ऋणानुबंध – भाग- सातवा (अंतिम भाग)

मधुरा शेवटी दामलेंकडे बघत सोहमला म्हणाली, “अरे बराच मनकवडा आहेस रे बाबा तू……सांगते सांगते…..अरे काही विशेष नाही आज फक्त आमच्या लग्नाचा वाढदिवस. त्यामुळे थोडं स्पेशल केल एवढंच.”

दामले अक्षरशः जागचे उडाले. त्यांच्या डोक्यात रात्रीपासून चाललेल्या गोंधळात ते चक्क आपला लग्नाचा वाढदिवस विसरले होते. गेल्या पंधरा वर्षात दामले पहिल्यांदा विसर पडला होता.

“काय बोलताsssss ! तुमच्या लग्नाचा वाढदिवस आणि तुमी आत्ता सांगताय मला. हे नाय पटलं मला. तुमी तरी सांगायचं नाय का मला.” सोहम दामल्यांकडे बघत लटक्या रागाने बोलला.

“ओह्ह माय गॉडssss ! मलाच लक्षात नव्हतं अजिबात, मधू आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी, रात्रीच्या अपूर्ण झोपेमुळे मला सकाळपासून अंगात कणकण आहे. कसं काय विसरलो तेच कळलं नाही, सॉरी.” दामलेंनी प्रयन्तपूर्वक माफी मागितली

“अरे असुदे, मला माहित आहे, तुझी तब्यत कळतेय, मला काही राग नाही आला.” असं बोलून मधुराने अगदी सहजच माफ केल. दामलेही अवाक झाले कि हिने इतक्या सहज कस काय माफ केलं.

लग्नाच्या वाढदिवसामुळे थोड्या वेळापुरता विसरलेला विषय परत त्यांच्या मनात डोकावला आणि त्यांना अजून आतून दुखावून गेला. दामलेंना वाटलं की, मधुरालाही हाच दिवस निवडायचा होता.
दामल्यांना आता स्वतःचाच राग येत होता. ‘आपल्याला साधं, हा दिवस नको’  हे ही सांगता येत नाही.

तिघांच जेवण उरकलं तस सोहमने समोरच्या बेकरीतून केक आणला. दोघांनी मिळून केक कापला. दामल्यांचे डोळ्यात हलकेशी आसवे टपकली. सोहमने ते पाहिलं आणि त्याने लगेच त्यांनाप्रश्न केला, “कावो, यवड्या खुशीच्या मोक्यावर तुमाला रडाला काय झालं आता, मी बाहेर गेलोतो तर ह्यांनी तुमाला मारलं बिरलं की काय?”

“नाहिरे, आज पहिल्यांदा मी आमच्या लग्नचावाढदिवशी विसरलो आणि पहिल्यांदा आम्ही तुझ्यासोबत असा साजरा करतोय, नाहीतर आम्ही नेहमी एकट्याच साजरी करत आलोय, म्हणून थोडे आनंदाश्रू टपकले बाकी काही नाही.” दामल्यांनी डोळे पुसत पुसत सावरलं.

“हवका, मी कबाब मदे हड्डी बनलो की काय मंग, पळतो मी….. तुमी दोग करा साजरी एकट्यात बाबा” सोहम चेष्टेच्या स्वरात बोलला.

“अरे नाही नाही सोहम, तुझ्यासोबत उलट चांगलाच वाटलं रे, अस केक वगैरे कापून आम्ही कधी सेलिब्रेट नाही केला रे आमची अंनिवर्सरी ऍनिवर्सरी कधी” मधुराने सावरत घेतलं.

“बसका! तुमी लय उशिरा सांगितलं नाहीतर मी लय भारी प्लॅन केलं असतं सकाळ पासन” सोहमचा उत्साहाने बोलत होता.

दामल्यांनी स्मितहास्य केलं. मधुराही हसली आणि म्हणाली, ” थँक्स सोहम, ते मला माहीत होतं, म्हणून तर सरप्राईज दयाच ठरवलं तुला, पण मला काय माहीत ते सरप्राईज वसंताला भेटेल. “दोघांचा हशा पिकाला, पण दामले गप्प बसले.

मधुराने घरातली कामं आवरता आवरता दामल्यांना सोहमला बोलण्याचा इशारा केला. दामले तिच्याकडे पाहिलं आणि सोहमला घेऊन बाहेर झोपाळ्यावर जाऊन बसले.

