रहस्य वट (भाग २ अंतिम भाग)

निरजला जाग आली तेव्हा त्याचे डोळे निरभ्र आकाशाकडे उघडले. बावरलेल्या अवस्थेत तो बाजेवर ताडकन उठून बसला. समोर पाहतो तर उंच माड, त्याच्या बाजूला ढाबा आणि ढाब्यासमोर लावलेली त्याची बाईक नजरेस पडली. ढाबा मालक त्याच्या उठण्याची वाटचं बघत होता. निरजला अजूनही डोकं जड वाटतं होतं. त्याला रात्रीच्या घटनेबद्दल पुसट पुसट आठवलं आणि मग आठवला तो मंदार.

“मंदया…मंदार कुठे आहे?” निरजने मालकाकडे बघत प्रश्न केला. तेवढ्यात मालकाने निरजच्या समोर चहा आणि पाणी आणून ठेवले.

“पाहूण, काल रातच्याला तुमी एकटं आला अन समदीकडे तुमच्या दोस्ताला आवाज देत देत चक्कर येऊन खाली पडला. कायतरी इपरित घडलं दिसतया.”

निरजने स्वतःची आणि मंदारची माहिती देत, काल घडलेला संपूर्ण प्रसंग मालकाला सांगितला. मालक निरजकडे डोळे फाडून पाहत गूढ विचारात पडला.

“शेठ, काय झालं” निरजने त्यांना विचारले.

“काय नाय….काय नाय. थांबा म्या कायतरी खायला करतो, तुमी न्याहारी करा” नजर चोरत मालकाने विषय बदलाला.

“काही नको…….मला मंदारला शोधायला हवं.”

“अवो, हो हो, जरा दमाण घ्या पाहुण. आता तुमी लयच घाईत दिसता मणून सांगतो, तुमी वडाला तरास दिलाय. तो कै असाच सोड्याचा नाय.”

“सोडणार नाही! काय म्हणायचं काय तुम्हाला. मला माझ्या मित्राला सोडवायलाच हवं. मी घरी काय उत्तर देऊ त्याच्या.”

“आयका…आयका..तुमी जावा..पण तुम्हास्नी खरचं त्यांना आणाच असलं ना, तर वडापासी जायचा पैलं तुमी पीराच्या चावडीवर जावा. तीत तुम्हास्नी पीर बाबा बेटतील तेन्ना सगळं ठाऊक हाय त्या वडाच. तेन्ना भेटा पैलं.”

निरज आपला आवेश कमी करत थोडा शांत झाला. मालकांचा सल्ला त्याला बरोबर वाटला. त्याने पिरबाबाचा पत्ता घेतला आणि सरळ चावडी गाठली. बाबा चावडीवरच होते.

निरजला पहाताच बाबा मंद हसले. “आवो बच्चा, दोस्त को तलाश रहा है।” जणू काही बाबाला निरजच्या येण्याचं सर्व काही कारण माहीतच होतं. निरज एकदम आश्चर्यचकित झाला. तो बाबाच्या चरणावर नतमस्तक होऊन “हो, बाबा….माझ्या मित्राला वाचवा।”

“तू तिथला नियम मोडलाय, तो भूगतना तो पडेगा।”

“नियम…कोणता नियम बाबा….आम्हाला तर तिथलं काहीही माहिती नव्हतं.।”

“बेवकूफ…तुम्हने पढने के बावाजुद, भी वहा पेशाब क्यू किया? आता भोगा….”

“बाबा, माफ करा मला, पण मला खरचं कळत नाही की माझं इतकं काय चुकलं?”

