फर्स्ट प्रपोज

भाग २(अंतिम भाग)

थोडया वेळाने मला शुध्द आली, तेव्हा माझ्यासमोर कोणीच नव्हते. घराचं दार वाजवून मायराला उठविण्याची माझी हिंमत झाली नाही.

दुसऱ्या दिवशी अंगात क्षीण होता. पण माझ्यात घरी थांबायचं धाडस नव्हतं. मायराच्या घरासमोरून जातांना मी नजरही वर केली नाही. दिवसभर माझ्या डोळ्यासमोर कालची रात्र गिरक्या घालत होती. आपण अशा व्यक्तीवर प्रेम करतोय जी जिवंतच नाही! असं कसं होऊ शकतं? माझ्या मनात असंख्य विचार भिनभिनत होते. तितक्यात मोबाईल बघतांना तिचं फेसबुक प्रोफाइल बघण्याचा विचार डोक्यात आला. मायराचं प्रोफाइल पेज सापडलं आणि जे दिसलं ते बघून मला दरदरून घाम फुटला. तिच्या वॉलवर मित्र मैत्रिणीचे ‘रेस्ट इन पीस मायरा’ असे असंख्य शोक संदेश झळकत होते….म्हणजे ती जे म्हणत होती ते खरं होतं. मी बऱ्याच वेळ ऑफिसातच बसून राहिलो. संध्याकाळ उलटून रात्र झाली होती. ऑफिसतले सगळे घरी गेले होते. मला घरी जायची मुळीच इच्छा नव्हती पण रिकामं ऑफिस खायला उठलं.

शेवटी ‘जे होईल ते होईल’,असा निर्धार करत मी घराकडे निघालो. धिम्या पावलांनी घराची वाट धरली होती. मनात खूप भीती होती. मायराच्या घराजवळ आलो तसा पावलांचा वेग वाढवला. तिरक्या नजरेने गेटजवळ पाहिलं तर कोणीच दिसलं नाही. मी झटकन मायरचा गेट ओलांडून मी माझ्या घराच्या गेटपाशी पोहचलो आणि सुटकेचा निःश्वास घेतला. तितक्यात मायरचा आवाज ऐकू आला.

“नचिकेत थांब.” मायरचा कर्कश्य आवाज ऐकून, माझे हातपाय इतके लटलटू लागले की माझं गेट पण मला धड लावता येत नव्हतं.

“घाबरू नको मी तुला काहीच करणार नाही. मला तुझी मदत हवी आहे.” मायराच्या तोंडून मदत हा शब्द ऐकून मी थोडा स्थिरावलो.

“मदत!!! आणि माझ्याकडून! एका भुताला मी कसली मदत करणार. तू माझ्यापासून का लपवून ठेवलस.”

“मला माफ कर नचिकेत.पण माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. मला मुक्ती हवी आहे. देशील तेव्हढी?”

“मुक्तीऽऽऽ… !! आणि मी कशी देणार?” मी आवक होऊन तिच्याकडे बघत राहिलो.

“चार वर्षापूर्वी मी घरात भांडून आपल्या पायावर उभं राहायला घरा बाहेर पडले होते. इथे एका कंपनीत एयर होस्ट्स म्हणून कामावर लागली. माझ्या कंपनीत हर्ष नावाचा एक मुलगा होता. तो माझ्यावर प्रेम करायचा असं मला वाटायचं. मी पहिले त्याला अजिबात भाव देत नव्हती. पण हळूहळू मी त्याच्या प्रेमात कशी पडले ते मलाच कळलंच नाही. आमचं प्रेम वाढत गेलं. नको त्या वयात मी नको ती चूक करून बसले. मला दिवस गेले. हर्षला हे सांगितलं त्यावेळी त्याने मला त्याच्या या घरी बोलावलं. हर्षने मूल पाडायला सांगितलं. पण मला हे बाळ हवं होतं म्हणून मी त्याला नकार दिला. आमच्या दोघात यावरून खूप वाद झाले. हर्षने चिडून मला खूप मारलं. शेवटी मी त्याच ऐकलं नाही म्हणून त्याने सुरा काढला. मी खूप घाबरले. मी त्याला माफी मागत होते पण त्याने मला व माझ्या होणाऱ्या बाळाला मारायचा कट त्याने आधिच रचला होता. अखेरीस त्याने माझ्या पोटात सूरा भोसकून माझा व बाळाचा जीव घेतला आणि या घरच्या मागे पुरलं. त्यादिवसापासून माझा आत्मा इथेच भटकत आहे. मला माझा प्रतिशोध घ्यायचा आहे. जो पर्यंत हर्षचा खात्मा करत नाही, तोपर्यंत मला मुक्ती मिळणार नाही. त्याने मला मारलं यापेक्षा त्याने माझ्या बाळाला मारलं आहे आणि त्यासाठी त्याला मरावंच लागेल.
या घरात नंतर कोणी राहायला आलेच नाही आणि तो ही कधी इकडे फिरकला नाही. जे शेजारी रहायला आले ते दोन दिवसापेक्षा जास्त काळ टिकलेच नाही. मग त्यादिवशी तू इथं राहिला आला आणि मला माझ्या मुक्तीचा मार्ग दिसला.” मायराची आपबिती ऐकून मन सुन्न झाले, डोळे पाणावले. तिने भोगलेल्या वेदना तिच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत होत्या. कोणी इतकं कसं निर्दयी वागू शकतं.

