रहस्य वट (भाग १)

“मंदया चल, शेवटची रिडींग दे. आज काही संपणार नाही हे काम. साडेपाच झाले. परत निघायला हवं. ओव्हर.” थिऑडोलाइटवर (एक उपकरण) रीडिंग घेत असलेल्या निरजने, त्यापासून साधारण एक किलोमीटर दूर प्रिझम पोल घेऊन उभ्या असलेल्या मंदारला वॉकीटोकीवर सांगितलं.

निरज आणि मंदार लहानपणापासूनचे जिवाभावाचे मित्र. दोघांनी एकाच कॉलेजमधून सर्व्हेइंगच (भु-सर्वेक्षण) शिक्षण घेतले. शहरातील एका नामांकित बिल्डरकडून निरज आणि मंदारला सुमारे पाचशे एकर जमिनीचे मोजमाप करण्याचे काम भेटले होते. कॉलेज संपल्यापासून दोन वर्षात दोघांनी मिळून सर्व्हेची बरीच कामे पार पाडली होती. पण एवढं मोठं हे पहिलंच काम त्यांना एका शिफारशीवर मिळालं होतं. जमीन शहरापासून चाळीस किलोमीटर दूर असलेल्या एक छोट्याशा गावाजवळ होती. जमिनीचा बहुतांश भाग डोंगराळ आणि बराचसा भाग दाट काटेरी झाडाझुडपांनी आच्छादलेला होता. साईटवर दूरदूर पर्यंत माणूस तर सोडाच, पण एखादा प्राणीही नजरेस पडत नव्हता.

तेथेच थोडं दुरवर एक भव्य डेरेदार वटवृक्ष होतं. त्याच्या पारंब्या जमिनीला टेकल्या होत्या. त्या वटाची भव्यताच निरजला खूप वेळेची खुणावत होती. निरजने शेवटची रिडींग घेऊन सर्व सामानांची आवराआवर केली आणि हलका व्हायला वडापाशी गेला. त्या वडाची दाट सावली त्या तपतपत्या उन्हात प्रचंड सुखावणारी होती. वडाच्याखाली खूप मोठया प्रमाणात पालापाचोळा साठला होता. पण एवढ्या घनदाट सावलीच्या वडावर एकही पक्षी नाही, हे बघून निरजला थोडं आश्चर्यच वाटलं.

तो झाडापासून पुढे जाणार तितक्याच त्याची नजर झाडावर ठोकलेल्या एक पत्राच्या पाटीवर गेली. पाटी बरीच जुनी व गंजलेली होती, पण त्यावर जे लिहलेलं होतं ते बऱ्यापैकी स्पष्ट दिसत होतं. निरजला त्या गंजलेल्या पाटीवरचं अजूनही स्पष्ट दिसतं असलेलं अक्षर बघून थोडं कुतूहल वाटलं. त्याने थोडं पुढे जाऊन पाहिलं तर त्यावर लिहलेलं होतं “यहा पेशाब करना मना है।”

“सालं इथं कोण खपणार आहे पेशाब करायला आणि केलं तरी येणार कोण मारायला. आमचं नशिब करंट म्हणून आमच्या नशिबी ही असली वणवण.” उपहासात्मक हसत व त्या पाटीकडे दुर्लक्ष करत निरज शेवटी तिथंच हलका झाला. तितक्यात एकाएकी जोराचा वादळवारा सुटला. सभोवतालचा सगळा धुराळा निराजच्या अंगावर उडाला. डोळ्यात धूळ जाऊ नये म्हणून त्याने डोळे घट्ट मिटले आणि तेवढ्यात झाडामागून कोणीतरी पहाडी आवाजात मोठ्याने खेकसले, “एऽऽऽ ये क्या किया तुने पगले।” निरजने घाबरत-घाबरत आवरतं घेतलं आणि लगेच मान वळवून मागे पाहिलं, पण मागे कोणी नव्हतं. झाडावर पाहिलं, पण त्याला तिथंही कोणीच दिसलं नाही. आवाज झाडाच्या मागून आला म्हणून तो शेवटी “कोण आहे?….तिकडं कोण आहे?” म्हणत झाडाच्या बुंध्यापाशी गेला, चोहोबाजूंनी पाहिलं तर तिथंही कोणीच नव्हतं. मंदार पण अजून आला नव्हता. “एवढ्या निर्जन स्थळी एक काळ कुत्रं पण दिसत नाही, ना इथं कोण्या पक्षांचा आवाज,….मग हा आवाज कोणाचा?” या विचारानेच निरजचा थरकाप उडत हृदयाची धडधड वाढली. डोकं जड झाल्यासारखं झालं…..आणि तेवढ्यात निरजला त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याचा भास झाला. निराजच्या अंगात शिरशिरी भरली. जागीच थिजल्यागत त्याने मोठया धीराने मान मागे वळवली.

