बायंगी (भाग-१)

“माझ्या मुंबईच्या जॉबच आज फायनली पक्कं झालं रे पोट्यांन्नो.” नेहमीच्या कट्टयावर बसलेल्या मित्रांना पाहून मी मोठ्याने चिरकलो.

“काय सांगतोस मक्या! मस्त काम झालं हे आणि हो रे… असं सूकं सूकं सांगतोस का?” नेहमीप्रमाणे चेत्याने पार्टीच तुणतुण वाजवलंच.

“झालं काढलंच का पार्टीच खुसपट मध्येच. अरे पहिले या भोपळ्याला टुनुकटुनुक उड्या मारत मुंबईला जाऊ दे, चांगली तूप रोटी खाऊ दे, मग खुशाल मला काप…..आणि सध्या तरी हे पेढेच खा.”

“हा भोपळा एकदा मुंबई गेला तर परत कुठे भेटणार आम्हाला बाबा! हा एक नंबरचा लबाड आणि चेंगट भोपळा आहे.” चेत्याच्या या वाक्यावर सर्वांचा हशा पिकला. त्यात मी पण निर्लज्जपणे एकमेकांच्या हातावर टाळ्या देत सामील झालो. तितक्यात कट्टयापाशी धापा टाकत आलेल्या विन्याला बघून, आमच्या सर्वांच्या नजरा त्याकडे वळल्या.

“अरे, तुम्हा कोणाला सम्याचा फोन आला होता का? सम्या बद्दल काही कळलं का?” जोरजोराने श्वास घेत विन्याने आम्हाला विचारले.

“नाही बुवा, का? इनफॅक्ट मी आत्ता त्यालाच जॉब लागल्याची बातमी देण्यासाठी फोन करणार होतो…पण झालं काय ते तर सांगशील?” मी विस्मित होऊन प्रतिप्रश्न केला.

“अरे मक्या, त्याचा दोन दिवसापासून काहीच पत्ता नाहीये. त्याचा फोन लागत नव्हता म्हणून काका मुंबईला गेले आहे. तो तिथं पण नाहीये. काकांचा फोन आला होता इतक्यात, ते आपल्या कोणाला माहित आहे का म्हणून विचारात होते.” विन्याला बोलताबोलता दम लागला. कट्ट्यावर बसलेले आम्ही सर्व मुल एकमेकांकडे पाहत जागेच उभे राहिलो. सर्वांचे निर्विकार चेहरे पाहून, सम्याबद्दल काहीच कल्पना नसल्याची ग्वाही विन्याला मिळाली.
सगलीकडे सम्याचा विषय रंगला आणि गावभर पसरला. मी मागच्या आठवड्यातच बोललो होतो त्याच्याशी. सगळं ठीक तर होतं. मग हा गेला कुठे? काय झालं असं अचानक? माझ्या डोक्यात प्रश्नाचं काहूर माजलं. मी दोन महिन्यापूर्वीची सम्यासोबत व्यतीत केलेल्या काही दिवसांच्या आठवणीत गुरफुटलो. माझ्या इंटरव्हीवपासुन सुरू झालेला दोन महिन्यापूर्वीचा प्रवास माझ्या डोळ्यासमोर झरझर वाहू लागला आणि मी आठवणीत गुरफटलो.

◆●◆●◆●◆

सम्या…समीर देवधर म्हणजे चकाचक ब्रॅण्डेड कपडे, हातात ऍप्पलचा फोन , डोळ्यावर रे-बनचा गॉगल, बुडा खाली स्पोर्ट बाईक, गळ्यात पाच तोळ्याची सोनसाखळी अशा प्रकारच्या सर्व ऐश्वर्याने संपन्न असलेली व्यक्ती. समयकडे सगळंच कसं नजर लागण्यासारखं होतं. त्याचं ते ऐश्वर्य पाहिलं की मनात असूया निर्माण व्हायची. पण त्याचं हे सर्व ऐश्वर्य काही पिढीजात नव्हतं, ना देवधरकाकांकडे कुठली संपत्ती. हे सर्व सम्याने स्वतःहून मिळवलं होतं. फार कमी वर्षात त्याने बरीच मोठी मजल मारली होती.

