मनोमिलन

“भाजीपाला आणला, किराणा आणला, तुझी गोळ्या-औषधं आणली, दळणही आणलं अजून काही राहिलं असेल तर आत्ताच सांग. मी उद्या गावी गेल्यावर हे कार्ट तुला काही एक आणून देणार नाहीए. नेहमी नुसतं इकडंतिकडं हुंदडत बसतं आणि काम सांगितलं की लागलीच अभ्यासाच नाव पुढे. चार-पाच दिवस तू माझ्याशिवाय कसं निभावशील…. ते देव जाणे.”

“तुम्ही काळजी नका करू होईल ऍडजस्ट, तुम्ही जाऊन या गावी निवांत. तसं स्वारी गावी जाणार म्हणून जाम खुष दिसते, एकदम नव्या नवरीला माहेरची ओढ असते तशी”

“मग असणारच मुळी, तब्बल दहा वर्षांनी जातोय गावी, अण्णा गेले आणि एकदाची नाळ तुटली ती कायमचीच. इतकी वर्ष दुबईत होतो म्हणून जाऊ नाही शकलो आणि मुंबईत आल्यापासून नवीन घर, याची नवीन शाळा, नवीन ऑफिस या सगळ्या नवनव्या जुळवाजुळवीत चार-पाच महिने उलटलेत, पण गावाला जाणं झालं नाही. आता कित्येक वर्षाने नशिबानं खडकेश्वरच्या पूजेचा पण मान आलाय त्यामुळे….जाना तो बनता है यार”

“हो, तेही खरचं…. तुमच्यासोबत मलाही यायची खूप इच्छा होती हो……खूप वर्ष झालीत सुभद्रा काकींना भेटून……अरुची परीक्षा नसती, तर मी पण आलेच असते.”

“तुला तर सांगतोय चल सोबत, ते कार्ट काय नशिब पाझळणार ते आपल्याला माहीत आहे.” सदाशिवच्या या वाक्यावर इतकावेळ पुस्तकात डोकं खुपसलेल्या अरुणने शेवटी बापाकडे डोळे वटारून पाहिलं आणि सदाशिव म्युट मोडवर गेला. आईने मुलांसमोर केलेला बापाचा उध्दार बघूनबघून, थोडाका होईना पण आईचा गुण अरुणला लागला असावा.

पहाटे गावाला निघायच्या हुरहुरीत रात्री दुर्लक्षित असं अर्धवट जेवणं करून, सदा पहाटे चारचा अलार्म लावून शांत झोपण्याच्या असा अशांत प्रयन्त करू लागला. गावाला जायची अस्वस्थता त्याच्या झोपेचं खोबरं करून गेली. या बेचैनीने चारचा अलार्म कधी एकदाचा वाजतो म्हणून चारदा उठून उठून घड्याळाकडे पाहिलं. चार वाजेपर्यंतची जायची सदाशिवची लगबग पाहण्याजोगी होती.

आणि एकदाचा अलार्म वाजला……

एरव्ही आवरायला तासनतास लावणारा सदा…. वीस मिनिटात आवरून आणि बायकोचा झोपाळू निरोप घेऊन घराबाहेरही पडला. शेवटी आपल्या गावाची ओढ सगळ्यांना हात उंचावून बोलवत असतेचं…..फक्त आपण प्रपंच आणि कामाच्या ढिगाऱ्यातून डोकं वर करून पाहायचं विसरतो.

कारमध्ये ‘थोडी आपल्या जमान्याची गाणी लावूयात’ म्हणत सदू मस्तपैकी आपली आवडती गाणी कारच्या काचा उंचावून मोठमोठ्याने चिरकत, गुणगुणत निघाला. त्यादिवशी सदाचं मन सर्व जुन्या आठवणींत विरघळून गेलं होतं. चार तासांचा एकटेपणा जुन्या आठवणीत कधी संपला ते कळलंच नाही. एकदाचा गावचा हिरवागार रस्ता दिसायला लागला तसं त्याचं मन ही हिरवंगार झालं.

सलग….न थांबता…. चार तासाच्या प्रवासाअंती सदाने एकदाचा घरासमोर येऊन हॅन्डब्रेक उचलला. अंगणात आलेल्या कारजवळ लुडबुणारी चिल्लरपार्टी सोडता, सुभद्राकाकी तिचा मुलगा विजय आणि सून तेही तेवढ्याच आतुरतेने सदूची वाट पाहत होती.

