मिसळ एक झणझणीत पदार्थ. ओह…सोssss सोssss सॉरी मुळात मिसळीला नुसतं पदार्थ म्हणणं चुकीचच. मिसळ तर एक चवदार, चटकदार आणि चमचमीत अश्या सर्व’च’संपन्न कुटुंबतील एक राजेशाही व्यंजन. मिसळला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी राजवैभव प्राप्त आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर अशा महाराष्टातल्या कानाकोपऱ्यात तुम्हाला मिसळीची चव एकसारखी भेटली तर नवलच. प्रत्येक ठिकाणची एक वेगळी खासियत आहे.
आपण कुठेतरी खाल्ली आणि घरी येऊन सेम तशीच केली, असं कधी मिसळबाबत होत नाही. नवख्या खानसाम्यांनी आपल्या करिअरच्या सुरवातीलाच याचा खटाटोप करू नये आणि केलाच तर जास्त अपेक्षा ठेवू नये. कोणताही व्यावसायिक आपल्या उत्कृष्ट मिसळची कृती कधीच पूर्णपणे देणार नाही,याचा अर्थ मी देतोय म्हणजे ती उत्कृष्ट नाही हे अस समजू नका.
कुठलेही आवडलेली मिसळ करणे म्हणजे तुमच्या जिभेची स्मरणक्षमता अतिशय शाबूत असावी लागते. हो मी जिभेचीच स्मरण क्षमते बद्दलच बोलतोय. कारण आपण जी अप्रतिम चव चाखली त्यातील सामग्री (इन्ग्रेडीएन्ट्स) आपल्या जिभेवर अक्षरशः नाचायला हवीत. तुमच्या जिभेवर जर ती चव रेंगाळली तर तुम्ही चाचण्या करण्यात सज्ज होऊ शकतात. त्यानंतरच तुम्ही त्याचा प्रयत्न करू शकतात आणि शंभर एक चाचण्या (ट्रायल्स) नंतर कुठे तुम्हाला सूर गवसतो, आणि एकदा का हा सूर गवसला तर तो आयुष्यभर तुमच्या सोबत राहतो हे पक्के.
मला खरंच सूर गवसला अस मी तरी नाही म्हणणार, परंतु ज्यांनी ज्यांनी ही चव चाखली त्यांनी मला इंजिनिअरिंगचे काम सोडून हॉटेल थाटण्याचा सल्ला दिला एवढं मात्र खरं.😀 त्यांच्या अतिआग्रहापाई हॉटेल तर नाही पण कृती लिहण्याचं धारिष्ट् करतोय, ते सर्वांनी तिखट मानून घ्यावे.😊

तुमच्या कौशल्याची पराकाष्ठा सर्वप्रथम वाटपापासून सुरू होते. वाटपासाठी थोडं सुक खोबर, उभा चिरलेला कांदा, चणाडाळ, खसखस तव्यावर खरपूस भाजावेत. हे सर्व पाटा-वरवंट्यावर मुबलक कोथींबीरी सोबत अगदी बारीक वाटून घ्यावं. मी पाटावरवंट्या ऐवजी दगडी ग्राइंडरवर वाटून घेतल, आणि चव अगदी पाटा-वरवंट्याचीच आली बघा.
मिसळ मुळात तर्रीबाज व्यंजन ज्यासाठी साहजिकच तेल थोडंस जास्तच घ्याव. त्यात तेज पत्ता, लवंग, चक्रीफुल, वेलची आणि थोडी दालचिनी टाकावी. त्यावर पुष्कळसा बारीक चिरलेला कांदा आणि आलं-लसुण पेस्ट टाकून व्यवस्थित परतून घ्यावी.

कांद्याला गुलाबसर रंग आला की आता वाटपाची तेलात उडी मारायची वेळ झाली हे समजून घ्यावं. वाटप तेल सुटुस्तोवर परतल्यावर त्यात लालेलाल तिखट, काळा मसाला, धणेपूड, जिरेपूड आणि थोडा गरम मसाला टाकावा. तेल सुटल्यावर त्यात मटकी, घुगऱ्या टाकून चांगली परतवुन आणि थोडी वाफाळून घ्या. आता त्यात गरम पाणी टाकावं, चांगल्या उकळ्या आल्यानंतर मटकी, घुगऱ्या शिजल्यात का बघून बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घेऊन फरसाण आणि लुसलुशीत पावासोबत चव चाखायला सज्ज व्हा.
ह्यात संपुर्ण कृतीत मी कुठल्याच प्रमाणाचा मुद्दामहून उल्लेख करत नाहीये. आपणच प्रत्येक सामग्रीच प्रमाण आणि रस्सा घट्ट किंवा पात्तळ हे आपापल्या आवडीनुसार ठरवा, ते पाप माझ्या माथ्यावर नको. बाकी आपण सूज्ञ सुगरण आहातच. नक्की छान होणार आणि जर उत्कृष्ट झाली तर मी हॉटेल थाटावी का नये तेवढं मात्र कळवा.

जिते रहो….सदा खाते रहो.
२४-०६-२०१८
मंगेश उषाकिरण अंबेकर
९८२३९६३७९९
आपला अभिप्राय नक्की कळवा. आपला अभिप्राय माझ्यासाठी अमूल्य आहे…..