सॉफ्टकोपी

काही काही बायका किती भाबड्या असतात यावर विश्वासच बसत नाही. हो, हो! मी भाबड्याच म्हणलो, बबड्या नाही. उगाच विषयाला भलतीकडे वळण नको. खरं सांगायचं झालं तरं नित्यनियमाने “ह्या बबड्याने वीट आणलाय नुसता!” असं उच्चारानेच या मालिका नित्यनियमाने का पाहतात? हा मोठा गहन व भाबडा प्रश्न मला पडतो. बरं इथपर्यंत ठीक आहे हो! पण काही बायका तर नवऱ्याला चिडवायचं म्हणून दिवसभर बबड्या! बबड्या! म्हणून हाक मारत बसतात त्यांचं काय करावं. (माझी नाही, उगाच गैरसमज नको. हा! सोनू , सोनू! करते तशी कधी कधी. पण ते बबड्यापेक्षा बरंच!

असो, तर आपण बबड्याला वगळून पुन्हा आपल्या भाबड्या मुद्द्यावर येऊयात. पण मुळात बायका (काही काही) खरचं भाबड्या, निरागस असतात का हो? का त्या तसं दाखवतात?  कारण बऱ्याच जणी तर येडगावच्या पेढे खाणाऱ्या असतात, तर काही खरोखरच येडगावच्याच असतात. पण,काहींच तर तंत्रच निराळं. खरचं कधी कधी काहीच कळत नाही.  साक्षात भगवंतालाही न उमगलेले.

तर झालं असं की, माझे स्नेही देशपांडे, असेच एकदा एक कोडं सोडवायला सरकारी बँकेत गेले असता; त्यांना अशाच एक भाबड्या मॅडमचा साक्षात्कार झाला. सहसा सर्वसामान्य माणूस बँकेत पैसे भरायला जातो, नाही तर पैसे काढायला. या व्यतिरिक्त सामान्यांसाठी गुंतवणूक, सुवर्ण योजना, माफक व्याजदर, झिरो प्रोसेसिंग या सर्व बँकवाल्यांनी पेरलेल्या निव्वळ ढोबळ संकल्पना आहेत.  खरतरं सर्वसामान्य माणूस हा देशपांडेंसारखं कोडंच सोडवायला बँकेत जात असतो. कारण सरकारी बँकांचे अनाठायी कटिंग हे सामान्य माणसाला तर सोडाच, पण बँकेतील अधिकाऱ्यांनाही न उमजलेलं एक कोडंच आहे. तसे एटीएम आणि इंटरनेट बँकिंग आल्यापासून हल्ली बँकेत खस्ता घालण्याची वेळ तशी कमीच येते, तरी सरकारी बँकांचे होमलोनचे गणितं आणि त्या गणिताच्या घोळात अडकलेला सामान्य माणूस अजूनही तसा सुटलेला नाही. अशाच एका चक्रव्यूहात अडकलेले आमचे देशपांडे, बऱ्याच दिवसांपासून इंस्टॉलमेंट, प्रिंसिपल आणि इंटरेस्ट यातलं गणित सोडवण्याच्या असफल प्रयत्नात होते.

अशाच एका सकाळी देशपांडेंनी बँकेत पाऊल ठेवाला. काउंटर समोर हनुमानाच्या शेपटी सारखी वाढत चाललेली वेटोळी रांग, कोठून सुरू होत होती आणि कोठे संपत होती, तेच कळत नव्हते. बँकेचा बिनगोळ्या रायफलधारी शिपाई, बँकेची शांतता भंग पावणार नाही या जिकरीने जोर जोरात हातवारे करून सरळ रांगेत उभं रहायला सांगत होता. वेटोळी रांग, स्टीलच्या जाळीदार खुर्चीत काठीवर दोन्ही हात ठेवून वाट पाहणारे पेन्शनधारी आजोबा, पेनच्या प्रतिक्षेत एकमेकांच्या मागे उभे असलेले विसरभोळे गोकुळ, तोंडावर चित्रविचित्र छटा उमटवीत सर्वांना शांत करणारा तो शिपाई, कॅबिनमध्ये लुकलुकणाऱ्या ट्यूब लाईट्स, लादी पुसल्यावर फायलींच्या गंधला दाबू पाहणारा लेमनफिनाईलचा मंद दरवळणारा सुवास, चहाचा घोट घेत कुजबुजत चकाट्या मारत बसलेले बँक कर्मचारी आणि बँकेतल्या घड्याळाच्या दोलकासम उभ्या उभ्या डोलणारी लोकं….सगळं एखाद्या चार्ली चॅप्लिनच्या जुन्या मुकपटातल्या सिन सारखं भासत होतं.

