फर्स्ट प्रपोज

भाग – १

“मस्तऽऽऽ छान आहे घर. आफिसच्या इतक्या जवळ आणि एवढ्या कमी रेंटवर असं टुमदार घर मिळवून दिल्याबद्दल खूप धन्यवाद मित्रा.” मी रियल इस्टेट एजेंटचे आभार मानले. मला हवं तसं घर बघून मी हुरळून गेलेलो.

“नचिकेत सर, कशाला लाजवता……ते तर आमचं कामाचं…..बाय द वे, हा घ्या ऍग्रीमेंट…सगळं वाचून घ्या, सही करा नि मग मी दुपारी येतो. ओके.” आकाश माझ्या हातात रेंट ऍग्रीमेंट ठेवून निरोप घेतला.

घर बऱ्यापैकी ऐसपैस होतं. घरासमोर छानसा बगीचा पण होता. भविष्यात आई-बाबांना माझ्यासोबत राहण्यासाठी उत्तम म्हणून हे घर निवडलं. घराला लागून भोवताली अजून सात ते आठच घरं होती. एक दोन घर सोडली तर बाकी सगळी घरं रिकामीच दिसत होती.अंदाजे सात-आठ वर्ष जुनी असलेली ही वसाहत इंडस्ट्रीयल एरियाला लागून होती तरीही परिसरात एक दोन माणसं सोडली तर बाकी निर्मनुष्य. माझ्या घराच्या शेजारी एक टुमदार बंगला होता. बगीच्यातले माड सोडले तर इतर सर्व झाडं, फुलंझाडं बऱ्याच दिवसांपासून पाण्याशिवाय रुक्ष आणि कोमजून गेली होती.

इस्टेट एजेंट संध्याकाळी येऊन ऍग्रीमेंट आणि दोन महिन्याच घरभाडं घेऊन गेला. सर्व समान आवरुन मी थोडं निवांत झालो आणि व्हरांड्यात येऊन आरामखुर्चीत विसावलो. व्हरांड्यात मावळतीचा आल्हाददायक सूर्यप्रकाश पडला होता.थंडगार हवा सुटली होती. मी मोबाईलवर किशोरदांचे गाणे ऐकत निवांत पहुडलो. सकाळपासून थकलेल्या देहाला झोप कधी लागली तेही कळलं नाही.

“नचिकेत….ऐ…नचिकेत” मला कोणीतरी आवाज देत असल्याचा भास झाला. मी डोळे उघडले तेव्हा आजूबाजूला कोणीच दिसलं नाही. बरचं अंधारल होतं. जोराचा वारा सुटला होता. माडाची झावळ सळसळत होती. वीजा कडाडत होत्या. आल्हाददायक वातावरणाने अचानक रौद्ररूप धारण केलं होतं.

मी उभा राहिलो, तसं माझं लक्ष माझ्या घराच्या बाजूला असलेल्या त्या बंगल्याकडे गेले. त्या घराच्या व्हरांड्यात एक बल्ब लुकलुकत होता. त्या बल्बच्या अंधुक पिवळट प्रकाशात झुल्यावर कोणीतरी झुला घेतांना दिसलं. झुला गंजल्यासारखा करऽऽकरऽऽ आवाज करत होता. निर्मनुष्य परिसर नि ते भयावह वातावरण बघून माझा घसा कोरडा पडला. माझे हातपाय लटलटू लागले. माझ्यापासून ती व्यक्ती फक्त वीस फुटावर दूर असेल. आमच्या दोघात फक्त एक आखूड कंपाऊंडची भिंत होती. नेमकं ती व्यक्ती कोण आहे, हे बघण्यासाठी मी दबक्या पावलांनी पुढे गेलो. तितक्यात बल्बचा प्रखर प्रकाश पडला आणि त्या झुल्यावर बसलेली ती व्यक्ती माझ्या नजरेस पडली. ती एक सुंदर तरुणी होती. तिला बघून थोडं हायसं वाटलं आणि माझ्या जीवात जीव आला.

आमची नजरानजर झाली. तिच्यावरून नजर हटवू नये असचं वाटत होतं. त्या अंधुक प्रकाशातही तिचं सौन्दर्य कमालीचं उठून दिसतं होतं. ती एकटक माझ्याकडे बघत होती. तब्बल मिनिटभर आम्ही एकमेकांना बघत होतो. मी तिच्याशी काहीतरी बोलावं म्हणून अजून जवळ जाणार तितक्यात ती अचानक उठली आणि झपझप पाय टाकत तिच्या घरात गेली. त्या घरात तिच्याशिवाय अजून कोणीच दिसलं नाही. मी थोडा हिरमुसलो पण एवढं लावण्य माझ्या शेजारी पडलं याचा मनोमनी खूप आनंद झाला. लव्ह ऐट फस्ट साईट….असचं काहीसं झालं.

दुसऱ्या दिवशीपासून माझी नोकरी सुरू झाली. ऑफिसमध्ये काम जास्त नव्हते. संध्याकाळी ऑफिसवरून घरी आलो की माझी भिरभिरती नजर समोरच्या घरावरच असायची. पण पुढले काही दिवस घरात कोणीच दिसलं नाही. ती कधी दिसते आणि मी कधी तिच्याशी बोलतो असं माझं झालेलं.

