“ताई, म्ही तर चिकन मटण खातचं नाय, पण पोरासनी दर चार पाच दिसामधी चाळीस पन्नास रुप्याची चिकन आणून भुरुनी करून खाऊ घालायचीच.
“अच्छा”
“अव पण आता कुठला काय तो करणा आलाय ना ,तर सगळं बंदच करून टाकलंय.”
“हम्म बरं केलं बघ आणि ते करना नाही, कोरोना आहे ग.”
“हा तेच ते.”
रखमा भांडे धुवायला गॅलरीत गेली. इकडे “भुरुनी हा कोणता नवीन पदार्थ” या प्रश्नाने मॅडमच्या डोक्यात कोलाहल माजवला. कदाचित रखमाच्या गावाकडचा पदार्थ असेल या उत्सुकतेपोटी मॅडमने शेवटी न राहून, “रखमा हे बुरुनी काय असते ग.”
“आता ग बया, म्हणजे तुम्हांसनी भुरुनी म्हायती नाई.” रखमाच्या जहरी हसण्यावर मॅडम चाचपल्या. आपण या बाबतीत एवढं अडाणी कसकाय?
“म्हणजे तो रक्ती वैगेरे प्रकार असतो, तस काही आहे का ग हे”
मॅडमने अगदीच न राहवून अन स्वतःच अज्ञान दूर करावं म्हणून रखमेला विचारलं.
“अववव ताई , ते भातात नाय का… म्हसाला आणि चिकनचे शिजवलेले तुकडे घालून मिस्क करून इकतात सगळीकडे.”
“अम्म्मम…….म्हणजे तुला बिर्याणी म्हणायचं आहे का?”
“हम्मम्म्मम्म,काय ताई तुमी पण…”
“हत्तऽऽऽऽतीच्या…. मॅडमने कपाळावर हात मारून घेतला आणि “माझंच चुकलं ग बाई.” म्हणत गुपचूप बेडरूममध्ये जाऊन पुढची वीस मिनिटे लोळूस्तोवर हसल्या.
जिते रहो….. सदा सिखते रहो.
मंगेश उषाकिरण अंबेकर