“तू तर आम्हाला विसरूनच गेला बाबा….फार मोठा झालास” असा नेहमीप्रमाणे नावडतीचा खोचक सूर न लावता काकीने त्याला आणि त्याने काकीला घट्ट मिठी मारली. चाळीशी उलटलेल्या सदाचा गोड पापा वयाची सत्तरी उलटलेल्या काकीने थरथरत घेतला. “कसं सुकलंया म्हव लेकरू” म्हणतं सदाच्या चेहऱ्यावरून आपले कापरे हात फिरवत स्वतःच्या डोक्यावर नेऊन मुडपली.

इतक्या वर्षांनी आलेल्या सदाचा त्या चार-पाच दिवसात यथेच्छ पाहुणचार झाला. सदा अगदी नव्याने आपलं जुनं आयुष्य जगाला….. गावच्या बोचऱ्या थंडीत उबदार गोधडीत मस्त पहुडणं….आळसावत आरामशीर उठणं….अंगणातल्या कोवळ्या कडुनिंबचा दातून तोंडात टाकून बंबातलं पाणी तापूस्तोवर दात घासत बसणं, विहिरीजवळच्या कठड्यावर आंघोळ आटपून काकींच्या हातचा सुंठ-गुळाचा कडक फक्कड चहा फुरक्या मारतं पिणं……रात्रीच्या शिळ्या भाकऱ्या, तेल-तिखट-मीठ, लोणच्यासोबत चवीनं न्याहरी हादडणं….शेतात हुंदडून कुठं बोरं तोडून खा…कुठं उसाचा चोथा कर…….कुठं ज्वारी बाजरी हुरडा भाजून खा…..तर कुठं हरभऱ्याचे घाटे शेकोटीवर भाजून खा. सदाची इतकीवर्ष राहून गेलेली खादाडी खऱ्या मेव्यांवर तुटून पडली होती. दुपारच्या जेवणात काकींच्या हातची चुलीवरचा झणझणीत रस्सासोबत चुरलेली भाकरी….काकीन आपल्या पुरचुंडीतून चुना, काथ, सोपं-सुपारी काढून बनवलेलं नागिलीच साधं पान…..त्यानंतर दुपारची झाडाखालची एक मनसोक्त पडी….. काका, मामा, मावश्या, शाळा, शिक्षक, जुन्या मित्रमंडळीच्या भेटीगाठी……संध्याकाळी देवाळतलं भजन, किर्तन….रात्रीच्या जेवणानंतरच्या भुताटकीच्या गप्पा मारतमारत बाजेवरची शांत झोप…..त्या चार-पाच दिवसात सदाने आपल्या जिवाचे लहानपणी सारखे यथेच्छ लाड पुरवले…..सदा अगदी नव्याने परत लहान झाला होता. त्याला त्याच्या शहरी जीवनाचा पार विसर पडला.

पुढल्या दोन-तीन दिवस जत्रा भरली…. हलगीचा नाद घुमघुमला, मौत का कुंवा, आकाशझुले, कुस्त्यांचे फड लागले…. पापडी, खव्याचे पेढे, गुळाच्या रेवड्या, लाल घाठी शेव अशा गोडा-धोडाच्या फुफुट्यात माखलेल्या पराती भरल्या….. लाकडी खेळण्या, प्लास्टिकच्या बाहुल्याच्या रंगबिरंगी ताडपत्री आच्छादलेल्या दुकान सजल्या आणि एकदाची खडकेश्वराची महापूजा पार पडली….

अखेर निघायचा दिवस उजेडला……सदा खडकेश्वरची निरोपचं दर्शन घेण्यास मंदिरात पोहोचला….दर्शन झालं आणि समोर गणेश मंदिराच्या पायरीवर येऊन क्षणभर विसावला. परतीची वेळ जशी जवळ येत होती तसं अंतःकरणाला जडत्व येऊ लागलं. सदा सरलेल्या दिवसांच्या आणि जुनी आठवणींनीच्या विचारात मग्न झाला. सगळे भेटले सगळं काही मनासारखं पार पडलं पण मनात कसली तरी रुखरुख वाटू लागली….काहीतरी अपूर्ण….काहीतरी अर्धवट राहिलं….पण नेमकं काय….ते कळतं नव्हतं.

तेवढ्यात त्याचा मोबाईल खणखणला.

“बोला बायको.”

“किती वाजता निघताय?”

“दुपारचं जेवण करून लागलीच.”

“अच्छा, भेटले का सगळे….”

“हम्म” सदा ‘खरचं सगळे भेटले का?’ या प्रश्नावर परत विचारत गुंगला.

तेवढ्यात एक चुणचुणीत मुलगी येऊन सदाच्या बाजुला बसली. सदाने त्या मुलीला जागा करून देत हलकासा बाजूला सरकला.

