अश्याच एका सकाळी, तिघे नाष्टा करत असताना, मधुराने सोहमला विचारलं.
” मग, आज कुठे इंटरव्हीव आहे रे सोहम”
” हाव, मी आज एका पेपरच्या आफिसात जातूय.” सोहमने सांगितलं
“अच्छा न्यूजपेपरच्या ऑफिसात का, ऑल द बेस्ट, तुझं आवरलं की दुपारी लवकर ये, आज तुझी फेवरेट पुरणपोळी करणार आहे.” मधुराने सोहमला सांगितलं.
हे ऐकून सोहमने खुष होऊन “अर व्वा ! पुरणपोळी! मी इटरवीव हवं तर कॅनसिल करतो आज मंग.”
“नको रे बाबा इंटरव्हीवला जा पहिले, आज तुला नक्की नोकरी भेटणार बघ, तू गेला नाहीतर त्याच न्युजपेपर मध्ये छापून यायचं की पुरणपोळीच्या आमिषापाई एक नामांकित कंपनी भावी मॅनेजरला मुकली.तुझं काम आज नक्की होणार बघ” मधुराच्या या वाक्यावर तिघांचा हशा पिकला.
“”खेचा, खेचा गरिबाची खेचा तुम्ही, मी साधं स्टोरकिपरच्या पदासाठी अर्ज केलाय ओ” सोहम हलक्या आवाजात पुटपुटला.
इकडे दामले दोलका सारखी मान डोलावत केविलवाण्या स्वरात “हे बरंय, याला पुरणपोळी आणि मला डब्ब्याला पिठलं भाकरी, आम्ही काय घोडं मारलंय.”
मधुरा दामल्यांना उद्देशून “वाटलंच मला तू बोलशील, ते जाऊ दे सोहम मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे.”
मिसवर्ल्डच नाव घोषित झाल्यावर त्या मॉडेलला जसा आनंद होतो तसाच काहीसा सोहमने आपल्या उघड्या तोंडावर दोन्ही हात ठेवतं, “थांकू, पण तुमाला कसं कल्ल.”
मधुराने दामलें कडे बघत “वसंता अरे तुझा टिफिन भरताना टेबलावर पडलेल्या सोहमच्या सिव्ही वर माझी नजर गेली आणि तेव्हा मला कळलं की आज ह्या लब्बाडचा वाढदिवस आहे. नाहीतर याने कुठे सांगितलं असतं आपल्याला.” सांगितलं.
”अरे वाह! मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सोहम, मग रात्री पण आपण जाऊयात बाहेर जेवायला.” दामलेंनी सोहमच्या होकाराच्या आधीच मधुराला बोलुन मोकळे झाले आणि सोहमने पण दामलेंच्या उत्साह बघून आपली सहमती दाखवत बोलला,” ओके, लयचभारी वाटलं मला, अता मी निगतो,उशीर होतोय इटरविवंला” असं बोलून सोहम गडबडीत बाहेर पडला. थोड्या वेळाने दामले पण कॉलेजला गेले.
दुपार उजाडली पण सोहम काही घरी आला नव्हता. मधुरा सोहमसाठी दुपारच्या जेवणाला बरेच तास थांबली होती पण सोहमचा संध्याकाळ होवूस्तोवर काही पत्ता नव्हता. मधुरा दारातच उभी होती सोहमची वाट पाहत तितक्यात दामलें कामावरून घरी आले.
“अरे बघ ना हा सोहम काही घरी आला नाही अजून” मधुरा दामल्यांना म्हणाली
“अग येईल तो, इंटरव्हीव लांबला असेल बहुतेक, नको काळजी करू, चहा ठेव मी आलोच फ्रेश होऊन” दामले बोलले आणि आत गेले.
दामले सर्व आवरून बाहेर येऊन झोपल्यावर पेपर वाचत बसले. पेपर वाचता वाचता दामल्यांनी मधुराला समजावण्याचा थोडक्यात प्रयत्न केला पण मधुरात काही फरक नाही दिसला म्हणून परत आपलं थोडं पेपर मधे खुपसल. दामलेंना रोजच्या चहाची साधी विचारपूस पण केली नव्हती तिने.
