ऑफिसच्या वाटेवर

एक मावळा आज भल्या पहाटे मनात एक अजब चलबिचल घेऊन उठला. प्रातः विधी आणि स्नान आटपून, जोरबैठका न काढताच पठ्या तडक न्याहरीसाठी चुलीजवळ येऊन बसला.

“धनी! अन हे काय वो? आज इतक्यात कस वो उरकलं, गडावर लवकर पोचाच हाय का?” बायको बावरल्या स्वरात पुटपुटली.

“तसं नव्ह! समद्या रात पासनं कानात नुसतं बिगुल वाजतुया! कायतरी यड वंगाळ हूणार वाटतया बघ! भाकरी वाढ पटकीनी गडावर पोचाया हवं म्हयासनी” गडबडीत न्याहारी आटोपली.

गड्यान पांढरा शुभ्र अंगरखा चढवला, मिश्या पिळल्या आणि डोक्यात फेटा बांधून घोड्यावर बसला.

एखादं भुत मागे लागव…तसा घोडा हाकत हाकत, पायदळी कित्येक जीव तुडवत, चिखला-खड्याततून, गल्ली बोळातून घोडा कूच करत होता. डोक्यात माजलेल्या कोलाहला सगट एका वेगळ्याच धुंदीत तो आडदांड देह आणि त्याचा घोडा तेजीने गडाकडे कूच करत होता. सैल सोडलेला लगाम आणि अंगात संचारलेला आवेशाने घोडा वाऱ्याला चिरत-चिरत वेगाने धावत होता. वाटेत डोंगराचा पायथा लागला. मावळा अजून वेगाने घोडा हाकु लागला. चढण्यास साधारण पंधरा मिनिटे वेळ लागणारा डोंगर, मावळ्याने काही क्षणातच पार केला. तो डोंगराच्या माथ्यावर पोहचला रे पोहोचला… तसा खि: … खि:…. करत घोडा जोऱ्यात किंकाळला…. बेसावध असलेल्या मावळ्याचे लक्ष पुढे गेले आणि पाहतो तर काय!!!! ………. कोणीतरी डोंगर अर्धा कापुन ठवलाय की काय अशी खोल दरी.

मावळ्याच्या आणि घोड्याच्या काही लक्षात येण्याच्या आत, काळ त्यांच्यासमोर येऊन ठेपला होता. गड्यान सर्व ताकतीनं घोडयाच्या नाकपुड्या फुटूस्तोवर लगाम करकचून आवळला पण कदाचित घोड्यानं जो वेग पकडला होता तो अखेरचाच. घोड्याचे पुढले दोन्ही पाय पूर्ण हवेत होते. अर्ध्याहून जास्त तो कडेच्या बाहेर होता आणि पुढचे पाय हवेत टेकावी ह्या धडपडीत अखेर त्याचा तोल गेला. मावळ्यांचा पण लगाम हाथातुन काही सुटला नाही आणि तो पार खोल दरीत फेकला गेला. डोक्यावरचा फेटा हवेत उडाला, जीर्ण झालेला अंगरखाच्या वाऱ्याच्या अतिवेगाने अक्षरशः चिंधड्या चिंधड्या झाला. सर्व होत्याच नव्हतं झालं आणि त्याचा तो आडदांड देह क्षणार्धात जमीनदोस्त झाला. चोहिकडे त्याचा एक मोठा आवाज घुमला.

………….आणि तसा मी अंथुरातून खाडकन जागा झालो. अंग पूर्ण घामाघूम झालेल्या अवस्थेत मी बाजूला ठेवलेला तांब्या तोंडाला लावला आणि गटागट पाणी नरड्यात ओतलं….कसलं भयानक स्वप्न हे.

इतक्यात भानावर येईल असं काही ते साधारण स्वप्न नव्हतं कारण तो “मावळा” मीच होतो. हात जोडले, भगवंताच नाम स्मरण केलं आणि दीर्घ श्वासाचा सुस्कारा सोडत थोडासा भानावर आलो. त्यावेळेस विचार आला की आपण यापेक्षा वेगळं करतो तरी काय?