अत्यंत जड अंतःकरणाने त्यांनी सोहमचा हात आपल्या हाती घेतला.
“काय कशी चालू आहे नोकरी? तुझा मॅनेजर काय म्हणतो?” आशा बऱ्याच इतरत्र गप्पा मारत त्यांनी अर्धा तास घालवला पण विषयाशी त्यांना काही हात घालता येईना, त्यांचा काही कंठ फुटेना. शेवटी मधुरा खिडकीतून दामल्यानंकडे एक कटाक्ष टाकून गेली. त्यानंतर जवळपास पंधरा मिनिटांनी विषयाशी हात घालत दामले सोहमला बोलले, ” अरे सोहम तुझ्याशी मधुला काही बोलायचं आहे ना वेळ तुला?”  दामल्यांनी प्रेमासाठी संपुर्ण समर्पण केलं होतं

‘काय बोलता ओ, तुमच्यासाठी यळचयळ हाय, बोला बोला” सोहम बोलला.

“नाही मी नाही, तुला मधुच व्यवस्थित सांगेल, आणि हो हा आमच्या दोघांचा विचार आहे त्यामुळे कसलच वाईट वाटून नको घेऊस. तुला नाही आवडलं तर नाही सांग पण अजिबात राग नको मानून घेऊस आमचा…….. तू आत जातो का मधु वाट बघत आहे?” फार हलक्या स्वरात मनावर दगड ठेवून सोहमचा हात दाबत दामले शेवटी धीरगंभीर आवाजात बोलले.

सोहम एकदम भांबावला, त्याला काहीच कळेना की दामले एवढे गंभीर का झाले? असं काय बोलायचंय यांना? , “ओ कसला इशय अन कसला राग? काय बी उमजना मला”

“तू जा आत कळेल तुला सगळं” दामले मृदू आवाजत बोलले.

सोहमची उत्कंठा वाढली,नेमकं काय बोलायचंय या विचाराने सोहमची उत्सुकता शिगेला पोहचली होती. तो सरळ उठून आतल्या खोलीत गेला, जिथे मधुरा त्याची वाट पाहात बिछान्यावर भिंतीला टेकुन बसलेली होती.

इकडे दामल्यांचा बांध फुटला. ते झोपळ्यावरून उठले आणि सरळ बाहेर अंगणात गेले. त्यांना आता या पुढे काहीच सहन होत नव्हतं. आपल्याच हाताने आपण आपलं प्रेम दुसऱ्या स्वाधीन कस केलं या विचारानेच ते ओक्साबोक्शी रडू लागले.  ऐन त्यावेळेसच वीज गेली. सर्वत्र तिमिर पसरला. दामले मनात आधींच दाट काळोख पसरला होताच. कसलच भान नाही राहिलं. त्यांना मागे वळून बघायचीही इच्छा झाली नाही. त्यांच्या अंगात कुठलाच त्राण नव्हता उरला, अगदी उद्विग्न अवस्थेत ते फाटकाचा आधार घेत त्यावर हात ठेवून उभारले. फक्त रातकिड्याचे किर्रकिर्र आवाज कानी पडत होता. एक भयाण बोचरी शांतता पसरली होती.

एवढा अंधार होऊनही मधुरा आणि सोहमचा आतुन कसलाच आवाज येत नव्हता. जवळपास तीस ते चाळीस मिनटं होऊन गेली पण सोहम काही बाहेर आला नव्हता. इकडे दामल्यांना एकएक क्षण काळीज व्याकुळ करून जात होता. तितक्यात वरांड्यात पावलांचा आवाज झाला. सोहम बाहेर आला. तो दामाल्यांना शोधू लागला, त्याला ते काही दिसले नाही आणि शेवटी त्याचं लक्ष फाटकाकडे गेलं. तिथे दामले मान खाली घालून, पायाच्या अंगठ्याने जमीन उकरत उभे होते.
सोहम जोरात पळत तिथे गेला आणि त्यांना एकदम मिठी मारली. दामलेंना काही कळलंच नाही.

सोहमला बोलायला श्वास अपुरा पडत होता,”इतकुशी गोष्ट सांगाला तुमाला इतका यळ लागला, तुमी मला साधं इशाराजरी केला असता ना तरी मी लागलीच तयार जालो असतो.”

दामलेंना ते जखमेवर अजून मीठ चोळल्या सारखं झालं. ते मनाने अजून खट्टू झाले. त्यांच्या कंठातून शब्द फुटेना, काहीच बोलले नाही. ते त्याच्या मिठीत तशेच अंग सैल सोडून उभे होते डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. दामले एकदम निर्जीव देहा सारखे आपला भार त्याच्यावर सोडला होता. सोहमच पुढे बोलणं चालूच होत.

“मंग आजपासून तुमाला काय मनु सांगा, काका काsss दामले काsssss वसंत राव….काsssssssssबाबा काssssss…. पप्पा …..काsssss डॅड.”

