माझ्या सारख्या सदैव भुकेल्या ढेरपोट्या समोर काळारस्याचे नुसतं नाव जरी काढलं तरी ही अतृप्त जीभ ओठांवर सैरसपाटा मारू लागते, पोटातला जठराग्नी पेटून उठतो आणि घसा नुसता लाळेचे घोट गिळतो, जीभेचे नुसते तुकडे तुकडे होऊन एक एक तुकडा हा काळा रस ग्रहण करण्यास पुढे सरसावतो. पण तसं काळ्यारस्स्या बाबत हे साधारणतः सर्वांचेच हाल.
एका गावाकडच्या घरंदाज घराण्यात उठून दिसावा असा कणखर धाठणीचा, ठसकेबाज लेक अर्थात झणझणीत काळारस्सा जो पूर्व महाराष्ट्रच्या शिरपेचातला मानाचा तुरा!
काळारस्सा करणे म्हणजे, कोण्या ऐऱ्या-गेऱ्याच काम नाही त्यासाठी असावी लागते ती जिभेची लगबग, पोटाची अतृप्तता आणि सर्व तन, मन आणि धन लावुन मोहीम फत्ते करण्याचं धारिष्ट.
मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशाचा अत्यंत जीवश्च-कंठश्च विषय पण ह्या प्रत्येक भागात बऱ्यापैकी वेगवेगळ्या पद्धतीने करतात, इथे मी खास मराठवाड्यात जशी बनवतात तशी लिहली आहे.
जसं लहानपणी प्रत्येकाला “मामाच्या गावी जाऊ या तूप रोटी खाऊया” अस वाटायचं तसच आम्हाला ही मामाच्या गावी जायची आणि विशेषतः खायची जाम उत्सुकता असायची फरक फक्त एवढाच की ती उत्सुकता तूप रोटीच्या ऐवजी काळारस्सा आणि भाकरीची असायची.

आमच्या मामाच्या हाथचा काळारस्सा म्हणजे एक सोहळा असायचा, व्हरांड्यात पेरुच्या झाडाखाली दोन काळ्या मातीचे रांजण रोवलेले होते त्यांच्या पासून दोन फूट दूर हा सोहळा पार पडायचा, स्वयंपाक गृहापासून एवढं दूर असण्याचं कारण म्हणजे आमची आजी तिला सामिष अर्थात गैर शाकाहाऱ्यांची प्रचंड चीड. ती चुलीकडे आम्हा कोणालाही (अर्थात सर्व पुरुष मंडळी) फिरकू ही द्यायची नाही. त्या दिवशी मला तर त्या निरागस भांड्याची फार कीव यायची कारण आजीची सकाळपासून भांड्यांसोबत कुस्ती चालायची, त्यातच बिचारी बरींच भांडी जीवानिशी गेली होती आणि जी उरली होती ती बिचारी सर्व अर्धमेलेल्या अवस्थेत आपलं जीवन जगत होती, कढईचे कान मोडलेले , तांब्याचे तळवे चमटलेलं, झारे मानेतूनच वाकलेले आणि राहिल्या त्या वाट्या चमच्याचे तर हाल बोलवतही नाही.
बरं एवढा प्रचंड विरोध असतानाही आमचे मामाश्री त्यांच्या निर्धारावर एकदम ठाम असायचे आणि अर्थातच नेताच इतका खंबीर असायचा त्यामुळे आमच्या सारखी कार्यकर्तेही सोकावलेली होती. आम्ही कार्यकर्ते म्हणवून घ्यायला कारण ही तसंच असायचं, कारण हा संपुर्ण डोलारा आमच्या खांद्यावर निर्धिस्त होता, ज्यात आमची दखल घेण्याजोगी कामे होती ती म्हणजे कांदा, कोथिंबीर सांगितले तसे निमूटपणे धुऊन, चिरून दायची, सुक खोबऱ्यांची उभी तुकडे करून दायची आणि अत्यंत क्लिष्ट काम म्हणजे लसुण शिलणे, पण सर्व क्लिष्टता काळ्यारस्या पोटी हसत खेळत पार पडायच्या. आमचे मामाश्री हेडकूक सारखी फर्मान सोडत आणि आम्ही किचन असिस्टंट सारखे त्यांचा आदेश पाळायचो. पाटा वरवंट्या वरील जबाबदारी मामी, मावशी किंवा आई चार हाथ लांबुन आणि आजींची नजर चुकवुन पार पडायच्या.
