आत्मनिर्भर

“मंजिरी नाव हिचं. बीएड केलं आहे. कशी वाटते तुला?” व्हरांड्यात लॅपटॉपवर स्थळ शोधत बसलेल्या बाबांनी विनयला एक स्थळ सुचवलं.

विनयने हातातला चहाचा कप बाबांना दिला. “बाबा, निदान या लॉकडाऊनमध्ये तरी मुली दाखवायचं थांबवा हो.”

” लॉकडाऊन संपल्या संपल्या तू कोणी सून म्हणून माझ्यासमोर उभी करणार असेल, तर मी हे सगळं आत्ताच बंद करतो बघ.”

लग्नाचा विषय टाळावा म्हणून विनय बाबांपासून वळला आणि तितक्यात त्याची नजर समोरच्या बंगल्यापाशी उभ्या असलेल्या अँबुलन्सवर गेली. अँबुलन्स समोर उभ्या असलेल्या मुलाला बघून त्याच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलले.
“बाबा, मितेश दिसतोय ना हो तो!” विनयने बाबांना प्रश्न केला. तसे बाबा उभे राहून त्या अँबुलन्सकडे बघू लागले.

“अरे, हो रे! चार-पाच दिवसांपूर्वीच आला तो अहमदाबादवरून. पारीखशेठ रात्री दोन वाजता सिटी बॉर्डरवर गेले होते त्याला आणायला.”

“अहो, पण लॉकडाऊन चालू असतांना तो आला का? आणि कसा?.”

“लॉकडाऊन सुरू झालं त्यादिवशीपासून पारीखशेठ फार चिंतेत होते. मला त्यादिवशी सहज फोन केला तेव्हा सांगत होते की मितेश तिकडे रूमवर एकटाच अडकलाय. त्याच्या एकट्याचे खायचे खूप हाल होत आहे. त्यात या बिचाऱ्याला साधा चहा सुध्दा करता येत नाही.”

“हो,पण आला कसा?” 

“परवाच कुलकर्णी काका सांगत होते की, पारीख शेठनी काहितरी एक्सटर्नल फोर्स लावून घरी आणलं त्याला. कोणत्या तरी सामानाच्या ट्रक मधून तो आपल्या सिटीच्या बॉर्डरपर्यन्त पोहचला आणि मग पारेख शेठ घेऊन आले त्याला तिथून.”

“बापरे, एवढं करायची काय गरज पण ! आणि बिचारा काय म्हणताय बाबा त्याला. लॉकडाऊन चालू असतांना सर्व नियम धाब्यावर बसवून येणं म्हणजे स्वतः सोबत कित्येकांच्या जीवावर उदार होण्यासारखंच. हा उहापोह कशाला! फक्त स्वतःच उदरभरण करता येत नाही म्हणून?”

“विनू, तू आता इथेच नोकरीला आहे म्हणून असं बोलतोय. पण बऱ्याच वेळा परिस्थिती वेगळी असते. शेवटी अशावेळी कोणाला आपलं मुल आपल्याजवळ नको आणि प्रत्येकाला आपल्या कुटुंबाजवळ असलेलेच आवडणार. असो, देव करो मितेशची टेस्ट पॉजिटीव्ह न येवो.”

“तुम्ही म्हणतात ते खरं आहे बाबा, ज्याचं जळतं त्यालाच कळतं म्हणा…….पण तुम्हाला एक सांगू, आज मितेशवर ही वेळ फक्तनिफक्त पारीखकाकांमुळे आली आहे.”

“पारीखशेठनी मितेशला या लॉकडाऊनच्या काळात प्रवास करण्यासाठी प्रोत्साहीत केले, म्हणून तू म्हणतोय का हे सगळं?”

विनय मिश्कीलपणे हसला “नाही हो बाबा…त्याने लॉकडाऊन असतांना प्रवास केला म्हणून नाही म्हणत ….खरतरं याकाळातला हा प्रवास चुकीचाच….पण त्याचे जेवणाचे एवढे हाल झाले की त्याला प्रवास करून इकडे येण्याशिवाय गत्यंतर उरलं नाही. यासाठी पारीख काकाच जबाबदार आहे.”

“ते कसकाय रे बाबा!”

