बापमाणुस

“मला ते काय माहीत नाही. बाबा मला स्पोर्ट बाईक पाहिजे म्हणजे पाहिजेच.” मानस आज हट्टाला पेटला होता.

“हे बघ मला आता खरचं झेपत नाही. पोस्टग्रॅज्युएट होऊन आता वर्ष झालय तुला, तेव्हा तू कामाचं बघ आणि तुला वाट्टेल ते घे.” श्यामराव अगदी सणसणीत उत्तरले.

“या इथे..मला काय काम भेटणार? मला नोकरीसाठी शहरातच जावं लागेलं आणि तसही मी नोकरी शोधतच आहे. मी काही रिकामटेकडा थोडी बसलोय.”

“बरोबर, रिकामटेकडे तर आम्ही आहोत बाबा. तू तुझ्या मित्रांसोबत नोकरी शोधत किती कष्ट करतोय ते फक्त मला माहीत. अरे, एखाद्या हिरोलाही लाजवेल एवढं तू मित्रांच्या बाईकसोबत फोटो शूट करत बसतो, आडरस्त्यावर जाऊन गाड्या हवेत काय उडवत बसतो, मोबाईलवर तासनतास चालणारे ते निरर्थक टाईमपास गेम काय खेळत बसतो. तुला काही विचारावं तर त्याकडे तुझं धड लक्षही नसतं एवढा तू त्या ग्रुप चॅटींगमध्ये व्यस्त असतो. खरंय तू अजिबात रिकामटेकडा नाही रे बाबा.
अरे, जो पर्यंत नोकरी भेटत नाही तो पर्यंत इथंच राहून का काम करत नाही. त्या देशमुखांना अकाउंटंट हवाय त्याच्याकडे सुरू कर काम. सुरवातीला कोणतंही काम छोटं नसतं आणि कोणताच अनुभव कधी वाया जात नाही रे.” श्यामराव फ़ार वैतागून बोलत होते. मानसने उनाडक्या करण्यापेक्षा काहीतरी उचित काम करावं हीच त्यांची अपेक्षा होती.

“छेऽऽऽ तो देशमुख…त्याच्या स्वतःकडेच कसला अनुभव नाही आणि तो काय नोकरी देणार मला…. ते सोडा…तुम्ही मला बाईक घेऊन देता का नाही ते सांगा.”

मानसचं उद्धट बोलणं ऐकून मानसची आई त्वेषाने बाहेर आली आणि मानसला एक खणखणीत कानाखाली लगावली.
“बापाशी, बोलायची ही पध्दत रे तुझी. बाप मरमर करून पैश्याला पैसे जोडतोय…. ते हे दिवस बघण्यासाठी.”

“आई इथं कोणी कोणावर काही उपकार नाही करत. त्या सोहमच्या बापाने बघ त्यासाठी कार घेतली. तो काय नोकरीला नाही जात. पण मुलाच्या प्रेमापोटी त्यांनी हे केलं. मला माहीत आहे, बाबांकडे खूप पैसा आहे पण तो माझ्यासाठी नाही तो फक्त मिनलसाठी.” मानस अजून आवेशाने बोलू लागला.

“असं, मग तू का नाही करत काही काम. एवढं शिक्षण झालं ना तुझं. तुला नाही वाटतं की, आपण घराचा थोडातरी भार उचलायला हवा. तू शेअर मार्केटमध्ये कमावलेल्या पैशातून आजतागायत कोणती गोष्ट या घरात आणली कधी? का देवाने बाप दिलाय पोसायला त्याच्या जीवावर तो मरूस्तोवर जगायच असंच काही ठरवलंय का?

