पुत्रवती भव?

रात्रीचं जेवण उरकलं, टिव्हीचा रिमोट हाती घेतला आणि आवडती छत्रपती संभाजींची मालिकेच्या प्रतिक्षेत सोफ्यावर विसावलो. तसा मी फारसा काही ऐतिहासिक मालिकांच्या भानगडीत पडत नाही, कारण लहानपणी बऱ्यापैकी ऐतिहासिक कथा कादंबऱ्या माझ्या नजरे खालुन गेल्या होत्या, हे काही ‘मी खुप मोठा वाचक वैगरे आहे’ असं काही कोणाला भासवण्यासाठी मुळीच लिहीत नाही, पण हे सांगण्याचा हेतु म्हणजे, ज्या काही मोजक्याच पण अप्रतिम कादंबऱ्या माझ्या वाचनात आल्यात त्या फार संस्मरणीय राहिल्यात आणि त्या सदैव तशाच स्मरणात राहाव्यात, म्हणून आजकालच्या टीआरपीसाठी उगाच लांबविलेल्या आणि रंगवलेल्या ऐतिहासिक मालिका बघुन उगाच कशाला आपली चिडचिड वाढवायची, पण फालतु नात्या गोत्यांच्या राजकारणी मालिकां बघुन मन कलुषित करून घेण्यापेक्षा, किमान आपल्याच छत्रपतींची माहिती आपल्या लेकरांच्या थोडी तरी कानी पडावी म्हणुन मी या मालिकेसाठी तरी टिव्ही लावतोच.

तर काल झालं असं की, या मालिकेचं शीर्षक गीत जस आमच्या कानावर पडल न पडल की भातुकलीच्या खेळात तल्लीन असलेल्या माझ्या पाच वर्ष्याच्या श्रीशाने मला एक प्रश्न केला, प्रश्न ऐकून मी आणि माझी ‘अग’ एकदम अवाक झालो, प्रश्न होता “श्री सखी राज्ञी जयति म्हणजे काय?” तिच्या तोंडून स्पष्ट उच्चारलेल्या राज्ञी जयती ऐकून मी खरंतर पाहिले धन्य पावलो कारण कालच्या भागात झालेला प्रश्न तिने आज पर्यंत डोक्यात ठेवला होता आणि ते जाणून घेण्याची उत्कंठा तिच्या इवलुशा डोळ्यात होती.

“श्री सखी राज्ञी जयति” हे शंभुराज्यानी त्यांच्या एकुलत्या एक धर्मपत्नी येसूबाई यांच्यासाठी लिहिलेलं एका ओळींच काव्य, हे काव्य त्यांनी, जेव्हा त्यांच्यापुढे दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव मांडल्या गेला, तेव्हा त्याला स्पष्टपणे नकार देत लिहिलेलं हे काव्य, ज्याचा अर्थ या आपल्यासारख्या साधारण जीवाला सांगायचा झाला तर ‘शंभुच्या ज्या श्री आहे, ज्या त्यांच्या लहानपणीच्या मैत्रीणही आहे आणि ज्या त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या राणीही आहेत अशा उदात्त मंगल तत्वाचा आणि पवित्र विचाराचा सहृदयी सदैव जयकर असो’ असा काहीसा आहे, पण खोलात जाऊन सांगायचा झालं तर खरचं हजारो शब्द पण अपुरे पडतील. पण या सर्व घटनेत खऱ्या अर्थाने जयजयकार करायचा झाला तर तो त्या शंभु राजांचा करायला हवा! कारण त्यांचं धर्मपत्नी यांच्या विषयी असलेले अपार प्रेम, एकनिष्ठता आणि संपूर्ण समर्पण या बद्द्ल या काव्यातुन त्याचा प्रत्यय येतो.
पण ह्यापुढे जाऊन विचार येतो की, ज्यांच्यावर भोसले घराणे पुढे न्यायची महत्त्वाची धुरा होती, त्यांना नसेल का वाटलं की आपला वंश पुढे न्यावा? स्वराज्याला आपण कोणी वारसदार द्यावा? निदान घरच्यांच्या नाहक आग्रहापाई तरी दुसरं लग्न का नाही करावं? असे कित्येक प्रश्न डोक्यात उच्छाद मांडतात, त्यासाठी तर ते हवे तेवढे संसार मांडून कित्येक वारस देऊ शकत होते आणि मोठया घराण्यात तर हक्काचा वारसदार ह्यापुढे अजुन एक सोयरीक किंवा अजुन एक लग्न या सारख्या गोष्टी त्यावेळी कितीतरी गौण होत्या. पण या सर्व आव्हानांना स्पष्टपणे नकार देण्यास जिजाऊंनी दिलेले संस्कार, त्यांनी प्राप्त केलेलं शिक्षिण आणि त्यांचे पवित्र विचार हे कामी आले. तसं ह्यानंतर त्यांना काही वर्षांनी वारस प्राप्त झाले तो भाग निराळा.

