एक मंत्रचळ केस.

“मक्या, ह्या बल्लूला सांग यार…सारखं सारखं कोणाच्याही केसात का हात घालतो?, स्वतःच्या केसांचा हा कसला माज”  विजू मक्याला काकुळतेने आर्जव करत होता.

“तुला आवडत नाही ना. मग…एक काम कर स्वतःच टक्कल करून टाक. तो काय शहाणा आहे का.” विजू मक्याकडे पाहतच राहिला.

“अरे टक्कल ही केलं असतं पण हा लेकाचा टकल्यांनाही सोडत नाही यार. आता परवाचीच गोष्ट, मी त्या टकल्या अण्णांच्या मयतीला गेलो होतो बघ, तिथे हा तिरडीपाशी बसून अण्णांच्या टकुऱ्यावर हात फिरवत बसला होता. त्यात रडता रडता काकूंनी याला पाहिलं आणि कुत्र्यासारखं हाड हाड करत बाजूला हटकलं.” विजूच्या या आपबितीवर मक्या लोळूस्तोवर हसला.

बल्लू उर्फ बल्लाळ टिपरे एक सर्वसाधारण सरकारी नोकरदार. एका छोट्या आकाराच्या खोळीत (कव्हर) जाड्याभरड्या उशीला जसं कोंबतात तसं बल्लाळ त्याच्या टवारलेल्या ढेरीवर चौकट्या-चौकट्याच्या शर्ट परिधान करून घट्ट अशा बॅगीपॅन्टमध्ये कोंबायचा. तो पॅन्टही बेंबीच्या जराशी वर नेइ, जेणेकरून ढेरी दाबली गेल्यामुळे ‘आपण थोडे स्लिम दिसतो’ असा त्याचा समज. पण प्रत्यक्षात ते दिसायचं खोळीत अर्धवट खोचलेल्या उशी सारखंच. बरं ही बल्लाळची सर्वसाधारण प्राथमिक ओळख, पण बाकी सर्व लोक त्याला ‘बल्लूभाई’ या विशेषणानेच ओळखायचे. मख्खीचुस, ढेरपोट्या आणि अंगभर घनदाट काळेभोर केसांमुळे जंगलबुक मधला भालु अर्थात बल्लूभाई.

आपल्या प्रत्येकाला काही ना काही मंत्रचळ असतोच फक्त त्याच प्रमाण कमी-जास्त असतो. जसे की काहींना हात धुतलेले असले तरी ते नेहमी नेहमी धुण्याचा मंत्रचळ असतो, काहींना सतत स्वतःशी काहीतरी बडबडत राहण्याचा मंत्रचळ असतो तर काहींना तर पोट साफ असलं तरी उगाचच तासातासाला टॉयलेटला जाण्याचा मंत्रचळ असतो. तसाच आपल्या बल्लूभाईलाही सतत स्वतःचे सावरलेले केस पुनःपुन्हा सावरत राहण्याचा आणि आपल्यापेक्षा लहानांच्या(कधीकधी मोठ्यांच्या सुद्धा) डोक्यात हात घालून त्यांच्या केसांची क्वॉलिटी चेक करण्याचा असा विलक्षण विचित्र असा मंत्रचळ होता. केसांची क्वॉलिटी तापसण्यापर्यंत ते ठीक होतं, पण हा नग पहिले इतरांच्या व मग स्वतःच्या केसात हात घालून, इतरांच्या केसांची क्वॉलिटी स्वतःच्या केसांपेक्षा किती निकृष्ट आहे, हे मिस्टरबिन सारखं खोबणीतले डोळे मोठे, तोंडाचा चंबू आणि नाक आखूड करत खिजवायचा. बल्लूभाईने असं नाही केलं तर त्याला सबंध दिवसभर कितीतरी वेळ दाबून ठेवलेल्या अश्या वेगळ्याच बैचैनीला सामोरे जावे लागायचे. त्यामुळे बल्लू नेहमी कुठेही जातायेता कोणाच्या तरी डोक्यात हात घालत आणि त्याला खुजे करत.

