बायंगी (भाग-२)

दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर आवरुन, सम्या सोबत शॉपवर जायला तयार झालो. सम्याने थोडे आळोखे-पिळोखे घेतले, पण शेवटी त्याला कळून चुकलं की, मी त्याचा पिच्छा सहजासहजी सोडणार नाही. म्हणून त्रासून का होईना, शेवटी तो मला नेण्यास राजी झालाच.

आम्ही दुकानावर पोहचलो. त्याच्या दुकानात काम करणारा माणिक त्याची वाटच पहात होता. सम्याने दुकानाच्या चाव्या माणिकला दिल्या. त्याने दुकान उघडलं आणि सम्याने मला बाहेर बसायला खुर्ची दिली.

सम्या दुकानात गेला. समोरच्या रॅक आणि भिंतीच्यामध्ये थोडासा गॅप होता. तो गॅप एक दरवाजा लावून बंद केला होता. सम्याने त्या दरवाज्याचे कुलूप खोलले आणि आत गेला. दुकानातील सर्व दिवे लावले. बाहेर फक्त काहीतरी मंत्र पुटपुटण्याचा आणि घंटीचा आवाज येत होता.

माझी नजर त्याच्या पूर्ण दुकानात भिरभिरत होती. दुकानात विक्रीला फक्त एकाच प्रकारचे हेल्थ प्रॉडक्ट ठेवलेले दिसतं होते. विक्रीस ठेवलेल्या प्रॉडक्टच्या तुलनेत ते दुकान बऱ्यापैकी मोठं होतं. माणिकने डेस्कटॉप चालू करत आपलं स्थान ग्रहण केलं आणि एक एक गिऱ्हाईक यायला सुरवात झाली. दुकान मार्केटपासून बरंच बाजूला होतं आणि रहदारी पण म्हणावी तेवढी नव्हती. पण दुकानावर येणारी गिऱ्हाईकांची गर्दी पाहता मार्केट जवळ नसण्याचा काही फरक जाणवत नव्हता.

पंधरा मिनिटांनी साहेबांची पूजा उरकली. माणिकची तोपर्यन्त चार-पाच गिऱ्हाईक करून झाली होती. हा प्रॉडक्ट मी मुंबईच्या बऱ्याच दुकानातही पाहिला होता. पण सम्याच्या दुकानात फक्त एका प्रॉडक्टसाठी होणारी एवढी गर्दी थोडं अचंबित करणारीच होती. ‘कदाचित मार्केटरेट पेक्षा कमी दरात विकत असणार, म्हणून ही गर्दी!’ हा तर्क लावत मी माझे विचार बाजूला सारले. माझं खरं लक्ष, सम्या नेमकं आत काय करत होता याकडेच होतं.

“सम्या एक विचारू? देवांना आत का ठेवतो? ते तर बाहेरच हवे.”
सम्याने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि माणिकसोबत बोलू लागला. मी विचारलेल्या प्रश्नाचं सम्याकडे उत्तर नव्हतं का नेहमीप्रमाणे द्यायचं नव्हतं, हे कळलं नाही. पण मला देवघर आत ठेवलेले विचित्र वाटलं. गिऱ्हाईक येत होते. मी आताजाऊन सम्याच डेस्कटॉपवर चाललेलं काम पहात बसलो. सम्या आणि माणिक गिऱ्हाईकी करण्यात मग्न होती.

तितक्यात साठीतला एक इसम दुकानावर आला. पांढरा सदरा, धोतर, डोक्यावर गांधी टोपी, गळ्यात मोठ्या रुद्राक्षच्या माळा, कपाळावर भलंमोठं नाम आणि खांद्यावर पंचा असा साधारण त्यांचा पेहराव होता. त्यांनी दुकानाच्यासमोर उभं राहून सम्याला फक्त नमस्कार केला.  सम्याने त्यांना जसं पाहिलं तसं त्याच्या कपाळावर आठया पडल्या. “तुम्ही आज कसे काय?” सम्याचा विस्मित चेहरा बरचं काही सांगत होता. मला तिथंच काहीतरी गडबड वाटली.

“काय ! सगळं ठीक आहे ना?”

सम्याने “हो,हो.” म्हणत त्यांना नमस्कार करत दुकानाच्या बाहेर गेला. माणिककडे गिऱ्हाईक सोपवली. तेवढ्यात त्याचं माझ्याकडे लक्ष गेलं. सम्याला मी तिथे नको होतो, हे मी त्याच्या कपाळावर पडलेल्या आठ्या सांगत होत्या. कदाचित म्हणूनच त्याने मला तिथूनच कटवायच्या इराद्याने तो मला म्हणाला, “मक्या यार त्या चहा वाल्याला चार चहा सांगशील का?”  मी पण माझ्या चेहऱ्यावर अस्वारस्य भाव उमटवत त्याला अंगठा दाखवत बाहेर पडलो.