बापाने काही कमी पडायला नको म्हणून जिल्ह्याच्या मोठ्या कॉलेजात तुझं ऍडमिशन केलं, शिक्षण दिलं, येण्या जाण्याचा त्रास नको म्हणून बुडाखाली गाडी दिली, सगळ्या मुलांकडे मोबाईल असतो म्हणून तुला भारीतला स्मार्टफोन दिला. तू त्या मोबाईलचा तरी कधी सदुपयोग केला? शोधली एखादी नोकरी?  शिकला का काही नाविन्यपूर्ण? एवढं शेअर मार्केट कळत तर तुला साधे क्लासेस घेता नाही येत?
नुसता चॅटिंग, गेमिंग! त्या गेमिंगवाल्या कंपन्या तुमच्या अमूल्य वेळेच्या जीवावर मोठ्या होतात. तुम्ही नाही! एक लक्षात ठेव, तुम्ही तुमच्या जीवनातला किती अमूल्य आणि कधीही परत न येणारा वेळ वाया घालवताय हेच तुम्हाला सध्या कळत नाहीए आणि जेव्हा कळेल तेव्हा तुमच्याकडे अजिबात वेळ नसणार. मला सांग, कोणत्या गेम ने तू काय शिकला? वा तुझ्या बुद्धिमत्तेत काय फरक पडला? हे तू सांगू शकेल? तुम्ही स्वतःची अक्कल गहाण ठेवून त्या कंपन्यांची पोटं भरताय…आणि ते ही ह्या बापाच्याच पैशाच्या जीवावर, जो कधी एका शब्दाने तुला काही कमी पडू देत नाही आणि तू म्हणतो तुझ्या बापाचं तुझ्यावर प्रेम नाही. आज बापाचं इतकंस बोलणं एवढं लागतंय, तर दाखव काही कर्तृत्व करून!” आईने आज रोद्ररूपच धारण केलं होतं. इतक्या दिवसापासून मानसची बाबांसोबत चालणारी रोजची किटकिट, एकदाची कायमस्वरूपीच संपवण्याचा आईचा प्रण होता.

“सुरेखा, बस झालं. तू शांत हो बघू.” श्यामरावांनी वातावरण शांत करण्याचा एक निरर्थक प्रयन्त केला.

“काय शांत हो! तुम्ही पहिलेच यांच्या तोंडात लगावली असते ना तर निदान आज ही थेरं तरी बघायला भेटली नसती. काय झालं असतं! जास्तीतजास्त हा घर सोडून गेला असता, नाहीतर कुठे जाऊन जीव दिला असता. पण ते केलं असतं तर बरं झालं असतं. लाड पुरवण्याचे हे नासकं फळ भेटलं आपल्याला.”
मानसचा संताप संताप झाला. नेहमी शांततेत समजावणारी आईचा हा अवतार त्याच्या कल्पनेपलीकडे होता. तो शेवटी रागराग करत घरातून बाहेर पडला.

“मिनल जा थांबावं त्याला.” श्यामरावांनी मुलीला सांगताच मिनल मानसला थांबवायला निघाली.

“मिनल त्याच्यामागे आजिबात जायचं नाही. हो घरात. घाबरू नका…असले पळपुटे लोकं जीव देत नाही, त्याला पण हिंमत लागते.” आईपुढे कोणाचेच काही चालले नाही.

त्यादिवशी मानस घरी परतला नाही, पण दोन दिवसांनी परत गुपचूप माघारी आला. त्यानंतर मानसने श्यामरावांशी पूर्णपणे बोलणं बंद केलं. काही लागलं तर मिनलला सांगून पैसे मागून घ्यायचा. उरलेसुरले तर शेअर मार्केटमध्ये पैसे लावून रोजच्या गरजा भागतील एवढं कमवायचा आणि कमावलेलं सगळं मित्र, बाईक आणि शानशौक पुरवण्यात उडवायचा. घरात त्याचं अस्तित्व फक्त जेवण आणि झोपण्यापूरतेच राहिले होते. मिनलने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केलं, पण सगळं पालथ्या घड्यावर पाणी.  श्यामराव तर रोज त्याच्याशी काहीनकाही काम काढून बोलण्याचा प्रयत्न करायचे पण मानसने अबोला धरला तो कायमचाच.

पुढे दोन वर्ष झाले पण मानसच्या वागण्यात यत्किंचितही फरक पडला नाही.