“बसा थोडं. बाबा, तुम्हाला आठवतं का लहानपणी मितेश आणि बाकीचे मित्र मला बालकामगार म्हणून चिडवायचे.”

“हो, हो…तू रडतपडत, नाक पुसत त्यांची कंप्लॅन्ट घेऊन तू माझ्याकडे यायचा आणि पारीख काकाकडे चला म्हणायचा.”

“बाबा, मी पण त्यांना पहिले चेष्टामस्करीत घ्यायचो. परंतु त्याने मला एकदा फार अभिमानाने सांगितलं होतं की “आमच्या घरात मुलं किचनमध्ये काम करत नाही आणि माझे पप्पा मला अजिबात घरकामाला हात लावू देत नाही.” त्यादिवशी मला त्याच्या या गर्विष्ठपणाचा फार राग आला होता. खरतरं मलाही त्याच्या ऐशोआरामचा हेवा वाटायचा. पण त्यादिवशी मी त्याला आणि माझ्याही मनाला समजूत घालत सांगितलं होतं की “माझे बाबा म्हणतात की घरचंच काय, पण कोणतंच काम कधी कमीपणाचं नसतं” त्यावर तो उपहासात्मक हसला होता. त्याच ते खिजवणार हास्य मला खूप खूज करून गेलं होतं.
                     त्या घटनेनंतर मला तुम्ही जेव्हा जेव्हा घरचं काम सांगायचे, तेव्हा मला मितेश आठवायचा आणि मी पण अंग जड करु पाहायचो. पण तुमच्या आणि आईच्या धाकापुढे मी निमुटपणे घरातलं सगळं काम करायचो. तुमचं बघून मी झाडू मारायला, फरशी पुसायला, कचरा कचराकुंडीत नेऊन टाकायला आणि अगदी अंघोळ झाल्यावर स्वतःचे कपडेही स्वतःच धुवायला सहजच शिकलो. तिसरी पासून आईने पण मला हळूहळू स्वयंपाक शिकवायला सुरू केला. तेव्हा ती माझ्या अगदी बारीक बारीक गोष्टीच कौतुक करायची. ‘किती मस्त बारीक चिरलीस तू कोथिंबीर!’ ‘कणिक अगदी छान तिंबलय हा तू!’ ‘वाह अगदी परफेक्ट झालाय वरणभात!’ हा आता तिखटामिठाचं सूत्र एकदम तंतोतंत जमलंय तुला!’ असलीच छोटी छोटी गोड कौतुक ऐकून माझा हुरूप वाढतं गेला आणि मग काय! हळूहळू माझी स्वयंपाकतली रुची कधी अन कशी वाढली, हेही कळलं नाही.”
                       “बाबा खरतरं, हल्लीच्या मुलांना स्वयंपाक फक्त दोनच कारणामुळे येतो. एक म्हणजे स्वयंपाकाची आवड आणि दुसरं म्हणजे गरज…… आणि इथेच पारीख फॅमिली आपल्या  मुलाला पूर्णपणे स्वावलंबी करण्यात अपुरी पडली. मितेशला नेहमीच लाडोबा करून ठेवलं. फुकटचा अभिमान बाळगण्यापेक्षा मितेशला घरची काम सोडा निदान स्वयंपाक जरी शिकवला असता, तरी मितेशला आपल्या घरी येण्याची एवढी गरज भासली नसती आणि आज दारापुढे अँबुलन्स येण्याची ही वेळही आली नसती. असो, मितेश लवकरच बरा होऊन येईल.”

