२००६ ची गोष्ट आहे. मी एकदा कोणार्क एक्सप्रेसने भुवनेश्वरवरून पुण्याला येत होतो. ट्रेनमध्ये एक गुजराती वयस्कर जोडपं माझ्या बाजूच्या सीटवर होते. ते बोलके आणि मी तर अतिबोलका…त्यामुळे लगेच ओळख झाली. बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडची स्नॅक्सची पोटली खोलली आणि त्यातून खाकरा, ढेपला, ढोकळा सारखे एक सो एक स्नॅक्स काढले. त्यातून त्यांनी मला नेमका नको असलेला शंकरपाळ्यासारखा दिसणारा एक पदार्थ खायला दिला. गोड आवडत नाही म्हणून मी ‘नाही…नाही’ म्हणत एकच तुकडा उचलत तोंडात टाकला….आणि काय सांगू….तोंडून एक उस्फुर्त आहऽऽऽहऽऽऽह निघाला. जिभेने घट्ट पकडलेल्या टाळूला सोडत तोंडून एक मोठा ट्टाऽऽऽ बाहेर पडला. ते शंकरपाळे जाडीने थोडे चपटे आणि आकाराने किंचित मोठे होते पण अजिबात गोड नव्हते. त्याच्या चटपटीत आणि खुसखुशीतमुळे जिभेची डिमांड वाढली आणि जिभ आता ओठांवर डोकावू लागली. माझा हावरटबाणा नजरेतुन ओसंडत ‘अजून द्या…थोडे अजून द्या’ म्हणू लागला. त्यांनीही ते ओळखलं आणि डब्यात हात घालून भरलेली मूठ माझ्यापुढे करत “लो…और लो बेटा..शर्मावो नहीं” म्हणत मोजून दोन तुकडे माझ्या ओंजळीत टाकले. माझा पुरता हिरमोड झाला पण मी आस सोडली नाही.
थोडे अजून मिळतील या अपेक्षेने त्यांचाशी थोडी अजून जवळीक वाढवत त्यांना ” अंकल, बहोत मस्त हे ये नमकीन, क्या कहते है इसे? कहा मिलेंगा?” असे कैक नानाविध प्रश्न विचारत त्यांना भंडावून सोडलं.
“बाहर क्या कहते हैं मालूम नहीं बेटा, पर हम इसे घरमे खारी कहते हैं और घर में ही बनाते है?” म्हणत अंकलने अपेक्षेप्रमाणे परत मूठ पुढे करत परत दोन खारी टाकणार; तितक्यात मी त्यांच्या मुठीला दोन्ही हाताने पकडलं आणि अगदी निर्लज्जपणे मुठीतला सगळा ऐवज माझ्या हातात खाली करून घेतला. मिस्टर बीन प्रमाणे माझ्या चेहऱ्यावर तीव्र आनंद झळकत असतानाच, तिकडे अंकलचा चेहरा किंचित पडलेला दिसला. खाली डोळे टवकारून माझे दोन्ही हात उघडून पाहिले, तर माझ्या मिळकतीत फक्त एकनेच वाढ झाली होती. “हाय रे दळभद्री मेरी किस्मत!”
नंतर मी परत हावरटी अपेक्षेने (जशा राक्षसी अपेक्षा असतात बघा तशी माझी हावरटी अपेक्षा) अंकलशी गोड बोलत राहिलो, परंतु अंकलने ना संभाषण वाढवलं ना मूठ पुढे केली. मग उरलेल्या तीन तासाच्या प्रवासात तासाला एक करत, एक एक खारी जपून जपून फस्तावली.
घरी पोहचलो, बॅग टाकली आणि सरळ किचनमध्ये आईला त्या खारीची गोष्ट सांगायला गेलो.
“आई येतांना एका अंकल-आंटीने मला एक असा चमचमीत भन्नाट पदार्थ खाऊ घातला ना, की विचारू नको बघ !”
“बरं राहिलं…नाही विचारत.” आईने अगदी झटक्यात मला लाथाडलं.
“नाही विचारत काय…नाही विचारत? मला ते खायचं आहे!” माझा बालहट्ट शिगेला पोहचला.
“अरे, ज्याचं ना रंग माहीत, ना रूप माहीत….ते कसं करू?” तडतडनाऱ्या मोहरीवर पाणी टाकुन थंड करावं तसं आईने माझा बाळहट्ट थंड करत परत आपल्या कामात जुंपली.
“अरे, मग तुझा हा चोचल्या ब्योमकेश बक्शी काय कामाचा….मी सांगतो ना तुला….अगदी सिम्पल आहे.” माझ्या निग्रहावर आईने डोक्याला हात मारून घेतला आणि मी तिच्या मागे पिंगा घालत खारी आख्यायिका सुरू केली.