आपला सर्वांचाही दिनक्रम काहीसा असाच तर असतो. रोज आपण आपल्या कामासाठी डोक्यात वाजणाऱ्या कसल्या न कसल्या बिगुलासकट घराबाहेर पडतो. आपल्या धुंदीत धडपडत कामावर पोहचतो आणि परत घाईघाईने माघारी येतो. या दोन्ही ठिकाणावर पोहचण्याच्या प्रवासात अर्धा कापुन ठेवलेल्या डोंगरासारखी अनेक आव्हानं फक्त आपल्या एका चुकीची वाटच बघत असतात. ह्या संपूर्ण प्रवासात काळ आपल्या मागावर असतो? …. का आपण त्या काळाला पकडण्याच्या नादात असतो?…. तेच उमजत नाही.

बरं असही काही नाही की आपण वेळ काळ काही पाहत नाही फक्त प्रत्येक गोष्टीत जरासाच काय तो उशीर झालेला असतो. आणि आपल्या रोजच्या प्रवासाचा आणि रोजच्या दिनक्रमा बाबत विचार केला तर……..नेहमीप्रमाणे आपला बिछान्यातुन पाय जमिनीला टेकायला उशिर झालेला असतो. उठतो की तसाच पळत सुटतो. मग सुरू होतो खरा खेळ “डोंगराला आग लागली पळा पळा” अर्थात हातात नसलेल्या वेळेला गाठण्याची शर्यत.
त्यात सर्वात आद्य काम म्हणजे दरवाजा उघडणे आणि पेपरवाल्याने पुंगळी करून फेकलेला पेपर शोधणे, उठल्यावर वर्तमान पत्राचं महत्व हे फक्त वेळेस कटिबद्ध असणारा व्यक्तीच सांगू शकेल. कमोडवर बसुन पेपर वाचण्या सारखी वेळेची बचत कुठलीच नाही. शिवाय याचे इतर महत्त्व ही तेवढंच जस की इकडे कर्जवाढ, बँक घोटाळे वाचलं की पोटात गोळा येतो. चोऱ्या, मारामाऱ्या बद्द्ल वाचलं की प्रचंड राग येऊन त्या गोळ्यावर दाब येतो आणि दगडफेक, बॉम्ब स्फोट वाचलं की इकडेपण स्फोट उडालाच समजा. अस या वर्तमानपत्राचं माहात्म्य ज्याला कळलं तो नशीबवान.

जेव्हा वेळ खरचं नसतो त्यावेळी दात घासणे, गालावरची वाढलेली खुरटं काढणे, आंघोळ, नाष्टा करणे इत्यादी गोष्टी तद्दन फालतू वाटु लागतात. या सर्व कसरतीत पूजाअर्चा तर सोडाचं देवाला आपलं बुरसटलेले तोंड जरी दाखवलं तर देवचं आपले धन्यवाद मानत असेल. कसंबसं आवरत, पिकांवर जशी फवारणी करतात तसा अंगावर डिओड्रंटचा मारा करून, चुरगळलेला शर्ट कित्येक महिने पाणी न पाहिलेल्या जिन्समध्ये कोंबतो आणि या सगळ्या धांदलीत डोक्यात वाजणाऱ्या कसल्यांकसल्या बिगुला सगट घराबाहेर पडतो.

बाईक वर बसलो की डोक्यात हेल्मेट घालणे गरजेचं पण आपल्यासाठी हेल्मेट म्हणजे हे एखादया साईड मिरर मध्ये अडकावी आणि कामावर निघावं. खरंतर हेल्मेट सारखी थुकरटगोष्ट आपला एवढा मोठा अमूल्य जीव वाचवू शकतो ही एक ढोबळ संकल्पना आहे. प्रामाणिक मत म्हणजे हेल्मेट ही पोलिसांना आपला हातात नसलेला वेळ आणि नसलेले पैसे दयावे लागु नये म्हणुन वापरात असलेली गोष्ट असं कित्येकांच ठाम मत. शिवाय हेल्मेटमुळे साईडचं दिसत नाही, भांग मोडतो, घामा घुम होतं, हिरो सारखं आपलं काळ तोंड जगला(विशेषतः तरुणींना) प्रदर्शित करता येत नाही……. यासारखे कैक थुकराट कारणे आपल्या कडे मांडली जातात. कदाचितच आपल्याला याचं महत्त्व ठेच लागण्याची आधी कळेल. तसचं रणरागिन्यां बद्दल विचारलं तर कौतुक कराल तेवढं कमी. डोक्यात हेल्मेट असो व नसो पण तोंडावरचा स्कार्फ मात्र त्या कधीच विसरत नाही, मग भले करकचून स्कार्फ बांधण्यात हेल्मेटपेक्षा जास्त वेळ का ना लागो. यांना कोणत्याही ऋतूत गुदमरत कस नाही हा मला पडलेला यक्ष प्रश्न. तरी यात मी कुठे स्कार्फ काढल्यानंतर त्यामुळे चेहऱ्यावर उमटलेले वण घालवण्यासाठी लागणाऱ्या रि-मेकअप आणि वेळेचा उल्लेख करत नाही आणि तो तसा न केलेलाच बरा…….असो स्किनटोनच्या नावाखालीच का होईना त्या आपल्या मावळ्यांपेक्षा नक्कीच सुरक्षेबद्दल किंचित थोड्या जास्त जागरूक असतात.