मला ग्रॅज्युएशन संपून जवळपास वर्ष होत आलं होतं, पण काही केल्या नोकरी मिळत नव्हती. नोकरीचा नाद सोडून निमूटपणे पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतलं असत तर निदान वर्ष तरी सरलं असतं, ही सल मनाला वर्षभर बोचतं होती. घरची परिस्थिती बाबांच्या पगारावर संथपणे स्थिरावलेली होती. पगार झाला की साठटक्के घर खर्च, वीस टक्के माझा आणि मिनूचा शालेय खर्च, पंधरा टक्के सेविंग्स आणि पाच टक्के एंटरटेनमेंट. उडप्याकडे जाऊन मसाला दोसा, वडा सांभार किंवा जास्तीतजास्त धाब्यावर जाऊन पनीर, तंदुरीरोटी खाणं तेवढंच काय ते सेल्फ एंटरटेनमेंट.

फार काही मोठी स्वप्न नव्हती माझी. मिनुच शिक्षण, तिचं लग्न किंवा घरची परिस्थिती, असलं कोणतंच टेन्शन नव्हतं. बाबाने तर त्याची तरतूद करून ठेवली होती. मला तर फक्त मोठं व्हायचं होतं, सम्या सारखं. सम्या माझ्यापेक्षा तीन-चार वर्षांनीच मोठा. त्याने ग्रॅज्युशनकरून गाव सोडल आणि मुंबई गाठली ती कायमचीच. मुंबईत राहून खोऱ्याने पैसा कमवायचा, पण कसा? माहीत नव्हतं. दोन चार दिवसांसाठी गावाकडे आला की आणलेला पैसे घरी देई आणि उरलं सुरलं की आम्हा मित्रांवर उधळत सुटे. सम्याला आम्ही सगळे विचारायचो, “काय करतोस मुंबईत, सोन्याची विहिर सापडली काय तिकडे?” पण सम्या नेहमी उडवाउडवीची उत्तर देऊन विषय टाळायचा. या बाबतीत सम्या फार आतल्या गाठीचा. मला मात्र सम्या काय काम करतो यापेक्षा तो त्याने इतक्या कमी वेळात एवढे पैसे कसे कमावले याचीच फार उत्सुकता होती. कधीकधी याच्या मोठमोठ्या गप्पा ऐकून वाटायचं की याच्याकडे खरचं पैसे आहे का हा उगाच आपला मोठेपणा मिरवतोय.

सम्याच बघून मी पण मुंबई गाठण्यासाठी भल्याभल्या जॉब कन्सल्टंटला पायऱ्या घासल्या. ऑनलाईन अप्लिकेशन केले. तगडे रेफरन्स मिळवले पण सगळं फोल ठरतं होतं. कुठूनच काही आशेचा किरण दिसत नव्हता. मी गावात राहून वैतागलो होतो. गावात मिनू, आई- बाबा होते, जिवाभावाचे मित्र होते, सगळे नातेवाईक होते. गावात सगळं काही होतं फक्त नव्हता तो एक नेटका जॉब आणि सम्या सारखा खळाळणारा पैसा.

नशिबाने मला एका मुंबईच्या कंपनीतून इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. मुंबईत राहण्यासाठी सम्या सोडला तर दुसरा कोणताच पर्याय नव्हता आणि जरी असला असता तरी सम्या नेमका काय करतो, या उत्सुकते पोटी तरी मी सम्याकडे राहण्याची ही संधी दडवली नसती. मी सम्याला कॉल केला आणि इंटरव्ह्यूसाठी मुंबईला येतोय म्हणून कळवलं. सम्याने थोडा अडखळतच, पण होकार कळवला.

