बायंगी (भाग-४)

मी सकाळी रत्नागिरीला पोहचलो. बसस्टँडवरच फ्रेश झालो. बसस्टँडवरच झटपट नाष्टा उरकला आणि परत लांजाची बस पकडली. तास-दिडतासात लांजाला पोहचलो. बसस्टँडच्या बाहेर आलो तसा आप्पांचा शोध सुरू केला. तीन-चार दुकानात विचारपूस करून झाल्यावर; एका दुकानदाराने सांगितलं की, ‘इथून वीस किलोमीटरच्या अंतरावर एक गाव आहे, तिथे आप्पा राहतात.’ उकड्यामुळे आधिच वैतागलो होतो, त्यात आप्पाचा शोध संपत नव्हता. मग तिथुन परत त्या गावापर्यंत जायला मी रिक्षा केली. रिक्षावाल्याजवळ आप्पाची थोडी विचारपूस केली, तर त्याने मान वळवून माझ्याकडे एक विचित्र भेदक कटाक्ष टाकला. मी निमूटपणे गप्प बसलो. त्याने प्रवासात एक शब्दही न बोलता, सरळ मला आप्पांच्या घरापाशी उतरवलं.

कोकणातला तो कौलारु वाडा; माड, फणस, रामफळ, आंबा अशा रसाळ झाडांच्या कुशीत विसावलेला होता. घराच्या डाव्याबाजूस एक मोठी दगडी विहीर आणि उजव्या बाजूला एक टुमदार मंदिर होतं. आप्पाच्या घराचं दार सताड उघडच होतं. मी आप्पांना हाक दिली. एक, चार-पाच वर्षाचा मुलगा मला बघून…”आप्पाऽऽऽ! आप्पाऽऽऽ! ” ओरडत परत घरात गेला. धोतर नेसलेले आप्पा, खांद्यावर पंचा टाकत बाहेर आले. मला बघून, आप्पांची उंचावलेली भुवई आणि हलकीशी डोलणारी मान, त्यांनी मला ओळखल्याची साक्ष देत होते.

“शेवटी पोहचलास म्हणायचा तू! पण कशासाठी आलाय इथं?”

“आप्पा मी सम्याला…..समीर देवधरला शोधतोय.” मी सम्याबद्दल विचारपूस चालू केली.

आप्पांच्या चेहऱ्यावर निर्विकार भाव पसरले. त्यांना सम्या आठवतच नव्हता. मी त्यांना सम्याचं वर्णन, मुंबईतल्या सम्याच्या दुकानाचा पत्ता आणि त्यांची शेवटच्या भेटीबद्दल सविस्तर संदर्भ दिल्यावर त्यांना सम्या आठवला.

“अच्छा तो होय! हो ओळखतो मी त्याला. पण त्याचं काय?

“आप्पा, सम्या गेल्या नऊ महिन्यापासून गायब आहे.”

“अच्छा, पण मला त्याबद्दल काही कल्पना नाही. मी त्याच्या दुकानावर वर्षातून एकदाच माझी वार्षिक शुल्क घ्यायला जायचो. त्यापलीकडे मला काहीच माहीत नाही.”

“वार्षिक शुल्क ? कशाबद्दलच?” माझ्या या प्रश्नावर आप्पा शांत राहिले. मी परत त्यांच्याकडे उत्तराची आस लावून पाहत बसलेलो, तेव्हा ते अचानक संतापले आणि ताडकन उभे राहत आपल्या चिरक्या आवाजात माझ्यावर ओरडले,”पूजा विधी करायचो त्याच्या नावाने. पण तुला काय करायचं त्याचं? तुझं विचारून झालं असेल तर तू निघू शकतोस इथून!”

