ऋणानुबंध – भाग-सहावा
दुसऱ्या दिवशी सकाळी मधुरा आणि सोहम नाष्ट्याच्या टेबलावर दामलेंची वाट बघत होते. सोहम घरात चाललेल्या सर्व घडामोडीतुन अनभिज्ञ आपआपल्या दिनचर्येत मशगुल होता.
प्रत्येक दुखण्याला गोळी असते पण मनाच्या बैचैनीला कोणतीच गोळी असर नाही करत. झोपेची गोळी घेऊन झोपलेले दामलें उलट नेहमीपेक्षा आधिच उठले आणि तय्यार होऊन खोलीतच पुस्तक घेऊन उगाच पान चाळत बसले होते. खरतरं त्यांना सोहम समोर यायचं धाडस होत नव्हतं आणि तशी त्यांची इच्छाही नव्हती. मधुराने तीन चारदा आवाज दिल्यानंतर शेवटी दामलें डायनींग टेबला जवळ आले.
“बर नाय वाट्टे का, डोळे यवडे लाल का दिसता, रात्री झोप नाय झाली का?” सोहमने दामलेंची काळजीपूर्वक विचारपुस केली. त्यांचा असा विसकटलेला अवतार पाहवेना.
“चला आपण डॉक्टराकडे जाऊ, बर नाय वाटत मला तुमाला असं बघून” सोहमची चिंतातुर होऊन त्यांना विचारू लागला.
“नाही नाही मी बरा आहे, फक्त थोडं जागरण जास्त झालं रात्री.” दामले हलक्या आवाजात पुटपुटले. आता दामल्यांचा उतरलेला आवाज ऐकून मधुरालाही चिंतीत झाली. तिने त्यांच्यापाशी जाऊन पाटीवर हाथ ठेवला.
“बर आहे ना सगळं” मधुराने विचारले.
“हो, गं मी अगदी बरा आहे, कादंबरी वाचता वाचता त्यात फार गुंतत गेलो आणि कळलंच नाही इतका उशीर कसा झाला.” दामलेंनी थोडा नाटकी आवाज वाढवतं पटवून देण्याचा प्रयन्त केला.
‘हवं तर सुट्टी घे आज.” मधुराने दामलेंना विनवणी केली, पण आज परत दिवसभर मधुराच्या समोर बसून तिचे प्रश्न झेलण्यात त्यांना अजिबात स्वारस्व नव्हतं.
“नाही नाही मी एकदम ठीक आहे, आणि आज कॉलेजात प्रॅक्टिकल्स पण आहेत त्यामुळे मला जावचं लागेल.” दामलेंनी लागलीच नकार देत सुट्टीचा विचार खोडला.
दामले कॉलेजात गेले परंतु त्यांच मन आज कुठ्ल्याच गोष्टीत लागेना. एकदम बोलका चेहरा एकाएकी शांत झाला कि सगळ्यांचं त्याच कोडं पडायला लागतं.
दामले रात्रीच्या धक्क्यातून आता थोडे फार तरी सावरले होते. त्यांना रात्री घेरलेल्या नकारात्मक प्रश्नांची उत्तरे शोधू लागले. आज दामल्यांच्या वास्तविक बुद्धिजीवी डोक्यासमोर त्यांच्याच सकारात्मक, समंजस आणि हळव्या मनाने उभं ठाकल होतं.
दामल्यांच मधुरावर असलेलं जिवापाड प्रेम त्यांच्या मेंदूला समजूत घालत होतं. “मधुराला काही चुकीचंच करायचं असत तर तिला मला विचारायची गरज तरी काय होती ? तिने मला ना विचारता काहीही केलं असत तर कुठे कोणाला कळलं असतं ? पण नाही तिने मला विचारल कारण तिला माझा विश्वासघात करायचा नव्हता, आणि तिचा हेतू फक्त मुलप्राप्तीसाठी आहे बाकी त्यादोघांत तरी तसलं काही नाही आणि शेवटी मुल कोणाला नको, आपल्यालाही तर बाळ हवंच आहे आणि तिच्या निर्णयात आपलाही पूर्ण सहमत असण यात चूक काय. शेवटी नात्यात समर्पण असल्याशिवाय आपलं नातं कस टिकणार. नशीब निदान आपण जो गैरसमज केला होता तस तरी दोघात काही नाहीय. मधूला माझ्यावर प्रेमच नसतं तर तिने माझ्या नकळत काही करू शकली असती.” ह्या सगळ्या विस्कटलेल्या प्रश्नांच्या जुळवलेल्या उत्तरात दामल्यांना पडलेला पहिला संदेह मिटला होता. परंतु आपलं प्रेम दुसऱ्या सोबत असं वाटणं, हे मनाची कितीही समजुत घातली तरी हे दामल्यांना न पटणारच होत.
