खुळखुळा

“हुश्शsssश्श संपला बुवा आजचा दिवस कसाबसा. आता मस्त दोन महिने सुट्टी. उद्याचा दिवस फक्त आराम आणि परवा सकाळीच भुर्रर्र. कधी एकदाचा मृणालला भेटतो असं झालय. बस फक्त हा पाऊस थांबायला हवा बाबा. वीट आणलाय नुसता याने. दिवाळी आली तोंडावर पण याचा थांबायचा काही नेम नाही. ” सलग पंधरा-सोळा तास काम करून, आहे त्या कपड्यात बिछान्यावर नुकताच पहुडलेल्या निखिलच्या डोक्यात घरी जायचे वेध घोंघावत होते.

तेवढ्यात त्याचं मोबाईलकडे लक्ष गेलं. बॅटरी कधीचीच डिस्चार्ज होत आली होती. त्याने बिछान्याबाजूचा चार्जर एका हाताने चाचपडला आणि मोबाईल चार्जिंगला लावला तितक्यात मोबाईल खणखणला. “निखिल, अरे मृणालला अचानक दुखू लागलंय, आम्ही आता तिला हॉस्पिटलला घेऊन जातोय.” तिकडून फोनवर धीरगंभीर आवाजात सासऱ्यांनी घाईघाईत निरोप दिला.

“बाबा, का काय झालं, मी तासाभरा पूर्वी तर बोललो तिच्याशी. त्यावेळी सगळं ठीक होतं….आणि आता हे…. काय झालंय काय नेमकं?”

“माहीत नाही, पण तिला पोटात त्रास होतोय. तू काळजी करू नको. डॉक्टरांना भेटल्या नंतर कळवतो. पोहचलोच बघ.” बाबांनी वाक्य आवरतं घेत, मृणालच्या हट्टापाई केलेला फोन अखेर ठेवला.

निखिल पुरता गांगरून गेला. काय करावं ते सुचेना. या थकलेल्या देही आणि या धोधो बरसणाऱ्या अवकाळी रात्री निघावं? का थांबावं? या द्विधा मनस्थितीत तो क्षणभर विसावला. गोंधळलेल्या मनी त्याला, मृणालला दिलेला शब्द आठवला आणि त्वरित कामाचा शीण झटकत ताडकन बिछान्यावरचा उठला. एका बॅगेत कसेबसे कपडे कोंबले, तोंडावर पाणी मारले, मोबाईल घेतला, कारची चावी घेतली आणि सरळ दरवाज्याला कुलूप लावून बाहेर पडला.

घनदाट काळ्या मेघांनी भरलेल्या त्या काळोख रात्री निखिल निघाला तर खरा, पण त्यापुढे होता तो दहा तासांचा खडतर एकाकी प्रवास, बेफाम पाऊस, थकलेल शरीर आणि डोळ्यांत एकवटलेली प्रचंड झोप. या सर्व त्रासाचा त्याला क्षणिकही विचार भेडसावत नव्हता, कारण त्यासमोर होता फक्त मृणालचा चेहरा, तिला दिलेला शब्द आणि त्यांनी भोगलेले, साजरे केलेले ते बारा वर्ष. निखिल समोर भुतकाळ झरझर वाहु लागला.

लग्न होऊन एक तप उलटून गेला होता. दोघांचा संसार अगदी व्यवस्थित चालू होता. फक्त या सुखी संसारात कमी होती ती एका आपत्याची. मृणाल आणि निखिलने बाळ होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयन्त केले होते. पण गर्भ राहतच नव्हता. दुसऱ्यांदा झालेल्या miscarriage नंतर डॉक्टरांनी निर्वाळा दिला होता की गर्भाशयात असलेल्या कमतरतेमुळे गर्भधारणा होऊ शकत नाही आणि यानंतरही जर गर्भधारणा झाली तर मृणालच्या जीवाला धोका होऊ शकतो. ह्या निर्वाळ्याने मृणाल पार खचली होती. पण तिने बाळाची आस सोडली नव्हती. तिने निखिल पुढे खूप हट्ट केला. निखिललाही मूल हवं होतं, पण त्याक्षणी येणाऱ्या आपत्यापेक्षाही मृणाल त्याला जास्त प्रिय होती. त्याकरणावरून दोघात बऱ्याच कुरबुरी झाल्या आणि कित्येक महिने अबोला राहिला.

