ऋणानुबंध (भाग-पाचवा)

गेल्या पंधरा वर्षांपासून मधुरा आणि दामलेंनी बाळ होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयन्त केले होते. सगळे तेत्तीसकोटी देवीदेवता, साधू, महाराज, हकीम, बुवाबाबाजी सगळे करून सरले होते पण कोणाचाच गुण आला नाही. शेवटी काही वर्षपूर्वी एका डॉक्टरांनी निर्वाळा दिला होता की दामलेंत असलेल्या कमतरतेमुळे ते कधी मूल देऊ शकत नाही. ह्या निर्वाळ्याने मधुरा काहीवर्षं पार खचून गेली होती. तरी सुद्धा तिची आस कधीच कमी झाली नव्हती. आता चाळीशीच्या उबंरठ्यावर असणाऱ्या मधुराला अजूनही फार फार आस होती. दामलेंनी हा विषय मनातून काढून टाकण्याचा बराच प्रयत्न केला होता परंतु मधुराच्या बाळाबद्दलच्या उत्कट इच्छा बघून त्यांना नेहमी हरल्या सारखे वाटायचे. दामलेंना आपल्यातील कमतरते मुळे मधुराला झालेलं दुःख फारच जिव्हारी लागायचं. मधुरालाही मनाच्या खोल कोपऱ्यात कुठतरी खंत होतीच की शारीरिक दृष्ट्या सक्षम असूनही ती बाळाला जन्म देऊ शकत नाही. दोघांनी दत्तक मुल घेण्याबद्दलही बराच विचार केला पण उद्या कोणी ते मुल माझं आहे म्हणुन घ्यायला आलं तर काय करणार? या अति नाहक विचारणे तो पर्यायही सोडला.

तस दामलेंना पण फार उत्कट इच्छा होती, त्यांनाही खुप वाटे की आपल्याला एक मुल असावं परंतु मधुरापुढे त्यांनी आपल्या भावना नेहमी दाबून ठेवल्या. दोघात वाढते वाद आणि विसंवाद बघून शेवटी दामलेंनी मधुरा व्यवस्थित समजावून सांगितलं आणि हा विषय या पुढे आपल्या घरात नको म्हणून वचन घेतलं. तरी मधुरा दामल्यांना लपून-छपून , खोटंनाटं सांगून आपले उपास तपास , व्रतवैकल्य, पोथीपुराण करायचीच आणि आता तर सोहममुळे राहिलेल्या इच्छा परत बळावल्या होत्या.

जवळपास सात-आठ महिने उलटून गेले होते. घरात बरेचसे बदल झाले होते. आता सोहम नोकरीत चांगला रुळला होता. नोकरी लागल्यापासून आता दुपारच्या जेवणालाही सोहम रविवार शिवाय घरी नसायचाच. संध्याकाळी दामलें घरी आले की त्याला खाली जेवायला आणि गप्पा मारायला बोलवून घ्यायचे. सोहम आणि मधुराची चांगली गट्टी जमली होती. तसे दामले पण सोहममध्ये बऱ्यापैकी रुळले होते. एकवेळेस दामलेंच्या नाष्ट्याचा, दुपारचा डब्बाचा, रात्रीच जेवणाचा थोडा उशीर झाला तरी चालेल पण सोहमला काही कमी पडायला नको, अर्थात दामलें पेक्षा तिला सोहमची काळजी जास्त घेतल्या जात होती. थोडक्यात सांगायचं झालं तर मधुराच्या जीवनात आता दामल्यांन ऐवजी सोहमने घर केलं होतं. ती कळत नकळत सोहमच्या मोहात पडली होती.

दोघांमधली जवळीक दामल्यांना थोडी खटकत होती. आपल्या पत्नीत झालेला स्वभाव बदल आता हळूहळू जाणवू लागला होता. भलते सलते विचार दामल्यांना येतं पण ते कधी चेहऱ्यावर उमटू नाही देत. कारण त्यांना पूर्ण कल्पना होती की मधुरा कधी माप ओलांडणार नाही आणि सोहमही स्वभावाने सभ्य आहे. तिच सोहम मध्ये इतकं गुंतणं त्यांना खटकत होत, शेवटी पुरुषाचं संशयी मन जे सगळ्यात वाईट. तसे दामले मधुराला आणि तिच्या प्रेमाला पुरते ओळखून होते आणि आपल्या मनातलं असं काही उघडपणे बोलण्याची हिम्मत करू शकत नव्हते. दामलेंना मुळात जाणीव होती कि, ‘आपल्याला जो भास होतोय तसं काही नसणारचं आणि तसं काहीच नाहीए तर उगाच बोलून का दुखवायचं. त्यापेक्षा आपल्या विचारांना विराम द्यावा हेच बरोबर.’ परंतु इकडे मधुरालाही दामल्यांना सोहम बद्दल काहीतरी सांगायचं होतं, पण तीचीही हिम्मतच होत नव्हती. दोघांच्या मनात चाललेली कालवाकालव बेचैन करून जात होती दोघांना, पण काहीकेल्या कोंडी मात्र फुटत नव्हती.