तर आपला घोडा अर्थात आपली दुचाकी/चारचाकी सुरू होते, पायदळी असलेल्या नसलेल्या सर्व जीवजंतू ना चिरडत, खड्यातलं पाणी लोकांच्या अंगावर उडवत, बेभान होऊन आपण हातात न लागणाऱ्या वेळेसाठी, स्वतः चा आणि दुसऱ्यांचाही जीव टांगणीला ठेवत भरधाव वेगाने कामाला निघतो. जसा का लाल दिवा दिसतो तसा करकचून ब्रेक लागतो आणि आपला घोडा पहिल्या सिग्नल वर येऊन थांबतो. सिग्नल वर उभ्या असलेल्या पोलिस मामांची नजर चुकवत, आपसुकच आपलं हेल्मेट चुकून डोक्यात जातं. जसा का हिरवा दिवा लागतो तसा कोण्या खिलजी वर आक्रमणं करावं तस सगळी सेना तुटून पडते. एवढी घाई असते सगळ्यांना जस की या नंतर परत हा हिरवा दिवा लागणारच नाही. त्यात भर म्हणजे कोणी नवखा डाव्या बाजूला येऊन थांबला असेल आणि जर त्याला सगळ्यांना ओलांडून उजव्या बाजुला जायचं असेल तर तो बिचारा कर्माने मेला समजा, सर्वांच्या शिव्यांची बोहनी त्याला अर्पिली जाते.

एक दीड मिनिटाच्या या थांब्यावर तुम्हाला भरपुर निरनिराळी मनोरंजनं बघायला भेटतात फक्त आपली तशी नजर असावी लागते…..आणि अर्थात पुण्यात म्हणाल तर तुम्हाला कोणत्या थिएटरमध्ये पण जायची गरज नाही पडणार, असं हमखास फुकट मनोरंजन!

परवाचाच एक किस्सा आठवला. मी आणि माझी “अग” शगुन चौकच्या सिग्नलवर थांबलो होतो. साधारण तारुण्यातील शम्मी कपुर सारखे दिसणारे एक साठीतले वयस्क महाशय आमच्या मागे थांबले होते. त्यांची नजर झेब्रा क्रॉसिंग वर उभ्या असलेल्या एका व्यक्ती कडे गेली. त्यांनी आपली मॉपेड साईड स्टँड ला लावुन थेट त्याकडे गेले आणि त्याची बाईक मागे घेत त्याला आपल्या दिलखुलास मिजाजत म्हणाले ” Hello Boss! please don’t cross zebra lines. ही पाई चालणाऱ्या लोकांसाठी आहे. please don’t do it again. OK” तो बाईकवाला पण भांबावलेल्या अवस्थेत खरचं आपल्या खुप मोठं पाप घडलय अश्या निरागस चेहऱ्याने त्यांच्या कडे पाहतच राहीला. आपले शम्मी साहेब लोकांच आकर्षण बनले होते ना होते तोवोस्तोवर शम्मी काकांना उद्देशून मागुन एक मोठ्याने आवाज आला. “साहेब ते सगळं ठिक आहे तुमचं हेल्मेट कुठंय.” बस्स….नव्या कोऱ्या गाडीची फीत कापतानाचं हवा जावी अशी परिस्थिती बिचाऱ्या शम्मी साहेबांची झाली. ते फार बावरले आणि कधी सिग्नल सुरु होतो आणि आपण इथून पळ काढतो असं झालं त्यांना. सांगायचा मुद्दा एवढाच की वाहतुकीचे नियम अर्धवट पाळूनही चालत नाही. त्यासाठी आपलं स्वतः पूर्णतः समर्पण आवश्यक किंवा निदान त्या दृष्टीने प्रयत्न तरी हवा. स्वयंसंरक्षणासाठी ती दिखावेगिरी तरी कशाला.