याच विचित्र मंत्रचळापाई कित्येकवेळा तो सोसायटीतील शाळेत जाणाऱ्या मुलांच्या डोक्यात हात घालून त्या बिचार्यांची नीटनेटकी आवरलेले केस विस्कटवायचे आणि त्या मुलांवर पहाटे पहाटे उठून प्रचंड मेहनत घेणाऱ्या त्यांच्या आयांकडून स्वतःवर शिव्यांचा अभिषेक वाहून घ्यायचा. बल्लूभाईला हा आनंद झाडाला हलवुन स्वतःवर प्राजक्ताचा सडा पाडून घेण्याजोगा वाटे.
असंच अजून एक त्याचा पेटंट गिऱ्हाईक म्हणजे त्याच्या ऑफिसतला ऑफिसबॉय छोट्या. तो तर बल्लूभाईच्या या सवयीला इतका विटला होता की तो घरातून निघताना कधी भांगच पाडत नसे. ऑफिसात आला की आपले केस स्वतःहून बल्लूभाईच्या स्वाधीन करत आणि जोपर्यंत बल्लूची दिवसभराची खाज मिटत नाही तोपर्यंत विस्कटलेल्या वेड्याच्या वेशातच दिवस कंठत असे.

बल्लूसाठी स्वतःचे केस म्हणजे जीव की प्राण, त्यासाठी त्याच्याकडे निरनिराळे कंगवेही होते. देवीदेवतांप्रमाणे जर याला चार-चार हात असते तर एका हातात गोलकार कंगवा, एका हातात पॉकेट कंगवा, एका हातात फणी आणि एका हातात आरसा असा काहीसा बल्लूभाईचा अवतार असला असता. कारण बल्लूच्या दिवसातल्या प्रत्येक मिनिटापैकी एकही मिनिट असा नव्हता की ज्या मिनिटात केसांवर कंगवा फिरत नसे आणि यासाठी कंगवे नाहीच सापडले तर हाताचा कंगवा करून केसांचा झुपका समोर काढत मनोमनी संतुष्ट होत. अंथरुणातून उठताना भांग, ऑफिसला जातांना भांग, ऑफिसात पोहचल्यावर भांग, जेवतांना भांग, रात्री अंथरुणात घुसतांना भांग आणि अगदी झोपेत असतांना सुध्दा भांग.

बल्लूची सौभाग्यवती मंगला म्हणजे एक सर्वसाधारण शामळू आणि भोळसर व्यक्तिमत्त्व. ती बल्लूच्या ह्या सर्व केस प्रकरणाला आणि अशा उपद्रवी स्वभावाला फार वैतागली होती. बल्लू तीच्यापुढे थोडा सरसच (आगाऊ). मंगलाचा धार्मिक आणि जोतिषशास्त्रावर आघाड विश्वास. आपल्या नास्तिक पतीदेवात परिवर्तन घडो म्हणून चोरून चोरून देवापुढे साकडं घाली.

अशाच एका सकाळी अंघोळ करून बल्लूभाई आपल्या रोजच्या केस सोहळ्यात मशगुल असतांना त्याच्यासमोर मंगला आली आणि उजव्या हाताने पदरेचा टोक नाकापुढे आणत एकाएकी हुंदके देऊ लागली.

“आता काय झालं तुला, कोणी टपकल का?” बल्लू नेहमी प्रमाणे मंगलावर खेकसला.

“काही नाही” मंगला पण नेहमी प्रमाणे त्याला घाबरत घाबरत गप्प बसली.

“काही नाही तर सकाळी सकाळी कशाला भोकाड पसरते?”

“तुम्हाला सांगितलं तर तुम्ही रागवताल.”

“आता सांगतेस का ह्या कंगव्याने फोडू तुझं टकुर.” बल्लूभाईने हातातला कंगवा मंगलावर वज्रा प्रमाणे उगारून जसे रौद्ररूप धारण केलं तशी मंगला भडाभडा बोलती झाली.

“अहो, काल तुम्ही मला देवळापाशी सोडून गेले आणि दर्शन घेऊन माघारी फिरले तेव्हा येतांना पारावर एक जोतिषीबुवा भेटले. मला पाहताच त्यांनी तुमच्या नावाचं अद्य अक्षर, हुद्दा, सवयी आणि भूतकाळ असं सर्वकाही इथंभूत सांगितले. तुम्ही किती हुशार आणि बुध्दिवंत आहात हे ही सांगितले”

“ह्यss त्यात काय, सगळे बुवा पैसे उकळण्यासाठी असचं सांगतात लेकाचे. तू पैसे तर दिले नाही ना?”  मंगलाने गडबडीत मान वरखाली करता करता, डोक्यावर अचानक थंड पाणी पडावं तशी झटक्यात उजवीकडून डावीकडे व डावीकडून उजवीकडे फिरवली.