खरतरं हॉस्पिटलमध्ये शांतता पाळावी हे समजू शकते, पण बँकेत शांतता का पाळतात हे मला लहानपणी न उमजलेलं कोडं. कदाचित मोठया आवाजात बोलले तर हिशोब चुकून परत परत नोटा मोजाव्या लागू नये किंवा बँकेत चोरपावलांनी चोर शिरले तर त्यांचा सुगावा लागावा किंवा ‘तुमच्या अकाउंटवरून चुकून दुसऱ्याच्या अकाउंटवर अचानक पैसे वळते झाले आहे’ हे मोठया आवाजात सांगितले तर ती व्यक्ती लागलीच हार्ट अटॅक येऊन परलोकी जाऊ नये….यासाठी शांतता पाळत असतील असा माझा तेव्हाचा भाबडा अंदाज होता. लहानपणी तसे मला खूप प्रश्न भेडसावत, पण त्यांचे उत्तर द्यायला सर्व टाळायचे.  तुम्हाला सांगतो! माझ्यासमोर कोणी नुसतं “आमच्या लहानपणी” हा शब्द जरी उच्चारला तर मी त्याचा संपूर्ण दिवस सत्कारणी लावल्याशिवाय थांबत नाही. 

“काम निपटून आपण ऑफिसला लवकर पोहचू” या आशेवर देशपांडेंनी मोठ्या मनाने दगड ठेवून, मनोमनी मराठवाड्याच्या चार शिव्या हासडत त्या रांगेत उभे राहिले. तेवढ्यात रांगेतला एक किडकिडीत व्यक्ती, घशाचा सायलॅन्सर फुटावा अशा खरखरीत आवाजात ओरडला “अहोsss! ओ मिस्टरss! शुssक शुsssक! ऐकलं का! आम्ही मूर्ख आहोत का सकाळपासून रांगेत उभा राहायला?” एव्हाना महाराष्ट्राच्या कोणत्या शहरात हा किस्सा घडला होता, हे किंबहूना तुम्हाला कळलंच असेल.  बावरलेल्या देशपांडेंनी नेमकं काय चुकलं हे बघायला स्वतः भोवती एक प्रदक्षिणा मारली आणि देशपांडेंना गोची कळली. नेमका पहिला आणि शेवटचा माणूस कोणता यातच त्यांची गफलत झालेली.  तोंडातून शब्द न काढता “फोकलीच्या नीट सांग की मंग” या अविर्भावात देशपांडे त्या व्यक्तीकडे डोळे वटारून बघत बाजूला झाले.