त्यांचा रौद्ररूप पाहून मी घाबरलो. आप्पा थोडे तिरसट स्वभावाचे वाटले. त्याचा राग पाहून वाटलं की, आता सम्याबद्दल अजून काही विचारत बसण्यात काही अर्थ नाही. हातजोडून उभा राहिलो आणि सरळ मुद्द्याकडे जीभ वळवली, “माफ करा आप्पा, सम्याच्या शोध घेण्यासाठीच मी घराबाहेर पडलो खरा, पण माझ्या डोक्यात नेहमीच त्याच्यापेक्षा त्याच ऐश्वर्य खुपत राहिलं आणि तुम्हाला पाहिल्यापासून मला सारखं राहूनराहून वाटतं होतं की त्याच्या ह्या उत्कर्षामागे तुमचं नक्कीच काहीतरी योगदान आहे. माझा तर्क जर खरा असेल तर मला पण सम्यासारखा पैसा हवा आहे.”

आप्पा माझ्याकडे बघत कुत्सितपणे हसले. “तुझं बोलणं आणि तुझी भिरभिरती नजरच सांगत होती की, तुला माझ्याकडून काही दुसरं हवंय. मला तू इथे आला तेव्हाच कळालं होतं की तू तुझ्या मित्रासाठी नाही तर पैश्यासाठी आला आहे. कारण मी तर तुला आधीच सांगितल होतं की, मी तुझ्या मित्राला ओळखत नाही. तुझ्या नजरेतच पैश्याची हाव दिसते. पण जो विधी आहे त्यासाठी खूप कडक नियम पाळावे लागतात. ते मंजूर आहे का?”

“मी सगळं पाळेन. मला सगळं मान्य आहे. मला ती पूजा विधी कोणत्याही परिस्थितीत करायचीच आहे.” काही न ऐकताच मी सगळं मान्य करत हट्टाला पेटूनच उठलो.

“ठीक आहे.लाग मग तयारीला” आप्पांनी मान डोलवत विहिरीकडे हात दाखवला.

आप्पांनी मला विहिरीवर आंघोळ करायची सांगून समोरच्या देवळात सोवळ्यात यायला सांगितलं. हापापलेला मी, चटकन अंघोळ आटपून देवळात हजर झालो. आप्पा पण आवरुन सर्व पूजेच्या सामानासकट देवळात आले. आप्पा देवांपाशी बसले. मला देवांच्या समोर बसायला सांगितलं. सहाणीवर चंदन-गंध उगाळत त्यांनी माझं पूर्ण नावं विचारलं. मग परडीतले फुलं गंधात बुडवून देवाला कौल लावत, देवासमोर गाऱ्हाणं मांडायला सुरवात केली. पुढचे पंधरा मिनिटे परडीतले एक एक फुल गंधात बुडवून त्यांनी देवाला लावले.

“हे बघ, आता मी रवळनाथाला तुझं गाऱ्हाणं सांगितलले आहे. त्याने कौल दिला तरचं मी तुला पुढचं काय ते सांगू शकतो.” आप्पाच्या या बोलण्यावर माझ्या कपाळावर आठ्या पडल्या.

“मला तर वाटलं की तुम्ही विधी सुरू केला.”

आप्पा पुन्हा कुत्सितपणे हसत म्हणाले, “अरे, थांब थांब इतकी घाई नको करू. जर रवळनाथाने उजवा कौल दिला तरच तू या विधीयोग्य ठरशील आणि जर देवाने डावा कौल दिला तर तुला हा विधी करता येणार नाही. त्याच्या मर्जीशिवाय कोणाला काहीच मिळतं नाही.”

आता माझं सर्व लक्ष त्या फुलांवर एकवटले. उजवा कौल मिळतो पडत की डावा, यातच माझ्या छातीत धाकधूक सुरू झाली. कारण मला माझ्या करंट्या नशिबावर पूर्ण विश्वास. त्यातच डाव्याबाजूचं फुलं सैल झालं आणि हळूहळू निसटू लागलं. आता जर डावा कौल मिळाला तर आयुष्यभर आपल्याला चाकरीतच घालवावे लागतील हाच विचार डोक्यात घोळू लागला. मी डोळे घट्ट मिटले आणि हात जोडून देवाला उजवा कौल देण्यासाठी मनोमनी प्रार्थना करू लागलो. तेवढ्यात आप्पा मोठयाने ओरडले, “रवळनाथ कृपा असू दे बाबा. तुझ्या लेकरांना सांभाळ.”

