बायंगी (भाग-५ अंतिम भाग)

मुंबईला माघारी परतत असतांनाच माझे सगळे प्लॅन ठरले. माझ्या हातात बायंगी पडताच, जणू काही माझे सगळे प्रश्न सुटले होते. डोक्यात विचारांची चक्रे बेभान होऊन फिरू लागली. काय करायचं? कसं करायचं? हे सगळं ठरवूनच माझा पाय मुंबईत पडला.

मागचा पुढचा कुठलाही विचार न करता मी सगळ्यात पहिले नोकरीला लाथ मारली आणि व्यवसाय करायचं पक्क केलं. व्यवसाय, त्यासाठी लागणार भांडवल, कामासाठी माणूस, डोक्यात सगळं काही ठरलेलं होतं. मुंबईत व्यवसायासाठी सम्याने निवडलेला व्यवसायच करायचं ठरवलं. मी सगळ्यात पहिले माणिकला गाठलं. माणिकला सम्याच्या धंद्यातल सगळं ज्ञात होतं. मी त्याला, सम्या देत होता त्यापेक्षा दुप्पट पगाराची ऑफर दिली. माणिक लगेच राजी झाला. माणिकला सर्व डिस्ट्रिब्युटर ओळखीचे होते. सम्याने जे दुकान भाड्याने घेतलं होतं, तेच दुकान माणिकने भाड्याने घेण्यासाठी सुचवलं. दुकानात जसं हवं तसं सगळं सेट होतंच. फार विनवणीकरून  बाबांकडून दोन लाखाची उचल महिन्याभराच्या परतफेडीची बोलावर घेतली. त्यात फक्त एकाच प्रकारचा कॉस्मेटिक प्रॉडक्टचा थोडासा माल खरेदी केला, दुकानाच भाडं दिलं आणि पुढल्या दहा दिवसात व्यवसायाचा शुभम भवतु केला.

मी आप्पांनी सांगितल्या प्रमाणे पूजा, नैवद्य सगळं रीतसर करु लागलो. दुकान उघडल्या पासून आठवडाभरात बायंगीने फळ देण्यास सुरवात केली. धंद्याने खरोखरच जोर पकडला. माल कमी पडू लागला. दुकानातली गर्दी बघूनच डिस्ट्रिब्युटर उधारीवर माल देऊ लागले. पाहता पाहता दोनच महिन्यात सत्तरटक्के फायदा झाला. माझ्या आनंदाला उधाण आलं.  बाबांचे पैसे, दुकानाच भाडं, डिस्ट्रिब्युटरचे उधार, माणिकचा पगार अगदी सगळं देऊन झालं.  पुढल्या चार-पाच महिन्यात लाखोंच्या घरात नफा हातात पडू लागला. मनातल्या राहून गेलेल्या सर्व सुप्त इच्छा पैसा बघून डोकं वर काढू लागल्या. पण सम्याने ज्या चुका केल्या होत्या, त्या चुका मला करायच्या नव्हत्या. दारू, जुगार, ऐशोराम, नसती उधळपट्टी करत सम्याने केलेला आततायी अव्यापारेषु व्यापार; मी पूर्णपणे टाळण्याचा निश्चिय केला.

थोडं थोडं साठवत मी पैशांला पैसा जोडू लागलो. आवश्यक तिथंच पैसा खर्च करू लागलो. सगळ्यात पहिले बाबांसाठी कार घेतली. गावाकडचे घर व्यवस्थित केलं, दोन वर्षात मुंबईत फ्लॅट घेतला. हळूहळू जास्त पैसे बाजूला पडू लागले. मला ज्या वस्तूंची हौस होती ती एक एक करवून मिळवत गेलो. ब्रॅण्डेड कपडे, ब्रॅण्डेड घड्याळ, शूज, जॅकेट्स गॉगल्स आणि माझी आवडती बुलेट…एकंदर काय… तर मी माझ्या राहणीमानात मला हवाहवासा बदल करून घेतला होता…आणि मी त्यातच खूप खूष होतो. मित्रांसोबत पार्ट्या, फिरस्ती, व्यसनं यावर पाणी सोडलं, पण बाकी सगळं काही मनासारखं चाललं होतं. माणिकही दुकान अगदी व्यवस्थित सांभाळायचा.