“हा मग ठीक आहे, तसा मी मुळातच हुशार आहेच. यात त्या बुवाने सांगायची गरज नाही. पण त्याने माझ्यातला महत्वाचा गुण ओळखला. सच्चा ज्योतिषी असेल तो.  पण मग यात रागवायचं काय आलं ग येडपट.” बल्लूचा जन्मचं सगळ्यांची मापं काढण्यासाठीच झालेला, त्यातल्यात्यात मंगला म्हणजे त्याच रोजच हक्काचं बकरू(गिऱ्हाईक).

“अहो, ऐका तर खरं. पुढे त्यांनी असं काय विधान केलं की , मी उभी होते तिथेच बसले.”

“का? माझ्या नशिबी दुसरी लांबसडक, काळेभोर केसावाली बायको हाय की काय.”

“तसं असलं असत तरी बरं झालं असतं. मी तरी सुटली असते एकदाची.” मंगला कपाळला हात लावत दबक्या आवाजात पुटपुटली.

“काय म्हणालीस?”

“काही नाही.”

“काय म्हणाला तो बुवा. ते सांग आधी, उगाच सीन नको वाढवू”

“असुद्या….नको, तुम्ही रागवताल!”

आता बल्लूभाईचा पारा प्रचंड वाढला, दात-ओठ खाऊन त्याने हातातला कंगवा मंगलाच्या बाजूने जोरदार भिरकावला.

“तुझ्यातर ssss आता sss सांगतेस लवकर, का देऊ एक ठेवुन”

बल्लूभाईचा निशाणा चुकला आणि मंगला घाबरून हाताने थांबा थांबा करत करत एका दमात बोलती झाली, “ते म्हणाले…ते म्हणाले की….तुझा पती काही दिवसात टकला होणार.”

झालंsss मंगलाच्या या वाक्यानंतर बल्लूभाईच्या चेहऱ्यावर एक भयाण शांतता पसरली. बल्लू भोवळ येऊन पाठीला भिंतीचा आधार देत धप्पकन खाली बसला. यमाने माणसाच्या शरीरातून आत्मा काढून घ्यावा तसा त्या ज्योतिषीबुवाने टकल्यावरून झटक्यात केस काढून घेतले. बल्लूभाईला केस नसल्याचा नुसता विचारही खूप छळून गेला. घामाघूम अवस्थेत त्याचे दोन्ही हात नकळतपणे डोक्यावर गेले तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, ‘अरेच्चा डोक्यावर तर अजून केस शाबूत आहेत, आपणतर उगाचचं घाबरलो.’

पुढच्या क्षणाला बल्लूभाईची कावरीबावरी नजर परत मंगलावर गेली आणि तो स्वतःला तिच्यासमोर सावरत हळूच पुटपुटला.

“काहीही काय बोलते…..काय अक्कल बिक्कल आहे का त्याला, डायरेक्ट टक्कल…….बावळट कुठला” हे बोलताना बल्लूच्या चेहऱ्यावर तटस्थ भाव असला तरी त्याचा आतून मात्र पार भेदरलेला उंदीर झाला होता.

“बर … कोणत्या पारावर भेटला? काय नाव?

“शनीच्या पारावर भेटलेला, नाव काय माहीत नाही.”

बल्लूने बनियानवर शर्ट चढवला आणि ताबडतोब शनीच्या पाराकडे निघाला. पण चार पावलं पुढे गेल्यावर समोरून जाणाऱ्या बायकांच्या फिदीफिदी हसण्यावरून त्याने मागे-पुढे, वर-खाली पाहिलं आणि तसाच पळत माघारी फिरला.

“बावळट सांगता येत नाही का की मी पॅन्ट घातली नाही म्हणून, ह्या अपऱ्या शर्टने कशीबशी आपली इज्जतअब्रू झाकत घरी परतलो. ” बल्लूभाई पॅन्ट घालत-घालत मंगलावर चिरकला.