मी हळूच डावा डोळा उघडला तर कळालं की, उजवा कौल मिळाला. माझ्या आनंदाला थारा उरला नाही. मी अतिउत्साहात आप्पानाचं टाळी देऊन बसलो. जणू तो कौल मला परिसस्पर्शच करून गेला.

“हे ठीक झालं, पण फार हुरळून जाऊ नको. आता कुठे तुझी खरी परीक्षा चालू झाली. तुला नियमांचं काटेकोर पालन करावं लागलं. कोणालाच कळू न देता नित्यनियमाने पूजा करणं. अमावस्या, पौर्णिमेला नैवेद्य दाखवणे. याचा सांभाळ करणे. नशापान, जुगार, व्यभिचार, फितुरी, अनिष्ट गोष्टी टाळणं…. असं बरंच काही सांगत होते आणि मी सगळ्यांना हो..हो करत होतो. मी तर पहिल्यांदाच उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघण्यात रमलो. काय करू काय नको अस झालं. माझ्या अतिउत्साहाच्या भरात त्यांचं बोलणंच मला ऐकवतही नव्हतं. एखादा कॉन्ट्रॅक्ट सही करतांना, अतिउत्साहात ते न वाचताच सही करून द्यावा असं माझं झालं.

“तुझं नशिब आज जोरावर आहे. आज अमावस्या आणि हा विधी फक्त अमावस्येलाच करता येतो. आता उरकायला हवं तू पण त्याआधी….. .”

“आता पण काय आप्पा…”

“यासगळ्या कामासाठी तीस हजार लागतील. सर्वात पहिले तीस हजार माझ्यापुढे आणून ठेव.”

आप्पाने तीस हजार म्हणताच माझ्या कपाळावर लाखभर आठ्या पडल्या.
“तीस हजार? आता एवढं लगेच कुठून आणू? खिशात फक्त दोन हजार आहे. माझा पगार इनमिन पंधरा हजार! पैसे नाही म्हणून तर हा विधी करतोय. पैसे आले की देतो ना तुम्हाला.”

“तुझ्याकडे पैसे आले की, मी ठरल्याप्रमाणे माझा वाटा तुझ्याकडून घेऊन जाणारच… त्यात कुठला वाद नाही….पण आता या विधीला बरेच पैसे लागतात त्यासाठी तुलाच पैसे आणावे लागणार. याशिवाय काम पुढे कसं सरकणार. सगळं काही फुकटात भेटत नसतं, त्यासाठी किंमत ही मोजवीच लागते आणि पैसे नसेल तर पहिले जमा कर आणि मग पुढल्या अमावसेला ये….जा आता माझा टाईम खोटा करू नको.” आप्पांच्या रागीट चेहऱ्यावर पैश्याची हाव स्पष्ट झळकत होती.

एवढे पैसे आताच्या आता कुठून आणायचे. मला काहीच सुचत नव्हतं….पण कुठल्याही परिस्थितीत आजचा दिवस मला पुढं ढकलायचा नव्हता.

“बरं बरं तुम्ही लागा तयारीला…मी कुठल्याही परिस्थितीत पैसे आणतो.” मी त्यांना शब्द देऊन, तडक गावातलं एटीम गाठलं. खात्यात फक्त सहा हजार होते. बाबांना सांगावं तर त्यांची विचारपूस चालू होईल आणि मित्राकडून मागव तर सम्यासारखा कोणताच मित्र पैसेवाला नव्हता. पैसे कमावण्याची सुवर्णसंधीपण पैश्यामुळेच हातातून निसटून चालली होती. डोक्यात विचारांचं चक्रीवादळ थैमान घालत होतं. विचार करत डोक्यावर ठेवलेला हात मानेपर्यंत पोहचला आणि हाताला गळ्यातल्या सोनसाखळीचा स्पर्श जाणवला…..हुश्शऽऽ सुटलो.