एक छानसं स्थळ मिनलसाठी चालून आलं. श्यामराव आणि पाहुणे मंडळी अगदी एकमेकांना साजेसे भेटले. मिनलने भावाला पाहुण्यांबद्दलची कल्पना दिली. तिच्याकडे दुर्लक्ष करत, मानस जो सकाळी घराबाहेर पडला तो थेट मध्यरात्रीच परतला. मिनलने मानसला आपली पसंती सांगितली पण मानसला तिच्या लग्न विषयात काहीच स्वारस्य नव्हतं. मग मिनलने आईबाबांना आपली पसंती कळवली. चार महिन्यानंतर लग्नाची तारीख ठरली. श्यामरावांची लग्नकार्याची तय्यारी सुरू झाली.

एकेदिवशी संध्याकाळी मिनलने मानसला फोन केला, “मानस लवकर जोशी हॉस्पिटलला ये.” मिनलचा रडका स्वर काहीतरी अघटीत घडल्याची कल्पना मानसला देऊन गेला.

“आता काय झालं.” मानस त्वेषानेच फोनवर ओरडला.

“मानस….अरे, बाबांना…. कार्डिअ‍ॅक अरेस्ट” फोनवर बोलता बोलताच मिनलचा कंठ दाटून आला.

“एवढंच ना….मेले तर नाही ना.” काळजाला गोठवणारे मानसचे उत्तर ऐकून मिनलच्या छातीत धस्स झाले.

“हे बोलायच्या पहिले तू का नाही मेलास. अरे, तो आपला बाप आहे रे बाप! यापुढे तुझं तोंडही मला बघायचं नाहीये. तू मेला माझ्यासाठी.”

त्यादिवशीच श्यामराव देवाघरी गेले.

बापाबद्दल एवढा द्वेष मनात होता की मानसला बापाचे अंतिम दर्शन घ्यायलाही उपस्थित राहावं वाटतं नव्हते. शेवटी मित्रांनी त्याला समजावून घरी आणलं. पण आईने सांगितल्यानुसार अखेरीस मिनलनेच श्यामरावांना अग्नि दिला.

मानसने निर्लज्जपणाच्या सर्व सीमाच गाठल्या होत्या. इतकं होऊनही तो आईला बोलला, “इतका जपून ठेवलेला पैसा शेवटी काय कामाचा जर त्याचा उपभोगच नाही घेतला.” त्यादिवशी आईच्या चेहऱ्यावर निस्तेज भाव होते. ती काहीच बोलली नाही. मिनलने तर त्याच्याशी बोलणेच सोडले. आईला मानसकडून आता कसलीच अपेक्षा उरली नव्हती.

एका दिवशी मानस आणि त्याचा मित्र निलेश नेहमीप्रमाणे दारू पित बसले होते.

“आता मिनूच लग्न कधी ठरलंय मग.” निलेशने सहज म्हणून प्रश्न केला.

“आता इतक्यात कुठे रे, मला काही माहीत नाही. तसंही मला कोण विचारतेय त्या घरात.” मानस नेहमीप्रमाणे उद्विग्नपणे उत्तरला.

“मानस तू असं कस बोलू शकतोस. बहिण ना ती तुझी…आणि यापुढे तुलाच सांभाळायचं सगळं. काका गेल्यानंतर आता त्या घराचा तूच कर्ता पुरुष.”

“ये साल्या,डोक्याची मंडई करू नको. गप पी …नाही तर मी निघतो. घरच्या गोष्टीत तू का लुडबुड करतो.”

“ओके बाबा, बरं ते सोड, तू सोहमला भेटला का  इतक्यात.” मानसची चिडचिड पाहून निलेश लागलीच विषय बदलला.

“नाही राव, वर्ष-दीडवर्ष होतं आलं असेल बघ. तो गावकडेच राहतो ना आता”

“हा तो तिकडच असतो. परवा गेलो होतो तेव्हा भेट झाली. तुला आठवतं का, सगळ्यात पहिली एकुलती एक बियर आपण तिघांनी मिळून पिली होती.” निलेश म्हणाला.