आप्पा वर्षातून एकदाच दुकानावर येतं. यायच्या आधी फोन त्यांचा फोन आला की, मी त्यांची देणगी तय्यार ठेवत असे.   त्यांची ठरलेलीच रक्कम घेत, ना एक पैसा जास्त ना एक पैसा कमी. थोड्यावेळ विचारपूस करत आणि निरोप घेत.

मिनुसाठी स्थळ येऊ लागली. तिच्यासाठी पुण्याच्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची पसंती कळली. बाबांच्या पैशाला हात न लावता, मी मिनूच पुण्यात मोठं थाटामाटात लग्न लावून दिलं. लग्नात खूप पैसा खर्च केला. आई बाबा माझ्यावर खूप खुष होते. मिनूच्या लग्नानंतर घरचे आता माझ्या लग्नासाठी मागे पडले. स्थिरस्थावर होऊन निमूटपणे प्रपंच करावा म्हणून मी पण लग्नासाठी झटकन होकार दिला. पुढल्या काही महिन्यात माझं पण लग्न उरकलं. मुंबईत जीवन एवढया वेगाने पळत होतं की प्रत्येक गोष्टीला वेळ कमी पडायचा. आई बाबांनी राहतं घर कधी सोडलं नाही. मुंबईला येऊन जाऊन असायचे. माधवी माझ्याच गावकडची होती. ती बऱ्यापैकी शिकलेली आणि समजूतदार होती. लग्नानंतर माझ्या स्वछंदी जगण्यावर, खर्च करण्यावर बऱ्याच प्रमाणात गदा आली.  तिच्या रिकाम्या डोक्याला कुठेतरी गुंतवाव, म्हणून मी तिला माझ्या व्यवसायातच हातभार लावायला बोलू लागलो. कॉस्मेटिक प्रॉडक्ट असल्यामुळे दुकानात लेडीज ग्राहकांची प्रचंड रेलचेल असायची. हळूहळू तिला व्यवसायातले सगळे बारकावे शिकवले आणि खरेदीविक्रीबाबत सगळ्या बाबी सांगितल्या. घरातले काम आवरून फावल्या वेळेत माधवी मदतीला येत आणि मी तेव्हा तिच्यावर सारा भार सोपवून थोडी विश्रांती घेत. काहीही न विचारण्याच्या आणि कोणालाही न सांगण्याच्या अटीवर, मी तिला फक्त पूजा आणि नैवेद्याच्या सगळ्या विधी समजून सांगितल्या. मी ठरवल्या प्रमाणे माझं आयुष्य एकदम सुखासुखी चाललं होतं.  बायंगीमुळे माझा पाच-सहा वर्षात खूप उत्कर्ष झाला.

अशाच एका दिवशी, माणिक घरगुती कामकाजासाठी सुट्टी घेऊन लवकर घरी गेला होता. दुकान वाढवायची (बंद) वेळ झाली होती. मी शटर बंद करणार तेवढ्यात मागून “थांबा…थांबा” म्हणत मला कोणीतरी आवाज दिला. मी मागे वळून पाहिलं तर, सलवार-कुर्ती परिधान केलेली एक नितांत सुंदर तरुणी मला हाक मारत होती. नितळ कांती, कमनीय बांदा, टपोरे निळसर डोळे, फिक्कट गुलाबसर ओठ, चेहऱ्यावर खेळणाऱ्या बटा….आहऽऽऽहाऽऽ हऽऽ अगदी क्षणात भुरळ घालणार मादक सौन्दर्य होतं ते. दुकानात एवढया सुंदर सुंदर लेडीज कस्टमर येत, पण माझा कधी तोल गेला नाही…. ना कधी लग्नाच्या पूर्वी,ना कधी लग्न नंतर….पण या तरुणीच्या बघताच क्षणी मोहात पडलो.

“हॅलो! प्लिज ते प्रोडक्ट द्याल का मला?” ती मला एका प्रोडक्टबद्दल विचारणा करत होती आणि मी तिच्यात हरवून बसलो होतो. नंतर तिच्या दोन-तीन ‘हॅलो’ नंतर माझी तंद्री भंगली.

“हऽऽ अहो त्याचा सगळा स्टॉक संपला आहे. उद्या याल का?” मुळात ती जे प्रॉडक्ट मागत होती ते मी कधी मागवलच नव्हतं.