दिवस मावळतीला आला होता. मी भरभर पाय उचलत सोनाराचं दुकान गाठलं. सोनसाखळी विकली. पंचवीस हजार मिळाले. पैशाची नड मिटली. आज दिवस माझाच होता.
परत आप्पाच्या वाड्यावर पोहचलो आणि एकदाचे त्यांच्या हातात पैसे टेकवले. आप्पांची पूजेची तयारी सुरूच होती. माहीत नाही कसे काय, पण आप्पांना मी पैसे आणणार यावर पूर्ण विश्वास होता.

अमावस्येचा काळोख वाढू लागला. त्यांनी सर्व जमावलेले सामान एका मोठ्या पिशवीत टाकून माझ्या हाती दिले. स्वतःच्या हातात एक बॅटरी घेतली आणि त्यांच्या मागोमाग येण्यास सांगितलं. पूर्ण निर्मनुष्य पायवाट होती.त्या निरव शांततेत रातकिड्यांचा आवाजही कर्कश्य वाटतं होता. गुढग्यापर्यन्त वाढलेली तण पायांना टोचत होती. मला थोडी भीती वाटतं होती. आप्पा काही न बोलता, आपल्या सवयीप्रमाणे झपझप पाय टाकत पुढे जात होते आणि मी त्यांच्या मागोमाग पळत होतो.

अर्धातास चालल्या नंतर आम्ही एका सपाट स्थळी पोहचलो. आजूबाजूला शेत होतं. शेतात वाढलेली पीकांमुळे बाकीचे काहीच दिसतं नव्हते. आप्पा फतकल मांडून खाली बसले. माझ्याकडची पिशवी घेऊन आप्पांनी त्यातून भरभर एकेक सामान काढले. सोबत आणलेल्या कणकेचा मोठा दिवा केला आणि त्यात कापसाची वात आणि तेल टाकून दिवा लावला. सर्वत्र पसरलेल्या दाट तिमिरात त्या दिव्याचा उजेडाने थोडस का होईना पण हायसं वाटलं.

आप्पा जागचे उठले आणि हातात पीठ घेऊन त्यांनी एक रिंगण आखलं. मला शर्ट काढून त्या रिंगणात बसायला सांगितलं. माझ्या खांद्यावर एक पंचा ठेवला. ते स्वतः रिंगणाच्या बाहेर बसले आणि पिशवीतुन एक नारळ आणि एक पांढरी बाहुली काढली. दिव्याच्या मंद प्रकाशात नजरेसमोर चालेल ते सर्व विचित्र प्रकार बघून मला थोडंस घाबरायला झालं. त्या अंधुक प्रकाशातही आप्पांनी माझ्या डोक्यावर पडलेल्या आठया हेरल्या.

“घाबरू नकोस, आता मी तुला जे सांगणार आहे ते लक्ष देऊन ऐक. आपण जे तांत्रिक यज्ञ करणार आहोत त्याला बायंगी म्हणतात. आता मी, तुझं गाऱ्हाणं मांडून या वातावरणात पसरलेल्या अमानवीय शक्तींना पुढील सात वर्षे तुझ्या सोबत वास्तव्यासाठी आमंत्रित करणार आहे. ही शक्ती अमानवीय असली तरी, तू जर बायंगीची नित्यनियमाने पूजा आणि अमावस्या-पौर्णिमेला गुप्त नेवैद्य दाखवून व्यवस्थित सांभाळ केला तर बायंगी तुझा उत्कर्ष करेल. तुझ्यापाशी धन दौलत लोटांगण घालतील. प्रत्येक कामात यश मिळेल, भरभराट होईल. परंतु एक लक्षात ठेव मी सांगितलेल्या नियमांचं पालन करत, ठरलेल्या वेळेनुसार तुला बायंगीला मुक्त करावं लागेल नाहीतर बायंगी तुझ्या जीवावर बेतेल. तू सर्व पाळशील ना?” आप्पांच्या शेवटच्या वाक्यावर माझ्या घशाला कोरडं पडली. साधं “हो” म्हणायलाही माझा कंठ फुटेना.

“हो, नक्की!”