“विनू, ह्या तर जरतरच्या गोष्टी झाल्या बघ. काहींना स्वयंपाक करायची आवड असते, काहींना नसते, काहींना प्रचंड कंटाळा असतो, काहींचे तर एवढं मोठं खटल्याचं घर असतं की जिथं मुलं-मुलींना देखील किचनमध्ये फिरकायची गरज पडत नाही. प्रत्येकजण आपल्या आवडी व आलेल्या परिस्थितीनुसार स्वयंपाक शिकतो किंवा त्याकडे डोळेझाक करतो. कोणी शिक्षण झाल्यावर, तर कोणी लग्न झाल्यावर स्वयंपाक शिकतात. कोणी अगदीच गरज पडल्यावर तर कोणी असले संकट आल्यावर स्वयंपाककडे बघतात. स्वयंपाक हा ज्याच्यात्याचा सवडीचा आणि चॉईसचा प्रश्न बनून राहिला आहे.”
                     “हा….पण विनू… तु जे म्हणतोय त्यातली एक गोष्ट मला मात्र अगदी पटली. स्वतःची भूकही आपण स्वतः क्षमवू न शकणे; यासारखं स्वतःहून ओढवलेले दुबळेपण दुसरं काही नाही. आपल्याकडे आत्मनिर्भरची व्याख्या फक्त ‘बक्कळ पैसा’ इथं पर्यंतच मर्यादित आहे. त्या व्याख्येत स्वयंपाक, घरकाम यासारख्या स्वतःच्या अत्याआवश्यक गरजा कधीच गृहीत धरल्याच जात नाही; मग ती मुलगी असो व मुलगा. पैसा फेकला की सगळं मिळतं या तत्त्वावर बहुतांश जण जगतात. मग दुष्काळ, महापूर आणि असले भयंकर रोग माणसाला आपली जागा दाखवतात. त्यात कोणी सुधारतो, तर मितेश सारखा कोणी अशा परिस्थितीतही त्यापासून पळ काढतोच.
                      मुलं सुसमजूत झाल्यापासूनच आपण जसं त्यांना अभ्यासात, खेळण्यात, कला क्षेत्रात प्रोत्साहीत करतो, तसचं थोडं थोडं किचनमध्ये पण लुडबुड करायला आणि थोडेफार पाकशास्त्राचे धडे गिरवण्यासाठी  प्रोत्साहीत करायला काहीच हरकत नाही. मूलभूत गरजे मधली रोटी, कपडा, मकान पैकी आपण निदान रोटी कशी करायची तेवढं जरी शिकवलं तरी खूप झालं.
                     विनू तुला सांगतो, पूर्वी गुरुकुल शिक्षण पध्दतीत, शिष्यला कोणत्याही एकाच घरी भिक्षा मागून भिक्षापात्रात जेवढं पडेल ते अन्न शिजवून तेवढ्यातच दिवस भागवावा लागायचा. याचे दोन फायदे होते. एकतर भिक्षा मागितल्या नंतर शिष्यात कुठेच अहंभाव उरत नव्हता आणि दुसरं म्हणजे, मिळालेल्या शिद्यात उत्तमोत्तम आणि पुरेपूर असं काय करायला हवं ज्याने आपली दिवसभराची भूक शमली जाईल, हे सगळ्यात महत्वाचे धडे शिष्याला भेटत. आजच्या मुलांना गुरुकुल सारख शिक्षण तर नाही मिळू शकत, पण कमीतकमी घरी शिजवायचं कसं एवढं तरी शिकवायलाच हवं. आणि हो…..प्रत्येकाने एक कायम लक्षात ठेवायला हवं. इतर कलांसारखी स्वयंपाक पण एक कलाच आहे. त्यामुळे ही कला जर तुम्हाला खूप छानपणे अवगत असेल, तर त्याचा कधी गर्व बाळगू नका. नाहीतर मोठमोठ्या कार्यक्रमात स्वतःला धुरंधर समजणाऱ्या एखाद्या तबलजींची सम चुकावी, तशी आपली पाककला पण ऐनवेळी हुकते बरं!”

शेवटच्या वाक्यावर विनयच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. तो दोन्ही हाताने आपल्या कानाच्या पाळ्या पकडुन, मान डोलवत बाबांकडे बघत म्हणला, “बाबा, तुम्ही बरोबर कान पिळता हा माझे……मला स्वयंपाक किंवा घरकाम येत म्हणून त्याचा मला गर्व नाही, पण आईने दिलेल्या या कलेचा अभिमान नक्कीच आहे. होस्टेल लाईफमध्ये घरच्या जेवनासाठी मुलांची होणारी तडफड, अस्वस्थता मी पाहिली आहे आणि नोकरी करतांना रोज हॉटेलचं जेवून करूनकरून विटलेले माझे सोबतीही मी पाहिले आहे. पण घरच्या जेवणाची तोड कशातच नाही आणि सगळ्यांना भुरळ घालणार हे घरचं जेवण आपल्याला येतं, म्हणून कदाचित माझ्या वाक्यातून चुकून गर्व डोकावत असेलही. पण यापुढे मी त्याची काळजी घेईन. पण बघाना बाबा…. तुम्हाला एक गोष्ट कधी जाणवली का!  आज आई देवाघरी जाणून अलमोस्ट पाचवर्ष होत आली, पण तिने लावून दिलेल्या सवयीमुळे आजतागायत आपल्या किचनमध्ये आपण दोघे सोडले, तर कोणालाच हात लावायचं भाग्यही लाभलं नाही.”