“ओऽऽहऽऽ! काही हरकत नाही. हे घ्या माझं कार्ड. आलं की प्लिज मला फोन कराल का?”

“नक्की. ” माझ्या उत्तरावर ती “थँक्स” म्हणत एक मधाळ स्मित देत चालल्या गेली.  त्या गुलाबी कार्डवर मोठया अक्षरात तन्वीज पार्लर व तिचा फोन नंबर छापलेला होता. 

ती दुसऱ्या दिवशी अशीच निघायच्या वेळी आलेली. पण गिर्हाईकीच्या व्यापात मी त्या प्रॉडक्टबद्दल विचारायचं सपशेल विसरलो होतो.

“सॉरी हा दोन दिवसांनी या, तुमच्यासाठी मागवले आहे. प्रॉडक्ट आला की तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करतो.” ती बिचारी काही ना बोलता हिरमुसून चालल्या गेली. मला वाईट वाटले. दुसऱ्या दिवशी मी न विसरता तो प्रॉडक्ट स्पेशली मागवून घेतले. संध्याकाळच्या वेळी तो प्रॉडक्ट हाती पडल्यानंतर मी तिला कॉल केला. तिने लगेच येते म्हणून सांगितलं. तिची वाट पाहत दुकान वाढवायची वेळ झाली होती, पण तिचा काही पत्ता नव्हता. तेवढ्यात तिचा कॉल आला “प्लीज दुकान बंद करू नका, मी पाच मिनिटात आले.” माणिकला कंटाळलेल पाहून मी त्याला घरी जाण्यास सांगितले. मी एकटाच तिची वाट पाहत थांबलो. जवळपास दहा मिनिटानंतर ती आली. तिची ती अदा! ते मधाळ बोलणं! रूप खुलवणारा तिचा पेहराव आणि ते मादक सौंदर्य….उफ्फऽऽ सगळच कसं मोहून टाकणार होतं. मी परत तिच्या सौंदर्यात स्वतःला भुलून बसलो.

“थँक यु सो सो मच! अख्खी मुंबई फिरले यासाठी, पण फक्त तुमच्यामुळे मला हे भेटलं. यु आर सो स्वीट…वन्स अगेन थँक्स!” ती इतकी खुश होती की, माझे आभार प्रदर्शन करत मला सरळ मिठीच मारली. तिच्या मिठीत मी जागीच गारठलो. तिच्या त्या मलमली मिठीत एक अप्रतिम मोहक सुगंध दरवळत होता. ती किती फॉरवर्ड होती याचा प्रत्येय मला त्यादिवशी आला. तिने मला माझं बिजनेस कार्ड मागितल.

दुसऱ्या दिवशीपासून तिचे मॅसेजस यायला सुरवात झाली, नंतर हळूहळू कॉल सुरू झाले आणि मग हळूहळू माधवीपासून लपवू छपून बाहेर गाठीभेटी वाढल्या. तन्वीला खरचं माझा स्वभाव आवडला होता? का, मला तिच्या सौन्दर्याने भुरळ घातली होती? कळतं नव्हतं……आमची मैत्री वाढत होती? का माझी आंतरिक हवस वाढत होती? कळत नव्हतं……सर्व काही इतकं वेगाने घडत होतं की मी काय करतोय हेच मला कळतं नव्हतं….. का मुळात मला खरचं काही कळवून घ्यायचं नव्हतं?

अवघ्या तीन-चार महिन्यात आम्ही एकमेकांच्या फार जवळ आलो. एकादिवशी, मी डिस्ट्रिब्युटर मीट निमित्ताने तन्वीला घेऊन दोन दिवस गोव्याला जायचा प्लॅन आखला. डिस्ट्रिब्युटरचा मार्केटिंग मॅनेजर माधवीसमोरच मला मीटला येण्यासाठी गळ घालून गेला होता. ठरल्याप्रमाणे मी तन्वीला घेऊन गोव्याला गेलो. डिस्ट्रिब्युटरने एका फाईव्ह स्टार रिसॉर्टवर व्यवस्था केली होती. मी ठरवल्याप्रमाणे, सगळा प्लॅन कसा अगदी तंतोतंत बसला होता. मी खूप खूष होतो.  त्यादिवशी आम्ही खूप फिरलो, भरपूर मज्जा केली, कॅसिनोमध्ये खेळलो, समुद्र किनारी पहुडलो आणि त्याचदिवशी आम्ही दोघांनी एकमेकांना, एकमेकांवर सोपवलं. दोन दिवस कशे गेले काहीच कळलं नाही.

दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही मुंबईला माघारी जाण्यासाठी प्रायव्हेट बसचं बसस्टँड गाठलं. आम्ही दोघे बसची वाट पाहत  स्टँडवर बसलो होतो. तिथे रस्त्याच्याकडेला बसलेला एक वेडसर भिकारी माझ्याकडे फार निरखून बघत होता. जसा काही तो आमच्यावर पाळत ठेवून होता.  विस्कटलेले केस, वाढलेल्या दाढी मिशा, मळकट फाटके कपडे, विक्षिप्त हावभाव, किळसवाणा अवतार जणू काही कित्येक महिने अंघोळच न केलेली. आपल्यावर कोण पाळत ठेवू शकतो? माधवीने तर नाही ना माझ्या लक्ष ठेवायला सांगितलं असेल? माझ्या डोक्यात संशयाचे भूत फिरू लागले. त्याची नजर एवढी भेदक होती, की मी माझी नजर खाली झुकवली आणि चोरट्या नजरेने त्याच्याकडे बघत राहिलो.
                              बघता बघता तो अचानक उठला आणि माझ्याजवळ आला. का कुणास ठाऊक पण मला त्याची फार भीती वाटली. त्याने एकदम माझ्याकडे हात पुढे करून पैसे मागितले. खिशात पैसे होते, पण त्याला देण्यासाठी हात धजावत नव्हते. त्याला बघून माझ्यामागच्या खुर्चीवर बसलेली तन्वी उठली आणि समोर आली. तिने तिच्या पर्समधून दहा रुपयांची नोट काढली आणि त्याच्या हातात टेकवली. त्याने तन्वीकडे डोळे वटारून पाहिलं, हातातले पैसे फेकत “बाईऽऽऽऽबाईऽऽबाई’ ओरडत तिथून वेड्यासारखा पळून गेला. आम्हा दोघांना ते फार विचित्र वाटलं. आम्ही दोघे त्या जागेवरून उठलो आणि थोडं पुढे जाऊन बसची वाट बघत बसलो. माझ्या चेहऱ्यावर पसरलेली चिंता तन्वीने हेरली. तिने माझ्या पाठीवर हलकासा हात ठेवत मला माझ्या समाधीतून जाग केलं.
                             
हा विचित्र प्रसंग वगळला, तर बाकी सर्व ट्रिप अगदी मनासारखी झाली होती. तेवढ्यात बस आली. आम्ही बसमध्ये बसलो. तन्वीने माझा हात हात घेत माझ्या खांद्यावर डोकं टेकवून, घालवलेल्या दोन दिवसांच्या आठवणीत रमली होती. मी डोळे बंद करून निवांत पडलो. माझ्या डोळ्यासमोर माधवी दिसत होती. अंधुक होतं चाललेल्या माधवीच्या छबीला मी डोक्यातून बाजूला सारत गाढ झोपी गेलो. बस सकाळी मुंबईला पोहचली.

त्यानंतर ही सगळं काही सुरळीत चालू होतं असं मला वाटत होतं. माधवीला काही कळलं होतं का नव्हतं, माहीत नाही. पण का, कोण जाणे? मला राहून राहून माधवीच्या स्वभावात बराच फरक जाणवत होता. कधी कधी मला स्वतःला तिच्या नजरेतून पडल्यासारखं वाटतं होतं. मी तिच्याशी नजरेत नजर मिळवून नंतर कधी बोललो नाही.

एवढं असूनही, तन्वीच्या मोहमिठीतुन मी स्वतःला सोडवू शकत नव्हतो. तन्वीच्या प्रेमापेक्षा मला तिचीच चटक जास्त लागली होती. गोव्यावरून आल्यानंतर आम्ही तीनदा भेटलो. आता आम्ही फक्त पंचतारांकित हॉटेलमध्येच भेटायचो. भरपूर पैसा खर्च होतं होता, पण तन्वीपुढे सगळं गौण वाटायचं.