त्यांनी बाहुली आणि नारळ माझ्या पुढे ठेवले आणि गाऱ्हाणं मांडायला सुरवात केली. कणकेचे सात दिवे करून ते पेटवले आणि बाहुलीवर हिरवा कपडा टाकून मोठमोठ्याने मंत्रोच्चार म्हणायला सुरूवात केली. आप्पांनी कपाळावर भस्माची चार बोटे उमटवलेली होती. डोळे लालेलाल झालेले. त्यांचा अवतार त्या दिव्याच्या प्रकाशात अजून भयावह दिसत होता. ते मोठंमोठ्याने ओरडत आत्म्याला आवाहन करत होते. जवळपास पाऊणतास हा सर्व खेळ चालू होता. कालपासून सुरू असलेल्या फरपटीमुळे मला झोप असह्य होऊ लागली. अंगात भिनलेला थकवा डोकं वर काढू लागला. गुंगीने डोळे लवू लागले, मी डुलक्या मारू लागलो. आणि अचानक समोर ठेवलेला नारळ गरागरा फिरू लागला. ते बघून माझे डोळे सताड उघडे झाले. माझी झोपच उडाली. हातपाय थरथर कापू लागलो. मी जरासा मागे सरकलो. आप्पांनी मला डोळे वटारून जागेवरच शांतपणे बसण्याचा इशारा केला. मी घट्ट डोळे मिटून घेतले. आप्पांचा मंत्रोच्चार वेग आणि आवाज एकाएकी वाढत गेला आणि पाच मिनिटानंतर सगळं शांत….. स्मशान शांतता…रातकिड्यांचाही आवाज येत नव्हता. मी हळूच डोळे उघडले तर माझ्या डोळ्यासमोर ना नारळ होता, ना बाहुली. नजर वर करून पाहिलं तर आप्पा उभे राहून एका काळ्या कपड्यात काहीतरी बांधतांना दिसले. त्यांनी मला उभं राहण्याचा इशारा केला. मी उभा राहिलो तसं त्यांनी माझ्या अंगावर भस्म फेकले आणि माझ्या हातात ती काळ्या कपड्यात बांधलेली पोटली दिली.

“हे घे,आता नीट सांभाळ, तुझं सर्व काम ठीक होणार. आता घरी पोहचेस्तोवर अजिबात मागे वळून बघायचं नाही. ये माझ्यामागे.” ते हातात घेतांना, मी काहीसा शहारलेलो, काहीसा आनंदी असे मिश्र भाव माझ्या चेहऱ्यावर उमटलेले होते. मी त्याच रात्री शेवटच्या बसने माघारी आलो.

क्रमशः

आपला अभिप्राय माझ्यासाठी अमूल्य आहे….उद्या शेवटचा भाग प्रकाशित होईल…. शेवटचा भाग वाचायला विसरू नका…..तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल, मी तुम्हा सर्वांचा खूप ऋणी आहे.

मंगेश उषाकिरण अंबेकर
९८२३९६३७९९

9 Comments Add yours

 1. मनोज इंदासराव म्हणतो आहे:

  मंगेश, आज सगळे भाग वाचले, खूप छान शब्दाची मांडणी केलीस आणि अप्रतिम लेखन केलेस , क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारी कथा आहे, वाचता वाचता MX Player वरील समांतर या webseries ची आठवण झाली, आता असे वाटायला लागले की, तुझी अशी एखादी कथा कदाचित काही दिवसांनी आम्हाला वेब series च्या माध्यमातून पाहायला मिळेल तर नवल वाटायला नको, दिवसातील एवढ्या व्यस्त कामकाजातून आणि संसाराचा हा गाडा हाकताना तू जो छंद जोपासला आहेस आणि तो आमच्या सगळ्या मित्रांना वाचायला देत आहेस त्याबद्दल तुझं मनापासून कौतुक करावे वाटत मित्रा,,, खरंच खूप छान लिहिलंस,,,,👌👌👌👌 शेवटच्या भागाची वाट बघतोय…..