सदाने तिच्याकडे ओझरता कटाक्ष टाकला आणि परत आपल्या मोबाईलवर बोलायला लागला…. त्या मुलीकडे टाकलेली ती ओझरती नजर त्याला काहीतरी आठवून गेली आणि त्याने “तुला परत कॉल करतो.” म्हणत कॉल बंद केला.

दोन झुपकेदार वेण्या, डोक्यावर पांढरा हेअरबेल्ट, अंगात शाळेचा लाल-पांढऱ्या रंगाचा चेक्सचा फ्रॉक. तुकतुकीत कांती, रेखीव चेहरा, बाकदार नाक, सगळं काही एकदम तिच्या सारखं……हे कसं होऊ शकत……आणि त्याला जे अपूर्ण, अर्धवट राहिलं होतं त्याचं उत्तरं सापडलं……सदा शाळेच्या दिवसात हरवला.

माधवी जी सदाला शाळेत असतांना खूप मनापासून आवडायची. तिला बघण्यासाठी धडपडण, तिच्या एक भेटीसाठी दिवसभर झुरणं आणि ती दिसताच फुलून जाण एवढीच काय ती त्याचा आवडीची एक निरागस व्याख्या. माधवीलाही सदाचं आपल्या मागे झुरझुरणं माहित होतं पण दोघांचं त्या कोवळया वयातलं हे निर्व्याज, निरागस प्रेम एकमेकांसमोर अव्यक्तच राहिलं आणि सदाने पण तशी कधी हिंमतच केली नाही. ती आपल्याला नकार देईल, बोलणं बंद करेल किंवा रागवेल हा विचारच त्याच्या अल्लड मनाला कधी शिवला नाही. मुळात या आवडण्याला आकर्षण म्हणतात की प्रेम हेच मुळी सदाला कधी कळले नाही.

लग्नानंतर सदाला जेव्हा जेव्हा आपल्या मित्रांकडून पहिलं प्रेम हा विषय निघायचा त्यावेळेस त्याच्या डोळ्यासमोर फक्त माधावीचाच हसरा चेहरासमोर यायचा. आपल्या नकळत्या वयातल्या अल्लड प्रेमाची आठवण त्याच्या चेहेऱ्यावर एक मंदस्मित देऊन जातं. ‘त्यावेळेस प्रेम यालाच म्हणतात हे जरी उमजलं असत तर निदान तिच्यासमोर व्यक्त झालो असतो आणि मनात आज अव्यक्तपणाचं काही शल्य राहिलं नसतं ‘ असं त्याला राहून राहून वाटे.

आपल्या जवळची आणि आपल्याला नेहमी हवीहवीशी वाटणाऱ्या व्यक्तीला, आपल्या प्रेमाची ग्वाही द्यायची राहून जाणे यासारखी आपल्या जीवाला लागलेली ती खंत कोणती?…..

मंदिराची घंटा वाजली आणि सदा भानावर आला. ती मुलगी एका गुलाबसर कागदावर काहीतरी लिहीत होती. त्या मुलीला तिचे नावं विचारावं म्हणून सदा धडपडू लागला. ती तिच्या लिहिण्यात गुंग होती. सदा तिच्याकडे निरखुन बघू लागला. ती लिहीत असलेल्या पेपरच्या खाली मोठया अक्षरात love u Mamma लिहलं. सदाने तेवढंच काय ते बघितलं आणि शेवटी त्याला बोलायला विषय सापडला.

“आईसाठी लिहतेय बेटा?”

तिने वर पाहिलं आणि होकारार्थी मान डोलावत, “हो आज व्हॅलेंटाईन डे ना काका.”

“अरे वाह, खूप गोड रे बाळा. काय नावं तुझं?”

“मयुरा रमेश काळे”

“आणि तू जिच्यासाठी पत्र लिहतेय त्या तुझ्या मम्माचं”

“माधवी काळे”

सदाच्या डोळ्यात एकदम चमक आली. त्याने जो निष्कर्ष काढला होता तो अगदी अचूक निघाला. त्याला खूप आनंद झाला. जुन्या भावना ओथंबून आल्या. इतक्या वर्षानंतर माधवी कशी आहे, ती काय करते, आता कशी दिसत असेल या विचारांचे त्याच्या मनात कुतूहल निर्माण झालं आणि त्याला माधावीला भेटायची तीव्र ओढ लागली.

“अरे तू माधावीची मुलगी, अरे वाह! वाटलंच मला. तुला सांगतो तुझी मम्मा आणि मी वर्गमित्र तुमच्या भाषेत काय म्हणतात ते…. हां ….. क्लासमेट. अगदी तुझ्या सारखीच दिसायची तुझी मम्मा. आम्ही सगळे खूप मज्जा करायचो…..त्यांत तुझी मम्मा म्हणजे एकदम खोडकर….खूप खोड्या काढायची…..” सदा माधवीबद्दल अखंड बडबडत होता आणि मयुरा सदाच्या गप्पा मन लावुन ऐकत होती.