“चल निघायचं ना.” मंदारचे शब्द कानी पडले. निरजने एक जोराचा सुस्कारा सोडत, मंदारला कडकडून बिलगला.

“मंदया कुठे होता तू? किती वेळ लावलास?” निरजने काकुळतेने विचारल.

“ओय नाटक्या….लय नाटकं करू नको, भूत-बीत पाहिल्या सारखं. चल उद्या परत यायचंय.”

“अरे माझ्यावर खरचं कोणीतरी खेकसल रे.”

“ओय, इथं तुझ्या आणि माझ्याशिवाय कोण आहे का?”

“नाही रे कोणीतरी होतं इथं! पण तू इतक्या लवकर कसा पोहचलास.” निरज अजून शहारलेलाच होता.

“ऐ बाबा…चल निघुया पटकन, अजून अंधार व्हायच्या आत गावापर्यंत तरी पोहचायला हवं” मंदारने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्या हाताला पकडून सामानापाशी घेऊन गेला.

निरज एकदम थंड पडला होता. त्याच्या तोंडातून शब्द फुटेना, दातखिळीच बसली. निरजच्या हातात सर्व समान देऊन त्याला मागच्या सीटवर बसायचं सांगितलं आणि बाईक स्टार्ट करू लागला. एरव्ही एकदा बटण दाबून स्टार्ट होणारी बाईक दहा-बारा किक मारूनही स्टार्ट होत नव्हती. ईग्निशन पाहिलं, पेट्रोल टँकचे झाकण उघडून पाहिले, पेट्रोलचा नॉब चेक केला सगळं ठीक होतं पण गाडी काही केल्या सुरू होत नव्हती.

निरजच्या मनात घडलेल्या घटणेमुळे एक अनाहूत भीती निर्माण झाली. अंधार पडत चाललेला पण बाईक सुरू व्हायचं चिन्ह दिसत नव्हते. त्याची सारखी नजर त्या झाडाकडे जात होती. त्या भीतीपोटी निरज घामाने डबडबला. इकडे मंदारच्या स्पार्कप्लगपाशी खटपट्या चालूच होत्या.

शेवटी निरजने हातातला सामान खाली ठेवले आणि बाईक स्वतःच्या हातात घेऊन जोऱ्यात किक मारली. एका किक मध्ये गाडी सुरू झाली. अखेरीस तब्बल पाऊणतासाच्या अथक प्रयत्नांती गाडी कशीबशी सुरू झाली म्हणून दोघेही थोडे सुखावले. निरजने मंदारला बसण्याचा इशारा केला.

“जीव निघायचा बाकी होता फक्त, निघायचं ना रे?”

“निघ बाबा….चल लवकर निघ!” मंदार मागच्या सीटवर सर्व सामान सावरून बसला.

सर्वत अंधार पसरलेला, दूरदूरवर कुठेही लाईट किंवा एखादा दिवाही दिसत नव्हता. साईट गावच्या आडवळणावर आणि गावापासून साधारण चार-पाच किलोमीटरच्या अंतरावर होती. मंदार आणि निरज हेडलाईटच्या मिणमिणत्या प्रकाशात कसेबसे वाट काढत पुढे जात होते. जसजसे ते पुढे चालले होते, तसतसा दोघांच्या जीवात जीव येऊ लागला.

“मंदया नाही रे तिथं काहीतरी आहे. त्या झाडावर एक पाटी होती. त्यावर लिहलं होतं “यहा पिशाब करना मन हैं”, तरी मी लघवीला गेलो. अचानक वारा सुटला,डोळ्यासमोर फुफुटा उडाला आणि कोणी तरी मला आवाज दिला.”

“काही नाही रे सकाळ पासून आपण या उन्हात मरमर करतोय. उन्ह लागलं तुला. गावात जाऊन एक मस्त फक्कड चहा मारू आणि मग निघू पुढे.”

“आता सात वाजले काय भेटणार?”

“नाक्यावर चालू असतात रे टपऱ्या.”

दोघांचं बरंच संभाषण सुरू होतं. गाडीपुढे जात होती. पण बराच वेळ होऊनही गावची वाट काही दिसत नव्हती. दोघांना काही कळेना. शेवटी निरजने गाडी थांबवली. सगळीकडे अंधार पसरलेला होता. दोघांना काही कळायला मार्ग नाही. तेवढ्यात त्यांना सकाळी साईटमार्किंगसाठी चुना मारलेला दगड दिसला. दोघे एकमेकांकडे बघून आवाक झाले.

“म्हणजे आपण अजूनही साईटच्या बाहेर पडलो नाही. अरे तब्बल एक तास होऊन गेला बघ. मंदया…तुला सांगतोय की काहीतरी वेगळं आहे पण विश्वास कुठे आहे माझ्यावर.चकवा लागलंय चकवा आपल्या माग.” बोलता बोलता निरजचा श्वास फुलला. त्याचे हातपाय थरथरू लागले.