तर अश्या या काळारस्याचा सांगतासोहळा, तुमची उत्कंठा अजून शिगेला पोहचण्यापूर्वी मी सुरू करतो, अगदी मामा जशी करायचा आणि अजुनही करतो अगदी तश्याच प्रकारे मी आठवून आठवून शेवग्या सोबत केला आणि तोच तुमच्या समोर मांडण्याचा प्रयन्त करतो.
उभा चिरलेला कांदा, चणा डाळ, उभे तुकडे सुक खोबरं, खसखस, तिळ वेगवेगळी तव्यावर खरपुस भाजावें आणि वेगवेगळी पेस्ट करून घ्यावी. भाजणीला तेल अजिबात टाकू नये, नंतर भाजीच्या तर्री साठी आपला हाथ राखुन ठेवावा.
आलं-लसुण पेस्ट, कोथिंबीर पेस्ट वेगळी करावी.या सर्व पेस्ट पाटा वरवंट्यावर करून बघा, अजून खूप रुचकर लागते.
मनसोक्त तेल टाकावे , तेल गरम झाल्यावर त्यात तमालपत्र, दालचिनी, काळीमिरी,दगडफुल, स्टारफुल, लवंग, मोठी वेलची टाकावी. तेल चांगले गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा (तोही थोडा मनसोक्तच टाकावा) त्यात आलं-लसूण पेस्ट टाकून लालसर होउस्तोवर तळावी.

आता ह्यात भाजलेल्या सर्व पेस्ट तसेच कोथिंबीर पेस्ट टाकून अगदी व्यवस्थित परतवा, तद्नंतर काळा मसाला ७०%, आलं-लसुण मसाला २०%, तिखट/कुटलेली काळीमिरी १५%, आणि गरम मसाला ५% टाकावे. हवे असेल तर मसाला % प्रमाण आपआपल्या जिभे आणि पृष्ठ भागाच्या क्षमते तसेच योग्यते नुसार बदलावे, त्यात थोडी धने पूड टाकून तेल सुटेस्तोवर परतावे.
ह्या सर्व मिश्रणात C टाकुन मस्तपैकी तेल सुटेस्तोवर परतावा आणि त्या नंतर त्यात गरम पाणी योग्य त्याप्रमाणात टाकून शिजवावे. C शिजल्यानंतर योग्य प्रमाणात मीठ घालावे (C शिजले का नाही त्यासाठी अधूनमधून थोडे थोडे वाटीत घेऊन चाखून बघावे, तेवढाच पोटाला आणि जिभेला दिलासा.)
तर अश्या प्रकारे स्पेशल काळारस्सा C तय्यार. चव न आवडल्यास पुन्हा संपूर्ण पाककृती शंभरदा वाचुन मगच करावी नाहीतर तुम्ही काहीतरी काशी घातली आहे हे समजुन घ्यावे.
चव आवडल्यास नुसतं धन्यवाद करून आभार मानू नये, पुढल्यावेळी प्रत्यक्ष समोर सादर करावी नाहीतर पुढल्या वेळेस दुष्परिणाम भोवतात.
अति महत्त्वाची टीप:-
निरामिष C = वांगी, शेवगा, सोयाबीन चंक्स इत्यादी इत्यादी
सामिष C = खरंच सांगायची गरज आहे का?
जिते रहो……..सदा खाते रहो
मंगेश उषाकिरण अंबेकर
९८२३९६३७९९
आपला अभिप्राय नक्की कळवा. आपला अभिप्राय माझ्यासाठी अमूल्य आहे…..