“अहो मी….अहो…अहो करत हाक देत होते पण तुम्ही कसलं ऐकून घेता का माझं.”

“येडपट, अहो अहो च्या ऐवजी पॅन्ट..पॅन्ट म्हणून तरी बोंबली असतीस तरी कळलं असतं, नुसती मंद आहेस, कसला धोंडा बांधलाय गळ्यात माझ्या…छे”

मंगलेला आणि उरलेला दोष स्वतःला देत, बल्लूभाई पुन्हा पॅन्ट घालुन बाहेर पडला आणि पारापाशी बुवांचा शोध घेऊ लागला. तब्बल तासभर शोधूनही तिथं कोणी बुवा भेटला नाही.  बल्लूभाई पार हिरमुसला आणि रिकाम्या हाती घरी परतला.

पण त्या दिवसानंतर त्या पारावरच्या बुवाने त्याच आयुष्यचं पार बदलून टाकलं. आता बल्लूभाई रोज पारावर जात. कोणी विचारपूस करू नये म्हणून गुपचूप देवाचे दर्शनही घेत आणि रिकाम्या हाती परत निघत. रोज डोक्यावर भिंग घेऊन आरश्यात केसांची स्थिती बघत. भांग पाडल्यावर कंगव्यात चुकून एखादा केस जरी सापडला की त्या रात्री शॅम्पू, कंडिशनर आणि तेल लावून केसांची मशागत करत. बल्लू पूर्ण बदलून गेला आणि आता केस जाणार या मंत्रचळात तो गोवला गेला.

मुळातच सुपीक असलेल्या जमिनीला अधिक खतांचा मारा करून अजून कसदार करण्याच्या नादात नापीक करत गेला.
पुढे काही महिन्यांतच बल्लूभाईची केस गळती जोमाने सुरू झाली. डोक्यातल्या दोन भोवऱ्या भोवती केस विरळ होतं चालले होते. त्यांचा रोज रोजचा तो त्रागा बघून मंगलाने डॉक्टरकडे जायचा सल्ला दिला. कधी कोणाचंही न ऐकणारा हा उर्मट प्राणी परिस्थितीच्या हतबलतेपाई शेवटी डॉक्टरकडे जाण्यास तय्यार झाला. त्यानुसार बल्लूने बरेच महिने बऱ्याच क्लिनिकचे उंबरठे घासले, पण काही फरक पडला नाही, त्याचे केस अजूनच विरळ होत गेले.

त्याची स्थिती मक्याला बघावली नाही. त्याने बल्लू शहरातील एकमेव नामांकित केसतज्ञ डॉक्टरांचा पत्ता दिला. तसं बल्लूने ताबडतोब त्या डॉक्टरच क्लिनिक गाठल. बऱ्याच तासांच्या प्रत्येक्षेअंती याच्या पोटातल्या कावळ्यांनी पोटात हाहाकार माजवला आणि शेवटी दुपारची भूक बल्लूला असह्य होऊ लागली. तो रिसेप्शनपाशी तावातावत रिशेपशनिस्टसोबत “अजूनही माझा नंबर का नाही लागला” म्हणून बराच वेळ हुज्जत घालत होता. बाहेरचा गोंधळ ऐकून डॉक्टरांनी याला अखेरीस आत बोलावले.

बल्लूभाईला डोक्यापासून पायापर्यंत तब्बल मिनिटभराच्या निरीक्षणांती डॉक्टरांनी त्याला एक भलताच प्रश्न केला.

“तुमच्याकडे पिवळ्या कलरची स्कुटर आहे का हो?”

आधिच इतक्यावेळ ताटकाळत बसलेल्या बल्लूभाईचा पारा डॉक्टरच्या प्रश्नावर थर्मोमिटर फोडून बाहेर आला.

“आहे, त्याच्यावर बसल्याने माझे केस गेले असं कधी म्हणाल तर आधींच सांगतो मीही इतरांप्रमाणे सीटवर, बुड ठेवूनच गाडी चालवतो डोकं ठेवून नाही ” नेहमीप्रमाणे उद्धट उत्तर देते बल्लू बडबडला.

