“आयऽआयऽऽआयऽऽऽआयऽऽऽ मिरची लागली मिर्ची ! पाणी दे पाणी…हाऽऽऽहुसऽऽऽहाऽऽऽहुसऽऽऽ”
“झेपत नाय तर खातो कशाला रे भुसनाळ्या! आता बोंबोलतो ते बोंबोलतो, सकाळी डेचकी घेऊन जातो तव्हापण कोकलतो. बंद कर ते ठेचा खाणं.”
“काय क्राव तात्या, ठेचा नसला तर काय ग्वाड लागत नाय अन दिसला की जिभेवर ताबा ऱ्हातो व्हय.”

लहानमुलाने भान हरपून कॅडबरी खावी, एवढं एकचित्त होऊन ठेचा खाणारे असे कैक रथी-महारथी या भूतलावर अस्तित्वात आहेत. ज्यांचा ठेच्याशिवाय नरड्याखाली घास जातं नाही. परंतु माझ्या सारखेही काही अपवाद असतील जे सकाळचा ‘दर्दभरा अहसास’ आधिच स्मरून यापासून दूर राहतात.
बघताच क्षणी आपण याच्या प्रेमात पडावं आणि याने आपला क्षणात प्रेमभंग करावा; असं बऱ्याच जणांचं ठेच्याला पाहिल्यावर वेळोवेळी होतं. जिभेवर पडताच क्षणी हा भल्याभल्यांना पाणी पाजत, मर्कटलीला करवतो.
ठेचा खाल्ल्याने चेहऱ्यावर तेज येत, कांती तुकतुकीत होते, पोटाचे विकार जातात, पाचनशक्ती वाढते इत्यादी इत्यादी ऐकण्यात वा वाचण्यात आलं असलं तर… हे साफ खोटं असून, असलं काही एक होतं नाही. ठेचा हा फक्त नि फक्त या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी अस्तित्वात आलेला एक ठसकेबाज, झणझणीत पदार्थ.
मी लहान असतांना मला माझी आजी सांगायची की, ठेच्याची उत्पत्ती शेतात झाली. शेतात आपल्या धन्यासोबत राबणारी बायको कधीकधी गडबडीत भाकरीसोबत काही भाजी करू नाही शकली तर झटपट ठेचा करायची. मिळमिळीत जेवणाला झणझणीत करण्यासाठी, शेतातल्या लवंगीहिरव्या मिरच्या आणि शेतातलाच ओला लसूण दगडावर ठेचून झटपट ठेचा करत. मग सगळं कुटुंब डेरेदार झाडाच्या थंडगार छायेत, काळ्यामातीत बसून, कांदापात सोबत भाकरी-ठेच्यावर ताव मारत….. आहऽऽऽहाऽऽऽहा स्वर्गसुखच!
असो…उत्पत्ती कुठेही झाली का असेना! आपण आपलं चवीने खायचं काम करायचा आणि जगाला द्यायचं.
तर, मराठी माणसाला ठेच्याची कृती सांगायची तशी खरचं गरज नाही, परंतु आपल्या प्रोटोकॉल नुसार मी जी चव आजवर चाखत आलोय ती तशीच्यातशी लिहिण्याचा प्रयत्न करतो. मी जी कृती इथं मांडतोय ती अगदी सर्वत्र तशीच करतात असं काही नाही आणि असं कधी होऊ ही शकत नाही. त्याच काय आहे ना….भाषे सोबत चवही कोसाकोसावर बदलते हो, ते विसरून कसं चालेल…..नाहीतर उगाच ‘या ढेमशाला काय येतं!’ म्हणत तुम्ही माझी मापं काढत बसाल. माझी खेचली तरी हरकत नाही हो, पण रेसिपी आज्जीच्या आज्जीची आहे. उगाच तिला वाईट वाटायला नको, बाकी काही नाही!
तर तव्यावर फक्त एक चमचा तेलात सात-आठ मोठ्या मिरच्या (कमी तिखट हवं असेल तर, काकडी मिरच्यासोबत लवंगी मिरच्या ऍड करा ) चांगल्या खरपूस तडतडु द्या आणि बाजूला करा. त्याच तव्यावर आता चांगले मूठभर शेंगदाणे भाजा (हळूच अर्धी मूठभर खाण्यासाठी बाजूला काढा. स्वयंपाक करता करता थोडं चरणे ही आवश्यक, नाही का!) तसं आज्जी शेंगदाणे टाकत नव्हती (कंजूष कुठली!) पण मी टाकतो कारण मुळात ठेच्यात शेंगदाणे थोडं गोडव्याचं काम करतात आणि ठेचाही एकदम रखरखीत वाटत नाही.
आता त्याच तव्यावर सात-आठ लसूण पाकळ्या, जिरे आणि पांढरे तीळ हलकेसे भाजून घ्या. (हवं तर तुम्ही हे सर्व न भाजताही टाकू शकतात) आणि शेवटी पाटा वरवंट्यावर मस्तपैकी त्या भाजलेल्या मिरच्या, खाल्यानंतर उरलेले शेंगदाणे, लसूण, तीळ, जिरे, खडे मीठ, आणि थोडी चिरलेली कोथिंबीर घालून वाटून घ्या.
पाटा वरवंटा नसेल तर खल-बत्ता वापरा, तेही नसेल विकत आणा पण कृपया यासाठी ते मिक्सर वापरू नका. सरळ सांगायचं म्हणजे उगाच त्या ठेच्याच नावं ‘कापा’ नका करू. ठेचा हा फक्त ठेचायचाच असतो. मिक्सरमध्ये टाकून तो कापू नका हो!

ता.क.:
या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगू इच्छितो की, ठेचायला काहीच नसेल तर मिक्सर वापरा पण घरा बाहेर पडू नका. नाहीतर घरा बाहेर पडाल आणि पोलिसांच्या माऱ्याने, ठेचा न खाताच लाल व्हाल.
बरं, ज्यांना झेपत नाही त्यांनी ठेच्याची दाहकता थोडी कमी करण्यासाठी त्यात वरून
१. थोडं गोडतेल टाकून खा. किंवा
२. थोडं लिंबू पिळून खा. आणि तरीही शेवटी नाहीच झेपलं तर,
३. भघूनभर साखर टाकून खा, पण खा!
आणि हो जाता जाता ठेच्याला तुमच्या भागात काय नावाने हाक मारतात ते ही नक्की सांगा. (ते उखाणे बिखाणे घेऊ नका म्हणजे झालं!)
जिते रहो….सदा खाते रहो….
मंगेश उषाकिरण अंबेकर.
९८२३९६३७९९
०५ एप्रिल २०२०