PAIN ऑफ पेन

बॉसच्या केबिनमध्ये फाईलांची जोरदार आदळआपट चालू होती. “यु आर अबसुलटली नॉट ऐट ऑल सिरियस अबाऊट युअर वर्क!!!!! आजपण लेट???? काय चाललंय काय तुझं????? काय आज काय नवीन कारण????” हे बोलतांना लालेलाल झालेले डोळे, चेहऱ्यावर मला खाऊ का गिळूचे पाशवी भाव आणि मनात ‘आज कसा गावला लेका’ असा आसुरी आनंद बॉसच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता. या अतीव आनंदच कारणं म्हणजे ‘मी’, जो दुसऱ्या दिवशीही ऑफिसला उशिरा येऊन बॉस समोर पडलेल्या मस्टरवर सही करण्यासाठी अगदी निरागसपणे (खरतरं निर्लज्जपणे) बॉसलाच पेन मागत होतो.

“असुदे आता प्रेसेंटी लावायची गरज नाहीए, मी पहिलेच तुझ्या रकाण्यावर लाल ठळक अक्षरात शेरा मारालाय” असं चिडून ओरडत बॉसने रागाच्याभरात चुकून मला देण्यासाठी काढले पेन परत खिश्यात ठेवले.

“तुझं जर असचं चालू राहिलं तर आय ह्याव टू टेक डिसिजन” या पेटंट वाक्यांची कुऱ्हाड कानी पडायच्या आत मी बॉसला जगातला सर्वात सुंदर असा एक शब्द चिपकवुन निर्लज्जपणे “सॉरी” म्हणत कॅबिनच्या बाहेर पडलो.

“गप-गुमान खाली मुंडी, गाढवच लागता साहेबांच्या तोंडी.” असं मानणारा गरीब नोकरदार मी, बॉसला पुढे अजून काही समजावून सांगण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हतोच. तसाच कॅबिनच्या बाहेर पडलो. बॉसला, नोकरीला आणि उरलं-सुरलं नशिबाला चार-पाच शिव्या हसाडत थेट स्वतःच्या क्युबिकल मध्ये जावून बसलो. याखेरीज माझ्यासारखा एक सामान्य माणूस अजून काही वेगळं करु शकतही नाही आणि जो करतो तो सामान्य नाही.

ऑफिसातले अगदी खास असणारे मित्र कधीच कोणत्या कामाच्या वेळी जवळ येऊ ना येऊ पण बॉसच्या चार शिव्या खाल्लेल्याकडे पहिले पोहचतात. बॉसच्या त्या गरमागरम तव्यावर खरपूस शेकलेल्या अशा चपातीचा आस्वाद घेण्यासाठी, स्वतःच्या चोमड्या सांत्वनरुपी लोणच्यासोबत आपल्यासमोर येऊन उभी ठाकतात. यातच अशा नारदांना खरा आनंद, बाकी काम-बीम गेलं फाट्यावर. तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला यांच्या मुखी सतत फक्त “नाsssरायण” “नाsssरायण”च्या ऐवजी “बॉसायन” “बॉसायन” ऐकू येईल.

“काय रे काय झालं, आज परत खिरापत का?” एका नारदाने माझ्या खांद्यावर हाथ ठेवत मला विचारले. अशा परिस्थितीत नारदाच खांद्यावर हाथ ठेवणें म्हणजे नुकत्याच खरचटल्या जखमेवर लगेच डेटॉल ओतण्यासारखं.