“हो यार, काय मज्जा करायचो रे कॉलेजला आपण आणि सालं सोहमने, सिगरेटच्या धुराचे छल्ले सोडण्यापासून ते तंबाखू कशी मळायची इथपर्यंत सगळं शिकवलं होतं.” मानस कॉलेजच्या आठवणीत रममाण झाला.

“अरे, त्या दिवशी भेटलो त्याला, काय बदललाय तो सांगू. अचानक इतका असा पेटून उठलाय ना की विचारू नको. काम, काम नि फक्त काम. नुसता नोटा छापतोय. दोन वर्षापुर्वीच काका गेलं आणि त्यानं घराचं रुपडच पालटलं रे. साला त्याच्या सारखा छपरी एवढा सुधारेल असं वाटलंच नव्हतं.”

“काय बोलतोस! अरे त्याचा बापाकडे बक्कळ पैसा होता. बापाच्या पैश्यावर चालू असल सगळे सोंग आणि काय.” मानसचा, सोहमच्या ऐश्वर्याबद्दलचा कयास अजूनही तसाच होता.

“बापाचा पैसा छेऽऽऽ  अरे बापाने एवढी कर्ज करून ठेवली होती की घराचं कर्ज तर सोड, पण सोहमच्या बर्थडेला घेतलेल्या कारचे हफ्ते पण त्याला फेडावे लागताय.”

“काय बोलतोस!” मानस ऐकून एकदम आवक झाला.

“अरे, मी त्याला सहज विचारल एवढा काय पैसा छापतोय की, मित्रांना भेटायला वेळही नाही. कर्ज काकांनी केले होते, तुला थोडीच कोणी पकडणार आहे. मला म्हणाला, “नाही रे निल्या,  त्यांनी आम्हाला सुख देण्यासाठी कर्ज काढून आमचे एवढे सोहळे केले. आज ते गेले म्हणून काय झालं. पप्पाची इज्जत अशी निलाम होतांना नाही बघू शकत रे. आपण जिवंत असतांना त्यांचं नाव कोणी कर्जबुडवा म्हणुन घेतलं तर आपण त्याची औलाद नाही. थुऽऽऽ साला आपल्या जिंदगानी वर”.त्यांचं ऐकलं आणि सुन्न पडलो. यार, उस दिन दिल जीत लिया बंदेने!” निलेश बोलत होता आणि मानस फक्त स्तब्ध होऊन नुसता ऐकत होता.

“मानस तुला सांगतो, एका झटक्यात सगळं सोडलं सोहमने आणि कामाला लागला……..आणि इकडे आपण बघ…. अजूनही त्या सिगरेटचा धुरातच गुरफटून बसलोय. आपण वाईट गोष्टी किती सहज घेतो मित्राकडून, पण एखादी चांगली गोष्टही कशी काय शिकत नाही राव.”

मानस सोहमची कथा ऐकून सुन्न पडला. त्याला सोहमची गोष्ट खूप जिव्हारी लागली. त्याच्या डोक्यात नुसतं विचारांचा काहूर माजला. “हाच तो सोहम होता, ज्याच्याकडून सगळ्या वाईट गोष्टी शिकलो, ज्याचं बघून आपण मोठं मोठे शानशौक करायला शिकलो, ज्याच्या कार, बाईकचे उदाहरण देत आपण आपल्या बापाला सूनवायचो….आणि त्याच सोहमचं सगळं जीवनच एक भ्रम निघालं. आज आपला बाप गेला पण निदान आपल्या डोक्यावर असली कोणतीच कर्ज तरी लादून नाही गेला. आपल्या बापाकडे तर त्याच्यापेक्षा खूप काही होत. एक सोहम आहे, जो मेल्याला बापच नाव पण धुळीस मिळू नये म्हणून लढतोय आणि एक आपण आहो, जो बाप हॉस्पिटलमध्ये असतांना आपण त्याचं मरण मागत होतो. खरचं  किती कर्म दरीद्री होतो आपण. किती निचपणे वागलो. ” मानसच्या डोळ्यात पाणी तरळले. त्याने एक मोठा उसासा सोडला. काही न बोलता तो तिथून उठला आणि सरळ घरी गेला.