देशपांडेंची नजर रांगवाल्या दुसऱ्या, तिसऱ्या काऊंटर पर्यंत भिरभिरली आणि शेवटी चौथ्या ‘नो रांग’ वाल्या काऊंटरवर येऊन थबकली. चौथ्या काउंटरवर एक सोडा बॉटल चष्माधारी, सुस्त ठेंगण्या मॅडम शिक्के मारण्याच्या कामात तल्लीन होत्या. मिनिटाला एक शिक्का, ह्या त्यांच्या अतिसुसाट वेगावरून त्यांची सुस्तता उभारून येत होती.
तुम्हाला सांगतो शिक्के मारण्यासारखं कोणतंच सोप्प काम नाही.  इंकपॅडमध्ये शिक्का बुडवायचा आणि खाडकन कागदावर आपटायचा. लहानपणी मला तर आमच्या शाळेतल्या चपराशी काकांचा खूप हेवा वाटायचा.  खाकी गणवेशातील त्या काकांना आम्ही नेहमी बुडव-पटक, बुडव-पटक! याव्यतिरिक्त ईतर कोणते काम करतांना पाहिलं नाही. तसे इतरवेळी तर ते खुर्चीवर बसून डुलक्याच मारायचे. बुडव-पटक! आहहह! किती सुटसुटीत काम ते!  मोठेपणी असलंच काहीतरी सुटसुटीत काम आपणही करावं ही मनिषा उराशी बाळगून होतो. एकदा मी हीच ईच्छा चुकून पप्पांसमोर व्यक्त केली, तेव्हा पप्पांनी माझ्या कानाखाली पाच बोटांचा लाल शिक्का उमटवून “उद्यापासून गुरं हाक.शिकू नको!” असा यथासांग सोपस्कार घडवला.

तर ऑफिसात लवकर पोहचायची पुन्हा उफाळून आलेली उबळ, देशपांडेंना नाईलाजास्तव त्या मॅडमपाशी घेऊन गेली.

“मॅडम माझं प्रिंसिपल कमी आणि इंटरेस्ट जास्त कट होतोय.”

मॅडमने अगदी गोगलगायमोशनमध्ये मान वर करत, एका हातातला शिक्का बाजूला ठेवला आणि नाकाच्या शेंड्यावर आलेल्या चष्माला दोन बोटांनी वर सरकवत, त्या चष्म्याला आत्महत्येपासून परावृत्त केलं. 

“इंटरेस्ट कट होतोय, अरे व्वा! इंटरेस्टिंग आहे!”

“अहो! काय इंटरेस्टिंग आहे. माझं डोकं इथं भंजाळून गेलंय आणि तुम्हाला पाचकळ विनोद सुचताय?”

“लोन काढल्यावर अकाउंटवरून इंटरेस्ट कट नाही होणार, तर काय टोमॅटो,भेंडी कट होणार! प्लिज, तुम्ही त्या रांगेत उभे राहून किडमिडे साहेबांची वाट पाहू शकता.”  मॅडमच्या ड्रॉवरमध्ये निवडलेल्या गवारकडे पाहून देशपांडेंनी मॅडमची टोमॅटो, भेंडीची उपमा फारशी मनाला लावून नाही घेतली,
पण त्यांचा अजब स्वभावगुण देशपांडेंच्या डोक्यात गेला. त्यांनी फणफणत काउंटर सोडले. मान वळवून पुन्हा एकदा रांगेकडे नजर फिरवली, तर दोन्ही डोळ्यातली दोन्ही बुबुळे विरुद्ध दिशेला खेचल्या गेली. रांगेत लटकण्याची शिरशिरी अंगात भरणार तेवढयात पँटमध्ये अचानक झुरळ शिरावे तसा अंगातून करंट पास झाला आणि ते डोळे मिचकावत परत मॅडमकडे बघू लागले.

देशपांडेंनी दोन्ही हात आदरपूर्वक जोडत, मॅडमला विनवणी मुद्रेत एक मंद हास्य दिलं.  “ह्यssह्यs! मॅडम, मला फक्त माझं अकाउंट स्टेटमेंट समजावून सांगाल का?”

“अहोsss, असं प्रत्येकाला स्टेटमेंट समजावून सांगत बसले तर कसं होईल? “

“बरं ठीक आहे! मला प्लिज स्टेटमेंट द्या.”

