ऋणानुबंध (भाग-दूसरा)

“ये, सोहम आत ये, मी पाणी आणतो थांब” दामाल्यांनी सोहमला घरात बोलवले.

सोहम त्यांना थांबवत मिश्कीलपणे “काका….वो नग, एवढा भला मोठा रांजण बाहेर ठेवलाय अजून किती पाणी पिऊ घालणार.”

“अरे हो विसरलोच मी, बर पण ह्याक्षणी तुला अजून काही मी देऊ शकत नाही, आमचं सरकार आत वामकुक्षी घेत आहे, आणि मला पाणी उकळण्या पलीकडे दुसरा कुठला स्वयंपाक येत नाही रे बाबा.” दामले बोलले आणि दोघांचा हसण्याचा टोह फुटला.

हसण्याच्या आवाजामुळे आतल्या खोलीत साखर झोपेत असलेली मधुरा जागी झाली. आपल्या पतीदेवाने भलत्यावेळी आता कोणाला पकडून आणलं हे बघण्यासाठी ती उठली. उठताना तिचा हात बाजूला ठेवलेल्या तांब्यावरच्या पेलाला लागला आणि पेला खाली पडला.

“ह्या मांजरांनी ना नुसता विट आणलाय बघ, बस तू मी आलोच” दामले आवाज ऐकून आतल्या खोलीकडे वळले. तिथं दिवाणापाशी मधुरा उभी होती. तिच्या चेहेऱ्यावरचे प्रश्न पाहून ते सरळ तिच्याजवळ गेले आणि तिला हलक्या आवाजात सोहम बद्दलची कल्पना देली.

दोघांना मुलबाळ नव्हते आणि त्याची सल दोघांनाही कायम होती.त्या दोघांच्या वयात सात वर्ष्याचा फरक होता.दामले शेचाळीसचे तर मधुरा एकोणचाळीस वर्ष्याची. दामले एका कॉलेजात प्रोफेसर आणि मधुरा घरच्या घरी शिवणकाम करत. मधुरा दिवसभर घरी एकटीच असायची. घरात कोणाची तरी सोबत असावी म्हणून त्यांनी एखाद्या मुलीला पेइंगगेस्ट म्हणून ठेवायचं ठरवलं होतं.

मुलीला पेईंगगेस्ट म्हणून ठवायचं ठरलं असतांना एका मुलाला पेईंगगेस्ट ठेवण्याबद्दल मधुरा थोडी विरोधातच होती. दोघांत थोडीशी खुसपुस झाली. शेवटी दामल्यांनी सोहमला खालची खोली न देता वरच्या खोली ठेवू या अटीवर मधुराचा होकार मिळवला. तसाही वरच्या खोलीचा जिना बाहेरूनच होता जेणेकरून तो कोणालाच त्याचा त्रास नव्हता.

दामले परत हॉल कडे येत सोहमला विचारलं, “अरे चहा घेणार का कॉफी.”

“मांजरान त्वांड घातलं नसलं तर काहीही चालेल काका” सोहमच हसत हसत बोलला, असलं उत्तर ऐकून मधुराला वाटलं हे प्रकरण थोडं आगाऊ वाटलं.

दामले हसले “अरे बाबा नाही, तसं काही नाही, मांजर नव्हती ती, आपल्या हसण्याचा आवाज ऐकून आमचं खटलं जागी झालं.”

“मधु अरे इकडे ये तुला ओळख करून देतो” दामल्यांनी मधुराला बोलावलं.

मधुरा आपला अवतार सावरत हॉलमधे आली ” नमस्कार”

“ह्या आमच्या सौभाग्यवती मधुरा दामले, आणि मधु हा सोहम, रूम शोधतोय” दामल्यांनी एकमेकांची ओळख करून दिली.

“मी याला आपली माळ्यावरची खोली दाखवतो, तो पर्यंत तू थोडा चहा ठेव सगळ्यांसाठी. सोहम ये रे…”

वरची खोली फार अडगळीची, सगळीकडे धूळ, जळमट आणि जुन्या पडीक वस्तू. एखाद्या प्राण्याने पण तिथे क्षणभरही थांबू नये एवढं निर्जीवित्व होत तिथं. दामले जुनी झालेली वस्तू तिथे आणून टाकली की वर्षभर परत तिकडे कोणी फिरकत ही नसे. अशी खोली कोणाला आवडणार, तरी सोहमची गरज आवडी-निवडीपेक्षा महत्वाची नव्हती.

