वदनी कवळ घेता

दाल बाटी

बातम्यात रोजचे संप, बंद, आंदोलने बघून, मी पण ठरवलं की आज हक्काच्या सुट्टी दिवशी आपणही संप करायचाच. मुळात आपण का संप करतोय हे जसं कार्यकर्त्यांना माहीत नसतं; तसं मात्र माझ्या बाबतीत मुळीच नव्हतं बरं. “हक्काच्या सुट्टीच्या दिवशी मी घरातलं कोणतच काम करणार नाही म्हणजे नाही.” हे होतं या कामगाराचं संप करण्याचं मूळ कारण.

सकाळी (अर्थात माझी सुट्टीच्या दिवशीची सकाळ, साधारण दुपारला टच करत असते) माझ्या संपाची सुरवात भरपेट नाष्टा आणि कडक चहा घेतल्यावर सोफ्यावर उताणा होऊन झाली.
बेत तसा पक्का होता की, ‘आज काहीच करायचं नाही’ म्हणून मी उगाच नाकासमोर चहा पितांनाच पूर्ण चाळून झालेला न्यूज पेपर घेऊन बसलो होतो.

त्या निरव शांततेत उगाच काहीतरी बोलावं म्हणून माझ्या तोंडून नाही ते शब्द बाहेर पडली. “मग आज काय करणार आहेस जेवायला?” झालंऽऽऽ (माझं मेलं असचं होतं बघा, माझं सुख मलाच पहावल्या नाही जात.)

तितक्यात क्षणभराच्या शांततेअंती किचन मध्ये ताट पडलं आणि त्याचा खणखणाट “आता बसं झालं किती वेळ वाचणार आहेस तो वाचुन झालेला पेपर.” असे काहीसं न बोललेलं वाक्य माझ्या कानावर आपटलं.

घरंगळत सोफ्याकडे येणार ताट बघून, ते अजून खणखणू नये, म्हणून मी ताडकन सोफ्यावरून डाय मारण्यासाठी तसाच ढोपरावर पडलो आणि साष्टांगदंडवत करत मुंडी खाली, दोन्ही हात पुढे करून त्या ताटाला कसंबसं पकडलं. निर्णायकक्षणी बॉण्डरी पार करणाऱ्या बॉलचा झेल घेण्यासारखा तो आनंद घेत असतांना, आपण आपली विजयी बत्तीशी मुद्रा वर करून पाहावं आणि अंपायरने नोबॉलचा सिग्नल द्यावा; अशी माझी रौद्ररूपी रणरागिणी, एक हाती कढई अन एक हाती झाऱ्याने माझ्या दंडवतला आशीर्वाद देत माझ्या पुढ्यात उभी होती.

“येथेच्छ लोळून झालं असेल, तर स्वयंपाकाच बघतो का?, आज तुझा दिवस, तुझं किचन. तरीही चहा-पान, नाष्टा मी केलाच.” भिक्षापत्रात मालकाने नाणं फेकावं आणि ते खाड्कन उडून भिकाऱ्याच्या डोळ्याला लागावं, असं ते वाक्य मला लागलं.

तुम्हाला म्हटलं ना, माझं सुख मलाच पाहविल्या जात नाही. असचं हिच्या कोण्या एका आजारपणातल्या दिवशी, डॉक्टरीण बाई समोर फुशारकी मारतांना मी हिला “आता दर सुट्टीच्या दिवशी मी स्वयंपाक करत जाईल आणि तू पूर्ण आराम करायचा.” असा उगाचच शब्द देऊन बसलो होतो. ती एक सुट्टी सोडली तर अश्या कैक सुट्ट्या संपाच्या पुरात वाहून गेल्या; तरी मी माझ्या अंगातला संप काही झटकला नाही.

“मग करतोस ना, आज दालबाटी.” तिची ती विषारी नजर वाचवत, शेवटी स्वतःची होणारी अवहेलना थांबण्याच्या निर्धाराने, प्रचंड त्वेषाने चिडचिडून उठलो आणि खांद्यावर रजनीकांत स्टाईल किचन नॅपकिन टाकत निमूटपणे स्वयंपाकाला लागलो.

“आता चिडणार तरी कोणावर” म्हणून मी कणकेला तुडतुड तुडवीत गुद्दे घातले, कोंथिबीरीवर सपासप सुरी चालवली, आलं-लसणाची ठेचाठाची केली आणि शेगडीवर जाळपोळ सुरू करून; मी माझा संप अखेरीस पुर्णतः माघारी घेतला म्हणून स्वतःच स्वतःला घोषित केलं.

संपाची सांगता केलेल्या या दालबटीची कृती तुमच्या सर्वांसाठी अगदी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो.