“बरोबर..तूच तो…चल हो बाहेर आधी. चालता हो इथून.गेट आऊट” डॉक्टरांनी तोंडात येईल तेवढे बाहेर जायचे शब्द फेकले.
डॉक्टरांचे शब्द कानी पडत ना पडता तोच बल्लूला चार-पाच महिन्यापूर्वी रस्त्यावर भेटलेला डॉक्टर आठवला. आपण याच डॉक्टरच्या  BMW कारला समोरुन स्कुटर धडकावली होती आणि उलट या डॉक्टरलाच चार शिव्या हासडून तिथून सटकलो होतो.

आता याने आपल्याला परत पैसे मागायला नको म्हणून स्वतःच,” तूsssss…..ये चले हाडेsss हाडंsss कोण येतं तुझ्या क्लिनिकमध्ये हाडंsss.” म्हणत त्याच्या कॅबिनच्या बाहेर पडला आणि रिसेप्शनपाशी “टक्कल पडलं म्हणून कोणत येडं गाईचं शेण गोमूत्रात मिक्स करून डोक्याला लावेल का?” असं तिथं आलेल्या चार टकल्या पेशंटला सांगत, स्वतःसोबत त्यांनाही घेऊन क्लिनिकच्या बाहेर पडला. अशाप्रकारे वर्षभराकाठी बल्लूकडून कैक डॉक्टर व रिसेप्शनिस्टचा उध्दार झाला आणि कैक डॉक्टरांनी आपले कैक पेशंट गमावले. पण यात बल्लूचाही शेवटचा पर्यायही संपला.

अश्या विचित्र व्यक्तींच्या आयुष्यात विचित्र माणसांचीही कमी नसतेच मुळी. ह्या डॉक्टर नंतर बल्लूच्या केसांची काळजी करणारा असाच एक केसांचा महान डॉक्टर होता तो म्हणजे त्याचा चंपू न्हावी. एका हेअरस्पेशालिस्ट डॉक्टरनंतर फक्त चंपु न्हाव्यालाच गिऱ्हाईकांच्या डोक्यात झालेल्या कोंड्याची, पांढरटकेसांची, फोड-फुंशीची, पातळ झालेल्या केसांची, चाईची, केसगळती आणि भविष्यात येणाऱ्या टक्कलची काळजी असायची व ह्या सर्व आजारांवर त्याच्याकडे जंगली जालीम उपायसुध्दा तयार होते. बल्लू बरेच वर्षापासून याच चंपू न्हाव्याकडे आपले केस भादरायचा. हो भादरणेच योग्य आहे, कारण मेंढरासारख्या राट केस कापत नसतात ते भादरावेच लागतात. शिकाकाईच्या जमान्यात भाईला विदशातील शॅम्पू आणि कंडिशनरची माहिती ह्याच चंपूकडून मिळे. चंपू त्यांचे इथेच्छ नखरे पुरवत आपले भारी भारी अंधश्रद्धाळू, अघोरी हेअर नरिषमेंट टेक्निक्स सांगायचा. त्याच पूर्ण नाव म्हणजे चंपु अंडेवाले त्याचा विचित्र आडनावा मागचं कारणही तसंच होतं. चंपूच्या प्रत्येक टिप्समध्ये प्रामुख्याने अंड हे असायचंच.   जास्वनदाच्या तेलात कच्च अंड फेटून केसांना लावणं, कडुलिंबाच्यारसात कच्च अंड टाकून पिणं, शिकाकाईत अंड्याचे टरफल उकळवून डोक्यावर लेपण. असल्या अघोरी टिप्सने बल्लूभाईच्या डोक्यावर जागा बळकावायला वेळ नाही लागली आणि अखेर केसांची झाडाझडती जोमाने सुरू झाली. बघता बघता वर्षभराच्या आत बुचका बुचक्याने बल्लूभाईच्या डोक्यावरचे सगळे केस गायब झाले और बल्लूभाई किसीं को टकला दिखाने के लायक नहीं रहा.

बल्लूभाईकडून ना कोणाचा छळ अन ना कोणाची कंप्लॅन्ट या बदलामुळे मंगला पहिले सहा महिने फार मनोमनी भरून पावली होती. पण जशी बल्लूची केसगळती सुरू झाली आणि  मर्कटतांडव करत त्याचा त्रागा दिवसंदिवस वाढत गेला तशी इकडे मंगलेची बेचैनी वाढत गेली. आता ती पण त्या जोतिषी बाबाला शोधू लागली.