सकाळी सातला बसने मुंबईत पोहचलो. सम्याने फोनवरच त्याच्या घरी कसं यायचं ते सांगितलं. टॅक्सीकरून पत्ता विचारत सम्याच्या घरी कसाबसा पोहचलो. मी माझं सामान दरवाज्यापाशी ठेवलं. सम्या मला सोफ्यावर बसण्यासाठी सांगून आत गेला. सम्याने एकट्यासाठी सेमीफर्निश वन बीएचके फ्लॅट भाड्याने घेतला होता. टिव्ही, दिवाण, गॅस, सोफा अशा मोजक्या वस्तूने ते घर सुसज्ज होत. एकंदर सम्या जसा दाखवत होता तसाच राहतही होता. म्हणतात ना…..सगळी सोंगं करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. सम्या बाबतीत तेच खरं ठरलं. आता प्रश्न राहिला होतो तो म्हणजे, ह्या पैशासाठी सम्या नेमकं काय करतो?

कामवाली मावशी किचनमध्ये काहीतरी खुडबुड करत होती. सम्याने त्यांना चहाचं सांगितलं आणि हॉलमध्ये येवून सोफ्यावर बसत माझ्याशी बोलता झाला.

“बोला मकरंद शेठ, काय म्हणतात?”

“काही नाही रे, दादरच्या एका कंपनीकडून इंटरव्ह्यू कॉल आला आहे.”

“ग्रेट, दादर जवळच आहे इथून. किती वाजता आहे इंटरव्ह्यू.”

“साडेबारा वाजता बोलावलंय.” मी सांगितलं.

“अच्छा” म्हणत सम्या आत गेला आणि कामवाल्या मावशींनी केलेला चहा घेऊन आला.

“मक्या, ठीक आहे. तू थोडा आराम कर, निवांत आवर आणि टॅक्सी करून जा. मला नऊला शॉपवर जायला हवं. मी आवरतो.” सम्याने शॉप म्हणताच मी उडालो. मला इतक्या दिवस सम्या कुठल्या तरी मोठ्या कंपनीत जॉब करतो असचं वाटायचं.

“सम्या,तू दुकानावर काम करतो?” मी त्याला एकदम विस्मित होऊन प्रश्न केला.

माझ्याकडे बघत सम्या कुत्सितपणे मोठमोठ्याने हसायला लागला. त्याच हसणं बघून मला कळेना की माझं नेमकं काय चुकलं. शेवटी न राहवून मी परत त्याला प्रश्न केला “अरे, काही बोलशील का नुसतंच एकटं हसत बसणार आहेस?” तसा सम्या हसू आवरून पोटावर आपले दोन्ही हात ठेवत सोफ्यावर बसला.

“अरे, मक्या निदान माझं राहणीमान तरी बघ माकडा. तुला वाटलं तरी कसं की मी दुकानावर कामं करत असेल?” सम्याच्या या वाक्यात ‘मी’ वर जास्त जोर होता. मी त्याच्या ‘मी’पणाकडे दुर्लक्ष करत परत प्रश्न केला “म्हणजे?”

सम्याने सोफ्याला पाठ टेकवुन दोन्ही हात हँडरेस्टवर पसरवले आणि आपला उजवा पाय दुमडून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवत मोठया ऐटीत म्हणाला, “म्हणजे! अरे येडा, मी काही दुकानावर काम नाही करत. अपना यहा बिजनेस हैं, बिजनेस….और मैं उस बिजनेस का मालिक हूँ….” सम्याच्या चेहऱ्यावर प्रचंड अहंकार झळकत होता. त्याचे बोल ऐकून मी एकदम आवाकच झालो. एकतर ह्याचा बाप भांडवल पुरवू शकेल एवढी त्याची ऐपत नव्हती आणि मुंबईत आमच्या सारख्यांची एक पिढी जाते तेव्हा कुठे बिजनेस सेट होतो…..मग हा कसा बिजनेसमध्ये उतरला आणि एकाएकी एवढा सधनही झाला?

मी पुन्हा एकदा त्याच्यातल्या ‘मी’पणाकडे नजरअंदाज करत त्याला म्हणालो,”तू आम्हाला काही सांगतच नाही तर आम्हाला कसं कळणार आहे बाबा!”

“हा, हे तू म्हणू शकतोस! मी सांगितलंच नाही तुम्हाला, पण तेव्हा मी जस्ट बिजनेसमध्ये सेट होतं होतो, त्यामुळे मी तरी कसा सांगणार.” सम्या ठासून खोटं बोलत होता, हे त्याच्या चोरट्या नजरेतूनच दिसत होतं.