घरी जाऊन आईच्या पाया पडावं आणि सगळ्या चुकांची माफी मागावी, हेच विचार त्याच्या डोक्यात घोळत होते. घरी पोहचला तेव्हा मध्यरात्र पार उलटून गेली होती. दरवाजातून मानसने त्याच्या खोलीत डोकावून पाहिले पण आई तिच्या खोलीत गाढ झोपलेली होती. यावेळी आणि या अवस्थेत आईला भेटायला नको म्हणत मानसने आपला विचार बदलला आणि थेट आपल्या खोलीत गेला. ती पश्चतापाची रात्र मानसला असंख्य असह्य वेदना देऊन गेली. त्याने मनोमनी या पश्चतापाची परतफेड करण्याची गाठ बांधली.

पहाट झाली. मानसला किचनमधली खुडबुड ऐकू आली. तसा तो किचनपाशी गेला. आई काम करत होती. त्याने बाकी काही न बोलता सरळ मिनलच्या पाहुणेमंडळींचा फोन नंबर आणि पत्ता मागितला. आई त्याच्याकडे बघतच राहिली. हा काहीतरी भलतंसलत करणार तर नाही ना, म्हणून ती थोडी गोंधळून गेली.
मानसलाही तिचे भाव कळले आणि त्याने आईच्या नजरेत नजर मिळवून तिच्या हातावर आपले दोन्ही हात ठेवत तिला दिलासा दिला. आईला त्याचा डोळ्यात एक पश्चतापाची किनार दिसली आणि अखेरीस तिने मानसला फोन नंबर आणि पत्ता दिला.

मानसने तासाभरात स्वतःला आवरून, अगदी नीटनेटका होऊन पाहुण्यांच्या घरी निघाला. त्यांचं गाव दोन तासांवर होतं. मानस बाईक घेऊन त्यांच्या घरी पोहचला.

“काका, बाबांची खूप इच्छा होती की त्यांच्या देखत मिनलच लग्न खूप धुमधडाक्यात व्हावं.”

“हो. पण नियतीला काही वेगळंच….”

“काका, आम्हाला वाटतं की हे लग्न व्हावं. मिनलचीही तीच इच्छा आहे. बाबानी जे ठरवलं होतं अगदी त्याप्रमाणे लग्न होईल. तुम्ही फक्त हो म्हणा.”

“मानस, तू सगळं करशील हे आम्हाला ठाऊक आहे. पण आमचं जे द्यायचं घ्यायचं ठरलं होतं ते तुझ्याकडून खरचं पूर्ण होणार ना?” 

देण्याघेण्या बद्दलच ऐकून मानस किंचित डगमगला. पण स्वतःला सावरत परत बोलता झाला, “काका, मला देण्याघेण्याचं जे असलं ते सांगा. तशी माझी ऐपत तर नाही पण मी नोकरी करून बाबांनी जो तुम्हाला शब्द दिला आहे, तो नक्की पूर्ण करेन.”

“तसं द्यायचं घ्यायचं सुरेखाताईंना माहीतच आहे…आणि तुला मान्य असेल तर ठीक आहे. या महिन्यातच आपण यांचं लग्न उरकून टाकूयात. लागा मग तयारीला.”

मानसला पहिलं यश चाखून खूप आनंद झाला. त्या आनंदाची तयारी करण्यासाठी त्याने कंबर कसली. त्याने पाहुण्यांचा निरोप घेतला आणि माघारी परतला.

मिनल आणि आई, मानसची फार आतुरतेने दारातच वाट पाहत होत्या.  मानसने घरी येऊन आईला आणि मिनल सर्व इति वृत्तांत सांगितला.

आईने मानस येण्याची कल्पना पाहुण्यांना दिली होती आणि मानस जसा तिथून निघाला तशी पाहुण्यांनी मानसची गोड स्तुतीसुमन आई पर्यन्त पोहचवली होती. मानसचे एकेक शब्द ऐकत…आई आणि मिनल एकमेकांकडे बघत चोरुन हसल्या. मानसमध्ये अचानक झालेला एवढा बदल बघून आई आणि मिनल खूप अचंबित झाल्या.