वर्षभरानंतर बल्लूभाईच्या टकल्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली. आता तो ना कोणाला आपलं टकलं दाखवी ना कोणाच्या टकल्यात हात घाले. उकडा असो वा थंडी तो आता नेहमी माकड टोपी घालून फिरू लागला.

बल्लूभाईमधला एवढा मोठा बदल पाहून ऑफिसबॉय छोट्या, विजू, मक्यापण हैराण झाले. ऑफिसबॉय छोट्याला तर बल्लूभाईचे हाल काही बघवेना. बल्लूभाईने आपल्या केसात हात घालावा म्हणून छोट्या मुद्दामहून त्याच्यासमोर चहा देतांना, कागदपत्रे देतांना आपलं डोकं त्यांच्या अगदी बल्लूच्या तोंडाजवळ आणत. बल्लू ह्याचा खुपसाखुपसीचा खेळ पाहून शेवटी वैतागले आणि त्याची गचंडी धरत त्यावर खेकसला. “आता जर तुझं थोबाड परत  खुपसलं ना तर तुझ्या टकुऱ्यावरचे सगळे केस भादरून कोंबड्यावानी मुंडकच छाटल तुझं.” छोट्या पुढं घातलेलं स्वतःचं मुंडक कोंबड्यासारखं झटकन मागे घेत, थरथरत तिथून जो सटकला की नंतर फिरकलाच नाही.

मंगलाच्या आग्रहापाई बल्लू रोज तिला मंदिरापाशी सोडत आणि पारावर बघूनच देवाचे दर्शन घेत. पण पारावर ना काही बुवा दिसत आणि ना मंदिरातला देव यांना कधी पावत. असंच एके दिवशी मंगला बल्लूच्यागाडीवरून मंदिरापाशी उतरली आणि तिचं शोधमोहीमेच व्रत फळाला आल. मंगलाला एकदाचा तो बुवा सापडला.
मंगल एखादा साखळीचोर सापडावा अश्या प्रकारे उंगलीनिर्देश करत जोराने किंचाळली “ओ…हाच तो बुवा…पकडा याला.”

बल्लूने आधी बुवाकडे अगदी निक्षून पाहिलं आणि मोठयाने “ह्यो!” असं आश्चर्यचकीत होऊन माकड टोपीतला बल्लू, आपल्या दोन्ही हाताने आपली पोत्यासम ढेरी सांभाळत पाराकडे धावत सुटला. मंगलेचे अतितीव्र स्वर बुवाच्या कानी पडले व नजर धावत येणाऱ्या बल्लूभाईवर गेली. गलेलठ्ठ हत्ती आपल्या अंगावर येतोय बघून जसं कोणी धावत सुटेल, तसं भगवा सदरा आणि धोतरधारी ज्योतिषीबुवा आपल्या हातातला कमंडलू फेकत पळत सुटला. मिनीटभराच्या धावपळीअंती बुवा धोतरात पाय अडकुन पडला व त्याच्या उरावर हा चवताळलेला हत्ती पडला आणि बुवांचा अक्षरशः चेंदामेंदा करून गेला.

कसाबसा मोठा ऊसासा सोडत बुवा शुद्धीवर आले. मानगुटीवर बसलेलं बल्लूच आडदांड देह आणि ढेरीने ठेचल्या गेलेलं बुवाच छाताड भार उचलून परत मूर्च्छित होणार की तितक्यात बुवांच्या कानाखाली खणssणssण आवाज झाला आणि येणारी भोवळ पळून गेली.

“मारू नको… मारू नको…मी काय केलं ते तरी सांग आधी”

“तू माझ्या बायकोला भविष्य सांगितलं होतं की मी टकला होणार आणि तुझ्यामुळे मी खरंच टकला झालो. सांग…. कशावरून पाहिलं तू माझं भविष्य” बल्लूने परत हात उगारून खणssण आवाज काढण्यापूर्वी बुवाला विचारलं.