“दर डिलिव्हरीला आपल्या हातात येता येता सगळं निसटून जातं, आणि ह्यावेळी जे डॉक्टरांनी सांगितलं त्यानंतर तर मी तुझ्या बाबतीत कुठलीच रिस्क घेऊ शकतं नाही.” निखिल आपल्या विचारांवर ठाम होता.

“मला काहीच नाही होणार सगळं ठीक होईल बघ.”

“अगं, बाळाचं सुख उपभोगण्यासाठी जर तू सोबतच नसेल तर त्या जगण्यात काय अर्थ मृणाल. त्यापेक्षा आता कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत. आपण त्याचा विचार करू.”

“निखिल ही शेवटीची वेळ, त्यानंतर तू जे म्हणशील ते होईल. पण प्लिज यावेळी माझ्यासाठी हा लास्ट चान्स…..” मृणाल हट्टालाच पेटली होती.

“नाही मला अजिबात नाही पटत, असो… हे दरवेळेस बघण्यापेक्षा आता मी देवाला साकडं घालतो की कोणाच्याही ऐवजी मलाच….” निखिल पुढे काही बोलणार इतक्यात मृणालने त्याच्या तोंडावर एकदम हात ठेवला आणि त्याला घट्ट मिठी मारली.

“मला आणि बाळाला काही होणार नाही, यावेळी मी पूर्ण काळजी घेईल. फक्त यावेळी तू माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये रहा.” शेवटी मृणालने हट्ट करून त्याला शेवटची संधी घेण्यासाठी मनवले. निखिलच्या फिरस्ती कामामुळे दोन्ही डिलिव्हरीच्या वेळी तिच्यासोबत असणं शक्य होऊ शकले नव्हते.

“तू आपलं सगळं वदवून घेतेस, तुला समजावणं कठीण… ठीक आहे यावेळी तब्बल दोन महिने रजा टाकतो कामाला.” मिठीत घेतलेल्या मृणालच्या डोक्यावरून हळुवार हात फिरवत निखिल मृणालच्या जिद्दीपुढे विरघळला.

पुढे मृणालने स्वतःच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सात महिने व्यवस्थित पार पाडले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून तिला योग्य ते मार्गदर्शन पुरवले. निखिल आणि घरच्यांनी तिचा पदोपदी सांभाळ केला. आठवा महिना अर्ध्यावरच संपला होता.

“बाबा, कशी आहे मृणाल, भेटले का डॉक्टर.”

“हो भेटले, पण डॉक्टरांनी अजून काही सांगितलं नाही. सध्या ऑपरेशन थेटर मध्ये नेलं आहे. होईल सगळं ठीक तू काळजी करू नकोस.”

“ठीक आहे मी निघालोय, सकाळ पर्यंत पोहचतो.”

“अरे, कशाला घाई करतोस. इतक्या पावसात आणि इतक्या रात्री निघायची काही गरज नाही. आम्ही आहोत ना इकडे.”

“काही प्रॉब्लेम नाही.”

“निखिल ऐक माझं, निघाला असेल, नसेल तरी माघारी फिर. उद्या सकाळी निघ. रस्ताही फार खराब आहे रे.”

“तुम्ही काळजी करू नका. पोहचतो मी.”

“ठीक पण सावकाश ये.”

निखिलने हो म्हणूस्तोवर मोबाईल आपोआप बंद झाला.

“शे….बॅटरी डिस्चार्ज…गडबडीत चार्जेरही राहिला.” निखिल त्रागा करत स्वतःच स्वतःला दोष देत बडबडला.

पाऊसाचा जोर बऱ्यापैकी कमी होता. एरव्ही कारमध्ये जोऱ्यात गाणे वाजवत कार हाकणारा निखिल आज सगळंच विसरला होता. एकदम निरव शांतता. रस्त्यावर तुरळकच वाहनं होती. कारमध्ये तो आणि फक्त त्याच्या आठवणींचाच गलका झालेला. त्यात भर म्हणून दिवसभराचा थकव्याला आरामाची भूक लागलेली. शरीर सैल होत चाललेलं, डोळे अधूनमधून लवत होते. डोळ्यावरची झापडं मध्येमध्ये मिचकू लागली.