“हो…खरचं रे विनू मला हे कधी जाणवलेच नाही!……पण हे बघ, तुझ्या या वाक्यातही परत गर्व डोकावतोय.” बाबांच्या या वाक्यावर विनय डोक्यालाच हात लावतो.

“बघा, हे असं होतं माझं, बोलायचं काही वेगळंच असत आणि अर्थ काही वेगळाच निघतो.” विनयचा पडलेला चेहरा बघून बाबा खळखळून हसतात. थोडं थांबतात आणि परत विचार करत विनयला म्हणतात,”ओ..हो..हो… तुला काय वेगळं बोलायचं होतं ते आता कळलं. आता लवकरच त्या किचनवर ताबा मिळवणाऱ्या गृहिणीकडे इशारा होता ना तुझा.”

“गृहिणी! …..अरे देवा, बाबा मला तसा कुठलाच इशारा द्यायचा नव्हता हो.”

“अरे, गृहिणीवरून आठवलं, सध्या सोशल मीडियावर या भयानक संकटातच्या काळात गृहिणीबद्दल सहानुभूती दाखवण्यासाठी, बऱ्याच पुरुषांचे घरकाम करतानाचे सेल्फी धुमाकूळ घालताय, स्तुतीसुमनांचे बॅनर फिरताय, मोठमोठ्या गप्पा मारल्या जाताय, स्त्रियांना थँक्यू वाले मेसेज फॉरवर्ड होताय. पण प्रत्येक्षात अखंड काम करत असणाऱ्या त्या गृहिणीच्या अपेक्षा काय ते कोणीच जाणून घ्यायचं प्रयत्न करत नाहीये. आजही तिच्या अपेक्षा मोजक्याच आहे. तिला मोठमोठ्या गप्पा नको, भाषण नको, उपकार नको, ना ही तिला ते थँक्यूवाले फॉरवर्डड मेसेज हवे. तिला फक्त हवंय ते समजून घेणार एक मन आणि तिच्या सोबत काम करणारे मदतीचे दोन हात…… असो, तू तुझ्या बायको सोबत तसं वागू नको म्हणजे आम्ही मिळवलं रे बाबा.”

“हो….हो…तुम्ही आता परत गाडी माझ्या लग्नाकडे वळवू नका हा!……आणि एवढं पण काही नाही हा बाबा. माझे बरेच मॅरीड फ्रेंड्सनी तर घरातली काम वाटून घेतली आहे. स्वयंपाक तू तर झाडू मी, लादी तू तर कपडे मी…. असं सगळं व्यवस्थित चालू आहे. काही मठ्ठच आहे जे तुम्ही जसं आत्ता बोलले ना तसं वागतात.”

“तसं असेल तर खरचं चांगल बघ. याकाळात तरी तिच्यावरच ओझं बनून राहण्यापेक्षा आधार बनून तिची मदत करायला हवी”

“बरं हे सगळं सोडा आणि मला एका क्लिष्ट प्रश्नाचं उत्तर द्या.”

“अजून कोणता प्रश्न रे?”

“तोच ..आईचा प्रिय प्रश्न. ‘सांगा…. काय करू जेवायला?’ विनयच्या हातावर टाळी देत बाबा खुदकन हसले आणि दोघेही तसेच किचनकडे वळले.

                                    समाप्त
                                   

जिते रहो…..फिलहाल घर में हीं रहो.

मंगेश उषाकिरण अंबेकर
३० एप्रिल २०२०
९८२३९६३७९९
www.mangeshambekar.net
 
(ही कथा पूर्णपणे काल्पनिक घटनांवर आधारित असून, कथेचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसा संबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.