नेहमीप्रमाणे मी असाच एकेदिवशी तन्वीला फोन केला. पण तिचा फोन बंद होता. त्यानंतर दोनदा-तीनदा मी कॉल केला पण तिचा नंबर बंदच होता. दोन दिवसानंतरही तीच परिस्थिती पाहून, मी सरळ तिचं पार्लर गाठलं पण तिचं पार्लरही बंद होतं. शेजारी विचारपूसअंती कळलं की पार्लर आठवडाभरापासून बंद आहे. कळायला काहीच मार्ग नव्हता की, तन्वी अचानक न सांगता गेली कुठे. तन्वीची जास्त खोलात जाऊन चौकशी करणं माझ्यासाठी योग्य नव्हतं, म्हणून मी शांत बसलो.

आठवडाभरानंतर एका दुपारी मी दुकानात बसलेलो असतांना तन्वीला परत फोन केला. त्यावेळेसही तन्वीचा फोन बंदच होता. सम्या गायब झाला त्यावेळेस जसं माझ्या डोक्यात काहूर माजला होता अगदी तसचं तन्वीच्या बद्दल झालेलं. पहिले सम्या… आता तन्वी ….असे अचानक कुठे गायब होतात लोकं? काय झालं असेल?

नेमके त्याचवेळेस आप्पा दुकानात आले. माझ्या डोक्यात तन्वी विषयी विचार चालूच होता. आप्पांनी माझ्या चेहऱ्यावरची चिंता हेरली.

“काय झालं?”

“आप्पा, माणसं अचानक गायब कशी होतात हो.” मी गल्ल्यातून आप्पांचे पैसे काढत त्यांना प्रश्न केला.

“आता कोण?” आप्पांच्या या प्रश्नांवर थोडासा सावरत. मी विषय सम्याकडे फिरवला.

“कोण काय आप्पा! सम्याचा विषय माझ्या डोक्यातुन अजूनही गेलेला नाही.”

“अच्छा तो! हे बघ बायंगी देतांना भरभरून देते पण तुम्ही एकदा चुकला तर भिकारी करून सोडते. पैसे भेटले की माणूस ऐशोआरामात जगतो, व्यसनाधीन होतो, पैसे उडवतो, अय्याश बनत जातो आणि शेवटी आपसूकच भिकेला लागतो. बायंगीचे रोजचे सोपस्कार करण्यात काही कमीजास्त झालं किंवा सांगितलेल्या वेळेनुसार सोडलं नाही, तर बायंगी संपूर्ण कुटुंबाचा ऱ्हास केल्याशिवाय राहत नाही….. बायंगीला जखडून न ठेवता, मुक्त करण्याचा मोह भल्याभल्यांना जमत नाही”

“आप्पा, सम्याने स्वतःची चैन केली पण बायंगीच काही कमी केलं असं अजिबात वाटत नाही. तरी कसा, कुठे हरवला अजिबात कळलं नाही.”

“स्वतःची चैन केली तोपर्यंत ठीक आहे, पण त्याने व्यभिचार केला असेल तर तो बायंगीच्या तावडीतून सुटणं अशक्य.”

“व्यभिचार?” हा शब्द ऐकताच मला दरदरून घाम फुटला.