तर आपण जस मजल दरमजल करत रोजच्या प्रवासात पुढे पुढे जात असतो, तसतशी वेगवेगळी आव्हाने आपली वाटतच पाहत असतात. जसे की कोणाला तरी जबरदस्तीने ओढून नेणारा मरतुकडा ट्रॅक्टर ज्याचं मुंडक एकीकडे आणि धड एकीकडे असतं. सदैव बावरलेल्या अवस्थेतील लर्निंग वाले कारचालक जे की कायम “आपण का या एवढया रहदारीच्या रस्त्यावर का आणलो गेलोय” या संभ्रमात असतात, अख्खी वाट अडवुन चालणार एखादा भला मोठा ट्रक ज्याच्या मेंदूला कधी “एका लेनमध्ये चालणे” असं काही शिवलेलं नसतं, ठिकठिकाणी फाटलेल्या कॉर्पोरेशनच्या बसेस आणि त्यांचा कधीही लागणार ब्रेक, तुरुतुरु गांडुळागत चालणारी ऑटोरिक्षा जे की “आपल्या मागे-पुढे, आजूबाजूला कोणीच नाहीए” ह्या आविर्भावात कधी यु-टर्न मारू पाहतात , नुकतीच मिसरूड फुटलेली स्पोर्ट बाईकवरची पोरं ज्यांचा सर्व जोर अकॅसिलेंटरवर पडावा म्हणून बुड चालवताना हवेत तरंगत असतं आणि या सर्वांवरून महत्वाचे म्हणजे स्वतःच नाव शुमाकरच्या रेशनकार्डावर घालू पाहणारे या सर्व वाहनांचे चालक जे सदा सर्वदा आपण ह्या सगळ्यांच्या पुढे कसं जाऊ शकतो याची वाट पहात असतात. कधीतरी आपल्या मागून सतत पीsssप…पीsssssप… करत येणाऱ्याला, थोडं मोठया मनाने “जा जिले अपनी जिंदगी” म्हणतं साईड देऊन तर देऊन बघा……तोही फार विलक्षण दानशूर आणि आनंदी अनुभव असतो हो.

या सर्व दिनक्रमा बाबत खरंच जर खोलात शिरून विचार केला तर अशा या सर्व आव्हानाला पेलत रोज कामावर आणि त्यानंतर घराची वाट सर करू पाहणारा आपला सर्वात महत्वाचा अमूल्य जीव, ज्याची आपण चुकूनही किव करत नाही. पण सत्य मात्र एकच असतं ते म्हणजे ‘आपलं कुटुंब’ जे की आपली सदैव वाट पाहत असतं. निदान त्यासाठी तरी आपण थोडं उशिरा का होईना पण सुखरुप पोहचायचा प्रयत्न करावा. अहो, आपण फक्त वेळेवर सुखरूप पोहचण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा फक्त दहा मिनिटं अगोदर घरा बाहेर पडलो, तर आपण कामावर आरामशीर आणि वेळेआधी पोहचतो आणि दुसरे म्हणजे आपण रस्त्यावरच्या गडबडीचे, अपघातांचे आणि भांडभांडीचे कारण बनत नाही. (आणि थोडं वेळेअगोदर पोहोचलात तर तुमच्या कंपनीवर तुमचे उपकार राहतीलच. हां… पण बॉस ते उपकार कधी मानणार नाही ते वेगळे…..मुळात तुम्ही दिलेली ही दहा मिनिटे ही तुमच्याच जिवासाठी आहे हे विसरता कामा नये.)

आपणच आपलं थोडंस आत्मचिंतन करून, डोक्यात चालणारे भुतांना बाजूला ठेवून, कोणत्याही आवेशात न येता आपण कुठेही निघालेल्या प्रवासात सुखरूप पोहचणे महत्त्वाच. आपल्या हाथी काम लागो अथवा ना लागो, पैसा मिळो अथवा ना मिळो, अंतिम सत्य तर हेच ते म्हणजे “सर सलामत तो पगडी पचास हजार”

ता. क. : मुळात हे काही आपल्या शम्मी काकांसारखं कोणाला दिलेलं नियमांबद्दलच तत्वज्ञान नाही. कारण आपण दुसऱ्यांसाठी जे करू ते महत्वाचच, पण ते स्वतः बद्दल त्याचा विसर पडायला नको. मी तर प्रयन्त करतोय, आपण पण एकदा अवश्य अनुभवून बघा.

जिते रहो……सदा सतर्क, सुरक्षित रहो.

मंगेश उषाकिरण अंबेकर
९८२३९६३७९९

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.