इकडे मृणालला असह्य वेदना सुरू झाल्या. डॉक्टरांनी लागलीच ऑपरेशन थेटरमध्ये गर्दी केली. थेटरच्या दाराशी उभ्या असलेल्या आईबाबांशी काही न बोलताच डॉक्टर नर्सेस भराभर आत गेले. दोघेही दरवाज्याच्या छोट्या खिडकीतून आतल्या गोष्टींचा कानोसा घेऊ लागले. ऑपरेशन क्लिष्ट होते. आई बाबा बाहेर बऱ्याच वेळ तातकाळत बसलेले. अखेरीस दोन तासा अंती ऑपरेशन पार पडले आणि मृणालने एका गोंडस बाळाला जन्म दिला. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नातून मृणाल आणि बाळ दोघेही सुखरूप होते. मृणालला तासाभराने शुद्ध आली. ऑपरेशनच्या असह्य वेदना जाणवू लागल्या.पण कुशीतल्या तान्ह्या बाळाला पाहून मृणालचा आनंद त्या त्रासिक चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. तिने आणि निखिलने सोबत भोगलेली सर्व वर्ष तिच्या समोरून वाहू लागली.

आईबाबांना एकदाची ही गोड बातमी निखिलला कधी सांगतोय असं झालं होत. पण त्याचा मोबाईल बंद असल्यामुळे काहीच संपर्क होऊ शकत नव्हता.

“निखिल?” पहाटे पूर्णशुध्दीवर आलेल्या मृणालने मान उंचावत बाबांना विचारलं.

“पोहचतच असेल इतक्यात, आता तू तुझी आणि बाळाची काळजी कर.” बाबा ही चेहऱ्यावर उसनं हसू आणत मृणालच्या प्रश्नाला उत्तरले.

त्यानंतर मृणाल बराच वेळ बाळातच मग्न झाली. बाबांनी सहजच रूम मधला टिव्ही सुरु केला. चॅनल पुढे करत असतांना बातम्याच्या चॅनल येऊन पोहचले. टिव्ही म्युट मोडवर होता. त्यातील एका चॅनलवर
“हायवेवर अपघातात एका कारला ट्रक ने उडवले, चालक जागीच ठार” चा मथळा झळकत होता. इनसेटमध्ये अपघात झालेली चक्काचूर कार आणि ट्रक झळकत होते. ते दृश्य बघून बाबांनी नकळत आवाज वाढवला आणि तसे आई व मृणालच लक्षही तिकडे गेले. अपघातग्रस्त कार, रस्ता आणि चालकांच वर्णन निखिलच्या सर्व गोष्टींशी हुबेहूब साधर्म्य साधत होतं. “भीषण अपघातात कार चालक ठार” कानांवर पडलेल्या बातमीदाराच्या आवाजाने तिघांच्या काळजात धडकी भरली. तिघेही सुन्न झाले. बाबांच्या थरथरत्या हातांनी नकळत खिशातला मोबाईल चाचपडला आणि थेट निखिलला कॉल लावला. निखिलचा फोन अजूनही बंदच लागत होता. मृणालच्या डोळ्यातून आपसूकच अश्रू वाहू लागले. मृणालकडे नजर फिरताच बाबा भानावर आले आणि पहिले टिव्ही बंद केला. रूममध्ये एकदम भयाण शांतता पसरली.

“ये वेडा बाई, निखिल येतच असेल. सगळ्या कार सारख्याच दिसतात.”

“तो एव्हाना पोहचायला हवा होता ना बाबा, पहाटे जास्तीतजास्त पाच पर्यंत पोहोचणारी व्यक्ती दुपारचे बारा वाजत आले तरी कशी पोहचली नाही. दर डिलिव्हरीला कोणी ना कोणी आहेच… रडवायचं ठरवले आहे का नियतीने.” रडक्या स्वरात मृणालने उभारलेल्या शंकेचे निरासन करायला बाबांकडेही शब्द नव्हते.

“निखिल बरा असेल ना हो? आपल्या कोणाकडूनही कळेल?” मृणालने काकुळतेने आर्जव करत आईकडे पाहिलं.