दामल्यांचं सोहमच्या बोलण्यात लक्ष नव्हतं, पण शेवटच्या शब्दाने त्यांना भानावर आणलं. निरभ्र नभात अचानक वीज पडावी असं अचानक दामल्यांच्या निर्जीव अंगात वीज संचारली. दामाल्यांनी दोन्ही हाताने त्याला मिठीतुन बाजूला ढकललं. डोळे फाडून ते सोहमकडे बघत जोऱ्यात किंचाळले, “काय…काय बोललास तू….परत बोल ….. परत बोल”

तितक्यात वीज परत आली, सर्वत्र पसरलेला अंधार परत सोहमच्या येण्याने लख्ख उजळून निघाला. दामले सोहमच्या डोळ्यात डोळे घालून बघत होते. दामल्यांना सोहमचा प्रफुल्लित चेहरा आणि गालावर ओघळलेले आनंदाश्रू स्पष्ट दिसत होते.
सोहमच्या डोळ्यात पाणी ओसंडून वाहत होते. तो त्याचा चेहऱ्यावरच उधळत हसू सांभाळत परत एकदा मोठ्याने बोलला, ” अवो मी इदक्यांदा बोललो, तुमी एकादापण नाही सांगितलं मला तुमच्या मनातलं, आज सांगितल्यावर कळलं की काय तरसातून गेलाय तुमी दोग. मी त्यांना आई म्हणणारआज पासून आणि आता तुमची बारी….सांगा की काय बोलू तुमाला बाबा पप्पा……का डॅड…अवो मी तुमचा मुलगा बनून जिंदगीभर नाय तर जन्मोजन्मी तुमच्या संग राहू शकतो.”

विलक्षण हळवा क्षण होता, दामल्यांचे अश्रुधारा थांबायच्या नाव घेत नव्हत्या आणि चेहऱ्यावरचा आनंद नभात मावत नव्हता. जेव्हा चेहऱ्यावर फक्त आसू किंवा फक्त हसू एकटं एकटं येत त्यावेळेस हातातून एकतर काहीतरी सुटलेलं असतं किंवा काहीतरी भटलेलं असतं, पण ज्यावेळेस हे दोघही चेहऱ्यावर एकदाच येतात त्यावेळी आपल्या सोबत सर्वात अतुलनीय घडलेलं असतं. उभ्या आयुष्यात असे क्षण फार कमी वाट्याला येतात. दामले आज ते अभुतपुर्वक्षण अनुभवत होते. त्यांनी सोहमला अगदी घट्ट मिठी मारली,”तुला हवं ते म्हण….तुला जे आवडत ते म्हण……काहीही म्हण बाळा……अगदी काहीही”

मधुरा वरांड्यात उभी होती, ती त्या दोघांना पाहून खूप भारावून गेली होती. तिलाही अश्रू अनावर होत होते. ती तशीच त्या दोघांपाशी आली. मधुरा आणि दामलेंचे आनंदाश्रू बघून खुप भावविवश झाली. त्यांना तर सोहमच्या रुपात त्यांचं जगच भेटलं होतं.

दामल्यांचं लक्ष मधुराकडे गेलं, त्यांची नजरानजर झाली. तिची नजर क्षणात दामलेंच्या संशयी मनाला भिकारी करून गेली.  त्याक्षणी दामल्यानां स्वतःची, स्वतःच्या मनाची आणि त्यांच्या विचारांची किळस वाटली. त्यांनी सोहमकडे ह्या नजरेने कधी असं का बघितलं नाही याची त्यांना लाज वाटली. जशी मधुरा जवळ आली तसं दामल्यांनी सोहमला बाजूला करत मधुराला खूप घट्ट आलिंगन दिलं, जणू त्याचं ते आलिंगन मधुराच्या विशालहृदयी मनाकडे आपल्या चुकांसाठी धायमोकलून रडत रडत आपल्या चुकांची क्षमा मागत होते. पण मधुराला आपल्या मातृत्व प्रेमापुढे दामलेंच्या विचारांची पुसटशी जाणीवही झाली नाही. पुढेही तिच्यावर मनावर दामलेंच्या मनातील संशयाच सावट कधी पडलं नाही आणि दामल्यांनी पण आपले विचार कधीच व्यक्त केले नाही.

सोहमने त्या दोघांच्या मिठीत स्वतःलाही सामायिक करून घेतलं.  दामले ज्यांना हा सोहम घरासमोर भेटला पण नंतर त्यांना त्यांचाच पश्चताप झाला, मधुरा जी पहिल्याच दिवशी सोमहला घरातून काढणार होती आणि हा कोणकुठला अनाथ, पोरका सोहम फक्त एक खोली शोधायला निघला होता आणि आज नियतीने या तिघांसमोर नात्यांची इतकी सुंदर बाग फुलवली. तिघेही रडत होते, हसतं होते आणि नात्यांचा हा गोड ऋणानुबंध अनुभुवत होते.

                                      समाप्त

मंगेश उषाकिरण अंबेकर

9823963799

2 Comments Add yours

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.