पण ह्याहुनही मोठी गोष्ट म्हणजे, हे सर्व काही फक्त बत्तीस वर्ष आयुष्य लाभलेल्या शंभुराजांनी आजपासून सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी बहुविवाह, वंश, जुन्यारूढी अश्या कित्येक दांभिक संकल्पनांना खुडून काढत, आपल्या समोर स्रीतत्वाचा आदर सत्कार मांडून ठेवला आहे. ज्या काळात माणसांपेक्षा फक्त रूढी परंपरेला प्राधान्य होतं, पण या सर्व बाबींचा आजही यत्किंचितही विचार होतो का? आपण आज मात्र त्यांच्या पेक्षा कितीतरी अतिउच्च शिक्षण घेऊन सुध्दा आपल्या विचारांनी खुजेचं आहोत.

असाच खुजेपणा मी चार महिन्यांपूर्वी एका लग्नाला गेलो होतो त्यावेळी अनुभवला, खूप मोठं आलिशान समारंभ होता, वधुवर अग्नीकुंडा समोर बसलेले होते आणि कोण्या एका विधीसाठी गुरुजी स्पिकरवर बोंबलत होते की “कोणी पुत्रवती स्त्री असेल तर कृपया येथे या, आणि ज्या तिथे पोहचल्या होत्या त्यांना परत विचारणा होत होती की तुम्ही पुत्रवती असाल तरच बसा!” हा सर्व प्रकार त्या भव्य मंडपाला भयंकर लाजीरवाणा होता, विचार केला तर पुत्रवतीच का? अशी कोणती ही विधी जिथं फक्त अन्य कोणत्याही स्त्री चालत नाही. हा सर्व खटाटोप का तर नवजोडप्यांना पण वंशवेल फुलवताना पुत्रप्राप्तीच व्हावी म्हणुन पुत्रवती स्त्रीचाच आशिर्वाद घ्यावा लागतो म्हणुन तर नसावा ना?

फक्त या वंशासाठी आजही कितीतरी मुली गर्भातच खुडल्या जातात, गर्भलिंगनिदान नाही म्हटलं तरी छुप्या स्वरूपात अजुनही चालूच आहे, उच्चशिक्षित, उच्चभ्रू असो वा अशिक्षित, गरीब कुटुंब पण मुलाच्या हव्व्यासापोटी किती अघोरी आणि किळसवाणे प्रकार अजुनही सर्रास होतात, मुलगी तर नकोच पण त्यातल्यात्यातही पहिली मुलगी तर यांना नकोच नको, आणि या सर्वांचं कारण काय तर फक्त नि फक्त “वंश”

तरी देखील आपल्याला मुलगाच हवाय तर तो कशाला, तर आपल्या क्षुल्लक संपत्तीला वारस म्हणून, वृद्धापकाळात आपला सांभाळ करावा म्हणुन, किंवा सगळ्यात वाह्यात कारण म्हणजे तिला मुलगा झाला, हिला मुलगा झाला पण मला नाही झाला म्हणून, हास्यास्पद आहे ना परंतु ही वस्तुस्थिती हसण्यावर नेऊ नका, खरचं या गोष्टीना प्रोत्साहीत करायला कळत नकळतपणे स्त्रियाही काहीश्या प्रमाणात जबाबदार असतात, ही एका स्त्रीने दुसऱ्या स्त्री-जन्मा पुढे मांडलेली सर्वात मोठी खेदाची बाब,मोठी शोकांतिका आहे. तुम्ही ही असल्या वागणुकीचा अनुभव घेतलाच असेल, बघा कधी कोणी गर्भवती स्त्री दिसली की तिला दिलासा द्यावा म्हणुन बऱ्याच स्त्रिया किती सहज बोलतात “अग! मला खात्री आहे तुला मुलगाच होणार बघ!” किंवा “पहिला मुलगा झाला म्हणजे सुटलीस बघ” आणि जर दुसऱ्या वेळेस गर्भवती दिसली की “ह्या वेळेस तर तुला नक्की मुलगाच होणार बघ” अहो पण …..का? तुमच्या दोन बुबुळात सोनोग्राफीच मशीन सेट केलंय आणि डोसक्यात मॉनिटर बसवलाय काय हो? आणि दरवेळेस ते मुलगाच आहे असं दाखवत का? नाहीना मग स्त्री असूनही का उगाच त्या स्त्री जन्माचा असा अनादर करता, म्हणायचं असेल तर म्हणाना एक वेळेस तरी की “तुला कन्यारत्नच होणार , लक्ष्मीचं येणार घरीं तुझ्या.

