उपरती

“तुह्या सारकी सून मिळाया लय भाग्य लागतं बई,तुला सांगते तुहे सासू-सासरे लय नशीबवान ज्यासनी तू गावलीस बग.” वसुदाकाकी मालतीच्या चेहऱ्यावरून हाथ फिरवत तिची स्तुती करत होती. काकींचा गावावरून आल्यापासून परत निघोस्तोवर मालती नावाचा कौतुक सोहळा थांबायचं नाव घेत नव्हता. मालती सोबत हे काही पहिल्यांदा घडत नव्हतं. तिला गेल्या दोन-तीन वर्षांपासून अशा कौतुकांची जणु सवयच झाली होती, पण ती कधी या कौतुकांच्या वर्षावात हुरळून नाही गेली.

अक्कांच्या पायाशी बसलेली वसुदाकाकी परतीच्या प्रवासासाठी उभी ठाकली.

“तुमचं पण ना…… काहीतरीच हं काकी…… असं नव काही केलं नाही मी…… असो, नमस्कार करते हा काकी” मालती वसुदाकाकींच्या पाय पडत बोलली.

“सुखी ऱ्हा पोरी….., रावू दे माय असच परेम अन माया रावू दे समदयांवर …… येते म्या” एवढं बोलून काकी विनायकचा हात पकडून त्याच्या सोबत स्टेशनला निघाली.

“काकी, सावकाश जा…. आणि पोहचल्यावर बंडूला फोन करून कळवायला सांगा…. इथली अजिबात काळजी करू नका, स्वतःची काळजी घ्या ” मालतीने आपुलकीच्या अनेक सूचना देत काकींना निरोप दिला.

“अहो …जाताजाता काकींसाठी वाटेत काही फळ घ्या त्यांना जेवणाच्या डब्ब्याखेरीज बाकी काहीच देता नाही आलं.” मालतीने विनायकला हळूच कानात सांगितले. विनायकनेपण नुसत डोकं वरखाली करत होकार दिला.

वसुदाकाकी गेली तशी मालती परत अक्कांच्या देखभालीत व्यस्त झाली. पण ह्या वेळेस वसुदा काकांची अतिस्तुतीचा अहं मालतीच्या निरागस मनाला स्पर्शून गेला. ‘सगळयांना माझ्याबद्दल आपुलकी वाटते पण आपल्या घरात कोणालाच त्याच मोल नाही’, असं आज पहिल्यांदा तिला मनोमनी वाटून गेलं. त्याचं कारणही म्हणजे अक्का एक खाष्ट सासू आणि विनायक मितभाषी पण तापत स्वभावाचा होता त्यातल्यात्यात अण्णांच्या जाण्यानंतर तो अजूनच मितभाषी झाला होता. विनायकला कधी कोणती गोष्ट नावडेल ह्याचा काही नेम नव्हता आणि ह्या अगदी उलट मालती जी की कायम स्वयंप्रेरित, सगळ्या बाबतीत प्रचंड हौशी आणि भरपूर बडबडी. तीची बडबड फक्त विनायक समोर आल्यावरच आपसूकच थांबायची, ज्याचं कारण त्याचा राग आणि एक अनामिक भीती.

तीन वर्षांपूर्वी अक्कांचे पती अण्णा गेले तशे अक्कांनी अंथरून धरले. मालती आणि विनायकचे तेव्हा नुकतेच लग्न होऊन चार महिनेच झाले होते. अर्धांगवायूच्या झटक्याने अक्का पूर्णपणे मालतीवर विसंबुन होती. मालतीने पण आपला कर्तव्यनिष्ठपणा जपत-जपत अक्कांचा अगदी कुकुल्याबाळा सारखा सांभाळ करत आली होती. अक्कांना काय हव,काय नको आणि आजारामुळे होणारी त्यांची प्रचंड चिडचिड एवढं सगळं ती निमूटपणे खरंतर खूप समजूतदारपणे सांभाळत होती. तिचा पूर्ण दिवस फक्त नि फक्त अक्कांना सांभाळण्यातच जायचा.