एका शनिवारच्या संध्याकाळी ती दिसली. इतक्या दिवसानंतरची तिची ती झलक मला फार सुखावून गेली. ती त्याच झुल्यावर निवांतपणे झोके खात माझ्या घराकडे बघत होती. मी त्यादिवशी ठरवलेच आज काही करून हिच्याशी ओळख तरी करायचीच.

“हॅलो, मी नचिकेत !” मी चेहऱ्यावर अगदी प्रसन्न भाव आणत नमस्कार केला.

“तरऽऽऽ?” डोळे वटरत फार रुक्ष स्वरात ती बोलली. तिच्या ‘तर?’ नंतर माझ्यात पुढे काही हिंमतच झाली नाही. तरी मी थोडं थांबून स्वतःला धीर देत बोललोच. “मी इथं नवीन आहे….इथं बोलायला कोणीच नाही…वाटलं तुमच्याशी ओळख तरी करावी.”

“कशाला ओळख…. मी चांगलं ओळखून आहे मुलांना. गोड गोड बोलून ओळख वाढवणार आणि मग फायदा घेणार.” तिचं सडेतोड उत्तर माझ्या जिव्हारी लागलं. तिच्या चेहऱ्यावर मैत्री विषयी स्पष्ट द्वेष झळकत होते.

“सॉरी मी तशातला मुलगा नाही. आणि हो…सगळीच मुलं सारखी नसतात आणि तुम्हाला तसं वाटतं असेल तर सॉरी, आय रिस्पेक्ट
युअर डिसीजन.” ती माझ्या मैत्रीचा अजून काही गैरअर्थ काढायला नको, म्हणून मी एवढं बोलून मागे वळलो.

“हॅलो, मी मायरा.” तिने मागून आवाज देत, स्वतःच नाव सांगितलं. मला थोडंस हायसं वाटलं. मी मागे वळून तिच्याकडे एक कटाक्ष टाकला.

“हाय, मी नचिकेत….मी नुकताच जवळच्या जायसन कंपनीत लागलो….” मी माझं नाव, गावं सांगत संपूर्ण परिचय देऊन मोकळा झालो.

“सॉरी मी तुला एवढं सडेतोड बोलले पण माझा खरचं कोणावर विश्वास नाही.”

“इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड…आजकाल कोणावर सहज विश्वास ठेवावं अशी परिस्थितीच राहिली नाही.”

“मी एअर होस्टेस आहे. मी आऊटस्टेशनच जास्त असते. त्यामुळे फार कमी असते घरी.” तिने माझ्या पुढल्या प्रश्नाचं न विचारताच उत्तर दिलं.

“ओह, आय सी..तरीच तू चार-पाच दिवस दिसली नाही.”

“म्हणजे तू माझ्यावर लक्ष ठेवून होतास तर!” असं म्हणत ती गालातल्या गालात खुदकन हसली. मी चाचपलो. “अहंऽऽऽ तसं काही नाही! इथं कोणीच नसतं ना बोलायला म्हणून …”
ती भेट माझ्या संस्मरणीय राहिली.

नंतर हळूहळू चार-पाच दिवसात कधी कधी गाठभेट होऊ लागली. ती झुल्यावर बसलेली असायची आणि मी माझ्या व्हरांड्यात आरामखुर्चीत बसून तिच्याशी तासनतास गप्पा मारत बसायचो. सहसा मीच जास्त बोलत बसायचो आणि ती मला निहाळत फक्त ऐकत बसायची. खूप वाटायचं की तिला प्रपोज करावा, पण तिला राग येईल किंवा तिचा विश्वास तुटेल अस काही करायची हिंमत नव्हती.

तरी दोन भेटी नंतर ती मला भेटली तेव्हा तिला तिचा फोन नंबर मागायची हिंमत केली.

“तुझा फोन नंबर सांग ना.”

“मी फोन वापरात नाही. मला फ़ार कंटाळा येतो.”

“फोन न वापरणारी मी पहिली एयर हॉस्टेस पाहिली.

“तसं काही नाही. एकेदिवशी बॉसवर चिडून, वैतागून मोबाईलच फेकला. त्यानंतर मला फोनची गरजच भासली नाही. आमचं कामाचं टाईमटेबल फिक्स असतं.”

“मग, फेसबुक, व्हाट्सएप तर माहीतच नसेल ना.”

“अकाउंट होते. पण त्यादिवशीनंतर फेसबुक, व्हाट्सअप्प पाहिलंच नाही.”

“ओके, पण आता तर वापरायला काय हरकत.”

“नको, मला नकोच ते.”

मायरा आपल्या विचारांवर पक्की होती. नंतर मी कधी मायराला फोनबद्दलच काय, पण तिला न आवडणाऱ्या कुठल्याच गोष्टींबद्दल कधी विषय काढला नाही. किंबहुना माझी हिंमतही झाली नाही.