“असो, आता सांगितलं म्हणजे आता तू सेटल झालाय, असं समजायला तरी आता काही हरकत नाही. अब पार्टी तो बनती है!”

“जरूर, तू इंटरव्ह्यू देऊन ये मग आपण संध्याकाळी नक्की पार्टी करू. चल तू आराम कर मी आवरतो आणि निघतो.”

सम्या फ्लॅटची चावी देवून शॉपवर गेला. माझ्या डोक्यातील इतर विषयांची ट्राफिक, ‘सम्या आणि त्याचा बिजनेस’ या अपघातीक विषयाने बऱ्याच तासांसाठी रोखून धरली होती. मी आवरून इंटरव्ह्यूला गेलो, तरी माझ्या डोक्यात सम्याचेच विचार चालू होते. कधी एकदाचा इंटरव्ह्यू देऊन बाहेर पडतो आणि त्याच्या बिजनेस बघतो असं मला झालेलं.

माझा नंबर लागायला आणि इंटरव्ह्यू संपायला संध्याकाळचे सात वाजले. ऑफिसमधून बाहेर पडल्यापडल्या मी सम्याला कॉल केला.

“आत्ता संपला तुझा इंटरव्ह्यू! बरं एक काम कर तू आहेस त्याच्या जवळच रिगल हॉटेल आहे. तिथं पोहच. मी आलोच.”

“अरे मी येतो ना शॉपवर, मग दोघ जाऊ.” मला त्या पार्टीपेक्षा सम्या नेमका काय करतो हे बघण्याची उत्सुकता जास्त होती.

“आता परत इकडे कशाला येतो, रिकामी चक्कर! थांब तिथेच, आलो मी.” असं बोलून सम्याने माझा भ्रमनिरास केला. बाईक घेऊन पंधरा मिनिटात रिगल हॉटेलला पोहचला.

“मग, कसा झाला इंटरव्ह्यू.”

“काही नाही फक्त एच-आर इंटरव्ह्यू झाला. टेक्निकलसाठी परवा बोलावलंय.”

“धऽत्त तेरी… तू भी किस फालतू नौकरी के चक्कर में अटक गया…” सम्याला कोणाला ठासून कमी लेखायचं असलं की त्याची हिंदी चालू व्हायची.

“तू देतो का नोकरी मग!” मी त्याला सरळ प्रश्न केला. सम्या माझ्या गुगलीवर गडबडला पण लगेच स्वतःला सावरत चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणाला,”काय मकरंदराव चेष्टा करताय का माझी. मी तुम्हाला नोकरी द्यावं म्हणजे सावकाराला घरी पाणी भरायला ठेवण्यासारखं झालं.”

“छोटीसी तो ख्वाहिश पूरी हुई है अभी
उसके बारे में क्या बताऊं मैं,
मिल जाए उम्मीद से दुगना
तब सारे जहां में शोर मचाऊं मैं…

तिनका तिनका जमा करने में जुटा हूं अभी,
उसमें थोड़ा वक्त तो लगता है,
कैसे करदु हसरतें बया दिल की
उन्हे नजर लगने का डर लगता हैं।”

त्यादिवशी सम्याने सगळं काही सांगतील पण स्वतः काय बिजनेस करतोय? कसा करतोय? हे सगळं अनुउत्तरीतच ठेवलं.

क्रमशः

आपला अभिप्राय माझ्यासाठी अमूल्य आहे….नक्की कळवा.🙏🏻😊

मंगेश उषाकिरण अंबेकर
९८२३९६३७९९
http://www.mangeshambekar.net

5 Comments Add yours

 1. Swapna Deshpande म्हणतो आहे:

  Mast….Go ahead.

  Liked by 1 person

 2. Swapna Deshpande म्हणतो आहे:

  Mast….Go ahead.

  Liked by 1 person

 3. राकेश दत्तात्रय पाटील म्हणतो आहे:

  छान मंगेश पुढील भाग पण पाठव.

  Liked by 1 person

  1. खूप खूप धन्यवाद…..नक्की …रोज सकाळी आठ वाजता एक भाग प्रकाशित होतील….

   Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.