“अरे, पण …”

“काही काळजी करू नको आई. मला माहीत आहे तू पैश्याबद्दलच विचारणार आहे ना….?मी येता येताच देशमुखकाकांना भेटुन आलोय. ते मला उधार द्यायला तयार आहे. लग्न उरकलं की, मी त्यांच्याकडे काम करून सगळी परतफेड करणार आहे.”

“सोन्या, मला पैश्याची मुळीच चिंता नाही, ती तर तुझ्या बाबांनी खूप पहिल्यापासून करून ठेवली आहे. अगदी मिनूच्या दागिन्या पासून ते रुखवतापर्यन्त, सगळी सोय त्यांनी करून ठेवली होती. राहिलं देण्याघेण्याचं तर पाहुणे हुंडाविरोधी होते, म्हणूनच मिनू आणि आम्ही दोघे तयार झालो होतो. त्यामुळे पैश्याची चिंता करायची तुला काहीच गरज नाही. तुझ्या बाबांना शेवटच्या क्षणी पण मिनूच्या लग्नाची चिंता नव्हती, तर चिंता होती ती फक्त तुझी. बाबांना तुझा उत्कर्ष पहाण्याची आणि तू त्यांना फक्त समजून घेण्याची एवढीच काय ती त्यांची इच्छा. त्यांना फक्त नि फक्त तुझा उत्कर्ष बघायचा होता आणि तुला नाव ठेवणाऱ्या लोकांपुढे मोठया गर्वाने मिरवत सांगायच होतं की मी मानसचा बाप आहे.”

“बाबा….बाबा…” ओरडत मानसने जोरात हंबरडा फोडला आणि रडत रडत आईच्या पायावर कोसळला. “खूप चुकलो मी आई, माफ कर मला….माफ कर…माझा करंटेपणाच तो की, जो स्वतःच्या बापाचं मरण मागत होतो. दळभद्री आहे मी आई, खरचं दळभद्री! बाबांच्या अकाली जाण्याच कारण फक्त नि फक्त मीच. मी त्यांना कोणतंच सुख देऊ नाही शकलो. अगदी त्यांच्यासोबत दोन शब्द मनमोकळेपणाने बोलण्याचंही सुख मी त्यांच्याकडून हिरावून घेतलं. मी कोणत्या तोऱ्यात जगत होतो माहीत नाही. आई-बाप म्हणजे हक्काची माणस, त्यांना काही बोला, त्यांच्याकडून काही मागा, का तर त्यांनी आपल्याला जन्म दिला आहे म्हणून. जन्मदाते आहे म्हणून मरुस्तोवर त्यांनीच आपल्याला पोसायला पाहिजे फक्त हाच संकुचित विचार माझ्या डोक्यात असायचा. मुलाचंपण आईबाबांप्रती काही कर्तव्य असतं, हे मी कसं विसरलो. बाबांनी प्रायश्चित करण्याचा पण अवधी नाही दिला आणि आता मला त्याची सल अखंड आयुष्यभर सलत राहील.  मी बाबांच्या फोटोच्याही माफी मागायचा लायकीचा नाही. माफ करा मला.. माफ करा…माझा बाबा खरचं एक बापमाणूस होता….एक बापमाणूस “

आईचं हृदय दाटून आलं. मिनल आणि आईच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. आईने मानसला उभं केलं आणि घट्ट मिठी मारली. मिनलही त्या दोघांच्या मिठीत सामायिक झाली.

समाप्त

कथा कशी वाटली हे कळवले नाही तरी चालेल, पण आवडली तर निःसंकोचपणे शेअर करा. मग भले माझंनाव नाही टाकलं तरी चालेल. कारण या कथेतून एखादे कोवळे मन, किंचित जरी काही चांगलं घेऊ शकले तरच या कथेला मिळालेली ती खरी दाद असेल. असं मी मानतो.

आपले अगदी मनःपूर्वक धन्यवाद

जिते रहो….सदा अपनों की सुना

लेखक : मंगेश उषाकिरण अंबेकर
९८२३९६३७९९
www.mangeshambekar.in

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.