लहानपण देगा देवा ……

आज एका सोशल साईटवर मला माझ्या बालवाडीतल्या मित्रांचा समूह गावला. लहानपणीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. ऑफिसातून घरी जाऊस्तोवर तासाभराच्या प्रवासात सगळी जुनी पाने डोळ्यासमोर भरभर येऊन गेली. गोड जुन्या आठवणीत जस मन ढवळून निघत होत आणि तस तसं चेहऱ्यावर हसू फुलत होत. रस्त्यावरची लोकं मला “आज येरवाड्यातला एक बाहेर पडलेला दिसतोय” या नजरेने बघत होती, घरी आलो तसा मोबाईल हातात घेऊन बसलो आणि एक एक मित्र-मैत्रिणीच लड डोळ्यासमोर आली. काही मित्रांना ओळखायला मला बराच वेळ लागला, कारण त्यावेळेस ते गोंडस मुलं आता बरेच ओबडधोबड झाले होते. अर्थात मी सोडूनच,आम्ही तर पहिल्यापासून ओबडधोबडच.

या सर्व गडबतीत माझ्या दिनक्रमातल्या खुप गोष्टी मागे पडल्या होत्या, अन जस माझ्या ते लक्षात आलं तशी माझी नजर माझ्या “अग” वर गेली. तो पर्यंत तिच्या नुसत्या नजरेनं लाल झालेला बाण माझ्या हातातल्या मोबाईलवर लक्ष वेधुनच होता आणि तसा तो जोरात येऊन धडकला आणि माझा मोबाईल आपसुकच माझ्या हाथुन निसटून खाली पडला. मी बावरल्या गत तिच्याकडे बघत राहिलो……… त्या दिवशी मला पहिल्यांदा माझ्याकडे रोज मोबाईल मागणाऱ्या माझ्या लेकीची फार किव आली.

पण या सर्व घडामोडीत मन बिचारं अजूनही त्याच विचारात फार मुरलेले होतं. “बालपण” आपल्या आयुष्यातले निरागस आणि निःस्वार्थ दिवस कोणते असतील तर ते म्हणजे बालपण. त्या बालपणीचे सवंगडी आणि ती निखळ मैत्री फक्त. त्यावेळेस आपल्याला कोणी काहीही मागो आपण त्यांना किती सहजच द्यायचो, किती सहज कोणासोबतही मिसळायचो. कोणालाही किती सहज बोलायचो पण कधीच कोणाला कुठल्याही गोष्टींचा न कधी राग यायचा न कधी हेवा वाटायचा. पुढे पुन्हा नवे मित्र भेटले नाही असही काही नाही, पण निरागस जिव्हाळा मात्र याच मैत्रीत गवसला…….

आमच बालपण अश्याच एक सुंदर बालवाडीत बहरलं, कदाचित हल्लीच्या कारट्यांना बालवाडी म्हणजे काय हे माहितीही नसणार, शाळा होती शिशु विकास केंद्र, जिथे खऱ्या अर्थाने शिशुच्या विकासाची पायाभरणी झाली. माझी ही पहिली शाळा, घरापासून फक्त १ किलोमीटर लांब, तशी इतरांना पेक्षा मला शाळा जवळच होती पण त्यावेळी त्या इवलुश्या पावलांना देखील ती फार लांब वाटायाची.