अक्काचा दवाखाना, घराचा खर्च ह्या सगळ्यात गुरफटलेला विनायक एका खाजगी कंपनीत सर्वसाधारण पदावर कार्यरत होता. जेमतेम पगारावर संपूर्ण घरच्या जबाबदाऱ्या पेलवत कसाबसा संसार चालला होता. विनायक फक्त संसाराचा गाडा हाकणे आणि पुत्रधर्म बजावणे यातच स्वःताची धन्यता मानत होता. तो नवरा या नात्याने अगदीच शून्य होता. त्याने कधीच आपल्या बायकोच्या कोणत्याच इच्छा-आकांशाची कधीच दाखल घेतली नाही.
बघायला गेलं तर मालती एक पदवीधर मुलगी होती आणि तिला बाहेर काम करायची तीव्र इच्छा होती पण ती कधी विनायकांशी बोलू शकली नाही, त्यातल्यात्यात अक्कांनी अंथरून धरल्यापासून तर तिने आपल्या सगळ्या इच्छा अपेक्षेवर पाणी सोडल होतं. अगदी बाळाच्या इच्छेवर सुध्दा.

विनायक कामाला गेला कि मालती किचनमध्ये काम करत-करत हॉलमध्ये झोपलेल्या अक्कांशी तासनतास बोलत बसत. या घरात तीच हक्काच असं कोणी नव्हतं जे तीच म्हणणं ऐकून घेईल किंवा तिच्याशी हितगुज साधेल. ती फक्त अक्कांपुढेच आपलं मन मोकळ करायची. “अक्का आज वरण भात करते हा आपल्यासाठी…… काकी तुमची फार आठवण काढत होत्या…… आता दिवाळीजवळ येतेय आपण दोघी छानशी साडी घेऊ……. मी पण बाहेर काम करून हातभार लावेल यांना……. ती शेजारची राधा ह्या सुट्ट्यात काश्मीरला जाणार बघा……. आपणही जाऊयात कुठे तरी फिरायला…….. अक्का मी आत्ता खालून कडीपत्ता घेऊन आले तीन शिट्ट्या झाल्यातर लक्ष राहू द्या हा……” अश्या असंख्य आणि अगणित गप्पा मालती अक्कांशी मारत असे, जणू काही त्या आत्ता उठुन मालतीशी गप्पा मारतील. मालतीने अक्का आजारी आहेत असं ना कधी समजलं ना कधी तस त्यांना भासु दिल. ती अगदी त्या घरात पाऊल ठेवल्यापासून जशी बोलायची तशी आजही अक्कांशी बोलत.

एका सकाळी मालती अशीच गप्पा मारत असतांना तिला “मालू” अशी हाक ऐकू आली, तिने दाराकडे पाहिले तिला कोणी दिसलं नाही. पुन्हा आपल्या कामात मग्न झाली परत आवाज आला “मालू”…. तिने अक्कांकडे पाहिलं तेव्हा त्या काहीतरी हालचाल करताना दिसल्या आणि परत एकदा आवाज आला “मालू” . मालती जोरजोरात किंचाळु लागली, अंगात आल्यासारखी उड्या मारु लागली, वेड्यासारखी टाळ्या वाजवू लागली, तिचे डोळे क्षणात चिंब भिजले, चेहऱ्यावर नुसता आनंद ओसंडून वाहत होता आणि तोही का बर नसावा, ती हाक चक्क अक्कांच्या तोंडून आली होती. जणू मालतीच बाळ आज पहिल्यांदा बोललं होतं.

मालतीने ताबडतोब विनायकाला फोन केला, “अहो … आपली अक्का…. अक्का…” अतीव हर्षोउल्हासापाई तिला पुढे काही बोलायला श्वासच अपुरा पडू लागला.

“अगं, काय झालं ते नीट सांगते का?” विनायक फार घाबरला नेमकं काय झालं ते काही कळेना.

“अहो…. अक्का बोलू लागल्या…” थोडी भानावर येत अखेर मालती बोलती झाली.

“काय !!!!! काय सांगतेस तू… भगवंता तुझे कोटीकोटी उपकार… थांब आलोच मी घरी” विनायकच्याही आनंदाला थारा राहिला नव्हता.

