रावणवध
Live Match बघायला जेवढी उत्कंठा आणि मज्जा येते, तशी उत्कंठा आणि मज्जा Match चे Highlights बघायला येत नाही. त्यातल्यात्यात Live Match मधली एखादी उत्कृष्ठ Wicket, Catch, Century किंवा एखादा Six बघायचा राहून गेला असेल तर, पूर्ण Match बघितल्याचं सुख एकीकडे राहतं आणि नेमकं जे बघायचं राहून गेलंय त्या दुःखाच ओझं सुखाच्या पारड्यापेक्षा बऱ्याच पटीने जड झालेलं असतं. बरं त्यातल्यात्यात ज्यावेळी एखादी दुसरी व्यक्ती जेव्हा ती हुकलेली गोष्ट फार रंगवून सांगते, त्यावेळी तर आपल्या हातातून खूप काही मोठं निसटल्या सारखं वाटतं. भले नंतर Highlights बघायला जरी भेटल्या तरी जी सगळ्यांसोबत Live बघायची मज्जा असते ती काही वेगळीच. अतुलनीय.
तर हे सगळं सांगायचं कारण म्हणजे, इ.सन १९८७-८८ सालापूर्वी माझ्याकडून असचं एक Live तर नाही… पण एक Series प्रकरण हातातून निसटल होतं, त्याची रुखरुख आजपर्यंत माझ्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी होती. ते म्हणजे रामायणातील रावणाचा वध.
खरतरं त्यावेळी हे series प्रकरण हो Live पेक्षाही entertaining होतं असचं म्हणावं लागेल. दर रविवारी सगळ्यांसोबत बसून रामायण बघायची मज्जा Live Match पेक्षा भारी होती. कारण Match बघायला साधारणतः फक्त पुरुष मंडळी असतं, पण रामायण, महाभारत बघायला आजी, आई, पप्पा, काकू, काका, ताई, दादा आणि सगळ्या महत्त्वाचे म्हणजे सख्खे शेजारी….सगळेच्या सगळे सगळं कामधाम सोडून एकत्र येत. रामायण बघतांना disturbance नको म्हणून, आमच्या सारख्या पाच-सहा वर्षांच्या तोंडग्यांना (त्या काळातल्या हो) बाहेर पिटाळून लावल्या जायचे, नाहीतर “हाताची घडी, तोंडावर बोट” सारखी दमदाटी करत घरात एका कोपऱ्यात एकदम चडीचूप बसायला लावायचे.
तर झालं अस की, कुंभकर्णचा वध झाल्यापासून रावणाचा वध ह्या रविवारी होणार, त्या रविवारी होणार असं म्हणत म्हणत कैक रविवार गेलेत. आजच्या कोरोनाघडीला सकाळी एक तास संध्याकाळी एक तास बघून एवढी उत्सुकता वाटत नसली तरी त्याकाळी एका एका रविवारासाठी किती वाट पहावी लागली, हे फक्त ज्यांनी अनुभवलं तेच समजू शकतात. तर झालं असं की एका शनिवारी आमच्या शेजारच्या काकूंनी आईला गळ घातली की, आपण या रविवारी मार्केटमध्ये जाऊन खरेदी करून येऊ एवढं नीटसं आठवत नाही पण कदाचित संक्रांतीचे दिवस होते आणि यांना वाण घायच होतं. आईने त्यांना सांगितलही की,”या रविवारी रावणाचा वध असेल हो!”.(काही असो वा नसो, पण रावणाचा वध बघण्यासाठी सगळेच मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते.) आईच्या बोलण्यावर त्या काकूंनी “छ्या, तो मेला रावण काही या रविवारी मरत नाही बघा. या रविवारी जाऊन सगळं सामान घेऊयात.” म्हणत मार्केटला जाण्यासाठी तग धरून बसल्या.
झालं….कधीच कोणाला ना न म्हणणारी आमची कौसल्या, काकूंच्या विंडो शॉपिंगला (त्याकाळच्या) भाळल्या गेली आणि हो म्हणून बसली.
रविवारी सकाळी जायची तय्यारी करून काकू आणि आई बाहेर पडणार त्यात माझ्या पप्पा का दादा पैकी कोणीतरी एकाने (नेमकं आठवत नाही.) माझ्याकडे बोट दाखवत,”याला पण घेऊन जा.” म्हणत आईकडे तगादा लावला. माझ्यासारख्खा तोंडग्याचा घरात धिंगाणा आणि नसता त्रास नको म्हणून मला आईसोबत मार्केटला जाण्यासाठी खेळण्यातली रेल्वे, कार सारखी निरनिराळी आमिष सांगून उचकवल्या गेलं आणि मार्केटला जाण्यासाठी प्रवृत्त केलं. मी त्यावेळीही नेहमीसारख्या द्विधामनस्थितीत असणार म्हणून कदाचित हे ठरवू नाही शकलो की रावणाचा वध बघायचा का मार्केटला जाऊन काही लुटूपुटूची खरेदी करावी. शेवटी चंचल मनाचा कौल आला आणि मी मार्केटच्या आमिषाला बळी पडलो आणि जे व्हायचं नाही ते झालं…..नेमका त्याच दिवशी रावण वधाचा एपिसोड दाखवल्या गेला. माझ्याकडून आणि आईकडून रावण वधाचा एपिसोड सुटला. त्यावर अजून वेदनादायी दुःख म्हणजे आईने ना कार घेतली, ना रेल्वे त्याचा राग वेगळाच होता. 😀
घरी आलो तेव्हा भावांनी आणि मित्रांनी रावण वधाचा एपिसोड फार रंगवून सांगत, मला रडकुंडीला येऊस्तोवर खिजवलं. सर्वांचे ऐकल्यानंतर माझ्या मनाला रावणवध न बघितल्याची जी मोठी रुखरुख राहिली, ती आजतागायत माझ्या ‘राहून गेलेल्या गोष्टींच्या’ लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांक टिकून राहिली.
बरं असं नाही की नंतर तो एपिसोड बघायला भेटला नाही. मामाची तर व्हिडीओकॅसेट लायब्ररी होती पुढल्या सात-आठ वर्षांनी ती संधीही आली पण बघावच नाही वाटलं. नंतर तर युट्युबवर पण उपलब्ध होतं पण ती ओढ ती उत्सुकता उरली नव्हती. म्हणतात ना योग्यवेळी योग्य ती गोष्ट झाली तेव्हाच त्याची मज्जा असते आणि ती खरचं अतुलनीय असते.
आताही काल रात्रीच रावणवध बघायला भेटणार असं अपेक्षित होतं, पण यावेळीही रावनवध लांबलाच. वाटलं ह्यावेळेसही बघायला भेटणार की नाही. पण इतक्या वर्ष जी रुखरुख, हळहळ मी मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवली होती, त्याची आत्मतृप्त करणारी सुखद क्षतीपूर्ती आज थेट बत्तीसवर्षानंतर अनुभवली.
मंगल भवन अमंगल हारी
द्रवहु सुदसरथ अजिर बिहारी
होइहि सोइ जो राम रचि राखा।
को करि तर्क बढ़ावै साखा॥
अर्थात शेवटी होणार तर तेच…..जे श्रीरामांनी लिहून ठेवलंय.
जय श्रीराम 🙏🏻😊
आपल्या सर्वांचं बालपण सुखद आणि समृध्द करणाऱ्या या सर्व कलाकृतींना आणि कला महर्षींना शत शत नमन. 🙏🏻
मंगेश उषाकिरण अंबेकर
९८२३९६३७९९
१८ एप्रिल २०२०
http://www.mangeshambekar.net