वर्ग भरायचा तेव्हा आम्ही लाल, निळ्या, पिवळ्या अश्या वेगवेगळ्या रंगाच्या सुतलीच्या पट्टयावर (चटई) मांडया घालून, शुद्ध भाषेत सांगायचं झालं तर ‘फतकल’ मांडून बसायचो, एका मागे एक अगदी असरळ रेषेत बसायचो, मी बहुदा संतोष काटे, भणंग आणि एजाजच्या बाजूला बसायचो आणि बसण्यापेक्षा खोड्या जास्त करायचो आम्ही. असच एकदा नकळत संत्याच्या डोळ्यात माझा बोट गेलं….. जाणारच की राव….संत्याची ची बुबुळ नाकापेक्षा पुढे होती आणि अजूनही आहेच, चष्मा घातला की बुबुळ काचेला लागतात. असो, पण त्यावेळी जाम घाबरलो होतो मी. कोणाला पण सांगून विश्वास बसत नव्हता, जे झालंय ते एक कुतकृत्य आहे आणि ते मी मुद्दाम केले असच सगळ्यांना वाटत होतं फक्त संत्या सोडून, कारण फक्त त्यालाच माहीत होतं की हे ‘तो मागे वळायला आणि मी त्याच्या खांद्यावर हाथ ठेवायला’ टायमिंग थोडा चुकला होता बस्स ! पण माकडाने अजिबात कोणाला न सांगता यथेच्छ फुटेज खाऊन घेतल हे प्रकरण प्रकर्षाने आठवतं कारण तो पहिला आणि अर्थात शेवटचा शेरा होता घरच्यांना शाळेत बोलवण्याचा. या सर्व प्रतापात आईची ओरड, पप्पांचा मार वजा फटके आणि बाईंच्या शिक्षा या सर्वांन पेक्षा जास्त वाईट याच वाटत होतं की या पुढे संत्या माझ्याशी कायमची कट्टी घेतो की काय आणि त्याप्रमाणे तसच काही झालंही, पण ते फार तर फार चार दिवस चालल, त्या मैत्रीची ओढचं अशी होती की, न त्याला माझ्याशिवाय अन न मला त्याच्याशिवाय काही राहवेना आणि मग शेवटी परत एकमेकांची पहिली दोन बोट जुळवून दोस्तीची मुहूर्तमेढ रोवल्या गेली, किती सहज दुरावे मिटायचे ना त्यावेळेस………अन त्यापुढे आजस्तोवर मैत्रीत कधी यत्किंचितही फरक नाही पडला.

आम्हाला सर्व शिक्षिका लाभल्या ज्यांनी खरंच घरच्यानं सारखी काळजी घेतली, विडुलकर बाई, काळे बाई आणि आमच्या मुख्यध्यापिका पांडे बाई. मॅडम म्हणायची रितभात नव्हती तेव्हा. एक पेक्षा एक सरस बाई सगळ्या. बाईंनी कोणाकडे नुसते डोळे मोठे करून जरी पाहिलं तरी आम्हाला कळायचं की हा आता छडी खाल्यावर छम छम करत नाचनार आहे, या नाचावर सगळे इतके दिलखुलास हसायचो जे की आता जगातल्या कोणत्या स्टँड-अप कॉमेडीयनला पण हसवायला जमू शकनार नाही.
संस्कार आणि अभ्यास या बाबत विचार केला तर त्यानीं जेवढ्या प्रार्थना आणि श्लोक पाठ करून घेतले ते आम्ही आमच्या मुलांना तरी पुस्तक हातात ना घेता शिकवू शकलो, पण जेवढे पाढे घोटून घेतले ते पुढे इंजिनिअरिंगच्या पायरी पर्यंत पुरले….. हो….नंतर हातात पडलेल्या कॅलक्युलेटरांनी मेंदूतील होत्या-नव्हत्या गणितशास्त्राचा बट्याबोळ केला.

सगळ्यात आवडता तास कोणता असेल तर तो म्हणजे मधल्या सुट्टीचा वेळ, सर्वांचे वेगवेगळे डब्बे त्यातली ती पदार्थ, अर्थात आजही माझी तीच गत आहे पण त्यावेळेसची मजा काही वेगळीच. शाळेला प्रांगण अस काही नव्हतं, शाळेसमोरच कमरे पर्यंत अर्धवट झालेलं दगडी बांधकामावर आम्ही गोल करून बसायच्या. जसा डब्बा उघडला रे उघडला की बाई लगेच सर्वांना हाथ जोडून “वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे” …… एकसाथ म्हणायला लावायच्या, माझं मेलं लक्ष “जय जय रघुवीर समर्थ” कधी म्हणतो त्याकडेच असायचं. डब्बे उघडल्यानंतर एकही मिनिट वाया जाणं म्हणजे मोक्ष मिळता मिळता परत पुढल्या जलमात ढकलल्या सारखं वाटयचं, कारण प्रत्येकाच्या डब्यातून येणार चटणी-पोळी, लोणचं भाकरी, साखरपोळी, बादशाही पोहे, फोडणीचा भात, पुरी भाजीच्या असल्या सर्वगुणसंपन्न पदार्थाच्या सुगंधानेच पोटात उंदर आकांडतांडाव करायची. त्या जेवणात एक वेगळीच तृप्ती होती ना कोणती पोट सुटायची भीती ना कोणत्या कोलेस्ट्रॉलची चिंता.