“काय करू आता, बॉसला खरं सांगूनसुध्दा विश्वास बसत नाही, अरे परवा ओपन-डे म्हणून मी फुल-डे सुट्टी टाकली होती आणि आज मुलीच्या शाळेत गोवर-रुबेलाची लसीकरण मोहीम होती म्हणून उशीर “

“पण मी काय म्हणतो लसीकरणला कुठे एवढा वेळ लागतो मी पण तर आज सकाळीच गेलो होतो मुलाच्या शाळेत.” स्वतःच्या मुलांच्या शाळेची कधी पायरीही न चढलेला हा नारद, घुशीसारखा जमीन पोखरून अजून खोलात शिरू पाहत होता. खरतरं याची बायको सगळं “चूल, मूल आणि स्कुल” सांभाळते म्हणून याचं धकत. नाहीतर तुम्ही जर याला विचारलं की तुमचा मुलगा कितवीत आहे तर तेही हा एका झटक्यात सांगू नाही शकणार असा हा कामचुकार, अजाणता बाप.

“अरे काय सांगु आजचा दिवसच खराब……या कर्तव्यदक्ष बापाला काल कळलं की, आज लसीकरण आहे म्हणून मी सकाळी सकाळी आठ वाजताच शाळेत पोहचलो, सर्व मुलांचे आई-वडील आलेले, खास करून आयाचं जास्त, वडील बिचारे जेमतेमकरून तीन-चारच असतील…..ते पण आपल्या सारखेच होमलोनकरी असणार. बर पुढे साडेआठच्या सुमारास लसीकरण पण झालं. वाटलं चला आता मुलीला घरी सोडून साडेनऊला आरामशीर ऑफिसात पोहचूया, पण कसलं काय शेवटी दिडतास उशीर झालाच”

“मग एव्हढा उशिरा यायचं कारण काय, घरी काही प्रॉब्लेम तर नाही ना” नारदाच्या या प्रश्नामुळे तुम्हाला कदाचित वाटत असेल बघा किती आपुलकी या मित्रांना आणि मी त्यांना उगाच नारद म्हणतो, पण या नारदाला गळाला लागलेल्या माश्यासोबत गळाला लावलेला शिदोड सुध्दा हवा होता. त्याच्या डोक्यातला नेहमीचा शिदोड म्हणजे “हा कुठल्यातरी कपंनीच्या ईंटरविवलाच गेला असणार”

असो…पण मी आज त्याची उत्कंठा फार शिगेला न पोहचवता आणि माझी खरी कथा बॉसपर्यंत पोहचण्याच्या गोड गैरसमजाला भुलून, माझी आपबिती त्याला एकदाची सांगायला सुरवात केली.

“अरे लसीकरण झाल्यावर क्लास टीचरने क्लासमध्ये बसायच सांगितल. पाच-दहा मिनिटांनी टीचर आल्या आणि हातात एक कागद टेकवून तो रिकाम्या जागा भरायच्या सांगितल्या. अर्थात लेडीजफर्स्ट म्हणत सर्वप्रथम महिलावर्ग कागद घेण्यासाठी पुढे गेला आणि त्यानंतर आम्हा उरलेल्या दोन-चार पुरुषांना पुढे जाण्याची मुभा मिळाली.

माझ्या हाती कागद पडणार तेवढ्यात एका ताईने माझ्याकडे पेन मागितले. सवयीप्रमाणे स्वतःच स्त्रीदाक्षिण्य जपत मीही ते कुठलाच विचार न करता निमिषार्धात देऊन टाकले आणि माझा कागद घेण्यास पुढे गेलो.

कागद घेतल्यावर पेन परत घेण्यासाठी त्या ताईंपाशी गेलो. तर ताई घोळक्यात दिसेनाशा झाल्या. पाच-सहा बायका त्यांच्यापाशी जमल्या होत्या. त्यांचा एकोपा बघून हेवा वाटला. मनात विचार आला कि आपण पुरुष मंडळी एकमेकांशी कशे तुटके-तुटके, एकलकोंड्या सारखे वावरतो आणि त्याउलट स्त्रिया बघा सर्व गोष्टी कश्या एकमेकींशी मिळुनमिसळून एकीने प्रश्न सोडवतात.