कित्येक महालक्ष्मीचे, भवानीचे, वैष्णव देवीचे, भक्त असे आहेत की ज्यांना आपल्या घरात कोणी मुलगी नको फक्त मुलगाच हवा असतो त्यांना विचारावं वाटत तुम्ही नेमकं कोणाला फसवताय ? का कोणाला फक्त राम किंवा कृष्णच हवा आहे, पण का कोणाला सीता किंवा रुक्मिणी नको? मुली तुमच्या घरचा आणि त्याहूनही जास्त तुमच्या संस्कारचा आरसा असतात. खुप गोंडस नातं असतं एक बापाचं आणि मुलीचं, शिवाजी महाराजांचं नुसतं नाव ऐकलं तरी शत्रू थरथर कापायचा पण तेच शिवाजी राजे आपल्या लेकी शिवाय कोणालाही घाबरायचे नाही, किती जिव्हाळा आहे ना या नात्यात. एवढे असूनही अजुनसुध्दा बरयाच जणांना वंशाचा दिवाच हवा असतो पण वात नको असते, अहो तुम्ही स्वतः मेण बनून त्या वातीच्या भोवती खंबीर उभे तर रहा मग पहा! ती वात सगळ्या जगाला किती प्रकाशित करून सोडते……..आणि तुम्हाला तुमच्या वितळण्याचही सार्थक वाटेल.

बर चला आपण एक वेळेस मान्य करू की खरंच मुलगाच हवाय, तर आजच्या धकाधकीच्या युगात त्याच्या भविष्यावर ही थोडा वास्तविक विचार करू …….समजा आपल्याला मुलगा झाला, आपण काय करतो तर त्याचे जिवापाड लाड करतो, आपल्या लहानपणीच्या राहुन गेलेल्या इच्छा त्यापुढे आणुन ठेवतो, आपण जे शिकलो त्यापेक्षा नक्कीच थोडं जास्त शिक्षण आपण त्यांना द्यायचा प्रयत्न करतो, त्यानंतर त्याच्यापण जीवनाबद्दलच्या आशा-आकांक्षा वाढतात, मग त्याला अपेक्षानुसार नोकरी किंवा धंद्यासाठी त्याला आपल्या पासून दूर जावं लागतं, मग त्याचे अतिउत्साही मित्र किंवा अति एकटेपणा घालवण्यासाठी त्याचं लग्न लावुन दिल्या जात, मग तो हळूहळू तिथेच स्थिरावतो आणि आपल्याला पण त्यांच्यासोबत राहण्याचा आग्रह धरतो, मग काही वर्षं, महिने, दिवस त्यांच्यासोबत राहिल्यानंतर आपल्याला आश्रिता सारखं भासु लागतं, आणि मग आपलं अख्ख आयुष्य ज्या लोकांसोबत व्यतीत केलं, ती आपली लोकं आणि आपल्या गावाची ओढ आपल्याला काही स्वस्थ बसु देत नाही , आणि शेवटी आपण परत माघारी फिरतो.
आता याउलट, जर तो आपल्या सोबतच राहिला तर काय होत? आपले न पटणारे पिढीजात विचार आपण त्याच्या दिनचर्येत घुसवु पाहतो, त्यातुन वादविवाद निर्माण होतात, मग कळत नकळत आपण दुर्लक्षित होऊ लागतो आणि अजुन वादविवाद यापेक्षा वेगळं राहिलेलं बरं म्हणुन चुली वेगळ्या करतो. हे सगळं भयाण निराशावादी वाटत असेल, पण कुटुंबातील सगळे समंजस असतील तर असं काही होत नाही, पण एक कटूसत्य म्हणजे आपल्या मुलाकडून (त्यांच्या लहानपणापासून साठवुन ठेवलेल्या) आपल्या अवास्तव अपेक्षा आणि मुलाच्या आपल्या कडून असलेल्या फुटकळ अपेक्षा आपल्याला बहुतांशी याच मार्गावर आणुन सोडतात, ह्यात मी सासु-सून या अनादी काळा पासुन कुप्रख्यात केलेल्या नात्या बद्दल काही न लिहलेलंच बरं! कारण ह्यात चूक दोघांचीही नसते पण वयातील अंतरामुळे दुभंगलेली वैचारिक मते आणि रोजचे रटाळवाणे सहजीवन या वादांचे मूळ कारण. या सहजीवणाचा तुम्हालाही प्रत्येय घ्यायचा झालाच तर तुम्ही तुमच्या अर्धांगिनी सोबत बाहेर कुठे ना जाता, घराची रोजची कामे करून, बाकी काही न करता एकमेकांसोबत पुर्णवेळ एकाच घरात चारच दिवस राहुन बघा, तुमच्या गोड गुलाबी प्रेमाचा गोडपणा संपून गुलाबाला किड कशी लागते ते बघा.