गव्हाचे जाडसर दळलेले पीठ ४ वाटी घ्या, जाडसर पीठ नसेल तर त्यात ३वाटी गव्हाच् पीठ आणि १ वाटी रवा घ्या. त्यात थोडे जिरे, ओवा, मीठ आणि चिमूटभर सोडा (नसला तरी चालेल) टाकून, हाताने व्यवस्थित मिक्स करा. आता त्यात तुपाचं कडकडीत १ वाटी मोहन (लहानपणी हा मोहन मला मदनचा भाऊ वाटायचा) टाकून पीठ चांगले एकजीव करून घ्या. (कोणी कोणी लाडू वळता येईल एवढ तूप टाकतात) आणि यात थोडं थोडं पाणी टाकून घट्ट कणीक मळून, अर्धातास कपड्याने झाकून ठेवा.

कणकेचे छोटे छोटे गोळे करून, ह्यापुढे तुम्ही तीन-चार वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही बाटी तयार करू शकतात, ते पुढील प्रमाणे आहेत तुमच्या सोयीनुसार तुम्हीच निवडा

१. वाफाळून घेतलेलं गोळे तुम्ही चुलीत भाजून घ्या. आणि तुपात बुडवून खायला घ्या. या प्रकारच्या बाटी चवीला सर्वात रुचकर लागते.

२.बाटी चे गोळे वाफाळून घ्या आणि त्याचे काप करून तुपात किंवा तेलात खरपूस तळा. मस्त कुरकुरीत लागतात. ढेरीचा विचार करणाऱ्यांनी ह्या फांद्यात पडू नये. तुम्ही तिसरा प्रकार अवलंबवावा.

३. बाटी चे गोळे न वाफाळता सरळ ओ.टी.जि मध्ये तूप लावून बेक करून घ्या. ह्या प्रकारात वेळ आणि कॅलरी दोन्ही वाचतील, आणि चव पण उत्कृष्ट लागते.

४. बाटीचे गोळे न वाफाळता, एका मोठ्या उथळ जाड बुडाच्या पातेल्यात अर्धी बाटी बुडेल एवढे तूप टाकावं आणि त्यात बाट्या ठेवून झाकावं. बाट्या एकीकडून व्यवस्थित खरपूस तळल्या की त्या दुसऱ्या बाजूवर पलटाव्या.

माझी या चारही प्रकारातल्या दालबाटींवर येथेच्छ ताव मारून झाला आहे आणि चारही प्रकारात याची चव वेगवेगळी आणि उत्तमच लागते. यापेक्षाही अजूनही काही वेगळ्याप्रकारे होतं असेलही….. तुम्हाला माहीत असेल नक्की कळवा.

ही झाली कृती, आता यापुढे माझी दैनास्थिती…..

एकदाची बाटी तयार झाली आणि मी पान लावून सोफ्यावर पेपर वाचत आडव्या झालेल्या माझ्या रणरागिणीला महाप्रसादसाठी आवाहन केलं.

शुध्द साजूक तुपात बुडवलेल्या बाट्या, गोड-आंबट-तिखट असं त्रिसूत्री वरण, वांगे बटाट्याची चमचमीत भाजी, थंडगार दही कोशिंबीर आणि सोबतीला पातीचा कांदा. असं महाप्रसादाच पान वाढलेलं बघूनही देवीच्या श्रीमुखातुन ‘वाऽऽऽह! वाहऽऽ!’ म्हणायच्या पहिले, “ते ठेचा करायचं विसरलास वाटतं” हे खडूस वाक्य नाक आखूड करत बाहेर पडलं. तुम्हाला म्हणून सांगतो डोळ्यात टचकनऽऽ पाणी आलं हो माझ्या….किती हा छळ म्हणावा. मी बिचारा तसाच खांद्या ऐवजी चुकून माझ्या आसुसलेल्या कानावर नॅपकिन मारत, “जो हुकूम मेरे आका” म्हणत परत किचन मध्ये शिरलो.

मिरच्या तव्यावर टाकून, मी भोळ्या आशेने देवी प्रसन्न झाली का म्हणून परत माघारी आलो. तर “तुमचे मिस्टर तुमची किती काळजी घेतात, किती नशीबवान आहात तुम्ही.” हे डॉक्टरीण बाईने (मी मारलेल्या फुशारकीवर) दिलेल्या प्रतिसादाची हिने मुद्दामहून पुरावृत्ती केली आणि कुत्सितपणे माझ्यावर नजर टाकत म्हणाली, “मग बोलूयात का तुझ्या लाडक्या डॉक्टरणीला जेवायला.”

मी मात्र ऐकलं का न ऐकल्या सारखं केलं आणि मोठ्याने, “अरऽऽऽर मिरच्या लागल्या वाटतं.” म्हणत किचनकडे पळालो. ते थेट महाप्रसादाच पान उचलायलाच बाहेर आलो.

शेवटी शुधा तृप्तीअंती (मी महाप्रसादाच पान उचलताना) माझ्या रणरागिणीने मनाचा मोठापणाचा ढेकर देत; आपला उजवा हात उंचावून मला आशीर्वाद दिला.

“जिते रहो….. सदा खिलाते रहो”

मंगेश उषाकिरण अंबेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.