  Liked by 1 person

  1. अगदी मनापासून धन्यवाद मनोज…..तुझा अभिप्राय वाचून खूप समाधान मिळालं. तुम्हा सर्वांमुळे खूप खूप हुरुप मिळतो….लोभ असावा… पुनःश्च मनःपूर्वक धन्यवाद.🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊

   Like

 2. मनोज इंदासराव म्हणतो आहे:

  मंगेश, आज सगळे भाग वाचले, खूप छान शब्दाची मांडणी केलीस आणि अप्रतिम लेखन केलेस , क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारी कथा आहे, वाचता वाचता MX Player वरील समांतर या webseries ची आठवण झाली, आता असे वाटायला लागले की, तुझी अशी एखादी कथा कदाचित काही दिवसांनी आम्हाला वेब series च्या माध्यमातून पाहायला मिळेल तर नवल वाटायला नको, दिवसातील एवढ्या व्यस्त कामकाजातून आणि संसाराचा हा गाडा हाकताना तू जो छंद जोपासला आहेस आणि तो आमच्या सगळ्या मित्रांना वाचायला देत आहेस त्याबद्दल तुझं मनापासून कौतुक करावे वाटत मित्रा,,, खरंच खूप छान लिहिलंस,,,,👌👌👌👌 शेवटच्या भागाची वाट बघतोय…..

  Like

 3. Swapna Deshpande म्हणतो आहे:

  बायंगी वाचताना भीती व उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.आता पुढे काय होणार याची काळजी वाटत आहे…आपला मक्या पुढे जाताना मागे वळून पाहनार तर नाही ना त्याला हे आव्हान पेलवेल का नाही ?? का तो ही सम्या सारखा गायब होणार याची वाट पाहते आहे…पुढचा भाग लवकर घेऊन या लेखक महाशय..
  तुझा पुढचा प्रवास साठी खूप खूप शुभेच्छा असेच लिहित रहा..व आमचा भेटीला येत रहा.

  Liked by 1 person

  1. बापरे….तुमचे एवढे सुंदर सुंदर अभिप्राय वाचून…तुम्ही सर्वजण कथेत किती गुंतले आहात हे कळत. उद्या कथा पूर्ण होईल आणि कदाचित तुम्हा सगळ्यांना तुमच्या मनातले उत्तरं मिळतील….
   लेखकाला या पेक्षा अजून काय हवं…शत शत आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊

   Like

 4. Manoj Ghadmode म्हणतो आहे:

  मंगेश कुठून सुचतं रे तुला एवढं? ते पण इतकं सुंदर लिहितोस की वाचणारा त्यात अगदी गुरफटून जातो.. मी चार दिवसांपासून थोड्या वेगळ्याच टेन्शन मध्ये आहे…म्हणून तुझ्या कुठल्याच भागाला प्रतिक्रिया दिली नाही…पण आज ठरवून चार ही भाग वाचून काढले आणि इतरांसारखी मलाही उत्सुकता लागून राहिली आहे की पुढच्या भागात काय होईल? मुंबई, रत्नागिरी आणि कोकण फिरून आल्या सारखं वाटतंय…

  Liked by 1 person

  1. कविवर्य का खेचता गरीबाची ☺️ तुमच्या सगळ्यांकडून काही न काही शिकत आलो आहे. तुझा अभिप्राय वाचून अगदी मनापासून आनंद झाला….🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊

   Like

 5. राकेश दत्तात्रय पाटील म्हणतो आहे:

  मंगेश बायंगी भाग 4 पण वाचून झाला येथे तर सम्या बाजूलाच राहिला आणि हा त्यामध्ये गुरफटला गेला.
  मला असे वाटते की ‘लालच बुरी बला है’ असे काहीतरी शेवटच्या भागात वाचायला मिळेल.
  एक गोष्ट खर सांगू मी या आधी असे काही वाचले नाही आणि या आपल्या ग्रुप मधील सर्व लेखक, कवी अशा मित्र-मैत्रिणीमुळे मला असे ऑनलाइन वाचन करावेसे वाटायला लागले.
  पुन्हा आपल्या ग्रुप मधील सर्वांचा आभारी आहे.

  Liked by 1 person

  1. राकेश, कमेंट वाचून खूप खूप आनंद झाला….

   Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.