अक्का आता थोडीफार हालचाल आणि अडखळत अडखळत बोलू लागल्या होत्या. विनायक आणि मालती दोघे अक्कांमध्ये झालेला सुधार बघून फारफार आनंदात होते.

एका रविवारी मालती भाजीपाला आणायला मंडईत गेली असतांना अक्कांनी विनायकला त्यांच्या जवळ बोलवून त्यांच्यापाशी बसायला सांगितलं.

“विनू माझी एक इच्छा आहे पूर्ण करशील बाळा?” अक्कांनी चाचपडत विनायकाचा हाथ आपल्या हातात घेत विचारलं.

“असं काय विचारतेस अक्का, तू हक्काने सांगायला हवं…. बोल ना काय करू?” विनायकाने अक्कांचा हाथ आपल्या दोन्ही हाताने हलकासा दाबत विश्वासाने बोलला.

“तू मालूला काही दिवस काश्मीरला फिरायला नेशील?”

“अक्का काही ही काय बोलतेस ….. तू व्यवस्थित बरी हो मग आपण सगळेच कुठे तरी फिरायला जाऊ.”

” मी बरी होईल तेव्हा होईल, तू मालूला आधी फिरायला घेऊन जा आणि मला सुमेकडे काही दिवस सोड मला तिच्याकडे खूप जावं वाटतय.”

“अच्छा तुला मालूने सगळं पटवून ठेवलंय वाटतं. अक्का आता नको तू बरी झाली की बघू……..सध्या पैशांची थोडी चणचण आहे” विनायकने आपले ढोबळ अंदाज अक्कांपुढे मांडले.

“नालायका त्या पोरीने काहीएक सांगितलं नाहीये, ती या घरात आल्यापासून तिला टीचभर सुख देऊ नाही शकले, आल्यापासून तिला उपदेश देत राहिली आणि नंतर माझ्या आजारातून आणि घरच्या कामातून ती कधी बाहेरच नाही पडली. तूला सांगितलं तेव्हढं कर.” अक्कांनी त्याला ठणकावून सांगितले . अक्कांच्या खाष्ट स्वभावाला मालतीच्या सेवेने अवीट गोडित प्रवर्तित केले होते.

काही दिवसांनी विनायकने ठरल्याप्रमाणे अक्काला त्याच्या छोट्या बहिणीच्या घरी म्हणजे सुमनकडे सोडून आला. बाकी सर्व व्यवस्था केली आणि एकदाच काश्मीरला जायचं ठरलं.

कैकवर्षांनी मालतीची दूरकुठेतरी फिरायला जाण्याची हौस पूर्ण होणार होती पण त्याहूनही तिला सर्वात जास्त आनंद म्हणजे नवऱ्या सोबत निवांत वेळ घालवण्याचा होता. मालतीने लगबगीने सर्व बॅगा भरून ठेवल्या होत्या. सर्व तय्यारी झाली होती. काश्मीरला जाण्याचा दिवस उजाडला. दोघे तय्यारीनिशी दाराला कुलूप लावून घराबाहेर पडले न पडले तोच विनायकचा मोबाइल खणखणला.

“भावजी दिदी कुठेय तिचा फोन लागत नाही?” नितु धाप लागल्यागत फोनवर विचारत होती.

“का ग काय झालं, इतकी कशी धाप लागली तुला.” विनायकने विचारले.

“भावजी बाबांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलय,रात्रीपासून त्यांच्या छातीत दुखतं होत. डॉक्टरने सांगितलं की काही सांगू शकत नाही,ऑपरेशन करावं लागेल, त्यासाठी बारा लाख रुपये लागतील. तुम्ही दिदीला घेऊन तात्काळ निघा, काय होईल काही सांगता येत नाही.” नितु हुंदके देतदेत विनायकशी बोलत होती.

“तू काळजी करू नकोस आम्ही अडीच-तीन तासात पोहचतो साताऱ्यात. “

नितु मालतीची सख्खी धाकटी बहीण. मालतीची आई नितु आठ वर्षांची असताना वारली, त्यावेळापासून मालतीच आईसारखं सगळं घर सांभाळायची. मालतीच्या लग्नानंतर नितु आणि त्यांचे बाबा हे दोघेचं माहेरी असतं. माहेरचं नाव ऐकताच मालती फार घाबरली तिला बिचारीला काही कळेना नेमकं झालंय काय ते, ती विनायकला विचारू लागली.