“सोहम ही बघ तुझी रूम. थोडी अजागळ परिस्थितीत आहे, पण घाबरू नकोस मी कामवलीला साफसफाई करायला सांगतो, आणि हो हे समान हवं तेवढं तू वापर बाकी एका कोपऱ्यात ठेवू तू आलावर. ओकेSS” दामल्यांनी त्याला पटवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

सोहम रूम निरखून पाहत होता, तेवढयात मधुराचा आवाज आला “वसंता चहा झालाय, खाली या” दोघेही खाली आले, चहा घेतला. एकंदर सोहमच्या वागण्या वरून मधुराला विश्वास होता की, वरची रूम याला काही पटणार नाही. तिने त्याला खोचक प्रश्न केला. “काय आवडली का रूम? थोडी वाईट अवस्थेतच आहे तशी”

सोहमलाही या शिवाय कोणताच पर्याय नव्हता. विचारांचे गोंधळ थांबवत, “.मला आवडली तशी पण अवस्था थोडी नाही भलतीच बिकट आहे हो. पण चिंता नका करू, मी दोन दिवसात व्यवस्थित करून घेईल. काय बी प्रॉब्लेम नाय ! मला चालेल, पण भाडं किती तेवढ सांगा ” ” सोहम मोठया आत्मविश्वासाने दामले आणि मधुराला उत्तरला. मधुराला हा त्याचा फाजील आत्मविश्वास वाटला.

“बघू रे पुढं, तू ये तर आधी राहायला” दामले सोहमचा प्रश्न टोलला.

तिने भुवया उंचावून दामल्याना एक कुचित हसू दिलं आणि कपबशी उचलून आत घेऊन गेली. दामल्यांना पुढची परिस्थिती कळून चुकली होती.

सोहम उद्या सामान घेऊन येतो सांगून गेला. दामले सरळ मधुराकडे गेले, “मधू, अगं..काय झालं तुला काही चुकलं का?”

बस.. झालं तर मग …….. मधुराने प्रोफेसरची उजळणी घ्यायला सुरुवात केली, “अरे, तुला काही कळत की नाही, मला काही न विचारता तू होकार देऊन टाकला सुद्धा आणि किती उद्धट आहे हा, काय ठरलं होत आपलं आणि तुला कस पटतं याचं असलं आगाऊ बोलणं.”

एका प्रोफेसरला काहीही बोललं तर तो खपवून घेतो पण “काही कळतं की नाही” असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा तो पेटूनच उठल्याशिवाय राहत नाही, तसंच काहीसं दामले बद्दल झालं.

“अरेच्चा…. काय…काय उद्धटपणा केला त्याने? तुझं हे नेहमीचंच आहे हा मधु. तुझी दुपारची झोपमोड झाली की तू असंच काहीसं करते. आणि राहिला त्याच्या ओपॅनली बोलण्याचा प्रश्न तर मीच त्याला आपल्या सोबत मोकळं बोलायचं सांगितलं होतं.”

“अरे हो पण तुला का एवढा पुळका त्याचा, कोण लागतो कोण तुझा तो” मधूराने प्रतिउत्तर केलं.

“अगं तसं काही नाही, तू पण त्याची आपबिती ऐकशील तर कळेल तुला ” शेवटी दामाल्यांनी मधुरा पुढे काही बोलण्याच्या आत तिच्या समोर सोहमची संपुर्ण व्यथा मांडली. दामले जेवढे भावुक होते तेवढीच मधुरा वास्तविकवादी पण दोघांची कमकुवत बाजू म्हणजे माणुसकी. मधुराही सोहमची व्यथा काहीशी भावनाविवश झाली, पण तिने चेहऱ्यावर अजिबात झळकू नाही दिलं.

“अच्छा…… तर हे असं आहे सगळं प्रकरण, पण मला त्याच उद्धट बोलणं काही पटलं नाही. मला तो जरासा विचित्रच वाटला बघ. तू पुन्हा विचार कर.” मधुरा नकार घंटा चालू ठेवला.

पण सोहमसाठी पेटून उठलेल्या दामल्यांनी विषय तसाच तासभर पुढे चालू ठेवत मधुराला फार विनवणी केली आणि पटवून सांगण्याच्या बाबतीत प्रोफेसराचा धर्म राखला. मधुराने शेवटी कंटाळून

असो…चालू द्या तुमचं, पण त्याला आपल्या जेवायच्या, झोपायच्या वेळा नीट समजावून सांग.” एवढं बोलून मधुराने थोडं आवरत घेतलं. मनातून दामल्यांना आनंदच झाला खरा पण आता पुढे याचे येण्याने काय होणार हे त्या दोघांना माहीत नव्हते.

क्रमशः

मंगेश उषाकिरण अंबेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.