मॅडमने देशपांडेंकडे एक भेदक कटाक्ष टाकला. पुढे गोगलगायमोशनमध्ये प्रिंटर चालू केल्या गेला, त्यात पेपर भरल्या गेले, त्याचे झाकण लावल्या गेले, डेस्कटॉपची स्क्रिन साफ केल्या गेली, अकाउंट नंबर टाकून चारदा चुकवल्या गेला,  देशपांडेंचे अकाउंट तपासले गेले आणि मग प्रिंट सोडण्यात आली. अशा प्रकारे मॅडमने स्टेटमेंटची प्रिंट द्यायला तब्बल दहा-पंधरा मिनिटे खाल्ली. एखाद्या घरकामवाल्या बाईला ‘तू काय काम केले?’ हे विचारल्यावर ती जशी एक सुरात सांगते, “भांडी काढली, भांडी घासली, भांडी धुतली, भांडी वाळवली, भांडी लावली” अगदी तसंच मॅडमपण स्वतःच्या दिवसाचा हिशेब मॅनेजरने “आज काय केलं?” हे विचारल्यावर सांगत असाव्यात.
एका अतिकिचकट कामातून सुटका मिळावी तसं मॅडमने सुस्कारा सोडत प्रिंटरवर आलेली स्टेटमेंट देशपांडेंच्या हातात थोपवली.  देशपांडेंनीही मुळीच वेळ न दडवता, तिथेच स्टेटमेंटचे पोस्टमार्टेम करत एक-एक प्रश्न मॅडमला विचारायला सुरवात केली. तन मन धन एकवटून देशपांडेंच पूर्ण लक्ष स्टेटमेंटमध्ये खुपसलेलं होतं आणि मान खाली घालून बसलेल्या मॅडमची तिरकस वटारलेली नजर देशपांडेंवर भिनली होती.

“अहोsss, तुमच्यामूळे मागची लोकं खोळंबली आहे. तुम्ही तुमच्या प्रश्नांचे क्षपणास्त्र घेऊन मॅनेजर सरांच्या केबिनमध्ये जा. मी इथे आत्ताच रुजू झाली आहे. तसाही माझा इथे नववाच दिवस आहे.”

अजून हुज्जत घालत बसण्यापेक्षा, देशपांडे सरळ मॅनेजरच्या केबिनमध्ये शिरले आणि स्वतःच्या डोक्यातल्या प्रश्नांची मेणबत्ती मॅनेजरसमोर पेटवली. मॅनेजरने ही तोडकीमोडकी उत्तरे देत लगेच त्यावर फुंकर घातली आणि त्यांच्या हातात अर्धवट विझवलेली प्रश्नांची मेणबत्ती तशीच घेऊन माघारी धाडलं.

शेवटी देशपांडे पुन्हा त्याच मॅडमच्या टेबलपाशी पडलेलं तोंड घेऊन उभे राहिले. देशपांडेंनी त्यांना काही प्रश्न विचारावा आणि त्यांनी नजर चुकवत कोऱ्या रजिस्टरकडे बघावं, यातच सगळं काही आलं. तरी देशपांडेंनी धाडस करून मॅडमच्या पुढे सरसावले.

“मॅडम, मला स्टेटमेंटची सॉफ्टकोपी द्याल का प्लिज?”

सॉफ्टकोपी म्हणताच मॅडमच्या डोक्यातील काजवे बाहेर डोकावून लुकलुक करू लागले. “कॉपी ? दिली की तुम्हाला! अजून काय हवंय?”

“ही हार्डकोपी झाली. मला सॉफ्टकोपी द्याल का प्लिज.”

मॅडमने देशपांडेंकडून स्टेटमेंट घेतली आणि त्याकडे निरखून बघू लागल्या. मॅडमची चिंतातुर नजर व गडबडलेल्या मुद्रेवरून, ‘काहीतरी घोटाळा झाला आहे.’ हे देशपांडेंना स्पष्ट जाणवत होतं. मॅडम जागच्या उठल्या. आपल्या बाजूच्या सहकाऱ्यापाशी गेल्या आणि त्यांच्या कानात काहीतरी कुजबुजल्या. इकडे देशपांडेंना  ‘आपण काही विचित्र तर मागितलं नाही ना?’ हा प्रश्न पडला. तितक्यात त्या कामात अतिव्यस्थ सहकाऱ्याने आपल्या झुकलेल्या मानेला जराही त्रास ना देता, आहे त्याच स्थितीत “त्यात काय! द्या ना मग!” असे मॅडमला बडबडले. बावरलेल्या अवस्थेत मॅडम निमूटपणे आपल्या जागेवर येऊन बसल्या.

