“मी काय म्हणतो,जे झालं असलं ते दे. मला उशीर होतोय.”
“अरे, हे बघ ! पोळ्या झाल्या. कांदा पण परतला आता, फक्त बटाटे टाकुन थोडं शिजवले की झालं!….. भाजी तय्यार!”
तिकडे माझ्या ‘अगं’ची मला डब्बा देण्याची तगमग, तडफड सुरू होती आणि इकडे माझी ऑफिसला जायची धुसमुस चालू होती. त्यात या कोरोनाच्या काळात ‘डब्बा राहू दे!’ म्हणणं, म्हणजे सरळ सरळ ‘आज मी निर्जली उपवास करतो!’ म्हणण्यासारखं हो! एवढं धाडस कोणी करावं आणि त्यातल्यात्यात माझ्यासारख्या हावरटाने तर मुळीच नाही. तेवढ्यात परतलेल्या कांद्यावर माझं लक्ष गेलं. मी घट्ट डोळे मिटले आणि माझ्या सुपिक चवणीच्या मेंदूत एक ठेवणीतला पदार्थ आठवला. नेहमीप्रमाणे मी माझा हावरटबाणा जपत फर्मान सोडले. (आजच्या काळात बायकोला फर्मान सोडणं म्हणजे फक्त विनंतीच्या बरोबरीच हे कृपया लक्षात घ्यावे.)
“कांदा परतला का! …..थांब मग! एक काम कर, त्यात तिखट,हळद, कांदालसूण मसाला, धणेपूड, मीठ आणि फक्त शेंगदाण्याचा कूट टाक. मिनिटभर वाफेवर शिजव आणि दे डब्ब्यात.”
“अरे, हे काय?”
“याला म्हणतात कांद्याचं चुटचुटं.”
“कांद्याचं चुटचुटं? हा कसला प्रकार.”
“एकदम भन्नाट प्रकार! कांद्याचं चुटचुटं उर्फ कांद्याची चटणी उर्फ कांद्याची भाजी उर्फ म्हाद्या उर्फ कांदवणी उर्फ कलसा उर्फ पेंडपाला उर्फ ..…..अजूनही उर्फ उर्फ आहे पण ते सध्या राहू दे…तू आता फक्त पटकन डब्बा दे. तिकडं क्लाइन्ट कोकलत असेल माझ्या नावाने.”
“किती रे गडबड तुझी, छे! तुझ्या गडबडीत इथं डब्बा पण सापडत नाहीये.”
“डब्बा भेटत नाही! …..थांब! अजून एक काम कर. दोन पोळ्या एकमेकांवर ठेव, त्यावरच हे कांद्याचं चुटचुटं टाक. फॉईलपेपरमध्ये रॅप कर, ते पण नसेल तर न्यूज पेपरमध्ये आणि ते ही नसेल तर सरळ सुती कपड्यात बांध आणि दे.”
“कसला रे तू गडबड्या! छे!”
वैतागलेल्या बायकोसमोर आपली तळमळणारी, चुळबुळणारी, अस्वस्थ व किंचित हसरी भावमुद्रा कायम ठेवत, मी माझी शिदोरी उचलली आणि चोरट्या नजरेने तिच्याकडे बघत गुपचूप निघालो. गाडी हाकतांना असंख्य विचारात गुरफटलेल्या छोट्या मेंदूत एक विचार चमकला की, ‘कधीकाळी माझ्यासारख्याच एखाद्या गडबड, गोंधळ घालणाऱ्या अजागळ कारभाऱ्यामुळेच , एखाद्या कारभारणीनं झटपट अशा या चमचमीत, झणझणीत, चुटचुटीत आणि चविष्ठ व्यंजनाला जन्म दिला असेल का? तर कदाचित हो!’ धन्य त्या व सर्व कारभारणींची…. तसं झटपट रेसिपीपैकी भेंडी फ्रायनंतर कांद्याच्या चुटचुट्याचाच नंबर लागायला हवा. याबाबतीत जरी भेंडीने आपलं वर्चस्व आजतागायत अभाधित ठेवलं असलं तरी, चवीहून निष्कर्ष काढायचा झाला तर, कांद्याच्या चुटचुट्याचाच पहिला नंबर लागायला हवा!