“काही नाही… आपल्याला साताऱ्याला निघावं लागेल…..आधी चल जाताजाता सगळं सांगतो” विनायकने तिला सांगितलं.
त्याने बसमध्ये मालतीला पूर्ण कल्पना दिली, मालती अगदी सुन्न पडली. विनायकने तिला खूप धीर दिला आणि समजावलं.

दोघे हॉस्पिटलला पोहचले, बाबांना अतिदक्षता विभागात ठेवले होते. विनायक नितुला भेटून सरळ डॉक्टरांकडे गेला. त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि ऑपरेशनची तय्यारी सुरु करण्यास सांगण्यात आली. दुसऱ्यादिवशी ऑपरेशन सुरळीत पार पडलं. सर्वजण खूष झाले. त्यांनतर बाबांना जनरल वार्डात हलवण्यात आले. विनायक रात्रभर बाबांच्या बाजूला खाली झोपत आणि दिवसा मालती आणि नितु आळीपाळीने बाबांच्या जवळ असे.

अश्याच एका रात्री नितु आणि मालती घरी असतांना, नितुला खूप असह्य झालं आणि तिला अचानक रडू कोसळलं.

“ए निते….. अगं काय झालं रडायला एवढं” मालती नेमकं काय झालं ते कळेना तिने नितुला विचारलं.

“काही नाही दिदी आज भावजी नसते तर आपण खरंच बाबांना बघू शकलो नसतो”

“असं अभद्रं बोलू नये …. त्यात भावजींचं काय एवढं त्यांना शक्य होत ते केलं त्यांनी” मालती नितुच्या तोंडावर हाथ ठेवत बोलली.

“ते बरोबर आहे ताई पण आज बारा लाख एवढी मोठी रक्कम गोळा नसती झाली तर बाबांचं ऑपरेशन पण नसत झालं …. कोणी सख्खपण करणार नाही. एवढं त्यांनी केलंय.” नितुचे बोल ऐकून आता मात्र मालती विचारात पडली.

घरात काही पैसे नाही, अक्काच्या हॉस्पिटलचा खर्च सगळा पर्सनल लोन घेऊन झाला? पगारीच्या पैश्यात कसाबसा घराचा हफ्ता आणि किराण्याच्या खर्च भागतो. ह्यांनी एवढं सगळं केलं आणि मला सांगितलंही नाही, मग नेमकं ह्यांनी एवढे पैसे आणले कुठून? तिच्या डोक्यात विचारांचं आगडोंब उठला.

सहाव्या दिवशी बाबांना डिस्चार्ज मिळाला, त्यांना घरी हलवण्यात आलं. सगळं काही सुरळीत करून मालती आणि विनायक माघारी निघाले.

त्यांनी परतीची बस पकडली. खिडकीजवळ बसलेली मालती अजूनही पैश्यांच्याच विचारात मग्न होती. बसने घाट चढताना जोरात वळण घेतलं तशी मालती विनायकच्या जवळ लोटल्या गेली. एक थंड हवेची झुळूक खिडकीतून आत आली. तिची विचारांची तंद्री तुटली.

“तुमचे आभार मागावे तितके कमी, आज बाबा फक्त तुमच्यामुळे वाचलेत, तूम्ही नसता तर कदाचित…..” मालती फार हळव्या मनाने विनायकशी बोलत होती.

“मी काय केले, फक्त त्यांच्या आणि तुमच्या सोबत मदतीला नामात्र होतो.” विनायक बोलला.

“एक विचारू चिडणार तर नाही ना?” मालतीने स्वतःला सावरत प्रश्न केला. विनायकनेही मान डोलावत तिला होकार दिला.

“एवढे पैसे अचानक आणले कुठून?” मालतीच्या या प्रश्नांवर विनायकच्या चेहऱ्यावर हलकस हसू फुटले.