एका रात्री, जेवण आटपून दोघंही झोपायला गेले. मनात चाललेल्या विचारांचे गोंधळाने दोघांचाही झोपा उडाल्या होत्या. दामले बिछान्यावर डोळ्या समोर पुस्तक धरून आडवे झाले होते, पण त्यारात्री त्यांचं वाचनात अजिबात लक्ष नव्हतं. मधुरा घरातलं सर्व काम आटपून दामल्यांच्या बाजूला पाठमोरी करून बसली. स्वतःच्या केसांना हलक्या हातांनी सावरत विचारांचा गुंता सोडवायचा प्रयत्न चालू होता. परंतु अजूनच गुंता वाढत चालला होता. मधुराने शेवटी सर्व दम एकवटून दामलेंनां विचारलंच. “तुला सोहम बद्दल नेमकं काय वाटत? “

दामले थोडे बिचकले हातातलं पुस्तक खाली ठेवलं “काय वाटत म्हणजे, तो गुणी आणि होतकरू मुलगा आहे.” नेमकं मधुराला काय अपेक्षित आहे ते त्यांना काही कळेना.

“नाही म्हणजे मला नेमकं जे वाटतंय तेच तुलाही वाटतंय ना, खरंतर स्पष्ट बोलायचं झालतर माझ्या मुला बद्दलच्या इच्छा अजूनही निवळल्या नाहीत. ” मधुराने जणू काही आज सर्व बोलायचा प्रणच केला होता.

“आपण त्याला विचारलं तर तो नाही म्हणणार नाही आपल्याला, उलटं त्याला आनंदच मिळेल यातून.” मधुरा सगळ्या गोष्टी ठरवूनच आली होती आज.

दामले आता एकदम गार पडले. नेमकं त्यांना ज्याची भीती होती तेच घडत होतं. त्यांना वाटू लागलं कि, सोहमकडून मधुराला बाळाची आस धरतेय. पण हे कितपत योग्य आहे? आणि मधुरानेही हा विषय इतक्या सहज आपल्या समोर कसा मांडला? हे त्यांच्या काही पचनी पडेना. त्यांच्या समोर उभा राहिलेले प्रश्न फार विचित्र होते. खोलीत एकदम निरव शांतता पसरली. दामल्यांना पुढे काय बोलावं ते काही सुचेना. दोन-तीन मिनिटांची शांतता बघून आता मधुराला वाटू लागलं कि आपण परत हा विषय काढून काहीतरी मोठी घोडचूक तर नाही केलीय ना.

शेवटी मनाला आवर घालून दामले बोलले “आणि जर तो ह्या सर्व गोष्टीला नाही म्हणाला तर?” हा प्रश्न त्यांनी मधुराच्या मनाची नेमकी कुठवर तय्यारी आहे हे बघण्यासाठी केला.

दामलेंचा प्रश्न संपत नाही तीच मधुरा उत्तरली “मी त्याला आता पुरते ओळखु लागलीय, एक स्त्री म्हणून त्याच्या इच्छा मी सहज समजू शकते, मला नाही वाटत तो आपल्याला नाही म्हणेल.”

दामल्यांना आता पुरतं कळून चुकलं होतं कि मधुरा हट्टाला पेटली आहे आणि सर्वकाही ठरवून आलीय. शेवटी दामले एक दीर्घ श्वास घेतला आणि धीरगंभीर आवाजात बोलले “ओके, बघू झोप आता” अजून काही पुढे बोलण्याच्या आत त्यांनी त्या विषयाला तूर्तास बंद केले आणि परत आपले डोके पुस्तकात खुपसले.

मधुरा लवकर झोपी गेली, परंतु दामले मात्र ती रात्र विसरू शकत नव्हते, त्यांचे डोळे पाणावलेले होते. त्यांच्या डोक्यातल्या विचारांनी चक्रीवादळाचं स्वरूप धारण केलं होतं. प्रचंड तळमळ चालू होती त्यांच्या मनाची. त्यांना मधुराबद्दल प्रश्न पडत होते कि मुलंबाळं बद्दलची इच्छा अजूनही कशीकाय शमली नाहीय हिची? आपल्यातल्या नात्याचं काय? तिने इतक्या सहजतेने कसकाय प्रश्न केला ? तिला मला काय वाटेल याचं काहीच कसं वाटलं नाही? सर्व नाती खोटी, कोणीच कोणाच नसतं ? असे अनेक प्रश्न डोक्यात थैमान मांडत असतांना त्यांना झोप कशी येणार शेवटी उद्या पहाट न बघण्याची इच्छा उराशी घेऊन झोपेची गोळी घेतली आणि झोपले.

क्रमशः

मंगेश उषाकिरण अंबेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.