थोड्यावेळाने त्यांच्या गोटात काही क्षणासाठी किलबिलाट सुरु झाला, कसलीतरी ओढ-ताण होतांना दिसली म्हणून उत्सुकतेपोटी त्यांच्या जवळ जाऊन पाहिलं आणि तेव्हा कळलं की, मी गृहीत धरलेला तो एकोपा प्रश्नांच्या हितगुजीसाठी नसून, तो मी दिलेल्या एकुलत्या एक पेनसाठी एक अभ्यद्य घेरावं होता.

त्यांच्या हातात लटकलेल्या सुंदर सुंदर हॅन्डबॅग बघून मला पहिले त्या बॅगेची आणि नंतर पेनची कीव आली. त्यादिवशी कळलं कि, बायकांच्या भल्यामोठ्या हॅन्डबॅगमध्ये लिपस्टिक, नेलपेंट, पावडर, फेसवाश, कंगवे, आरसा, जुन्या पिना, रबर, सुई धागा ई…… (थांबलेलं बर नाहीतर ही यादी नाही संपणार आणि हो ही यादी माझ्या ‘अगं’ ची पर्स ढवळून लिहली आहे, उगाच मनात नको ते विचार न आलेले बरे) असं सर्व काही सापडेल. थोडक्यात सांगायचं म्हणजे एकवेळस यांच्या बॅगेत ब्रह्मांडतल्या सर्व वस्तु मिळतील पण एक साधा पेन नाही मिळणार याचा प्रत्येय आज मला आला. त्या बिचाऱ्या पेनाच्या वाट्याला आलेली केवढी मोठी ही शोकांतिका.

उपस्थित असलेल्या लेडीज पैकी फक्त एक-दोन अपवाद सापडल्या, ज्यांच्याकडे त्यांच्या बालवाडीतल्या खोडसर पाल्यामुळे चुकून पेन होते. बर ही परिस्थिती फक्त हाऊसवाईफची असते तर कळू शकत पण सो कॉल्ड वर्किंगवुमन सुद्धा याला अपवाद नव्हत्या….

बाकीचे सर्व पेनवाले दोन-तीन हुशार पुरुषमंडळी (हुशारांमध्ये आजदेखील माझा नंबर येतायेता राहिला) ज्यांनी वर्गातला गोंधळ पाहून गुपचूप आपापला कागद घेऊन चोरांसारखा स्वतःचाच पेन लपवत लपवत गुपचूप बाहेर पडले.

आता तर माझ्याकडे काही पर्याय उरला नव्हता, पोपटात जीव अडकलेला राक्षसा सारखा मी त्या घोळक्यात माझा जीव सापडत होतो आणि हा राक्षस जेव्हा जेव्हा त्या पोपटाला पकडायला जात तेव्हा तेव्हा तो पोपट एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडावल्या जात होता. पण यापेक्षा माझ्या सारख्या भोळ्याभाबड्या राक्षशाला खरी चिंता होती ती ऑफिसात टक लावून वाट पहात बसलेल्या भाबड्या बॉसची. माझं लक्ष सतत पेन आणि घड्याळाकडे.

एक ताई प्रश्नपत्रिका जशी सोडवावी तसा तो कागद निरखून पाहात होत्या. त्यांचा चेहरा एकदम धीरगंभीर झालेला जसा की यातील कोणत्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत नाही आणि आता आपण नक्की फेल होणार. कदाचित लहानपणी सुध्दा प्रश्नपत्रिका एवढी नीट वाचली नसलं ते आज होतांना दिसत होत.

इकडे माझ्या डोक्यात आज बॉसकडून होणाऱ्या सम्मानपूर्वक आदरतिथ्याची कल्पना आतून भयभीत करून जात होती. सहसा माझ्यासारख्या सर्वसाधारण होमलोनधारकांसोबत असंच होतं. तरी मी अश्या गोष्टींना आतून कितीही घाबरत असलो तरी, बाहेरून भीकसुध्दा घालत नाही म्हणून बरं.