“अच्छा ते हो, अगं त्यात माझे असं काहीच नाही, सगळी तुझी कमाई ती, तू केलेलं स्वकष्टाचे पैसे आहे ते.” विनायकला बोलणं ऐकून मालती अजून बुचकाळ्यात पडली.

“मी…अहो उगाच काय फिरकी घेता या वेडीची…..मी तर घरा बाहेरही पाऊल ठेवला नाही मग एवढे पैसे कुठून देणार तुम्हाला.”

“सांगतो…सांगतो … सगळं सांगतो …. मालू तुला लग्नापासून बाहेर काम करण्याची इच्छा असतांनाही मी त्याकडे नेहमी दुर्लक्ष केलं, तुझी कोणतीच इच्छा कधी पूर्ण करू शकलो नाही. पहिले अण्णा गेले आणि नंतर अक्का अंथरुणात खिळली, यात तू पूर्ण गुरफटून टाकल्या गेली आणि मी या आपल्या संसाराच्या रहाटगाड्यात तुझ्याकडे कधी वळूनही पाहिले नाही. तू या घरात आल्यापासून मी तुला दीड-दमडीचही सुख देऊ शकलो नाही. उलटं तू येण्यानेच हे सगळं दुःख माझ्या नशिबी आलं हे मी मुर्खासारखं मनोमनी मानत राहिलो.

अण्णा गेल्यापासून घर कायम पाहुण्यांनी भरलेलं राहील मात्र सगळ्यांचा यथासांग पाहुणचार करूनच तू त्यांची पाठवणी केली. मी होतो नव्हतो याचा पाहुण्यांनाही कधी फरक नाही पडला. वसुदाकाकी सारखं बऱ्याच जणांनी तुझी पाठ थोपटून मला कळवली, पण मी त्याकडे नेहमी दुर्लक्ष केलं.

अक्काची तू एवढी सेवा केली की ती तुझ्या निःस्वार्थ सेवेपाई ती पुन्हा बरी झाली सर्वांशी बोलू शकली. पण मला तुझ कधी साधं कौतुकही करायला उमजल नाही.” एवढं सगळं काही बोलता बोलता विनायकच्या पापण्यांचे काठ ओले झाले होते. पाषाणाला फुटलेला पाझर पाहून मालतीही खूप हळवी झाली होती.

विनायकने तिच्या खांद्यावर हात टाकून तिला त्याच्यापाशी ओढलं, “मालू …. अक्काने त्या दिवशी मला जवळ बोलावलं आणि तुझ्याबद्दल, तुझ्या किचनमधल्या सततच्या कामाबद्दल, तू केलेल्या पाहुण्यांच्या पाहुणचारा बद्दल, ती बरी नसतांना तु तिच्याशी केलेल्या असंख्य बडबडी बद्दल आणि त्या बडबडीतून कळलेल्या तुझ्या सुप्त इच्छांबद्दल सांगितल. आणि त्यादिवशी कळलं की मी किती चुकीचा होतो. मी तुझ्या अंतर्मनात कधीच डोकावून पाहिलं नाही की तुझ्या इच्छा काय आहे, तुझ्या अपेक्षा काय आहे. मी तुझा ना कधी एक मित्र ना कधी एक साधा पती होऊ शकलो. ज्याची त्यावेळेस तुला फार गरज होती पण मी माझ्या मगरुरीतच मशगुल होतो.

पण हे सर्व अक्काने जाणलं. अक्का अंथरुणात खिळली होती पण तुझ्यावर पडणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या ती पाहत होती. अक्का बरी नसती झाली आणि मला हे सांगू शकली नसती तर कदाचित मी तुला जन्मभर समजूही शकलो नसतो. मला खरचं माफ कर मालू….आज मला त्याची उपरती झाली…… मी फार चुकीचा वागलो तुझ्यासोबत.” विनायकच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू मालूच्या गालावर पडत होते आणि मालूचे आंनदाश्रू विनायकच्या छातीवर. एका मनापासून दुसऱ्याच्या मनापर्यंत आणि दुसऱ्याच्या मनापासून परत पहिल्याच्या मनी,जणू मनाच्या प्रति…… मनाचा एक विलक्षण कृतज्ञ सोहळा पार पडत होता .

