शीर्षक वाचुन थोडं बुचकळ्यात पडला असाल ना! दररोजच कांदा पोहे तर खातोच, आता त्यात “बादशाही पोहे” हा काय प्रकार बुवा ! तर या “बादशाहीयत” च्या मागे एक सुंदरता लपली आहे, ती पहीले तुम्हाला सांगतो.
आमचे पिताश्री श्री किरणराव अंबेकर यांना खाण्याबाबत असे फारसे काही स्वारस्य नाही पण बादशाही पोहे म्हणजे त्यांच्या जीव की प्राण. ते ज्या कंपनीत कार्यरत होते तेथे त्यांचा भलामोठा खादाडी मित्र परिवार होता. ते पण अगदी माझ्या मित्रानं सारखे “प्रचंड खादाडखाऊ”. फरक फक्त एवढाच असेल की आता डब्याला पावभाजी, मिसळ पाव, रोल, पनीर, इडली आणला की ताव मारतात आणि तेव्हा शिळ्या भाकऱ्या, पिठलं, खार लोणचं, वाटीभर ठेचा आणला की अक्षरशः तुटून पडायचे. या पैकी जर कोणी डब्यात हे आणलं तर त्या दिवशी त्या बिचाऱ्याची निर्जळीच समजा.
असो, तर हे सर्व सांगायचे कारण म्हणजे याच खवय्यां मंडळींनी एका सर्व साधारण अश्या स्वादिष्ट व्यंजनाला बादशाहीयत मिळून दिली. ते म्हणजे बादशाही पोहे अर्थात बाद झालेले असे शाही पोहे. या बादशाही पोह्यांवर आपण बऱ्याच चवीने आणि बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ताव मारतो जसे की “कुसकरा” उर्फ “भुगा” उर्फ “मनोरा” उर्फ “कुटके” उर्फ “चुरा” इत्यादि इत्यादी (तुम्हीही वेगळ्या प्रकारे संबोधत असाल तर कंमेंट्स मध्ये नक्की नमूद करा)
काही भागात याचं बऱ्याच नजाकतीने नाव घेतात “माणिक-पैंजण”, “रघुविलास” “श्याम सुंदर” तर काही भागात “कुट्टा”, “काला”, “कुटके”, “तुकडे” अशी म्हणाल तेवढी सहस्त्र नावे.
खरंतर हा पदार्थ बऱ्याच घरात सर्रास करतात, किंबहुना बऱ्याच घरात रोजच असतो. पण अपवादात्मक असे काहीजण आहेत की जे आदल्या रात्रीच्या पदार्थांना हातही लावत नाही पण बाजारातले आठवडाभर पूर्वीचे पदार्थ फेसबुकवर दाखवू दाखवू खातात. असो तो ज्याचा-त्याचा प्रश्न.
तर असे आपले बाद झालेले शाही पोहे, म्हणजे बादशाही पोहे अर्थात चुरा, भुगा……जेव्हा जिरेमोहरीच्या खमंग अश्या थुईथुई फोडणीत थोडा कडीपत्ता तडतडुन, कांदा खरपूस गुलाबी होतो आणि त्यावर झालेला हळदी तिखटचा माऱ्यात चपाती/भाकरीचा चुरा ज्यावेळेस नाहून निघतो. त्यावेळेस कोथींबीरीच्या साजात पोह्यांचा बादशाही थाट खुलतो ते म्हणजे बादशाही पोहे.
मंद आचेवर थोडेसे खुसखुशीत झालेले हे बादशाहीपोहे …आहहह ! काय लाजवाब याची चव…..म्हणजे जिभेला आणि पोटाला एक मनसोक्त मेजवानी. कदाचित त्याकाळी कोणत्या बादशहाला पण मिळाले नसणार अशी बरीच सुखं आपण उपभोगतो…..नाही का!
थोडक्यात सांगायचे झाले तर अगदी पोहे जसे करतात तसेच करू शकतात, फक्त पोह्यांचा ऐवजी चपाती/भाकरी चुरा घ्या आणि त्या आदल्या रात्रीच्या असेल तर उत्तमच.

तळटीप :-
१. चपाती चा बारीक चुरा मिक्सर ऐवजी हातांनीच करा (हातांच्या पाचही बोटात पंचतत्व आहे असं ऐकलंय)
२. हिरव्यामिरच्यां ऐवजी लालमिर्चीच तिखटच उत्तम
३. व्यवस्थित वाफळण्यासाठी पाण्याचा हलकासा हबका मारा
४. लिंबू किंवा दह्या सोबत उत्तम आणि हो….सर्वात महत्त्वाच
५. नवख्यांनी फक्त एक करा पोहे जसे भिजवतात तसे पोळ्याचा चुरा पाण्याखाली भिजवू नका😊….. नाहीतर झालं! (तसे आपले खवय्ये फार गुणी आहेत.)
जिते रहो….. सदा खाते रहो
मंगेश उषाकिरण अंबेकर
१८ जानेवारी २०१८
९८२३९६३७९९
आपला अभिप्राय नक्की कळवा. आपला अभिप्राय माझ्यासाठी अमूल्य आहे…..