सकाळी साडेसात वाजता वर्ग भरला. खिडकीतून आत डोकावणारं सोनेरी कोवळं ऊन, वर्गात सर्वत्र प्रसन्नता पसरावत होतं. भिंतीवरचा गडद काळा फळा झळाळी दिल्यासारखा स्वच्छ पुसलेला आणि त्यावर कॅलिग्राफीपेक्षा सुंदर अशा वळणदार ठळक अक्षरात लिहलेलं होतं “जागतिक महिला दिन” आज दिनांक ०८ मार्च १९९९.

काळ्या रिबीनने बांधलेल्या दोन झुपकेदार वेण्या, कमरेत स्टीलचे बक्कल असलेला ईलास्टिकचा बेल्ट, पायात कॅनव्हासचे काळे बूट आणि फिक्कट पिवळ्या रंगाचा फ्रॉक परिधान केलेल्या इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनींनीचा तो वर्ग. त्या निरागस चेहऱ्यांवर पडणारा तो सोनेरी कवडसा, जणू कोवळ्या किरणात डोलणारी टवटवीत सूर्यफूलं.
शाळेतील सर्वात कडक शिक्षिका मीनल मॅडमचा तो तास. त्यामुळे सर्व मुली मस्ती, गोंधळ आणि कुजबूज थांबवून, स्वतःला नीटनेटक्या सावरत, आपापल्या जागी चडीचूप आणि अगदी शिस्तीत बसल्या होत्या. मीनल मॅडम वर्गात आल्या, तसा सर्व मुल्लींनी “एक साथ नमस्ते” असा एका सुरात नमस्कार घातला. मॅडमनी सर्वांना हात दाखवत बसण्याचा इशारा केला.
शिडशिडीत बांधा, रेखीव चेहरापट्टी आणि विलक्षण बोलके डोळे असलेल्या तिशीतल्या मीनल मॅडम, त्यादिवशी नेहमीपेक्षा थोडया शांत शांत वाटत होत्या.
मॅडमनी हजेरी घेतली आणि गृहपाठ न विचारातच सरळ जागतिक महिला दिन विषयात हात घातला.
जिजाऊ पासून झांशीची राणी लक्ष्मीबाईपर्यंत व अहिल्याबाईपासून सावित्रीबाईपर्यंत सर्वांची शौर्य गाथा आपल्या कणखर सुरात मांडत शेवटचा टप्प्यावर येऊन पोहचल्या.
“स्त्री म्हणजे सृष्टी, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे शक्ती आणि स्त्री म्हणजे आत्मसम्मान….. तर मुलींनो जीवनात आपला आत्मसम्मान जपा, कोणाचा अत्याचार कदापि सहन करू नका.”
पहिल्या बाकावर बसलेली तनु, मॅडम आल्यापासून त्यांच्याकडे एकटक लावून बघत होती. तास संपला. मोठ्या आवाजात ‘ट्रिंगऽऽऽऽऽऽ’ करत बेल वाजली आणि तनूची तंद्री भंगली.
मीनल मॅडम फळा पुसून आपलं सामान आवरत वर्गाबाहेर पडण्याच्या बेतात असतांना तनुने मॅडमला हाक मारली, तश्या मॅडम मागे बघत दाराजवळ थांबल्या.
तनुने मॅडमला दाराजवळ गाठलं आणि आपल्या नाजूक आवाजात विचारलं. “मॅडम, तुम्हाला एक विचारू?”
नेहमीप्रमाणे काहीतरी बाळबोध प्रश्न असणार म्हणून मॅडम चटकन म्हणाल्या, “हा बोल”
“तुमच्या पाठीवर लाल चट्टे कशाचे?”
तनुकडून अचानक आलेल्या प्रश्नाने मॅडम भांबावल्या. त्यांनी तनूच्या डोक्यावर हात ठेवला आणि एक मिनिटे आहे तशाच स्तब्ध उभ्या राहिल्या.
आपल्या पाठीवर पतीने दिलेले पट्ट्याचे व्रण साडीच्या पदराने झाकले. पापण्यांची उघड-झाप करत, त्यांनी डोळयात आलेल्या पाण्याला लपवले. हुंदका फुटण्यापूर्वी आलेला एक दिर्घश्वास घेतला आणि काही न बोलता त्या तेथून निघून गेल्या.
समाप्त
अत्याचाराला प्रतिकार वेळीच करा, मग तो घरापासून का होईना!
मंगेश उषाकिरण अंबेकर
९८२३९६३७९९