बायंगी (भाग-३)

मी दुसऱ्या दिवशी मुंबई गाठली आणि नोकरीवर रुजू झालो.
पहिल्या दिवशी ऑफिसातील ओळख, परिचयाची औपचारिकता संपवून; डोक्यावरच्या छप्परची व्यवस्था करण्यासाठी ऑफिसातून लवकर बाहेर पडलो. तसं माझं राहण्याचं ठिकाण ठरलेलंच होतं. सम्या रहायचा तिथं जवळच बॉईज हॉस्टेल होतं. तिथं राहण्यामागे माझे दोन उद्दिष्टे होती. एकतर तिथून ऑफिस जवळ होतं, दुसरं म्हणजे सम्या गायब होण्यामागे काहीतरी गूढ नक्की होतं आणि त्याचा शोध मला घ्यायचा होता. त्या संध्याकाळी माझी बॉईज हॉस्टेलला राहण्याची सोय झाली.

मी रितसर कामावर रुजू झालो. ऑफिसच्या धावपळीत दिवस कसा निघून जायचा, हे कळतही नव्हते. संध्याकाळी रूमवर आलो की हातपाय धुवून मेसवर जेवायला जायचो आणि रूमवर येऊन सरळ गाढ झोपी जायचो. दररोज हेच चालायचं. त्यात चिडका बॉस आणि रोज टेबलावर पडलेल्या प्रचंड फाईलीमुळे महिन्याभरातच मला जॉब कंटाळवाणा वाटू लागला. इकडे सम्याच्या शोधमोहीमे बाबत जे ठरवलं होतं, त्यापैकी महिनाभरात काहीच जमलं नाही. माझी खूप चिडचिड होऊ लागली. पण खरतरं मला नेमकं उमजत नव्हतं की, मला या शोधमोहिमेतून नेमकं काय हवय. सम्या? का सम्यासारखं ऐश्वर्य? दोन्ही प्रश्न अनुत्तरीत होते.

एका दिवशी सम्याच्या वडिलांचा फोन आला. त्यांनी मला पोलिसस्टेशनला जाऊन विचारपूस करून यायची विनंती केली. त्यानंतर मी दोनदा-तीनदा पोलिसस्टेशनला जाऊन सम्याची विचारपूस केली. पण पोलिसांनाही काही सुगावा लागला नव्हता. माझीच उलट चौकशी होऊ लागल्यानंतर, मी पोलिसस्टेशनला जाणे थांबवले.

कालांतराने मी ऑफिसात रुळलो. कामाचा पसाराही हलका होतं गेला. रविवार सोबत शनिवारची पण सुट्टी मिळू लागली. मी सम्याची स्वतःहून चौकशी चालू करायचं ठरवलं. पण नेमकी सुरवात कुठून करावी ते उमजत नव्हतं. माझ्यासमोर सगळ्यात पहिले घरकामवाल्या मावशीचा विचार आला. घरी कोण कोण येत होतं? हे त्यांनाच माहीत असावं. मी कामवाल्या मावशीची शोधाशोध करायला सुरवात केली. सम्याच्या सोसायटीच्या सेक्युरिटीकडून मावशीचा पत्ता मिळाला. मावशींच घर शोधलं. त्यांच्याकडे विचारपूस केली तर त्यांनी सरळसोट काहीच माहीत नसल्याचं सांगितलं. मावशी कदाचित पोलिस चौकशीमुळे आधीच वैतागलेल्या होत्या. शेवटी मी नाउमेद होऊन बाहेर पडलो.

आता माझ्याकडे दुसरा आणि शेवटचा पर्याय उरला होता, तो म्हणजे सम्याच्या दुकानात काम करणारा माणिक. परत चौकशी सुरू केली. माणिकचा नंबर चहाच्या दुकानदारांकडून मिळाला. माणिकलाही पोलिसांनी फार पिळलं होतं. हो, नाही, हो, नाही करत अखेरीस माणिक भेटायला तय्यार झाला. पुढल्या सुट्टीत माणिकला भेटलो.

“नाही शेठ, मला समीरशेठ बद्दल काहीच माहीत नाही.” ‘ना’ चा कित्ता गिरवतचं माणिकने बोलायला सुरवात केली.

“माणिक तुला असं काहीच वेगळं जाणवलं नाही का त्यांच्या वागण्या-बोलण्यात?”

“नाही हो शेठ, त्यांनी आत्ताच नवीन मालाचा भरपूर स्टोक केला होता. त्याची उधारी भरपूर झाली होती. पोलिसांनाही हे सांगितलं होतं पण डिˈस्ट्रिब्युटरकडून पैशांबद्दल कधीही कोणतं प्रेशर नव्हतं.”