“सांग… मी काय करू? त्या हरामखोरला पकडून आणू तुझ्यासमोर?” माझा संताप अनावर झाला होता.

“नको… तू माझ्यासाठी कायदा हातात घेऊ नको. तू फक्त त्याला इथं पर्यँत आण, बाकी मी बघते.”

“नक्की…. मायरा तुझ्यासाठी मी काहीही करायला तय्यार आहे.” माझे पाणावलेले डोळे बघून मायराचेही डोळे पाणावले.

मायराने सांगितल्याप्रमाणे मी पुढली सर्व सूत्रे फिरवली. हर्षला इथे आणायचा मी एक परफेक्ट प्लॅन आखला. मी हर्षला एका टेलिफोन बुथवरून कॉल केला. त्याला सांगितलं की, मला त्याचा बांगला विकत घ्यायचा आहे आणि त्यासाठी मार्केटरेटपेक्षा तिप्पट पैसे द्यायला तय्यार आहे. जो चार वर्षापासून फिरकलाही नव्हता तो लोभी हर्ष ऑफर ऐकून त्या संध्याकाळीच हजर झाला.

मी बंगल्याच्या गेटपाशी त्याची वाट पाहत होतो. हर्ष ठरलेल्या वेळेनुसार तिथे आला. आम्ही गेट उघडून व्हरांड्यात झुल्यापाशी गेलो. मायरा पण तिथंच झुल्यावर बसलेली होती पण हर्षला दिसत नव्हती. त्याला पाहताच मायरचा राग अनावर झाला.

मी ठरल्याप्रमाणे बंगल्याच्या मागच्या बाजूला जिथे मायराला पुरलं होतं तिकडे जाऊ लागलो. तितक्यात झुल्यावर हात टेकवून बसलेली मायरा, जोरजोरात झोका घेऊ लागली. कोणी बसलेलं नसतांनाही जोराने हेलकवणारा झोका बघून हर्षला दरदरून घाम फुटला. तो घाबरून माझ्यामागे पळत आला. आम्ही दोघे मायराला पुरलेल्या ठिकाणी पोहचलो. मायराला जिथं पुरलं होतं त्याच्या बाजूलाच एक मोठा खड्डा खोदलेला होता. त्या जागेला बघून हर्ष जागीच थिजला.

“कोण आहेस तू?” हर्ष माझेकडे रागाने बघत ओरडू लागला. तितक्यात आमच्या दोघांमध्ये वाऱ्याच्या वेगाने मायरा येऊन उभी राहिली. मायराचे डोळे प्रतिशोधाच्या आगीने तप्तलाल झाले होते. तिचे केस विस्कटलेले आणि चेहऱ्यावर जखमांचे व्रण होते. पोटात रक्ताळलेल्या असंख्य जखमा. मायरा त्याच्या कानाजवळ येऊन रडक्या सुरात कर्कश्य चिरकली.”आऽऽऽआऽऽऽअऽऽऽ..” मायराचा तो भयानक अवतार बघून हर्षचा थरकाप उडाला.
अंगणात असलेल्या फुलझाडांच्या कुंड्या प्रचंड वेगाने हर्षच्या अंगावर एक एक करून फेकल्या जात होत्या. हर्ष मोठमोठ्याने व्हिवळत होता.