“हो, बायंगीला व्यसनाधीनता पेक्षा परस्त्री संबंध अजिबात धजत नाही. त्यामुळे मी सुरवातीलाच हे सगळं सांगत असतो….पण देव जाणे, कोणीतरी कुठें ना कुठे चुकतो आणि मग बायंगीच्या तावडीत चुकून सापडला की बायंगी त्याला उध्वस्त केल्या शिवाय राहतं नाही. ती त्याला वेडापिसा करून सोडते. चल असो, निघतो मी….. तू काळजी घे…आणि हो,पुढच्या चार महिन्यात तुला बायंगीला सोडायचं आहे. लक्ष्यात ठेव.” आप्पा गेले पण आप्पांचा शब्द नि शब्द कानात घंटानाद झाल्यासारखा घुमत राहिला. मी डोक्याला हात लावला. माझा श्वासोच्छ्वासाचा वेग वाढला. अंगात शिशारी भरली. कपाळावरून टपटपणारा घाम पुसत, माझ्या डोक्यात फक्त एकच प्रश्न घोळत होता, “इतके वर्ष सर्व सांभाळून एकएक पाऊल टाकणारा मी, असा कस काय चुकलो?”  मी चक्रावून गेलो. माझं डोकं भणभणु लागलं. मी सरळ उठलो आणि दुकानाबाहेर पडलो. माणिक मला आवाज देत होता. मी त्याला न बघताच हातवर केला आणि आपसूकच दिशाहीन चालत सुटलो. कुठे निघालो होतो माहीत नाही. माझ्या दृष्टिपटलावर तन्वी सोबत घालवलेला एक एक दिवस उमटवू लागला. तिच्या सोबतची पहिली भेट, रोज रोजच्या गप्पा गोष्टी, फाईव्हस्टार हॉटेल्समध्ये घालवलेले दिवस, गोवा ट्रिप…..आणि!…आणि अचानक माझ्या नजरेसमोर आले…ते डोळे…. त्या वेडसर भिकाऱ्याचे… जणू मला ते बोलवत होते…. कोण होता तो वेडा?…कोणाचे होते ते डोळे?…..आणि मला सम्या सापडला. हो, तो सम्याच होता….

तेवढ्यात खिशातला फोन खणखणला…..माणिकचा फोन होता. “शेठ, अनर्थ झाला. तूम्ही ताबडतोब या. दुकानाला आग लागली. सगळं जळून खाक झालं. तो नव्या प्रॉडक्टचा लाखोंचा मालही सगळा जळून खाक झाला.”  मी हसलो…अगदी मोठं मोठ्याने हसलो… सर्व जोर लावत हातातला फोन पुलावरून खाली पाण्यात भिरकावला… आणि शुध्द हरपून मी भररस्त्यात दिशाहीन पळत सुटलो…वेड्यासारखा..

मी मकरंद वसंत शिरोडकर

हसलो…फसलो….आणि सुटलो कायमचाच…

बस निकल पड़ा मैं
बसी-बसाई दुनिया उजाड़ के
    कुछ गैरों से और
    कुछ अपनों से मुंह मोड़ के

इंतखाब छोटे रास्तों का,
हरवक्त लंबे रास्तों से किफायती नहीं रहता
    कैसे भूल गया मैं,
    फरेब की दहलीज पे कोई मकान नहीं टिकता

कुछ पाने की आस में
सब कुछ लुटा बैठा,
    जिंदगी से खिलवाड़ करके
    खुद को मिटा बैठा,

सबकुछ तो मयस्सर था मेरे पास
फिर भी हजारों ख्वाहिशें लेकर खड़ा मैं?
     नामुकम्मल जहां को छोड़के
      बावरा… बस निकल पड़ा मैं…..बस निकल पड़ा ..

                                 समाप्त
                                

आपला अभिप्राय नक्की कळवा. आपला अभिप्राय माझ्यासाठी अमूल्य आहे….

मंगेश उषाकिरण अंबेकर 
९८२३९६३७९९

5 Comments Add yours

 1. राकेश दत्तात्रय पाटील म्हणतो आहे:

  मंगेश छान शेवट केलास आपल्या आयुष्यात खूप काही संधी येतात आणि त्या संधीचे सोनें करता आले पाहिजे आणि जे मिळालेले आहे त्यात समाधानी राहावे.

  “मानलं तर सर्व आहे, नाही मानलं तर काहीच नाही”
  प्रयत्न आणि मेहनत केली तर काहीच कमी पडणार नाही.

  Liked by 1 person

  1. वाह वाह! थोडक्यात पूर्ण सारांश मांडला.
   अगदी मनापासून धन्यवाद राकेश 🙏🏻😊😊😊

   Like

 2. Swapna Deshpande म्हणतो आहे:

  लाजवाब ! एकाच शब्द…. झक्कास कथा गुंफली आहेस..

  Liked by 1 person

  1. खूप खूप धन्यवाद ….अगदी मनापासून 🙏🏻😊😊😊😊

   Like

 3. संतोष काटे म्हणतो आहे:

  मंगेश उषाकिरण अंबेकर….आज उत्सुकता संपली 🙏.
  एवढं व्यवस्थित मांडली सगळी कथा खूप छान…वाचत असताना नारळ खरंच डोळ्यासमोर फिरत होता…
  पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏

  Liked by 1 person

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.