ऋणानुबंध (भाग-पहिला)

नव्वदच्या दशकातली एक कथा तुमच्या समोर सादर करत आहे. ही गोष्ट आहे एक प्रोफेसर, त्याची पत्नी आणि त्यांच्या जीवनात अचानक टपकलेल्या एका पेइंगगेस्टची. तिघांच्या मनातले विचार, प्रेम, समज आणि गैरसमज याची एक गुंफण आजपासून रोज एक-एक भाग आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय.

ऋणानुबंध

सोहम गेल्या चार तासापासून अनोळखी अशा शहरात गल्लोगल्ली पायपीट करत होता. आस होती ती की आजतरी आसरा भेटवा. तहानलेला सोहम, उकड्याने घामाघूम, बेजार होऊन आपलं बुड कुठे तरी टेकवण्यासठी जागा शोधत होता. अखेर त्याला एका आळीत पिंपळाच्या झाडाखाली पाणपोई दिसली. लाल सुती फडक्याने गुंडाळलेला काळा रांजण बघून तो थोडा का होईना पण थंडावला, भलं त्या पाणपोईवाल्याच.

हताश झालेला सोहम पाणी पिऊन पाणपोईच्या कठड्यावर बसला. रांजणाचा ओलावा घेण्यासाठी त्याचा हाथ नकळत त्या भिजलेल्या लाल कपड्याकडे सरसावला. पांढरी शुभ्र बंडी आणि पायजमा घातलेलं चाळिशीतील प्रोफेसर दामले आपल्या कंपाऊंडमध्ये कंबरेवर हाथ ठेवून बगळा आपल्या माश्याकडे टक लावून बघावं तसं सोहमकडे बऱ्याच वेळापासून एकटक पाहत होते. सोहमचा जसा स्पर्श झाला तसा त्याच्या अंगात एकदम गारवा संचारला पण तो गारवा रांजणाचा नसून दामले ओरडण्याचा होता. दामले त्याच्या अंगावर जोरात खेकसले. “ओ, हॅलो…. पाणी पिऊन झाल्यावर तो रांजण काय फोडायचा का आता, पंधरा दिवसा पूर्वीच एक माकडं पाणी ढोसून फोडून गेलाय, हा नवीन आणलाय आताच.”

सोहम ताडकन जागच्याजागीच उभारला, भर उन्हात दामल्यांनी सोहमला क्षणात गार करून टाकलं होतं. काय बोलावं ते कळेना, भांबावलेल्या अवस्थेत सोहम मिनटभरच्या स्तब्धते नंतर पुटपुटला. “म …. म …. माफ करा काका…. अवो माझा तसा काहीच मतलब नवता ओ, उलट खरंतर तुमचं धन्यवाद की उकड्यात तुमच्यामुळे तहान मिटतिया सर्वांची, लयभारी काम करताय बघा तुमि. माफ करा हा काका, येतो मी.” एवढं बोलून पुढे चालू लागला.

सोहमच असलं बोलणं आणि भाषा ऐकून दामले जागचे थांबले. तसे दामलें मुळात मृदू, बोलके आणि हळव्या स्वभावाचे. दामल्यांना वाटलं या बिचाऱ्याला थोडं जास्तच बोललो. ते थोडेसे भावुक झाले आणि होणार पण का नाही, एकतर सोहमच बोलणं आणि दुसरं म्हणजे गेल्या पाच वर्षापासून ते न चूकता दर उन्हाळ्यात पाणपोई लावत होते पण कधी कोणी त्यांच्या उपक्रमाला साधं “वाह!” म्हणून कौतुकही केलं नव्हतं. पण या मुलाने त्यांचं छटाकभर केलेलं गुणगानही त्यांच मन गदगदीत करून गेलं, मग तर त्याला ते असंच कसं सोडणार.

“ओ, हॅलो….ऐका” अजून काही बोलण्याच्या आत सोहमला तसाच पुढे चालू लागला. त्याला वाटलं हा बुवा आता काय पंधरा दिवसापूर्वी दुसऱ्याकडून फुटलेल्या रांजनाचे पैसे आपल्याकडे मागतोय की काय? पण दामल्यांच्या दोन-तीन “ओ, हॅलो” ला शेवटी कंटाळुन मागे वळून म्हणाला, “हॅलो काका!अवो माझं नाव सोहम अय ओ .” “अच्छा सोहम काय, अरे माझं तरी नाव कुठे ‘हॅलो काका’ आहे, मी दामले, वसंत सदाशिव दामले” पाचकळ विनोद मारून दामल्यांनी सोहमला कसतरी बोलतं करण्याचा प्रयत्न केला. दामले हे आपुलकीचे आणि बोलण्याचे भुकेले.

“तु काही शोधताय का ह्या आळीत?” दामल्यांनी विचारलं.