एक-एक करत, मी माणिकला प्रश्नांचा भडिमार केला पण दुकान व माल याव्यतिरिक्त माणिकला काहीही माहित नव्हतं. मुळात माणिक खूप कष्टाळू आणि कामाशी काम ठेवणारा होता.

“अच्छा! पण तुला दुकानात आलेल्या व्यक्तीबद्दल कधी काही संशय?” शेवटचा प्रश्न म्हणून, मी त्यावर सहज एक प्रश्न फेकला.

“नाही हो, तुम्ही तर स्वतः पाहिलं ना! गिऱ्हाईकच एवढे असायचे की दुकानात तोंड वर करून बघायलाही सवड मिळत नव्हती. आता हेच बघा ना! तुमचा चेहरापण मला नीटसा आठवत नव्हता. तुम्ही फोनवर ओळख सांगितली, म्हणून कळलं. नाहीतर ओळखूही शकलो नसतो तुम्हाला.” सरळमार्गी माणिककडून इतर कुठलीही अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नव्हता. माझ्या पदरी परत निराशाच पडली. अखेर मी त्याचा निरोप घेऊन माघारी वळलो. पाच पावलं पुढे जात नाही तितक्यात मागून माणिक ओरडला.

“शेठ, समीरशेठला भेटायला दरवर्षी एक गुरुजी यायचे. त्यांना समीरशेठ पैशाचे बंडल द्यायचे. त्यांना माहिती असेल का हो काही?” माणिकने, ‘गुरुजी’ म्हणताच माझी ट्यूब पेटली.

“कोण?… ते पंचा आणि गांधी टोपीवाले?”

“हा, तुम्हाला माहितीय का?”

“नाही, पण मी आलो होतो त्यावेळी मी त्यांना पाहिलं होतं. ते पुन्हा आले होते का? तुला माहित आहे का त्यांचाबद्दल काही?”

“नाही, ते त्यादिवशीच आले होते. पण त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाही. शेठ त्यांच्याबद्दल कधी काही बोललेही नाही. पण मला राहून राहून वाटतं की त्यांना काहीतरी माहीत असेल. बघा, कदाचित त्यांना काही माहीत असेल!”

मला त्या गुरुजींचा पूर्णपणे विसर पडला होता. निदान माणिकमुळे ती छोटीशी कडी तरी उलगडली. माझ्या डोक्यात चक्रे सुरू झाली. त्यांचा ना फोननंबर, ना पत्ता. गुरुजींना शोधायचं तर कसं?

माझ्या छोट्याश्या मेंदूवर रात्रभर जोर देत, मी ‘तो दिवस’ आठवत केव्हा झोपी गेलो ते कळलंही नाही. सकाळी उठलो तेव्हाही डोक्यात त्यांचेच विचार घोळत होते. त्यादिवशीचा एक एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उलगडत होता. सम्याने त्यांना दिलेले पैसे – माझा गुरुजींमागचा पाठलाग – बसस्टँड – त्या गर्दीत गुडूप झालेले गुरुजी – बसच्या खिडकीत दिसलेले गुरुजी – माझा पाठलाग – हातातून निसटलेली बस आणि मग आठवली बसवर झळकणारी मुंबई ते रत्नागिरीची ती पाटी. यसऽऽऽ रत्नागिरी! मला कोण आनंद झाला! मला माझीच पाठ थोपटावी वाटत होती. पण माझ्या आत्मस्तुतीची कर्पूरज्योत, काही क्षणातच एका उद्धभवलेल्या प्रश्नाने मावळली. रत्नागिरीला जाणार पण शोधणार कुठं? गुरुजींच तर नावही माहीत नव्हतं. नंतर या विचारातच बरेच दिवस गेले. या शुक्रवारी जावू, उद्या जावू, आज जावू करत दिवस हाताचे निघून गेले आणि शेवटी मी जाण्याचा नाद सोडला.

पुढे सहा-सात महिने उलटून गेले. सम्याचा काहीच पत्ता लागला नव्हता. सम्याच्या घरच्यांचीही आस मावळली होती. पोलिसांनीही मिसिंग केस बनवून फाईल गुंडाळली. मी माझ्या चाकरीत गुंतलो. कालपरत्वे सम्याचा विषयही डोक्यातून विरळ होत गेला. नोकरी आणि रूममध्येच आयुष्य गुरफटून गेलं. कधीकधी सगळं नकोस वाटायचं. काय करतोय? कश्यासाठी करतोय? नोकरीच्या समुद्रात किती पोहणार? कधी श्रीमंतीला शिवणार? कधी ऐशोरामात जगणार? कधी? काहीच उत्तर सापडत नव्हते.