बुवा क्षणासाठी मंगलाकडे पाहिलं मग बल्लूकडे पाहिलं आणि विचारात डुबला. त्याला काहीतरी पुसटस आठवलं आणि त्याच्या चेहरा एकाएकी कुश्चित हसू फळफळलं, “अच्छा अच्छा तो तू तर! अरे टकल्यामुळे ओळखूच नाही आला बघ.” बुवाच ते कुश्चित हसू बघून बल्लू अजून चिडला.

“तुझ्यातर….आता अजून दात काढशील तर बोळकच करतो बघ तुला.” बल्लू चवताळून उठला आणि पिसाळल्यागत बुवाला बदडू लागला.

बल्लूचा मार आडवत बुवा भडाभडा बोलता झाला “बर थांब….थांब…सांगतो…..सांगतो..बाबा तुला. कोणीतरी दोन माणसं माझ्याकडे आली होती. तुझे मित्र आहे म्हणून सांगत होते. त्यांनी माझ्या हातावर पैसे ठेवत, तुला अद्दल घडवायला सांगितलं होतं.”

‘कोण…कोण होते ते फक्त नाव सांग. नाहीतर मी तुला जिता नाही सोडणार.”

“थांब सारखं सारखं काय अंगावर येतो रे. कोण होते माहीत नाही, पण तुला अगदी आईशप्पथ घेऊन खरं सांगतो की मी हे अजिबात करणार नव्हतो पण त्यादिवशी तू मला पण बोलला आणि मग मला तुझा भयंकर राग आला….म्हणलं तुझे मित्र म्हणतात तेच खरं…तुला अद्दल तर घडलीच पाहिजे. पण कशी माहीत नव्हतं म्हणून मी त्यादिवशी तुझ्या बायकोला सहज बोलुन गेलो. मला काय ठाऊक की तुझं सगळं छप्पर खरंच उडून जाईल ते…मंत्रचळात गुंतला गेला रे तू …मंत्रचळात….”

बल्लू बुवावरून हटला आणि बाजूलाच जमिनीवर फतकल मांडून डोक्यावर हात ठेवून बसला, “वाटोळं केलं तुम्ही….नाय सोडणार… ना तुला… ना त्या हरामखोरांना”

बल्लूचा निग्रह बघून बुवा थोडा भांबावून गेला. बल्लूला कसही करून शांत करणं आता जिकरीचं झालं. बुवा मंगलाकडे बघत म्हणाला “ताई मला सांग असं चिडून काय होणार आहे का ह्याच, बदला घेऊन का थोडीच याला केस परत येणार आहे. मी सांगतो तस कर, याच्या डोक्यावर केस येणार, नक्की येणार?”

“आता तोंडातून एक शब्द जरी काढला ना तर तुला याच पारावर गाढतो बघ.” त्वेषाने बल्लूने बुवाच्या अंगावर हात उगारला.

मंगलाने लगेच त्याला थांबवत, “अहो, शांत व्हा तुम्ही, ऐका तर थोडं. बुवा आता नीट गुमान खरं सांग नाहीतर मंदिरातल्या सगळ्या बायकांना बोलून चांगला चोप देईल.” 

निदान ऐकून तरी घेण्याचा मंगलाचा भाबडा समंजसपणा बघून बुवाला थोडं का होईना पण हायसं वाटलं. मध्ये मध्ये बल्लूकडे चोरट्या नजरेने लक्ष टाकत बुवा मंगला समजावून सांगू लागला,
“ताई सांगतो…. मला सांग याचे केस कशामुळे गेले?” बुवाने फेकलेल्या प्रश्नाला बल्लू व मंगला डोकं खाजवत निरुत्तर राहिले. 

दोघांच्या डोक्यावर बारा वाजलेले पाहून शेवटी बुवाच बोलते झाले, “थांबा नका खाजवू डोकं, मी सांगतो तुम्हाला. हा मी वर्तविल्या भविष्यापाई टकला झाला नाही तर ‘मी टकला होणार’ या विचारापाई हा माणूस टकला झाला. थोडक्यात काय तर मना अंतरीं जो विचार तू करशील, तसेच विकार तुला जडतील. म्हणून सांगतो आता मनात अजिबात नकारात्मक विचार करायचा नाही. आता मला खूप केस येणार हा विचार कर. तुला पुढल्या पाच-सहा महिन्यात हमखास भरभरून केस येतील बघ.”