त्यावेळेस घरचे आम्हाला बळजबरीने विडुलकर बाईकडे शिकवणी ला पाठवायचे आणि बाई वर्षातून एकदाच रिपोर्ट दायला आमच्या घरी यायच्या तो दिवस म्हणजे संक्रांतीच हळदीकुंकू, त्यादिवशी मी असले नसले खेळ सोडुन घरीच बसायचो, कारण तस काही नव्हतं, पण उगाच आपल्या आई समोर आपली अधिक प्रशंसेची भीती आणि त्याहूनव भोळी संकल्पना ही होती की आपल्या समोर बाई थोडं कमी सांगतील पण व्हायचं सगळं उलट…….मी, अभिजित आणि पुजारी तीन टोकाला राहायचो आणि एका चौकात भेटून पुढे शिकवणीला जायचो, टेलिफोन किंवा मोबाईल नसतांनाही आमचा टायमिंग कधीच चुकला नाही. घरच्यांनी बाईंकडे शिकवणी परीक्षेसाठी नाही तर आमचे पाढे आणि अक्षर सुधराव,पण खरं मुळ कारण म्हणजे ‘गल्लीतल्या पोरांसोबत उनाडक्या मारण्यापेक्षा शिकवणीला गेलेलं बर’ हे होत. कारण परीक्षा तर त्यावयात फारच गमतीशीर परीक्षा असायच्या, परीक्षांसाठी शिकवणी हा प्रकारच नसायचा, कारण त्यावयात परीक्षा पण फार गमतीशीर असायच्या आणि परीक्षा प्रश्न पण काय तर वीस फळांची नावे लिहा, महिन्यांची नावे लिहा, पालेभाज्यांची नावे लिहा, रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा. पण हे शेवटचे दोन प्रकार आयुष्यात पुरते उरून पुरले, आजही कामाला कोणी दांडी मारली की त्याची रिकामी जागा आम्ही भरतो आणि कोणाला कोणासोबत काम करता येईल याचा जोड आम्ही व्यवस्थित लावून देतो.

आमचं गणवेष पण छान होता लाल चड्डी आणि पांढरा सदरा. रंगा-अंगाने कितीही बेढब असलो तरी आम्ही सर्व गोंडसच दिसयचो त्या गणवेशात, पण एवढा चांगला गणवेष फार क्वचित मुलांकडून स्वच्छ राहायचा कारण बरीच मुलं रडपडत आणि अक्षरशः खाली पडून लोळत शाळेत पोहचायची…….. आणि शाळासुटे पर्यंत टम्म फुगलेली असायची, सर्वात सुमुधूर एकच संगीत माहिती होतं ते म्हणजे लाकडी हातोडी जेव्हा पितळेच्या प्लेटवर टन टॅन टन टॅन वाजयचं……हूSरSरे शाळा सुटली,पाटी फुटली……..शाळा सुटायची तेव्हा मी, मंदया आणि गण्या पाठीवर दफ्तर घेऊन एका हाताने शेंबडान बरबटलेले नाक पुसत पुसत आणि एकाने घसरती चड्डी सांभाळत सांभाळत घरा पर्यंत शर्यत लावायचो. कोणीही जिंको भेटायचं तसं काहीच नाही उलटं येतायेता परत कुलकर्णयांच्या कुत्र्याला का डिवचवून आलास म्हणून आईची ओरड पडायची, पण या सगळ्यात घाई असायची ती दफ्तर पलंगावर फेकून लवकर खेळण्याचं जायची.

असो, आणखी बरंच काही आहे सांगण्यासारखं आणि न सांगण्यासारखं. मित्र आहेत आजसुद्धा, अगदी जीवाला जीव देणारे पण या शाळेतल्या मित्रानं विषयी एक वेगळी आत्मीयता आहे. त्याच कारण म्हणजे त्या नकळत्या वयातली मैत्री निरपेक्ष होती. आपलं वय वाढत तसे अनुभव येत जातात, अक्कल येते, मत बदलतात आणि मग राग, लोभ, मत्सर, द्वेष यासारखे अवगुण नकळतपणे का होईना जडले जातात. मग माणूस नात्यांतून आणि मैत्रीतूनसुद्धा अपेक्षा ठेवू लागतो आणि तिथंच नाती कोमजली जातात. आज आपले भलेही विचार भिन्न, काम भिन्न, हुद्दे भिन्न, पण आपण आणि आपलं नात तसंच आहोत, निदान या निरागस नात्याला तरी आपण जपायला हवंच!!

अशीच मैत्री अबाधित राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना…….

जिते रहो……. सदा दोस्त बनाते रहो


१६ फेब्रुवारी २०१८

मंगेश उषाकिरण अंबेकर

९८२३९६३७९९

आपला अभिप्राय नक्की कळवा. आपला अभिप्राय माझ्यासाठी अमूल्य आहे…..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.