“नासमज, तुला एवढं कसं समजलं नाही की ज्या बरगदपाशी पक्षी तर सोड, गुरढोरं पण फिरकत नाही त्या बरगदपाशी तू गेलाच कसा. बरं गेला तर गेला, नसते ते उद्योग करून आला. तिथं इतके जीव गेले आहेत की मोजू पण शकणार नाही. त्या वडाच्या छायेतच बरीच थडगी आहेत, ज्यांची ते वड छाया बनून हिफाजत करतो. आणि….. तू तिथल्याच एका थडग्यावर पेशाब केली. तू त्यांना सगळ्यांना दुखवलंय!” पिरबाबाचा रुद्र अवतार बघून व वटवृक्ष मागच रहस्य ऐकून निरज पुरता भांबावला. तो बाबाकडे दयेची भिकमागू लागला.

“बाबा मग त्यांनी मला कसं काय सोडलं आणि खरतरं तर माझ्या कर्माची फळे माझ्या मित्राला का?”

“मतलबी, खरं तर तूच फसला होता, पण तू चकव्यातून बरोबर बाहेर पडला. तेरे दोस्त को भी वही बतया रहेता, तो शायद वो भी तेरे साथ निकल आता”

“मी जर रिकाम्या हाती घरी परतलो तर सगळे मंदारबद्दल विचारतील तेव्हा मी त्यांना काय सांगणार.काही तरी मार्ग दाखवा बाबा. तो कुठे आहे.” निराजच्या डोळ्यातून पाणी वाहू लागल.

“तो कुठे आहे हे फक्त त्या दुखावलेल्या आत्मा आणि ते वटवृक्षच तुला सांगू शकतात. तुझे उनको खुश करना पडेगा। दोपाहर ठीक बारा बजे पेड की छाव जमीन पर जितनी पडेगी उतनी पुरी जमीन साफ करके, उसें अपने हाथो से धोना पडेगा। उसके बाद धूप,बत्ती कर के उन आत्मा और बरगद को खुश करना पडेगा। अगर वो बरगद तुझसे खुश हो गया। तो शायद तुम्हें तुम्हारा दोस्त मिल जाये। ये ताबीज अपने हाथो पे बांध ले; ये तुम्हारी हिफाजत करेंगा।”

निरज तडक उठला, बाबानी सांगितलेलं सर्व आवश्यक सामान एका दुकानातून घेतल आणि बाराच्या आत त्या झाडापाशी पोहचला. झाडाची सावली काठीने जमिनीवर कोरून तिथली साफ सफाई सुरू केली. सगळा पालापाचोळा बाजूला करून, तिथल्या एका ओढ्यावरून एक एक बादली पाणी आणून सर्व परिसर धुतला. हे सर्व करुस्तोवर त्याला साडेपाच वाजतात. खूप थकला पण हार मानली नाही. शेवटी सूर्यास्ताच्या अगोदर धूपबत्ती करून मनोभावे सर्वांची माफी मागितली.

तितक्यात परत जोराचा वारा सुटला. सभोवतालचा सगळा धुरळा अंगावर उडाला. निरजला काही दिसेनासे झाले. डोळ्यात धूळ जाऊ नये म्हणून त्याने डोळे घट्ट मिटले आणि…आणि त्याला जाणवलं की हे सगळं तर अगदी काल सारखंच होतंय. तेवढ्यात झाडामागून परत तो पहाडी आवाजा ऐकू आला, “बोला था ना यहा पिशाब करना मना है।” निरजने थोडाही वेळ न दडवता लगेच मान वळवून मागे पाहिलं. पण मागे कोणी नव्हतं. तो परत झाडाच्या बुंध्यापाशी गेला पण परत तिथंही कोणीच नव्हतं. आज मंदार भेटतो का नाही? का आज आपण ही अडकणार? या विचारानेच निरजचे डोळे पाणावले. त्याच्या हृदयाची धडधड वाढली…..वटवृक्षाची मोठ्या प्रमाणात पानगळ होऊ लागली , पारंब्या दोलका प्रमाणे डोलु लागल्या आणि फांद्या जोरजोराने खालीवर करु लागल्या. वटवृक्षाचं ते भयंकर रौद्ररूप बघून निरजचा थरकाप उडाला, त्याच्या डोळ्यातून ढळाढळा पाणी वाहू लागलं, त्याचे दोन्ही हात आपसूकच वटवृक्षाला नमस्कार करत जोडल्या गेले. तशी क्षणात सगळीकडे परत शांतता पसरली.