“आणि नाहीच आले तर.” बल्लूभाई खेकसला.

“अररर..हे बघ…मी शेवटी काय म्हणलो. नकारात्मक विचार अजिबात करायचा नाही. तू तसा विचार केला की येणार केस गेलाच समज.” बुवाने कसंबसं आपलं मरण टाळल आणि जडबुद्धीच्या डोक्यात येणाऱ्या केसाच पिकं पेरलं.

मंगलाला पण ते पटलं आणि तिने बल्लूला मुंडक खालीवर करत बुवाच्या बोलण्याला होकार कळवळा. शेवटी मंगला ने बुवाची गचंडी बल्लूच्या तावडीतून कशीबशी सोडवली आणि माघारी परतले.

घरी आल्यावर मंगलेचे डोक्यात कितीवेळचा घोळत असलेला प्रश्न बल्लूला केला. “का हो तुम्ही त्या बुवाला तुम्ही त्याला काय बोलले होते? आणि ते दोन मित्र कोण असलं? “

“तो बुवा मला एकदा तुला मंदिरात सोडलं होतं त्यावेळेस भेटला होता, बराचवेळ मला हात दाखव हात दाखव म्हणत मागे लगलेला. शेवटी मी त्याला दाखवला. पहिले बरच काही चांगलं सांगितलं त्याने मग पैसे द्या तर पुढचं भविष्य सांगतो म्हणाला”

“मग”

“मग काय मी देतोय त्याला पैसे उलट मीच त्याला म्हणालो, तुला ना दाढी ना डोक्यावर केस, तू असला कसला बुवा. पहिले स्वतःच भविष्य उजाळ आणि दाढी बिढी वाढावं आणि मग ये मला भविष्य सांगायला. त्यावर तो लय लालपिवळा झाला होता आणि कामंडलूतून हातावर पाणी घेत ते माझ्यावर शिंपडलं” बल्लूच्या या वाक्यावर मंगलेने कपाळावर हात मारून घेतला.

मंगलाच्या दुसऱ्या प्रश्नाच्या विचारात मग्न असतांना, बल्लूला त्यादिवशी मंदिरात जाण्यापूर्वी त्याच पारावर भेटलेले विजू आणि मक्या आठवले आणि त्याने पण काही न बोलता डोक्यावर हात मारून घेतला.

त्यादिवशी बल्लूभाईच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने नकारात्मकतेचा मंत्रचळ सोडला आणि मला केस येणार असा गंडाच बांधून घेतला.

सहा महिन्यानंतर

बल्लूभाई एकदा झोपेत असतांना अचानक अस्वस्थ झाला. त्याला त्याचे केस एकाएकी लांबलचक झाल्याची प्रचिती आलील. त्याची झोपच उडाली आणि आपण स्वप्नतर बघत नाहीना म्हणून त्याने त्या अंधुकशा प्रकाशात दोन्ही हातांनी केस चाचपून पाहिले आणि त्याला आपल्या हातातले केस बघून विश्वासाचं बसेना. तो बिछान्यावर खाडकन उठला आणि बघतो तर काय घड्याळात सकाळचे सहा वाजवे असा तो झोपलेला आणि त्याचक्षणी पंधरा मिनिटे व्हावे अशी मंगलाच डोकं बल्लूच्या डोक्याला भिडलेलं आणि बल्लूचा हात मंगलाच्या केसात गुंतलेला.

निराष होऊन बल्लू जागचा उठला आणि आरश्यात आपलं डोकं चाचपून बघत होता. खिडकीतून सूर्याची सोनरी कोवळी किरणे त्याच्या टकल्या पडून चकाकत होती. तो सोनेरी चकाकणारा क्षण बल्लू न्याहाळत असताना, अचानक त्याने डोळे टवकारले आणि या जाड्याभरड्या चेहऱ्यावर एक येडपीसं हसू उमटलं….. त्याच कारण होत त्याचा डोक्यावर अंकुरित झालेला आणि त्याला सलामी देत तटस्थ उभा असलेला एक मंत्रचळ केस.

समाप्त

एक मंत्रचळ केस

जिते रहो…..सदा हसते रहो….

मंगेश उषाकिरण अंबेकर
९८२३९६३७९९
११ डिसेंबर २०१९ (दत्त जयंती)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.