संध्याकाळी दामले सोहमपेक्षा थोडे उशिराच घरी आले. मधुरा बऱ्याच वेळा पासून त्यांची वाट पाहत दारातच उभी होती. दामले आल्याचे पाहून ती लागलीच किचनकडे वळली. चहा घेऊन लागलीच दामल्यांसमोर उपस्थित झाली. दामल्यांचा पडलेला चेहेरा, थकलेलं शरीर, विस्कटलेला अवतार याची मधुरा अजिबात भ्रांत राहिलेली नव्हती. तिच्या मनात चाललेली हुरहूर आज कधी एकदाची संपवते फक्त ह्याच प्रतीक्षेत मधुरा होती.
“आपण आज रात्रीच जेवण उरकल्यावर त्याच्याशी बोलून बघुयात का? तु समजावून सांगणार का त्याला?” मधुराने दामल्यांसमोर हळूच प्रश्न टाकला.
“मीSSSSSS मी नाही बोलू शकणार त्याच्याशी हे सगळं. तुच बोल, मला नाही जमणार.” दामल्यांनी क्षणाचाही विलंब न करता लागलीच अंगावरचा नकोसा भार लागलेच झटकला.
“ठीक आहे मी बोलते, फक्त जेवण झाल्यावर त्याला आपल्या खोलीत पाठवून तर देशील” मधुरा बोलली.
दामले निशब्द झाले. त्यांना स्वतःला कळेना कि मीच माझा बिछाना दुसऱ्यासाठी कसा सजवायचा. काय वेंधळेपणा चालवलेला हिने, कस सांगू हिला कि बाळाच्या हव्यासापोटी ती कोणत्या थराला जाऊन पोहचली आहे. दामले अंगात त्राणच नाही राहिले. त्यांनी मधुरा कडे एक कटाक्ष टाकला आपली मान वर खाली केली आणि बाहेर जाऊन वरांड्यातील झोपाळ्यावर जाऊन बसले.
रात्रीच्या जेवणाच्या वेळी तिघे जवायला बसले, सोहम आपलं नेहमी प्रमाणे मधुराशी चेष्टा-मस्करीचा स्वर चालू होता.
“अरे वाहSSSS ! आजतर माझा बड्डेही नाय तरी आज पुरणपोळीचा बेत, क्या बात क्या है, आज कुणाचा बड्डे म्हणाचा.” सोहम मधुराकडे बघून बोलला.
“का? सहजच नाही करू शकत कधी हा बेत? कोणाचा वाढदिवसाचं असायला हवा का?” मधुरा हसत बोलली.
“नाय तस नाय बुवा, मी तर मनतो रोजच करा.” सोहम बोलला.
“हो रे बोक्या, मांजरीला दुध आणि तुला पुरण ! रोज दिल तरी मन भरणार नाही.” मधुरा म्हणाली. दामलेंच्या चेहऱ्यावर निर्विकार भाव होते.
“इक वेळेस ह्यांच्या चेऱ्याकडे बगुन नाय, पण तुमच्या चेऱ्याकडे बगुन काय तरी स्पेशल आय हे पक्क.”
मधुरा शेवटी दामलेंकडे बघत सोहमला म्हणाली, “अरे बराच मनकवडा आहेस रे बाबा तू……सांगते सांगते…..अरे काही विशेष नाही आज फक्त आमच्या लग्नाचा वाढदिवस. त्यामुळे थोडं स्पेशल केल एवढंच.”
दामले अक्षरशः जागचे उडाले. त्यांच्या डोक्यात रात्रीपासून चाललेल्या गोंधळात ते चक्क आपला लग्नाचा वाढदिवस विसरले होते. गेल्या पंधरा वर्षात दामले पहिल्यांदा विसर पडला होता.
क्रमशः
मंगेश उषाकिरण अंबेकर