एकूणच काय तर या सर्व जीवन-प्रवासात मुलं समंजस आणि गुणी निघाली तर ठीक नाहीतर आपला पण नटसम्राट झाल्याशिवाय राहत नाही आणि जर आपली परिस्थिती अशीच काहीशी होणार असेल तर मुलगा असो वा मुलगी त्यात शेवटी काय फरक? आणि राहिला तो वंश-वारसाचा प्रश्न तर तुम्ही खरं सांगा तुमच्या खापर पणजोब्याच नाव तरी तुम्ही सांगु शकता किंवा त्यांच्या काही कर्तृत्वाच्या गोष्टी तुमच्या मुलाला सांगु शकता? अहो वंशावळी पुढे चालू ठेवायला आपण आता काय कोणते राजे , महाराजे लागुन नाही गेलोय की आपला वंश पुढे नाही राहिला तर तुमची घराणेशाही संपेल किंवा आपल्या काकरूपी आत्म्याला कोणी पितरांचे जेवण वाढणार नाही?

ह्याचा अर्थ मुले चांगलीच नसतात असं अजिबात नाही किंवा फक्त मुलीचं चांगल्या असही मुळीच नाही, तर आपला मुली ऐवजी मुलाचा हव्व्यास आणि त्याकडून भविष्यात ठेवल्या जाणाऱ्या अपेक्षांवर आधारित असलेलं आपलं उर्वरित जीवनसाठी, एका न जन्मलेल्या बाळाचं जगात येण्यापूर्वीच जीव घेणं, हे खरंच किती अक्षम्य आहे? मुलगा किंवा मुलगी या पुढे जावून विचार करायचाच झाला तर त्या माऊलीचा विचार करायला हवा जिची झोळी अजूनही फक्त एका बाळाच्या प्रतिक्षेत आहे. निदान त्या असह्य वेदनांपेक्षा निमुटपणे भगवंताने आपल्या पदरात जो काही प्रसाद टाकलाय तो सहृदयी स्वीकारून त्याचा यथासांग संस्कार करावा, अर्थातच तो किंवा ति बद्दलची कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता.

मला लाभलेले स्नेही आणि कुटुंब यांकडे पाहता, मी आज स्वतःला फारचं भाग्यवान समजतो. घरात आम्ही तिघे भाऊ मी सर्वात लहान, दोन मुलांनंतरही माझ्या आई वडिलांच्या असलेल्या फक्त मुलीच्या आसे पोटी मी हे जग पाहू शकलो नाहीतर आज हे अख्ख जग एका थुकराट लेखकाला मुकले असते, पण ह्यातुन गमतीचा भाग वजा केला तर माझा जन्म अशा कुटुंबात झाला जेथे पहिल्या बाळा पासून मुलीची ओढ होती आणि ती परिपूर्ती तब्बल तीन तप उलटुन गेल्यानंतर श्रीशाच्या रुपात उदयास आली, आणि आजही परत आम्ही दोघेही उभयता आमच्या येणाऱ्या मुलीची आतुरतेने वाट पाहतोय.

अर्थात जे आमच्या पदरी पडेल ते सगळ्यात गोडचं……….

या संपूर्ण लेखाला माझ्या आयुष्यात आलेली प्रत्येक स्त्री म्हणजे माझी आज्जी, सासु, मावशी, काकु, मामी, बहिणी,वहिण्या, मेव्हण्या, मैत्रिणी आणि माझी खास करून माझ्या कायम सोबत असलेली आई, धर्मपत्नी व मुलगी हा प्रत्येक घटक कारणीभूत आहे, ज्यांचा मी आयुष्यभर ऋणी आहे, अशा उदात्त स्त्री तत्वाचा कायम जयजयकार असो.

“स्त्री सखी राज्ञी जयती” या लेखाचा शेवट यापेक्षा अजुन काय गोड असु शकतो.

मंगेश उषाकिरण अंबेकर

९८२३९६३७९९

आपला अभिप्राय नक्की कळवा. आपला अभिप्राय माझ्यासाठी अमूल्य आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.