“अSSSSS अळी SSSS कुठंय अळी, मला कशी नाही दिसली.” सोहम अंग चाचपडत बोलला.

“अरे आळी म्हणजे ती झाडावरची अळी नाही रे बाबा, हि आळी ” एक हात डोक्याला आणि दुसरा हात रस्त्याकडे दाखवत दामले ओरडले.

सोहम हसत हसत म्हणाला, “अररSरSर र र गल्ली मना कि मंग”

“अवोSS काका मी भाड्याची रूम शोधतोय, हाय का इकडं कुटं?” सोहमने मोठया अपेक्षेने त्यांना विचारलं.

दामले त्याच असलं बोलणं ऐकून त्याच्याकडे डोळे वटारून बघू लागले, त्यांच्या अचानक पाराच चढला “अरे काय बोलतोय काय हे? हे काय बोलणं झालं? मोठ्यांशी कस बोलतात, काही शिकवलं नाही का कोणी?”

सोहम परत घाबरला त्याला काही कळेना कि आता काय चुकलं आपल, ” काय झालं काका तुमाला यवड चिडायला, काय चुकलं बिकल का?”

सोहमच असलं बोलणं ऐकून तर दामल्यांना अजून राग भरला, “अरे चुकलं बिकल काय विचारतोय, हि काय पद्धत झाली, कोण हा भाड्या? कोणाबद्दल अशी विचारपूस करता का? आणि तुझ्या भाडयाला आम्ही कस ओळखणार?”

सोहम आता पुरात कळून चुकलं कि काका का चिडले, त्याने क्षणाचाही विलंब ना करता दामल्यांना थांबवत, “अररSररSरSSर तस नाय ओ काका तुमाला कई यगळंच वाटलं, मी मनलो कि एखादी रूम आहे का भाड्याने रायला इत…. खोली आय का इकड कूट?, असं विचारायचं होत.”

दामले शांत झाले, “अरेच्चा…. असं हो, अरे मग असं विचारतात का? मला काही वेगळच वाटलं ना. कशी भाषा वापरतोस, बर ते असो कुठला तू ? मराठवाड्याचा दिसतोय” दामल्यांची हि एक विशिष्ठ सवय आपणच प्रश्न करायचे आणि लागलीच आपणच उत्तर द्याच.

सोहम डोळे विस्फारून आपल्याच अंगाकडे खालीवर मागेपुढे बघू लागला.

दामले त्याच्याकडे बघत “अरे असं काय बघतोय,आता काय झालं?”

“नाय तस काय नाय, बगत होतो कि माझ्या अंगावर काय लिवलं बिवल हाय काय. तुमाला कस कळलं कि मी म्हराठवाड्याचा मनून?”

दामले आता पार खळखळून हसायला लागले, “अरे मग अंगा खांद्यावर काय बघतोय स्वतःच्या, तुझ्या बोली वरून लगेच कळलं मला, मी पण बॅचलर असतांना तीन-चार वर्ष औरंगाबादलाच होतो प्रोफेसर म्हणून.”

सोहमने पण हसत हसत “हत्त-तिच्या मारी….. हवका! तेच मनलं तुमाला म्हाज ठिकाण कस गावलं, माझं गाव औरंगाबाद पासून चाळीस किलोमीटरवरच आहे बघा”

दामले त्याला समजावत, “अरे,कस आहे ना, मराठवाड्याची भाषा आणि टोनींगच वेगळं, महाराष्ट्राचं सेन्टर ना तुमचं शहर त्यामुळे तिथं मालवणी सोडलंय तर खान्देशी, व्हराडी आणि नगरी असं सगळ्याच भाषेचं थोडं थोडं मिश्रण आहे बघ “

दामल्यांचं लेक्चर ऐकून सोहम धन्य पावला, पण त्याच्या डोक्यात नुसता निवाराशोध घोळत होता, पुढे दामले अजून काही बोलण्याच्या आत त्याने दामल्यांना विसर पडलेला प्रश्न परत टाकला, ” हाव अगदी बराब्बर आय बघा तुमचं, म्हराठ्वाडा तो म्हराठ्वाडा त्याची सर नाही कुट, लय बर वाटलं बघा तुमाला भेटून, बरं मी काय मनतो काका, आहे का मंग एखाद रूम इकडं?”

“वन रूम का वन बीएचके हवाय का? ……….. तसा ह्या आळीत तुम्हाला ते दोन्ही भेटणार नाही” दामल्यांनी एका क्षणात सोहमचा हिरमोड केला.