एकदा असचं, एका शुक्रवारी ऑफिसवरून रूमकडे जात असतांना एका बसकडे नजर गेली. बसस्टँडपासून निघालेल्या त्या बसच्या खिडकीत गांधीटोपी आणि पंचा घातलेला एक माणूस दिसला. त्या माणसाला पाहून मला सम्याकडे आलेल्या त्या गुरुजींची आठवण झाली. मी थोडं जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला तर ते तेच गुरुजीच होते. त्यांना बघून माझे डोळे घुबडासारखे सताड उघडेच राहिले. सिग्नल सुटला. बस निघाली. मी त्याच्यापासून साधारण वीस फुटाच्या अंतरावर होतो. मी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता त्या बसच्यामागे धावत सुटलो. बस फुटपाथला खेटून धावत होती आणि मी फुटपाथवर गर्दीतून वाट काढत तिच्यामागे पळत होतो. श्वास फुलला, दम लागला. बसचा वेग समोरच्या वाहतुकीमुळे जरासा मंदावला आणि शेवटी मी कशीबशी बसची खिडकी गाठली. खिडकीवर हात मारत मी त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी माझ्याकडे लक्ष दिल नाही. अखेरीस मी बेंबीच्या देठापासून जोरात चिरकलो, “सम्या…सम्या…. कुठंय?”

त्यांनी माझ्याकडे वाकडी मान करून, डोळे वटारत पाहिले. बसची खिडकी पूर्ण उघडली आणि माझ्यावर जोरात खेकसले, “ए पागल…कोण सम्या? मी नाही ओळखत.”त्यांनी कोण सम्या म्हणताच माझ्या अंगातल त्राण गेलं. मी जागीच थांबलो. बस पुढे जात होती. ते माझ्याकडे बघत होते. ते खिडकीतून डोकं बाहेर काढले आणि त्यांचे धूसर होतं चाललेलं वाक्य माझ्या कानी पडले, “दुसरं काही हवं असेल तर लांजाला ये, आप्पा नाचणकर नावं माझं.” बस जात होती आणि मी तिथंच उभा राहून तिच्याकडे बघत राहिलो…’मला हे दुसरं काय देणार?’ याचा विचार करत.

मी झपझप पाय उचलत रूमवर गेलो. बॅगेत कपडे कोंबले आणि परत बसस्टँड गाठलं. बस यायला अजून उशीर होता. भुकेने पोटात कावळे ओरडत होते. कँटीनमध्ये जाऊन मिसळ खाल्ली आणि परत स्टँड वर येऊन बसलो. डोक्यात असंख्य प्रश्नांची गर्दी झाली होती. हे आप्पा नाचणकर कोण? हाच प्रश्न माझ्या डोक्यात घोळू लागला. समीरकडून पैसे घेणारे आज चक्क नाही कसे म्हणू शकतात? आणि हा दुसरं काय देणारं आपल्याला? तितक्यात बस आली आणि मी बसमध्ये जाऊन परत प्रश्नांनच्या गराड्यात बसलो. आपण नक्की कशासाठी आप्पा नाचणकारला भेटायला चाललोय? त्यांनी तर स्पष्ट सांगितलं की, सम्याबद्दल तर त्याला काहीच माहीत नाही.मग आपण जीवाचा आटापिटा करून कश्यासाठी चाललोय? नक्की सम्याचा शोध? का अजून काही?


क्रमशः

आपला अभिप्राय नक्की कळवा. आपला अभिप्राय माझ्यासाठी अमूल्य आहे….

मंगेश उषाकिरण अंबेकर
९८२३९६३७९९

6 Comments Add yours

 1. मदन म्हणतो आहे:

  झक्कास टर्न…..

  Liked by 1 person

  1. खूप खूप धन्यवाद मदन 🙏🏻😊

   Like

 2. Swapna Deshpande म्हणतो आहे:

  Majja aali….ya appa nachankar la lovkar bhetav pudhe kaay honar khup utsthu ok ta waadhli aahe…

  Liked by 1 person

  1. वाह….लवकरच… सगळं उलगडणार….खूप खूप धन्यवाद🙏🏻😊

   Like

 3. राकेश दत्तात्रय पाटील म्हणतो आहे:

  छान मंगेश
  आज मी बायंगी भाग 2 व 3 वाचला पुढे काय होईल सम्या भेटणार कि त्याच्याबरोबर काही वाईट झाले आहे. ते भाग 4 मध्ये नक्की मिळेल असे वाटते

  Liked by 1 person

  1. मनापासून आभार राकेश सर🙏🏻😊😊😊😊

   Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.