“बघ त्यांनी ना मैद्यामध्ये मीठ घालून चांगलं मळून घेतलेलं असेल. आणि त्यातना अख्खा ओवा आणि जिरं पण दिसतं होते. खमंग, खुमासदार व्हावी म्हणून तू जसं चकलीत ते तेलाचं मोहन टाकते ना, तसंच मोहन सुध्दा टाकलेलं असावं बहुतेक….. आणि बघ मठरीवर कसे काटा चमच्याने मारा करून छिद्र पाडतात, अगदी तसचं त्यावर पण छोटे छोटे छिद्रं पाडले होते. झालं… मग काय… चपटे चौकोनी काप करून गुलाबसर तळायचे आणि त्यावर चटपटीत आमचूर पावडर नाहीतर चाट मसाला मारून खारी तय्यार….आहे काय त्यात!” आईला अशी पूर्ण रंगरूप व चवींनीशी खारीची आख्यायिका भडाभडा संगीतल्यानंतर अंकलचा राहिलेला किस्सा सांगितला. ती खारी राहिली बाजूला आणि आई बिचारी त्या अंकलआंटीचे चेहरे डोळ्यासमोर आणूनच हसून-हसून बेजार झाली.
“अग, तुझं काय चाललंय आई, मी तुला खारीचं एवढं वर्णन कशासाठी सांगतोय? ते कसं करायचं सोडून तू इथं हसत बसलीस. करतेस ना रेडी”
“हो रे रेड्या!!! एवढं सोप्प आहे तर तूच का नाही करत. तू सांगितलं आणि झालं….असं कधी होतं का? तूझ्या चोचल्या चवीनुसार जरी ते केलं आणि फसलं, तर परत तूच माझ्या चुका काढत बसशील. जाऽऽऽ… कुठल्यातरी फरसाणच्या दुकानावर जाऽ….भेटलं कुठेतरी.” आईकडून असलेल्या शेवटच्या अपेक्षांवर पाणी सोडत, मी झटकन आवरून घराबाहेर पडलो.
त्या खारीच्या शोधार्थ, बाहेर दिसेल तेवढ्या बिकानेरी, गुजराती फरसाणच्या दुकानावर धाडी टाकल्या. पण खाकरा, फाफडा, मठरी, मेथी पुरी या व्यतिरिक्त काही मेजर हाती लागलं नाही. त्यादिवशी या राक्षसी जिभेने माझ्या बिचाऱ्या गरीब पायांना फार थकवल. शेवटी हताश, निराश अशा सगळ्या “नो..आस” घेऊन मी संध्याकाळी घरी परतलो.
हातपाय धुतले, सोफ्यावर टेकलो आणि टीव्ही चालू केला. त्यावर एक रेसिपीचा कार्यक्रम चालू होता आणि त्यात पण कुठलातरी वेगळाच चटपटीतच पदार्थ दाखवत होते. अजून जिभेचे नखरे नको म्हणून वैतागून टीव्हीच बंद केला आणि तसाच निपचित सोफ्यावर आडवा झालो. डोळे बंद करत, डोक्यावर हात नेतचं होतो; तितक्यात समोरच्या टीपॉयवर आईने एक बाऊल आणून ठेवला. “हे खाऊन बघ” म्हणत आई गडबडीत परत गॅस बंद करण्यासाठी किचनमध्ये परतली. मी त्या स्टीलच्या बाऊलमध्ये मोठ्या नाउमेदेने हात टाकला आणि आहे तो पदार्थ न बघताच तोंडात ढकलला. तेवढ्यात सोफ्यात कोणीतरी करंट सोडावा, तसा एक ‘जोर का झटका’ बसला आणि मी जागचा उठलो. कोण तो आनंद झाला मला….. आणि मी माकडा सारख्या उड्या मारत-मारत किचनकडे गेलो.
सात जन्माच्या करंट्याला बंपर लॉटरी लागावी तसा मी “हीच….हीच ती खारी” ओरडत आईकडे धाव घेतली आणि तिला घट्ट मिठी मारली.” समाप्त
खारी/ नमकपारा
१. साधारण दोनकप मैद्यात दोन-तीन टेबलस्पून बारीक भरडलेली धने जिरे पूड, थोडासा ओवा आणि हातावर चुरलेली थोडी कसुरी मेथी टाका.
२. नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ, हळद व थोडं तिखट टाकून मिक्स करा.
३. पिठात खड्डाकरून त्यात एक वाटी कडकडीत तेलाचं मोहन टाकुन मग पाच मिनीटांनी त्या पिठाला चांगले मळून घ्या.
४. थोडं थोडं पाणी टाकत कणिक घट्ट मळून घ्यावी. कणिक घट्टच तिंबलेले हवं.
५. आता त्याचे गोळे करून चपाती सारखे लाटा. मळलेली कणिक कपड्याने झाकून ठेवा.
६. शंकरपाळ्या सारखे जाड लाटू नका आणि अगदीच पातळ सुद्धा नको.
७. आता सुरीने उभ्या पट्टया कापा किंवा चौकोनी तुकडे कापा आणि तेलामध्ये मध्यम आचेवर तळून घ्या.
८. तळून झाल्यावर त्यावर काळमीठ किंवा चाटमसाला टाकून लागलीच खायला घ्या. (सुरवातीला पिठात मीठ थोडं कमीच टाका. म्हणजे चाट मसाला टाकल्यावर खारटपणा प्रमाणात राहील.)
रेसिपी वाचल्यानंतर तुम्ही या पदार्थला खारी/नमकपारा/खारे शंकरपाळे/ चोराफली/सांखे काय वाट्टेल ते म्हणलं….तरी हरकत माझी काहीच नाही माझी ब्बा.

जिते रहो…..सदा खाते रहो….
मंगेश उषाकिरण अंबेकर
०९ एप्रिल २०२०
९८२३९६३८९९
http://www.mangeshambekar.com