अर्धा मिनिटात लिहून होणाऱ्या कागदासाठी त्या ताईंनी तब्बल दहा मिनिटे घेतली आणि एकदाची त्यांची सही ठोकली. माझा हाथ पेन घेण्यासाठी पुढे सरसावला तोवर बाजूला बसलेल्या त्यांच्या अजून एका मैत्रिणीने ताईंच्या बाजूने हात घालून त्या पेनावर कब्जा मिळवला. …सत्यानाश…..अजून वाट

“ओ ताई माझं पेन….” मी बोललो

“थांबा हो…किती वेळ पासून थांबली आहे मी..” त्या माझ्याकडे डोळे वटारून बोलत होत्या

“अहो, ऐका तर … माझं पेन.” मी बोलण्याचा परत प्रयन्त केला.

“थांबा हो…” त्या बाळासाहेबांसारखा हातवर करत बोलल्या.

माझं नेमकं असच होत ज्यावेळेस आवाज वाढायला हवा असतो नेमका त्याच वेळेस तो अचानक म्यूट होतो. पण नाही….. म्हणलं ह्यावेळेस सायलेंट मोडवर नाही राहायचं, भले समोर कोणी असो.

“अहो ते माझच पेन आहे” शेवटी धाडसाने बोललो.

“हो का!…..अहो मी कुठे घेऊन चाललीय, थांबा की थोडं”

त्यांच्या या बोलण्यावर . शेवटी मी हताश होऊन पेनाची अपेक्षा सोडली आणि दुसऱ्या पेनाच्या शोधात क्लास बाहेर पडलो.

कोणाला दया येवो ना येवो कदाचित देवाला माझी दया आली, आणि तेवढ्यात समोरून माझा एक ओळखीतला मित्र पेना सगट धावून येतांना दिसला. हिरमुसलेल्या पिल्लाला मालक दिसताच जसा आनंद होतो तसंच काहीतरी मला पेन बघितल्यावर झालं आणि मी ही पिल्लाप्रमाणेच पण जिभे ऐवजी हाथ पुढे करत त्याकडे तसाच झेपावलो. त्याला वाटलं मी त्याची गळाभेट घ्यायला आलो आहे म्हणून त्यानेही आपले दोन्ही हाथ पुढे केले. पण मी निर्लज्जपणे ते पुढे सरसावलेले हाथ झिडकारून त्याच्या खिशातलं पेन हिसकवलं.

शेवटी माझं पेन परत मिळण्याच्या आशेला स्वतःच्या हाताने मुखाग्नी दिली आणि कागद परत करून मुलीचा हात पकडून झरझर बाहेर निघालो. बाहेर पडता पडता माझ्या पेनकडे एक शेवटचा कटाक्ष टाकावं म्हणून परत माघारी नजर फिरवली तर ते बिचारं अजूनही त्या गराड्यातच अडकलेलं, बायकांच्या ज्वलंत विचारांच्या आगीत होरपोळुन होरपोळुन जळत होतं.”

एवढा इतिवृतांत नारदापुढे मांडल्यावर नारद माझ्या शोकांतिकेवर हसून हसून बेजार झाला आणि त्या नालायकाचा हसण्याचा आवाज ऐकून बॉस बाहेर येऊन माझ्याकडे तिरस्काराचा भेदक कटाक्ष टाकतं, ऑफिसबॉयला मला तात्काळ आत धडण्याचा फर्मान सोडून गेला.

            -----------------__________----------------

ता.क. :- पेनची एक पैनफुल विनंती:

पेन हे पुलिंगी आहे, का स्त्रीलिंगी, का नपुंसकलिंगी याचा सारासार विचार न करता आपापल्या भागात पेन ज्या प्रकारात मोडत असेल त्या प्रकारात मोडून वाचावे. पेन वरून उगाच पेनफ्रेंड्समध्ये वाद नको.

जिते रहो…..सदा पैनलेस रहो.

©मंगेश उषाकिरण अंबेकर

९८२३९६३७९९

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.