“अक्का ने तुला काश्मीर फिरायला घेऊन जायचं सांगितलं त्यावेळस ठरवलं की हे सगळं मनातलं तुला काश्मीर जाऊन सांगू पण नियती काही वेगळेच हवं होत. आज जे काही मी बाबांसाठी कणभर करू शकलो ते तुझ्यामुळेच, कारण अक्का तुझ्यामुळे बरी झाली आणि ती बरी झाली म्हणून अण्णांनी जपून ठेवलेल्या वीसलाखांबद्दल कळलं, जे की फक्त अण्णा आणि तिच्याखेरीज कोणालाही ठाऊक नव्हते.
त्यामुळे बाबा आज जे बरे होऊ शकले ते फक्त तुझ्या….. एका हाऊसवाईफच्या कमाईमुळे, त्यात माझी टीचभरही मदत नाही.” विनायकचा अबोला,स्वार्थ, अहं सगळा सगळा काही मालतीच्या उपकारा आणि प्रेमापुढे निखळून पडला होता. मालतीच अंतःकरण जड झालं.

“खरंतर मला अक्कांचे आभार मागायला हवे…. तशी मला माझ्या आयुष्याकडून काहीच अपेक्षा राहिल्या नव्हत्या, ना नोकरी करण्याची, ना फिरण्याची आणि ना आई होण्याची… मला फक्त नि फक्त तुम्ही हवे होता…. मला जाणून घेणारे, माझ्याशी प्रेमाने दोन बोलणारे, माझ्या सोबत खळखळून हसणारे आणि कधी कधी माझ्याशी गोड भांडणारे……. आज अक्कांनी मला माझा पती मिळवून दिला…. आणि अजून एक सांगू मला आज कळलं कि तुम्ही एवढं अखंड बोलू शकतात.” मुसमुसत बोलणारी मालती चेहऱ्यावरचं मंद हसू लपवत, साश्रू नयनांनी विनायकला बिलगली.

विनायक आणि मालती घरी न जाता थेट सुमनच्या घरी गेले आणि मालती सरळ जाऊन अक्कांच्या गळ्यात पडली.

“अरे वाह मालू!!!…. आले तुम्ही!!!…. कशी झाली तुमची ट्रिप?” मालतीला बघून हर्षीत झालेल्या अक्कांनी विचारले.

त्यांना मिठी मारलेली मालती काहीच बोलत नव्हती, उलट तिने अजून मिठी घट्ट केली. तिच्या हमसून हमसून रडण्याने फक्त दीर्घ श्वासांचाच आवाज येत होता.

“अगं ये वेडाबाई काय झालं रडायला? विनू काही बोलला का? का गेलाच नाही काश्मीरला?” अक्कांना तिला रडतांना बघून प्रश्न पडू लागले.

“अग बोल आता, विनू….ये….. विनू काय केलंस माझ्या पोरीला” तीच रडणं बघून आता अक्कांचे डोळेही पाणावलेत.

“काही नाही अक्का छान झाली ट्रिप, तुमची फार फार आठवण येत होती तिकडे म्हणून रडू आले, बाकी काही नाही.” एक हाताने स्वतःचे आणि दुसऱ्या हाताने अक्कांचे पाणावलेले डोळे पुसत मालतीने सावरून घेतलं.

“खरं बोलतेय ना तू….नाहीतर विनूची खैर नाही आज” अक्कांनी परत खणकाऊन विचारले.

“खरंच सांगू…… अक्का तुमच्यामुळे मला माझे पोपटासारखे मिठूमिठू बोलणारे पतीदेव परत मिळाले” मालती लाजेनं मान खाली घालून हसत अन काहीशी मुसमुसत उत्तरली.

सर्वांच्या पापण्यांचे किनार ओले करून जाणारा तो विलक्षण हळवा क्षण अक्का, मालती, विनायक आणि सुमन यांना खुदकन हसवून गेला……..

जिते रहो…..सदा दुसरो के दिल में रहो.

©मंगेश उषाकिरण अंबेकर
०१ जानेवारी २०१९
९८२३९६३७९९

फोटो सौजन्य: गुगल

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.