“थांब मी राघूला फोन करून बघतो तिथून हे ठिकाण जवळ आहे, तो तिथे जाऊन बघू शकेल. नाहीतर मी निघतो” बाबांनी दबक्या आवाजात आईला बाजूला घेऊन सांगितले.
फोन करायला ते रूमचा दरवाजा उघडून बाहेर पडले आणि हॉस्पिटलच्या दारात मोबाईलमध्ये नंबर शोधत उभे होते. तितक्यात एका व्यक्ती त्यांच्या नकळत पाया पडली. बाबांच लक्ष मोबाईलकडून त्याच्यासमोर खाली झुकलेल्या देहाकडे गेले आणि त्यांनी एकदम ओरडत घट्ट मिठी मारली.
“निखिलsss निखिल ssss अरे होतास कुठे तू? किती कॉल केले तुला? सांगितलं होतं ना नको घाई करू, त्यात भरीसभार म्हणून त्या बातम्या.”

“सॉरी बाबा सॉरी….सांगतोsss सगळं सांगतो, आधी मृणाल कशी आहे ते सांगा.”

“तूच आत जा आणि बघ. तुम्ही दोघेही हट्टी. बोलायचंच नाही मला तुम्हा दोघांशी” भिजलेले डोळे लपवत बाबांनी मृणालच्या रूमकडे बोट दाखवले.

निखिलची उत्सुकता शिगेला पोहचली होती. तो सरळ रूमकडे पळत सुटला, बाबाही त्या मागे रूमकडे वळले. मृणाल बेडवर निर्जीव पडली होती. मृणालच्या मिटलेल्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या आणि ओठ काहीतरी पुटपुटत होते. बाळाला हातात घेऊन बसलेल्या आईने मोठ्याने “निखिलsss” म्हणून ओरडल्या. तश्या ओलावलेल्या पापण्या उघडल्या. तिला आपला हुंदका आवरता आला नाही.

निखिलने मृणाल उठवून घट्ट मिठी मारली.

“या वेळी तू रडवायचं ठरवलं होतंस का?” मुसमुसणाऱ्या मृणालने निखिलला दमटावून प्रश्न केला.

“सॉरी रे, मी फक्त तुला दिलेल्या शब्दासाठी झटपटत होतो.” मिठी सैल करत निखिल पुटपुटला.

“कोणता शब्द खरा करणार होतास तुझा, ‘माझ्या ऐवजी देवाने तुला……?”

निखिल उठला आईंच्या पाया पडून, अलगदपणे बाळाला हातात घेतलं आणि त्याकडे बघून बोलला, “डिलिव्हरीच्या वेळी मी तुझ्यासोबत असण्याचा शब्द, मी यावेळीही पूर्ण नाही करू शकलो. पण आपल्या या बाळानेच मला वाचवलं. हे मात्र खरं”

“बाळाने?” आई, बाबा आणि मृणाल तिघेही निखिलकडे आवक होऊन बघत होते.

“तसा माझाही अवेळी निघण्याचा हट्ट चुकलाच पण आता तुम्ही रागावणार नाही तर सगळं सांगतो. निघावं? का नाही? या द्विधा मनस्थितीत मी निघालो. कारमध्ये बसल्यावर आठवलं की खरेदी केलेल्या वस्तू सोबत घ्यायच्या राहिल्या. ‘घ्यावं? का नाही?’ याचा विचार करत तो सोसायटीच्या गेट बाहेर पडला, पण मनाने ‘घेऊया’ चा कौल दिला आणि तो परत माघारी फिरलो. बाजारातून खास खरेदी करून आणलेल्या काही वस्तू कारच्या डिक्कीत ठेवल्या आणि राहिलेल्या मागच्या सीटवर.

निघालो तेव्हा पाऊस कमी होता पण नंतर तासाभराच्या अंतरावर काळजात धडकी भरणार पाऊस सुरू झाला. पहिलेच दोन दिवसाचा थकवा आणि झोपीचे डोळे आणि त्यात हा पाऊस. मी पुढले सहा सात खूप सावकाश बऱ्यापैकी सतर्कतेने कार चालवली. नंतर पाऊस बऱ्यापैकी ओसरत आला होता. माझ्या डोळ्यावरची झापडं मध्येमध्ये मिचकू लागली होती. तेवढ्यात माझी कार एका खड्यातून गेली आणि मागे सीटवर ठेवलेल्या समानांपैकी बाळासाठी घेतलेला खुळखुळा खाली पडला आणि त्याच्या आवाजाने मी एकदम दचकून अंग शहारत भानावर आलो. रस्त्याच्या मधोमध असलेली कार एव्हाना कडेला आली होती. थोडा उशीर आणि कार डिव्हाडरवर आदळली असते. थोडक्यात अनर्थ टळला. माझ्या अंगावर काटा आला.