नेहमी सगळ्यांचे वांदे करणारे हे कांदे, वर्षातून एकदा कधीतरी दहा रुपये किलो होतात आणि तेव्हा कुठे या चुटचुट्याची चव चाखायला मिळते. तसं मराठवाड्यात याला कांद्याची चटणी किंवा कांद्याची भाजी म्हणतात, पण माझ्या संगमनेरी मित्र श्री. श्री. मिलिंद पांडे यांनी सांगितलेलं नाव मला जास्त भावलं. कसं आहे ना! एखाद्या चमचमीत व्यंजनाला असं चुटचुटीत नावाचं शोभून दिसतं. नाव घेताच कसं! तोंडात लाळेच्या असंख्य लाटा उठाव्या, घश्याने एक घोट घेत त्या लाटांना सामावून घ्यावं आणि जिभेच्या शेंड्याने टाळूला सोडत... तोंडून एक मस्त,मोठा ट्याऽऽऽऽ! निघावा....तसं हे नाव 'कांद्याचं चुटचुटं' . नाहीतर एखाद्या चविष्ठ, चटपटीत पदार्थाला फतफतं हे नावं कुठे शोभून दिसता का राव? आता तुम्हाला म्हणून सांगतो कोणाला सांगू नका, मी फक्त नि फक्त त्या "फतफतं" या नावामुळे कैक वर्ष अळूचं फतफतं जिभेला लावलं पण नाही हो! पण कोण्या एकेदिवशी आईच्या अतिआग्रहास्तव जेव्हा चाखलं... तेव्हा जाणवलं की, आपण ते कैक वर्ष काय अप्रतिम चवीला मुकलो.....त्यामुळे 'नावात बरंच काही आहे' बरका! आणि निदान भाज्यांना तरी अशी चटकदार नावं ठेवायलाच हवी. जेणेकरून माझ्यासारखी नालायक कार्टी किमान चव तरी चाखतील. तर मी मधल्यासुट्टीत शिदोरी सोडली तेव्हा, त्या पोळीसोबत एकरूप झालेल्या कांद्याच्या चुटचुट्याचा नजारा बघून मी त्यावर अक्षरशः तुटून पडलो आणि नकळत लहानपण डोळ्यासमोर तरळलं. लहानपणी कोणाच्या डब्ब्यात कांद्याचं चुटचूटं असलं की, त्यावेळेपुरता श्रीमंत भासणारा तो राजबिंडा, डब्बा उघडताच क्षणात भिकारी व्हायचा. भूकेलेले लांडगे जसे दुसऱ्याच्या शिकारीवर तुटून पडतात, त्यापेक्षा भयंकर व हिंस्त्र प्रकारे आम्ही सर्वजण त्या चुटचुट्यावर तुटून पडायचो..... मग डब्बा आणणाऱ्याशी अगदी कट्टी असली तरी! त्यातल्यात्यात आमच्यातल्या काही खविसांचा एक एक घास म्हणजे अर्ध्या पोळीच्या बरोबरीचा. सद्यस्थितीत आम्ही जरी अंगाखांद्यानी भरलेले दिसत असलो तरी, त्याकाळी आमची कुवत काडी पैलवाना सारखी.... त्यामुळे त्या झुंबडीत आपल्या हाती मुरलेल्या पोळीचा जो काही तुकडा नशिबी लागत असे, त्यातच आम्ही आमचं सौख्य सामावून घ्यायचो. मसाल्यात ती मुरलेली पोळी म्हणजे सगळ्यांचा जीव की प्राण. लोणचं, ठेचा, चटण्या यांपैकी लोणच्यात मुरलेल्या पोळीची जशी बादशाहत बरकरार आहे, अगदी तशीच बटाट्याच्या काचऱ्या, भेंडी फ्राय, कारलं फ्राय या भाज्यांपैकी पोळीत एकरूप होऊन मुरणाऱ्या कांद्याच्या चुटचुट्याची बादशाहत बरकरार आहे.
पण या सर्व आठवणीत खरा सांगायचं भाग म्हणजे, आपल्या डब्यात कांद्याचं चुटचुटं आहे, हे माहीत असतांनाही ते कोणापासून न लपवता सगळ्यांसोबत शेअर करत स्वतःहून त्या शिकारीत सहभाग घेऊन, मस्ती करणारे ते चुटचुटीत सख्खे मित्र आता दुर्मिळच. असो…
याची रेसिपी द्यायची तशी खरंच गरज नाही, पण आपल्या प्रोटोकॉलला तडा जाता कामा नाही म्हणून झटकीफट सांगतो…..
तेलात मोहरी आणि जिरं तडतडले, की त्यात पाच-सहा कांदे मध्यम चिरून टाका. मीठ टाकून कांदा चांगला मऊसर परतल्या जातो असं म्हणतात, मी अनुभवलं आहे त्यामुळे तुम्हाला अनुभवायला हरकत नाही. काहीजण आपल्या आवडीनुसार यात ठेचलेला लसूणही टाकतात. कांदा चांगला परतून झाला की, त्यात कांदा-लसूण मसाला, हळद, तिखट, धणेपूड टाकून अगदी व्यवस्थित परतून घ्या. मग त्यात शेंगदाण्याचा मुबलक भरडसर कूट टाका आणि थोडं वाफवून घ्या. बारीक चिरलेली कोंथिबीर भरपूर टाका आणि मग काय! वाट कसली बघता! लोखंडी कढईत तासून निघालेलं कांद्याच चुटचुट्याची चमचमीत चव, भाकरी किंवा पोळीवर टाकून लागलीच चाखायला घ्या….आणि चाखली की तुमच्याकडे चुटचुट्याला नावाने हाक मारतात तेवढं मात्र नक्की कळवा.
जिते रहो….सदा खाते रहो.
मंगेश उषाकिरण अंबेकर
९८२३९६३७९९
http://www.mangeshambekar.net
Waah. Tondala paani sutle na rao…aata jewan zaale pan udya nakki hech banawnaar mi jewanaat.
LikeLike
नक्की करून बघ….. खूप चुटचुटीत पदार्थ हा….👌
अगदी मनापासून धन्यवाद🙏🏻😊😊
LikeLike