त्याचा पडलेला चेहेरा बघून दामल्यांनी त्याला थोडं बसवलं. त्याची नेमकी गरज जाणून घेत त्याच्या सोबत तब्बल तासभर गप्पा मारल्या. शेवटी दामले हाडाचा शिक्षक, बायको घरात वामकुक्षी घेत असतांना यांना कोणीतरी बोलायला भेटलं याचा त्यांना आनंद. पण सोहमची सखोल विचारपूस केली. सोहमने पण आपली आपबिती सांगितली

सोहम एका मध्यमवर्गीय घरचा पण मनाने श्रीमंत असं पोरं. तरणाबांड सोहम कित्येकांच्या गळ्यातलं ताईत होता. त्याची सद्सदविवेकबुद्धी आणि बोलकं व्यक्तिमत्त्व त्याला आपलंसं करून टाकायचा. त्याचे आई-बाप तो आठवीत असतानाच अपघातात वारले. नंतर मामाने जमिनीच्या तुकड्यापाई त्याचा ग्रॅज्युएशनपर्यंत कसाबसा सांभाळ केला. मामा आपला सांभाळ का करतोय ही गोष्ट त्यालाही चांगलीच माहीत होती. अभ्यासात तो तसा जेमतेमच, गावाकडच्या कॉलेजमध्ये नकला करत करत कसाबसा काठावर उत्तीर्ण झाला, पण प्रचंड मेहनती, तारुण्याची झिंग त्याच्या अंगात होती. आपलं सर्व शिक्षण शेती करत करत पूर्ण केलं. शिक्षण संपल्यावर अर्धी जमीन मामाच्या नावावर केली, थोडी विकली आणि राहिलेला तुकडा आपल्याकडे ठेवला, पण शेतीत राहिलेल्या तुकड्यात काही भागणार नाही हे तो जाणून होता आणि परत अजून आपला कोणाला त्रास नको म्हणून सोहमने कामासाठी पुण्यात यायचं ठरवलं.

नोकरी भेटण्यात पराकाष्ठा करावी लागणार हे त्याच त्याला चांगलं ठाऊक होतं. मित्रांनाच्या मदतीने पुण्यात दोन-तीन दिवसांचा आसरा त्याने मिळवला. त्या दोन दिवसांचे दोन आठवठड्यात रूपांतर होतं आले होते. त्याने जंग जंग पछाडले पण त्याला काही केल्या ना नोकरी ना कुठे निवारा भेटेना.

दामले आधीच भावुक स्वभावाचे एक परोपकारी व्यक्तिमत्त्व. सोहमची आपबिती आणि सध्याची परिस्थिती ऐकून दामले एकदम हळवे झाले. सोहमने त्यांना क्षणात आपलंस करून टाकलं होतं. दामल्यांच्या समोर ते स्वतः जेव्हा या शहरात आले होते त्या स्मृतीचा काळ ओसरला. एवढा गुणी मुलगा डोक्यावर आई वडिलांचं छप्पर नाही. दुसऱ्यांना कोणाला आपला त्रास नको म्हणून, नोकरी करून स्वतःच्या पायावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करू पाहतोय. याला आपण कश्या प्रकारे मदत करू शकतो. या विचारात दामले हरवले.

तेवढ्यात सोहम उठला “बर काका, काही असलं तर नक्की सांगा” नमस्कार करून सोहम मागे फिरला. सोहम चार पावलं पुढे जात नाही स्तोवर दामले परत एकदा ओरडले.

“ओ हॅलो…. सॉरी सॉरी…. सोहम तुला माझ्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहणं आवडेल का? ” दामले शक्य होईल तशी मदत त्याला करू इच्छित होते.

“काय मनता काका ! पळलकी, भिकऱ्याला भीक जेवढी भेटली तेवढी ठीक! कावून नय आवडणार , पण…..” सोहमला तर आभाळ ठेंगणं झालं होत, पण त्याच्या “पण” ने दामल्यांचा कपाळावर आढया पडल्या.

“पण ….. पण काय रे”? दामल्यांनी विचारलं

“पण काका, भाडं किती ? मला अजुक काम-धंधा पण शोधायचाय?” सोहम हळूच पुटपुटला

“अरे, तेवढंच ना ! तू घर बघ पाहिले, मग ठरवू आपण सगळं, आणि बाय द वे, आय विल नॉट आस्क यु समथिंग इर्राशनल. आणि हो हे काका, काका म्हणू नकोस मी फक्त शेचाळीस वर्ष्याचाच आहे, यु कॅन कॉल मी, मीस्टर दामले ऑर जस्ट वसंत, ओके. “

भावुक होऊन दामल्यांनी त्याला मदत केली तर खरी, पण ते हे विसरले होते की अजून आपण आपल्या संगिणीला सांगितलं सुध्दा नाही. हे तिला आवडेल का नाही? पुढे काय लिहून ठेवलं होतं ह्याची त्यांना कल्पना नव्हती.

क्रमशः

मंगेश अंबेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.