मी कसंबसं स्वतःला आणि स्टेरिंगला आवरत गाडी सावरली. एका हाताने डोळे चोळले, चेहऱ्यावर हात फिरवला, पाणी पिले आणि परत तसाच कार चालवत राहिलो. शरीर आराम मागत होते आणि पोहचण्याची घाई वजा हट्ट शरीराला मज्जाव करत होती.

माझ्या डोळ्यांवर काही मिनिटांनी परत जाड झालेल्या पापण्या आपसूक पडू लागल्या. मानेला तंद्रीचे हलके हलके झटके बसू लागले. तेवढ्यात पुन्हा एकदा माग पडलेला तो खुळखुळा वाजला आणि माझी तंद्री तुटली. पण मी पूर्णतः शुध्दीवर येतो ना येतो तेवढ्यात मागून भोआsssआsssअ करत सुसाट वेगात येणारा एक ट्रक दिसला. माझी कार उजवीकडून जाणाऱ्या त्या ट्रकच्या अगदी समोर दहा पंधरा फुटांवरच होती. डावीकडे दरी होती. मी खूप घाबरलो, गडबडलो. काय करावे ते सुचेना. मी सुटलेल्या स्टेरिंगचा जोर घट्ट केला आणि पूर्ण ताकदीनिशी डावीकडे वळवण्याचा प्रयत्न केला आणि थोडक्यात वाचलो.

नंतर त्या खुळखुळ्याचा आवाज सलग येऊ लागला आणि तेव्हा मला आपल्या बाळाची पहिली चाहूल झाली. जणूकाही आपलं बाळ मला ‘मी आलोय’ म्हणत खुळखुळा वाजवून मला थांबायची ताकीद देत होतं. त्यावेळी माझा ड्रायव्हिंगवरचा ओव्हरकॉन्फिडन्स क्षणात निवळला आणि शेवटी अंतर्मनातुन हाक आली की ज्या बाळासाठी आपण निघालो, निदान त्यासाठी तरी सुखरूप पोहोचणंही आवश्यक. मी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि गुपचूप झोपी गेलो.

एक माकडं कारच्या खिडकीवर हात मारत होते तेव्हा कुठे दचकून जागी झालो. घड्याळात पाहतो तर सकाळचे दहा वाजले होते. सरळ गाडी काढली, तेव्हा रस्त्यात एक अपघात झालेला दिसला. अपघात झालेली कार माझ्या कालच्या आख्या प्रवासात माझ्या कारच्या मागे-पुढेच होती आणि ज्या ट्रकने तिला उडवलं तोच मला डावलूनच पुढे गेला होता. मी मनोमन देवाचे आणि या बाळाचे आभार मानले आणि थेट हॉस्पिटल गाठलं.”

भरलेल्या डोळ्यांनी बाबा बाळाकडे बघत, निखिलच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले,” बेटा जीवनाच्या वाटेवर आपल्यालाही खुळखुळारुपी छोटेछोटे संकेत कानी पडत असतात. प्रश्न फक्त असतो की तो नजरअंदाज करावा की खरचं सतर्क व्हावे.”

निखिलनेही बाळावरून नजर न हटवता होकारार्थी मान हलवली आणि आपल्या खिशातला खुळखुळा काढुन बाळाच्या इवलूश्या हातात ठेवला. बाळ हात हलवत तो खुळखुळा वाजवून गोंडस हसले. ते पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित झळकले आणि एक कुंटुंब खुळखुळ्याच्या खळखळाटात खुलून निघाले.

समाप्त

जिते रहो, सदा सतर्क रहो.

मंगेश उषाकिरण अंबेकर
०५ नोव्हेंबर २०१९
९८२३९६३७९९

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.