“…..पण स्वभावाने फार गोड मुलगी……….मला खूप आवडायची.” आठवणींच्या एका टप्प्यावर सदाच्या तोंडून अचानक मनातल्या भावना आपसूक बोलत्या झाल्या.

“मला…..म्हणजे सर्वांनाच आवडायची…..सगळ्यांना आपलसं करून टाकलं होतं तिने.” पण सदाने लगेच आपल्या मनाला आवर घातला आणि वाक्याला सावरल.

सदाचे डोळे जरासे पाणावले आणि आईच्या आठवणीत तल्लीन झालेल्या मयुराचाही एकाएकी भावनांचा बांध फुटला आणि तिला एकाएकी हमसून हमसून रडायला आलं.

“ये बाळा, बघ तू पण रडलीस ना, आमच्या आठवणी आहेतच गोड, तुला सांगतो मी पण या आठवणीत गुंगतो त्यावेळेस हळूच एकटा गच्चीवर जातो आणि खूप रडून घेतो. छान वाटतं मोकळं होऊन. तुही माधवीसारखीच हळवी बघ. असो, चल आता शांत हो आणि मला तुझ्या मम्माकडे घेऊन चल. मला खूप आनंद होईल तिला बघून.”

सदाचे ते बोल ऐकून मयुरा अजूनच हुंदके देऊन मोठमोठ्याने रडू लागली. सदा आता कळेना की नेमकं काय झालंय. तो मयुराला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला.

“हे घ्या काका.” मयुराने डोळे पुसत आपल्या आईसाठी लिहलेली चिठ्ठी सदाच्या हातात दिली.

“अगं हे काय करतेस बेटा, ही चिठ्ठी तू तुझ्या मम्मासाठी लिहलीस ना, मग मला का देतेस” सदा आवाक होऊन मयुराकडे बघत राहिला.

“काका, हा बाप्पा गोड माणसांना इतक्यालवकर आपल्याकडे का बोलवुन घेतो. ती पाच वर्षांपूर्वीच एका जिवघेण्या आजारामुळे आम्हाला सर्वांना सोडून बाप्पाच्या घरी गेली. जर मम्मा आपल्यात असती तर मी तुम्हाला नक्की नेलं असतं.”

सदा सुन्न झाला. त्या लहानग्या जीवाच्या तोंडून ते बोल ऐकून तो भांबावून गेला आणि त्याच्या डोळ्यातून नकळत पाणी वाहू लागले.

“पण ही चिठ्ठी मला?” स्वतःला सावरत कापऱ्यात स्वरात विचारलं.

“काका….जाते वेळी मम्माने मला सांगितलं होतं की मला जेव्हा तिची आठवण येईल तेंव्हा या देवळात येत जा ती नक्की भेटनार. आज तुम्ही मला माझ्या मम्माकडे घेऊन गेलात. क्षणभर मी मम्माच्या बालपणात बागडले, काही क्षणांसाठी असं वाटलं मम्माचं तिचं बालपण माझ्याशी शेअर करतेय की काय. आज मम्मा मला तुमच्या रुपात भेटलीही आणि माझं लेटरही तिच्याकडे पोहचलं. Thank you काका तुमच्या गोड आडवणींमुळे मी मम्माला परत जवळून भेटू शकले, खूप खूप आनंद झाला. I Love you Mamma” भारावलेल्या अवस्थेत मयुराने सदाला घट्ट मिठी मारली. त्या हळव्याक्षणी सदाने पण तिला आपल्या मायेच्या कुशीत कवटाळले आणि तिच्या कपाळी आपल्या अश्रूंनी भिजलेल्या ओठांनी एक गोड पापा घेतला.

एखादी अतिप्रिय व्यक्ती आपल्यातून जाऊनही आपल्या आठवणीत, विचारत, आचरणात अश्या कोणत्या ना कोणत्या स्वरुपात जिवंत राहतेच.

सदा माधवीच्या रुपात मयुराला पाहत होता आणि इकडे मयुराने सदाच्या रुपात आपल्या आईला….. माधवीला घट्ट कवटाळले होते. बोचऱ्या आठविणींचा तो विलक्षण हळवा क्षण दोघांना आपल्या आवडत्या आणि अतिप्रिय व्यक्तीचं एक सुखान्त मनोमिलन करून गेला.

समाप्त

जिते रहो……सदा दिल की कहो.

मंगेश उषाकिरण अंबेकर

९८२३९६३७९९

फोटो सौजन्य: गुगलबुवा

mangeshambekar.blogspot.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.