माझा सम्यावरचा संशय बळावला. मला नेमकी ती व्यक्ती कोण होती? हे जाणून घ्यायचं प्रचंड कुतूहल निर्माण झालं. मी पळत-पळत चहावाल्याला चहा सांगून परतलो. थोडं आडोश्याला थांबुन लांबूनच त्या दोघांकडे बघत बसलो. नेमका त्याच क्षणी  मला इंटरव्ह्यू दिलेल्या कंपनीतून कॉल आला. त्यांनी मला इंटरव्ह्यूबद्दल इतक्यात काही सांगता येणार नाही एवढंच कळवलं. मी रागाने कॉल कट केला.

इकडं सम्याच वागणं खूप संशयास्पद वाटतं होतं. तो दुकानात गेला आणि नोटांचे दोन बंडल आणून त्या व्यक्तीच्या हाती ठेवले. त्या व्यक्तीने नमस्कार केला आणि सम्याचा निरोप घेतला.. काही असो व नसो, पण या व्यक्तीचा सम्याच्या या समृध्द जीवनात नक्कीच काहीतरी हातभार होता, हे फार प्रकर्षाने जाणवलं. इंटरव्ह्यूच काही फळ भेटलं नाही!, याचं मला काहीच सुतक नव्हतं. माझ्या नजरेसमोर फक्त ती व्यक्ती झळकत होती. मला त्या व्यक्तीची माहिती काही केल्या काढायचीच होती. मी लांबूनच सम्याला कॉल केला आणि मला तात्काळ इंटरव्ह्यूला बोलालवं म्हणून खोटं सांगितलं.

मी त्या व्यक्तीचा पाठलाग करू लागलो. ती व्यक्ती झपाझप
पाय टाकत पुढे जात होती आणि मी त्यांच्या मागे चालत होतो. काही अंतरानंतर ते एसटी स्टँडजवळच्या गर्दीत दिसेनासे झाले. मी पळत त्यांचा शोधाशोध केला, पण ते पुढे कुठे गायब झाले ते कळलंच नाही. ते एसटी स्टँडकडे गेले असतील, असा अंदाज लावत मी स्टँडच्या आत शिरलो. त्यांचा शोध घेतला पण स्टँडवरच्या गर्दीत ते कुठे गायब झाले हे कळलंच नाही. जवळपास अर्धातास मी त्या व्यक्तीचा शोध घेतला आणि शेवटी रिकाम्या हाती स्टँडच्या बाहेर पडलो. मी माघारी फिरणार तेवढ्यात समोरून येणाऱ्या बसच्या खिडकीत गांधी टोपी आणि पंचा घातलेली ती व्यक्ती दिसली. मी त्या बसचा पाठलाग करणार तोवर समोर येणाऱ्या ट्रॅफिकमुळे मी अडकलो आणि बस माझ्यापासून दूर गेली. स्वतःवर रागराग करत मी जमिनीवर जोरात पाय आपटले आणि खाली फुटपाथला बघत तसाच उभा राहिलो. काहीच हाती लागलं नाही. फक्त बसवरची नेमप्लेट “मुंबई ते रत्नागिरी”  तेवढी मात्र माझ्या लक्षात राहिली.

मी माघारी दुकानावर गेलो. दुकानावर गेल्यागेल्या मी सम्याला  त्या व्यक्तीबद्दल विचारपूस केली. सम्याने नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तर देत. “अरे, ते दुकानात पूजा करणारे गुरुजी होते.” एवढंच सांगितलं. माझ्या अपेक्षेप्रमाणे तसं काहीच नव्हतं, हे ऐकून माझं मन थोडं खट्टू झालं.

“ते सोड तुझ्या इंटरव्ह्यूच काय झालं?,” सम्याने विषय माझ्या इंटरव्ह्यूकडे वळवला.

“ते म्हणाले, इंटरव्ह्यूचा रिझल्ट इतक्यात मिळणार नाही.” मी सम्याला सांगितलं. 

त्यादिवशी मला माझ्या नशिबावर फार राग आला. ना नोकरी भेटली ना सम्याच्या यशाचं काही गुपित उलगडलं. मी माझ्या परिस्थिती आणि नशिबावर फार कंटाळलो होतो. सम्यावर अजून ओझं नको म्हणून मी त्या रात्रीच गावी परतलो.

                 
◆●◆●◆●◆

“मक्या, कशात गुंगला? जायचं नाही का घरी? उद्या मुंबईला जायचंय ना तुला? ” चेत्याने हाक मारली तशी माझी तंद्री भंगली आणि मी सम्या सोबत घालवलेल्या भूतकाळातून बाहेर आलो.

“हो!”

“स्वतःला जप बाबा! मुंबई जेवढी चांगली तेव्हढीच वाईट. एखाद्याला एका रात्रीत प्रसिद्धी देते आणि तो जर माजला तर दुसऱ्या रात्री गायबही करते? मायानगरी ती मायानगरी…” चेत्याच्या या उपदेशाच्या कडवट बोलापेक्षा, सम्याच अचानकपणे गायब होणं हेच विचार माझ्या डोक्यात घर करून बसलं होतं.

क्रमशः

आपला अभिप्राय नक्की कळवा. आपला अभिप्राय माझ्यासाठी अमूल्य आहे….

मंगेश उषाकिरण अंबेकर 
९८२३९६३७९९

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.