बघता बघता महिना उलटून गेला. मायरला भेटून सात-आठ दिवस होऊन गेले होते. ऑफिसात कामाचा बराच व्याप वाढला होता. कधी कधी ऑफिसातून घरी येऊस्तोवर मध्यरात्र व्हायची.

असचं एकेदिवशी उशिरा घरी येतांना मायरा बंगल्याच्या गेटसमोर उभी ठाकलेली दिसली. “तू इतक्या वेळ कुठे होतास? मी किती वेळापासून वाट पाहत आहे तुझी?” मायरा अक्षरशः माझ्यावर खेकसली. मी उशिरा आल्याने ती खुप वैतागलेली होती.

“अग, ऑफिसमध्ये थोडं काम होतं म्हणून उशीर झाला. तुला तर मी म्हणतो की मोबाईल वापरत जा. निदान बोलणं तरी होतं. पण आपला हेका सोडेल ती मायरा कसली? असो, बोल! काय म्हणतेस तू?”

“आत ये. मला तुला काही सांगायच आहे?” पहिल्यांदाच मायराने मला तिच्या बंगल्यात बोलवलं होतं. माझ्या मनात वेगळेच लाडू फुटले. मायराला नक्की काय सांगायचंय? प्रपोज तर नाही ना करणार? ती थोडी फॉरवर्ड आहे, पण डायरेक्ट प्रपोज करणार? नुसत्या विचारानेच मी हुरहूरलो. माझा आनंद गगनात मावेना.

मी गेट उगडले नि आत गेलो. “बोल ना! काय सांगायचं आहे?” माझे कान ते अडीच शब्द ऐकायला आसुसले.

आम्ही दोघे बोलत बोलत घरच्या गार्डनमध्ये फिरू लागलो. तिने माझा हात पकडला तशी अंगात शिरशिरी भरली. असं म्हणतात की प्रेमाचा स्पर्श गार असतो पण तिचा हात खरचं बर्फासारखा थंडगार पडला होता.

“मी तुला जे सांगणार ते नीट लक्षपूर्वक ऐक. मला तू जी समजतो, ती मी नाही…..”

“नाही नाही मायरा, माझ्या मनात तुझ्याबद्दल असं काहीच गैर नाही.” मी तिचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच पुटपुटलो.

मायरा माझ्याकडे बघत मोठयाने हसली. “अरे वेड्या, मला तू जी समजतो, ती मी नाही….म्हणजे मी मायरा आहे. पण हा देह माझा नाही.”

“हंऽऽऽ…अच्छाऽऽअच्छाऽऽ! तुला एक सांगू, मी पण नचिकेत नाहीये. मी तात्या विंचू आहे. हा हा हा” मी हसत खिदळत तिला टाळी दिली.

“मी खरं सांगतेय नचिकेत.” तिचा चेहरा गंभीर होता.

“काय खेचते माझीऽऽ सकाळ पासून कोणी भेटलं नाही का?”

तेवढ्यात लाईट गेली. सगळीकडे काळाकुट्ट अंधार पसरला. मी मायरचा हातात हात घेण्यासाठी हात पुढे केला आणि पाहतो तर काय! समोर मायरा नव्हतीच. मी चारही दिशांना गिरकी घेतली. पण मायरा कुठेच नव्हती. समोर असलेली व्यक्ती एक क्षणात गेली कुठे? मी थोडा घाबरलो.

“मायरा, हे फालतू खेळ प्लिज नको यार! कुठे आहेस तू? समोर ये?” मी असं बोलत नाही तोपर्यँत माझ्यापाठी एकदम वाऱ्याच्या वेगाने कोणीतरी येऊन उभा राहिल्याचा भास झाला. घराबाहेरचा बल्ब लुकलूक करू लागला. मी घाबरत-घाबरत हळूच मागे वळून पाहिले. मागे मायरा पाठमोरी उभी होती.
“मायरा हे काय? तू अशी पाठमोरी का उभी तू? इकडे बघ.”
मायराने धड ना हलवता गर्रकन मान मागे वळवली. तिचे केस विस्कटलेले होते. चेहऱ्यावर असंख्य रक्ताळलेल्या जखमा, डोळे म्हणजे फक्त पांढरी बुबुळे. ती मायरा होती म्हणून विश्वास बसत नव्हता. तिचं हे भयावह रूप बघून माझा क्षणात थरकाप उडाला. गात्र न गात्र गळून पडले आणि बोवळ येऊन मी खाली पडलो.

क्रमशः

सदर कथा पुर्णपणे काल्पनिक असुन, फक्त नि फक्त वाचकांच्या मनोंरंजनाच्या हेतुने लिहिली आहे. ही कथा कोणत्याही अंधश्रद्धा चालना देत नाही. या कथेचा कुठल्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही.

©मंगेश उषाकिरण अंबेकर

5 Comments Add yours

 1. Dipti म्हणतो आहे:

  😲 मला नावावरून लवस्टोरी असेल असं वाटलं होतं.. पण धक्कातंत्र आवडले.. next part कुठे वाचायला मिळतील..?😊

  Like

   1. Dipti म्हणतो आहे:

    Thank u so much..🙏😊😊

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.