एक दिर्घ उसासा सोडत मंदार डोक्यावर हात लावून उभा राहिला. त्याला आता कुठे निरजच्या बोलण्यावर विश्वास बसला. त्याला काय करावं, काही कळेना.

निरजला त्याच्या आजोबांनी कधीतरी सांगितलेल्या चकाव्या वरचा उपाय आठवला. तो गाडीच्या मागे गेला आणि त्याने त्या कच्च्या रस्त्याच्या मधोमध उभा राहून वर्तुळाकार लघवी केली आणि आपल्या शिवाम्बुचा तिलक डोक्यावर आणि नाभिवर लावला. बाईक सुरू करत मंदारला पटकन बसायला सांगितले. मंदार थरथरत सगळं सामान घेऊन कसंबसं बसला आणि ते त्या साईटचा दगड ओलांडून बाहेर पडले. निरज बाईकचा ऍक्सेलेटर जीव ओतून पिरघळत, बाईक दामटावत निघाला.

हळूहळू निरजला गावचा रस्ता दिसू लागला. दुर कुठेतरी पुसटशे लकाकणारे एक-दोन दिवे दिसू लागले, तसं हायस वाटलं. या सर्व भानगडीत गावात पोहचेस्तोवर बराच वेळ होऊन गेला होता. थोडं अजून पुढे आल्यावर एका उंच माडाच्या बाजूला बल्बच्या पिवळट प्रकाशात लख्ख उजळलेला एक छोटुसा ढाबा दिसला.

निरजने ढाब्यापाशी येऊन गाडी थांबवली. काऊंटरपाशी उभा असलेला साठीतला ढाबा मालकाची निरजकडे नजर गेली. मंदार उतरल्याच समजून निरज खाली उतरला. थकलेल्या, आळसावलेल्या देही निरज आपले दोन्ही हात वर मोकळे करत, अंगाला आळोखे-पिळोखे देत मागे वळला. आणि पाहतो तर काय….मागे ना मंदार होता ना सामान. निमिषार्धात अंगातून सगळे त्राण जावे असा झटकन हात खाली करत स्तब्ध उभा राहिला.

निरज प्रचंड घाबरला. त्याला काही कळेना. मंदारला मोठं मोठ्याने चोहोबाजूंकडे आवाज देऊ लागला, पण त्याला कोठूनच काही दुजोरा मिळू नाही लागला.

“शेठ, तुम्ही माझ्या पाठी बसलेल्या मित्राला पाहिलं का?” समोर उभा असलेल्या ढाबा मालकाकडे मोठ्या आशेने पहात निरज बोलला.

“घेतली की काय भौ? तुमच्या माग काय तुमच्या म्होरं बी कोण नव्हतं.” दुकानदाराला त्याचा प्रश्न काय समजला नाही.

निरजच डोकं गरगरू लागलं. मंदार त्याच्याशी कुठेपर्यन्त बोलत होता हेही त्याला आठवू नाही लागले. त्याने आपले दोन्ही हात केसात घालत करकचून केस ओढले. जिवाच्या आकांताने त्याने मंदारला हाक मारली आणि जागीच चक्कर येऊन खाली पडला.

क्रमशः

मंगेश उषाकिरण अंबेकर
९८२३९६३७९९

Photo by: thomas/flickr

8 Comments Add yours

 1. अनिरुद्ध मोकासदर म्हणतो आहे:

  खूप सुंदर . आता जेव्हा जेव्हा असे वडा चे झाड दिसले तेव्हा तेव्हा तूझी गोष्ट आठवणार. मस्त रे मंगेश.

  Liked by 1 person

  1. 😊😊😊😊🙏🏻 खूप खूप धन्यवाद साहेब.

   Like

 2. शेखर इंगळे म्हणतो आहे:

  खुप सुंदर वर्णन केलेले आहे वाचताना सर्व सिन डोळ्यासमोर उभा राहतो . उत्कुंठा निर्माण झालीय की नेमकं त्या जागी काय रहस्य दलय …… पुढील भागाची वाट पाहतोय

  Liked by 1 person

  1. खूप खूप धन्यवाद सर. 🙏🏻🙏🏻😊😊😊

   Like

 3. मनोज घडमोडे म्हणतो आहे:

  मंग्या आता तू रहस्यमय कथा पण लिहायला लागलास, भारीच लिहिलंय…..
  असंच भारी सदा लिखते रहो

  Like

  1. खूप खूप धन्यवाद मनोज 🙏🏻😊

   Like

 4. Swapna Deshpande म्हणतो आहे:

  Superb…majja aali Mangesh…aata pudhe kaay te lovkar lihi mhanje maza jiwat jeev yeil…

  Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.