त्यादिवशी सोहमला नोकरी लागली. त्याला आभाळच ठेंगण झाला होत जणू, खूप खूप आनंद, काय काय करू असं झालं. सर्वात पहिले त्याला मधुराची आठवण आली होती, कारण मधुराने सहज केलेलं भाकीत खरं ठरलं होतं. घरी परत कधी पोहचतो आणि ही गोष्ट मधुराला सांगतो असं झालं. घरी येतांना एक छानसा मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आणि कुंदाचे पेढे घेतले.
इकडे मधुराची चलबिचल चालूच होती. तिचं सारखं घडाळीच्या काट्यावर आणि कुंपणाच्या फाटकावर लक्ष लागून होतं. तितक्यात सोहम धापा टाकत टाकत फाटक उघडून थेट मधुरापाशी आला आणि तिला गच्च मिठी मारली “तुमी मणाला होता ते खरं झालं बगा, माझी नोकरी पक्की झाली.” . त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मधुराही खूप भाराहून गेली आणि तिनेही सोहमची मिठी घट्ट केली.
“अरे वाह! खूप छान, अभिनंदन तुझे” मधुराने त्याची पाठ थोपटली.
हा सर्व प्रकार दामलें तोंडावरचा पेपर खाली सरकवून बघत राहिले. पण त्यांनी ते दुर्लक्षित केलं, आणि पहिली संशयाची ठिणगी इथे पडली.
दुसऱ्या क्षणाला सोहमची नजर मागे बसलेल्या दामल्यांवर गेली आणि तो थोडा भानावर आला. मिठी सैल करत हळूच मधुराच्या हातात गजरा ठेवून, दामल्यांन समोर पेढ्यांचा पुडा केला.
दामलें पेढा उचलत “अभिनंदन, खूप खूप अभिनंदन सोहम”
खरंतर दामलेंना पण तेवढीच खुशी झाली जेवढी मधुराला, पण त्या दोघांच्या मिठी पुढे त्यांनी स्वतःला मिठी मारण्यापासून सावरलं. मुळातच मिठीचा प्रकार त्यांना थोडं बोचून गेला. रात्री बाहेर जायच्या बेताबद्दल दामलें पुढे काही बोललेच नाही. मधुरानेपण सोहमसाठी सकाळचा राहिलेला बेत परत आखला.
मधुराला कामात मदत करता करता सोहम मुलाखतीच्या गप्पा दोघांना सांगत होता. मधुरा ते कान देऊन ऐकत होते, परंतु दामले थोडे हरवल्या सारखे वाटतं होते. गप्पागप्पात रात्रीच जेवण उरकलं. सोहम दोघांचा निरोप घेऊन आपल्या खोलीत गेला. दामलेही आपल्या खोलीत गेले, मधुरा सगळं किचन मधलं काम उरकुन झोपायला आली.
दामले छताला लोंबकळणाऱ्या संथगतीत फिरणाऱ्या पंख्याकडे एकटक बघत कुठल्यातरी विचार मग्न होते. मधुराचं त्याकडे लक्ष गेलं नाही. ती अजूनही सोहमच्याच विचारात गुंतलेली होती. बिछान्यावर पडल्या पडल्या तिने दामल्यांन बद्दल विचारपूस करण्याच्या अगोदर सोहम बद्दल बोलली “लागला एकदाचा नोकरीला, किती छान झालं ना सोहमच, गोड मुलगा आहे बिचारा”
दामलेचं त्यावर काहीच प्रतिउत्तर नाही आलं म्हणून परत मधुरा बोलली, “झोपलास का?” दामल्यांनी काहीच न बोलता डोळे मिटले तसेच शांत पडून राहिले. त्यादिवशी दामलेच्या मनात संशय घर करू पाहत होता आणि दामले त्याला बाहेरच रोखू पाहत होते.
दुसरीकडे मधुराला दामयाल्यांशी बरंच काही बोलायचं होतं जे की राहून गेले. कदाचित आज संवाद झाला असता तर पुढे बरंच काही थांबलं असतं.
क्रमशः
मंगेश उषाकिरण अंबेकर