मिनिटभर निरज तसाच डोळे घट्ट मिटून स्तब्ध उभा होता आणि तेवढ्यात निरजला त्याच्या खांद्यावर परत कोणीतरी हात ठेवल्याचा भास झाला. घाबरत घाबरत त्याने मान मागे वळवली.

“चल निघायचं ना.” मंदारचे तेच शब्द कानी पडले. निरजला एकदम गहिवरून आलं, त्याचा श्वास फुलला, डोळे पाण्याने डबडबले आणि एक जोरात उसासा सोडत त्याने मंदारला पुन्हा कडाडून मिठी मारली.
“मंदया कुठे होता तू? किती वेळ लावलास?”

“ओय नाटक्या….परत चालू झाले का तुझे…. लय नाटकं करू नको….भूत-बीत पाहिल्या सारखं. चल उद्या परत यायचंय.”

निरजला खरचं कळेना की आपल्यासोबत आत्ता जे होत आहे ते काल जशासतस होऊन गेलं आहे? …का.. काल काही झालंच नव्हतं.

निरजने गावातून सोबत आणलेल सामान कुठे दिसतंय का, म्हणून इकडे तिकडे नजर भिरभिरवली, पण कुठेच काही दिसल नाही. वादळवाऱ्यामुळे सगळं परत जसं होतं तसंच झालं होतं. सगळ्या साफसफाईवर परत पालापाचोळा साठला होता.

मंदारने परत त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्या हाताला पकडून सामानापाशी घेऊन गेला. निरज मागे वटवृक्षाकडे बघत; मनोमनी वटवृक्षाची माफी मागत आणि धन्यवाद करत परतला.

दोघे बाईक वर बसणार, तेवढ्यात निरजने सरळ स्पार्कप्लग काढला आणि पहिले तो ठीक केला. मंदार त्याच्याकडे बघतच राहिला. “आता स्टार्ट कर बाईक आणि मी जो पर्यत काही बोलायला सांगत नाही तो पर्यंत तू काहीच बोलू नकोस” निरजने मंदारला अगदी दामटावून सांगितलं. मंदारने स्टार्टर दाबला, बाईक सुरु झाली आणि निरज सामान घेऊन मागे बसला. दोघे एकदम शांत, चिडीचूप. दोघे लवकरच साईटच्या प्रवेशापाशी पोहचले. मागे बसलेल्या निरजला तो चुना मारलेला दगड दिसला आणि ते साईटच्या बाहेर पडले.

हळूहळू निरजला गावचा रस्ता दिसू लागला. आता निरजने ठरवलं की पिरबाबाची चावडी दिसली की आपण याला तिथे थांबवून कालचा घडलेला सर्व प्रकार सांगू. थोडं पुढे आले, तसं गाव दिसू लागलं. निरजने मंदारला चावडीच्या दिशेने गाडी वळवायला सांगितली. सकाळच्याच रस्त्याने पुढे गेले पण तिथं कुठेच चावडी दिसली नाही. अगदी निर्मनुष्य जागा. निरजला वाटलं की आपण कदाचित रस्ता हुकलो. मंदारने त्याला शेवटी न राहून विचारलच अरे “काय चालू आहे तुझं?” निरजने त्याच्याकडे न बघताच “काही नाही….चल निघुयात आपण” आणि ते दोघे परत माघारी फिरले. निरजला आता फक्त एकच आस उरली ती म्हणजे ढाबा.