“हॅलो, मॅडम! स्टेटमेंट देताय ना!” देशपांडेंना मेणबत्तीचा अनुभव वाईट होता, म्हणून यावेळी त्यांनी प्रश्नांची धुपबत्तीच लावली आणि त्या धुपबत्तीचा धूप मॅडमच्या भिंगाच्या चष्म्यावर अच्छादला होता. एव्हाना मॅडमही त्या धुपात गुडूप होणार, तितक्यात देशपांडेंनी त्यांच्या टेबलावरचा पेपरवेट उचलला आणि ठकss ठकss ठकss करत तो धूप पांगवला.

“हंssss” म्हणत मॅडम दचकून समाधीतुन बाहेर आल्या आणि  त्या हार्डकोपीला न्याहाळत पुन्हा शुन्यात हरवल्या. मॅडमची चाललेली टाळाटाळ बघून, बँकेने आपल्या सोबत काही फसवणूक तर नाही केली ना? या मॅडमने काही लबाडी तर केली नसेल ना? मॅनेजर आणि या मॅडमने मिळून आपल्या अकाऊंटवर काही घोळ तर घातला नसेल ना? असे ना ना प्रकारचे प्रश्न देशपांडेंना भेडसावू लागले. मॅनेजरच्या कॅबिनकडे बघत देशपांडेंनी मनातल्या मनात च्याxx, म्याxx, आxxx,  भाxxx या अस्सल शिव्या हसडल्या. कदाचित त्यादिवशी शिव्यातले सर्व प्रकार बँकेच्या सुप्त कानांनी ऐकलं असेल.

“काय झालं मॅडम? किती वेळ थांबायचं अजून?” देशपांडेंनी  सूर चढवला. मॅडमने खालचा ओठ दातांखाली दाबत स्टेटमेंटवरची नजर हळूच देशपांडेंकडे वळवली आणि देशपांडेंचे आग ओकणारे डोळे बघून मॅडम भयंकर धास्तावल्या. शेवटी ततss फफss करत मॅडम बोलत्या झाल्या.

“तss तेssss सss सॉsss”

“मॅडम, काय ते नीट बोला हो! परत बालवाडीत गेल्यासारखं वाटतंय!”

शेवटी मॅडमने सर्व धीर एकवटला आणि देशपांडेंच्या कानाजवळ येऊन हळूच म्हणाल्या, “अहो, तुम्हाला आता जी हार्डकॉपी दिली आहे ना, तिला मऊ कशाने करून देऊ?”

“मऊ? म्हणजे?” देशपांडे चक्रावले.

“अहो, म्हणजे सॉफ्ट कशी करून देऊ?”

त्या भोळ्या जीवाचा तो भोळा प्रश्न ऐकून हसावं की रडावं? या  स्थितीत अडकलेल्या देशपांडेंचा ऊर भरून आला.  त्यांच्या अंगातला त्राण गेला, डोळ्यात पाणी तरळले आणि शेवटी ते एक दीर्घ उसासा सोडत हात जोडून नमस्कार घालत म्हणाले, ” राहू द्या बाई ….तुम्ही राहू द्या.”

देशपांडेंना त्या भोळ्याभाबड्या निरागस जीवाची, त्यांना झेलणाऱ्या त्या सहकाऱ्यांची आणि कॅबिनमध्ये बसलेल्या त्या मॅनेजरची अतोनात कीव आली. मॅडमच्या घामाटलेल्या हातात सॉफ्ट झालेली हार्डकोपी घेऊन, देशपांडे बँकेच्या बाहेर पडले.

                              समाप्त

       ……सदा हसते रहो.

मंगेश उषाकिरण अंबेकर
९८२३९६३७९९
http://www.mangesh ambekar.net

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.