“मला माफ कर मायरा. मी चुकलो.” हर्षला मायराच अस्तित्व कळून चुकलं. तितक्यात त्याच्या एक पाय एका जाड दोरखंडाच्या फासात अडकला आणि तो पाठीवर पडला. जमिनीवर घासत घासत तो जोरात ओढल्या जाऊन, एका उंच वाकलेल्या माडावर खेचल्या गेला. त्याचं डोकं आणि हात खाली. एक पाय दोरखंडात जखडलेला तर दुसरा पाय हवेत अधांतरी होता. त्याचा दोर जसा सैल सुटायचा तसं त्याच डोकं जमिनीवर जाऊन आपटायचं आणि परत तो वर ओढल्या जायचा.

“मायरा मी कबूल करतो मी तुझ्या सोबत बेईमानी केली…माफ कर मी चुकलो.”

“मी पण त्यादिवशी अशीच दयेची भीक मागत होते. पण तू पुढचा मागचा विचार न करता मला मारत होता. तू किमान माझ्या पोटातल्या बाळासाठी सोडलं असतं तर एक वेळ मी तुला माफ केलही असतं. पण तू कुठलीच दया दाखवली नाही.” मायरा चिरक्या आवाजात ओरडून सांगत होती.

“माफ कर! मला सोड मायरा! मला सोड” हर्ष जोरजोराने रडत दोन्ही हात जोडून मायराची माफी मागत होता.

“बरं, हे घे सोडते तुला.” मायराने दोर सोडला. हर्ष चाळीस फूट उंचावरून खाली खोदलेल्या खड्यात डोक्यावर पडला. खड्यात रोवलेला सुरा त्याच्या डोक्यात घुसला आणि तडफडतं असलेल्या हर्षला शेवटी मृत्यूने कवटाळले.

मायरा आपल्या प्रतिशोधानंतर शांत झाली.
“नचिकेत मी तुझे उपकार कधीच विसरू शकणार नाही. आता तुझी रजा घेण्याची वेळ आली आहे.

“असं नको बोलुस मायरा, तू प्लिज मला सोडून नको जाऊ.

“मला जावं लागेल नचिकेत.”

“मला एक सांगशील? मी तुला ज्या दिवशी दिसलो त्याच दिवशी तू मला का नाही सांगितलं. एवढा वेळ का घेतला.”

“तुझ्या अगोदर जे जे इथं राहिला आले ते मी काही सांगायच्या आगोदरच मला बघून पळून गेले. आणि जेव्हा तू आलास तेव्हा मी कोणत्याही परिस्थितीत तुला गमावू शकत नव्हते. त्यासाठी तुला वेळ देणं आणि समजून घेणं आवश्यक होतं. मला तुझा स्वभाव आवडला. तुझं बोलणं ऐकून ऐकून मी तुझ्यात गुंतत चालले होते. एकएकदा तुझं बोलणं ऐकून असं वाटायचं की माझ्या नशिबी तुझ्यासारखा जोडीदार का नाही आला. मला तुझ्यासारखा मित्र मिळाला असता तर माझं आयुष्य खरचं वेगळं असतं पण कदाचित तुझ्यासारख्या गोड व्यक्तीच्या हातीच माझी मुक्ती ठरली होती.”

“मायरा, मी कधी कोणाच्या प्रेमात पडलो नाही. पण तुला पाहिलं आणि त्याच क्षणी तुझ्या प्रेमात पडलो. मला तू हवीहवीशी वाटायची. खूपदा विचार केला की तुला सांगून टाकावं पण तूला ते आवडणार का नाही म्हणून घाबरत होतो. पण मी आजही तुला नाही सांगितलं तर मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकणार नाही ….. आय लव यु सो मच. मला कधी वाटलं नाही की माझ्या आयुष्यातला माझा पहिला प्रपोज असा असेल.” मी घुडग्यांवर बसलो होतो. मला माझे अश्रू अनावर झाले नि गळा दाटून आला.

“आय लव यु टू नचिकेत.” मायराच्या डोळ्यातले पाणी माझ्यावर प्रेमाची ग्वाही देत होते. मला निरोप देत मायरा अनंतात विलिन झाली.

समाप्त

सदर कथा पुर्णपणे काल्पनिक असुन, फक्त नि फक्त वाचकांच्या मनोंरंजनाच्या हेतुने लिहिली आहे. ही कथा कोणत्याही अंधश्रद्धा चालना देत नाही. या कथेचा कुठल्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही.

मंगेश उषाकिरण अंबेकर
९८२३९६३७९९
http://www.mangeshambekar.net

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.