दोघे परत गावाच्या रस्त्याने पुढे आले. तेवढ्यात त्याला ढाब्या जवळचा माड दिसला. तेवढया ओसाड परिसरात तो एकुलता एक माडच त्या ढाब्याची एकमेव ओळख होती. म्हणून माड बघून निरजला थोडं हायसं वाटलं. आतातरी ढाब्याच्या शेठला भेटून मंदारला खरं वाटेल. ते थोडे अजून पुढे अगदी माडापाशी आले तशी निरजने मंदारला गाडी थांबवायची सांगितली. निरज खाली उतरला रस्त्याच्या चोहोबाजूंनी त्याची नजर भिरभिरवली. सगळीकडे फक्त अंधार पसरलेला पण तिथे कोणताच ढाबा नव्हता.. माड तर इतक्या लांब आणि झाळकटीत होता की तिथं पोहचणेही अवघड होते. आता मात्र निरज पुरता चक्रावून गेला. “खरचं काल काही घडलं होतं का फक्त माझ्या मनाचा खेळ होता.” आता मात्र त्याला काहीच कळेना. मंदारला कालचा प्रसंग ठामपणे सांगू शकेल अशी कोणतीच कालची निशाणी त्याच्याकडे नव्हती.

इकडे मंदार निरजची अस्वस्थता बघून भयंकर वैतागला होता. “निरज तूझं डोकं जागेवर तरी आहे ना. काय चालू आहे तुझं?”
पण निरजकडे आता सांगण्यासारखं आणि पटवून देण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. त्याने “चल घरी जाऊयात” म्हणत विषयावर पडदा टाकला.

दोघेही आपापल्या घरी सुखरूप पोहचले. निरजने मंदारला खाली उतरायला लावले आणि एक कडकडून मिठी मारली. “ओय…संध्याकाळपासून तुझं लक्षणं काही ठीक दिसतं नाहीये मला. डॉक्टरला दाखव. चल येतो मी” मिश्कीलपणे हसतहसत मंदारने निरजला निरोप दिला.
मंदारला निरोप देतांना “काहीही असो वा नसो….पण आपण आपला मित्र तरी परत मिळवला” एवढंच काय ते समाधान निराजच्या डोळ्यात दिसतं होतं.

निरज घरी आला तेव्हा घरातले सगळे अगदी रोजच्या सारखेच वागत होते. पण निरजचे डोकं आणि मन अजूनही मानायला तय्यार नव्हते की काल खरचं काही घडलं नव्हतं. “तो वटवृक्ष, ते पिरबाबा, ते शेठ सगळं खोटं होतं?” पण उत्तर काही सापडेना म्हणून शेवटी त्याने कालचा विचार डोक्यातून बाजूला सारला आणि या पुढे कुठेही असलं काही करणार नाही म्हणत कानाला खडा लावला.

घरच्यांसोबत रात्रीच जेवण घेऊन, रोजच्या गप्पागोष्टी संपवून निरज आपल्या खोलीत आला. दोन्ही हात डोक्यावर दुमडून मस्तपैकी बिछान्यावर पहुडला. शारीरिक, मानसिक थकव्याने खूप गुंगी लागली. तेवढ्यात त्याचा डाव्या दंडापाशी काहीतरी असल्याचा त्याला भास झाला, म्हणून त्याने आपला डावा हात पुढे आणत बघितलं…..आणि तो एकदम विस्मित होऊन तडक जागचा उठून बसला. दंडावर पिरबाबाने बांधलेलं ताविज होते. समाप्त

जिते रहो…..सदा कायदे मे रहो….🙏🏻😊

कथा कशी वाटली ते नक्की कळवा… आपल्या प्रतिसादाच्या नेहमीच प्रतीक्षेत असणारा…..आपलाच,


मंगेश उषाकिरण अंबेकर
२० एप्रिल २०२०
९८२३९६३८९९
http://www.mangeshambekar.net

2 Comments Add yours

  1. Swapna Deshpande म्हणतो आहे:

    Chhan hoti gosht majja aali wachun…asech lohit raha Mangesh All the best.

    Like

    1. अगदी मनापासून धन्यवाद स्वप्ना 🙏🏻😊

      Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.